गजऱ्याचा वेडेपणा


परवा परड्यातल्या झाडीत 
जाईची फुले वेचताना 
तू माझ्यासाठी पाठवलेला सुगंध भेटला 
तुझे श्वास घेऊन आला तो माझ्याजवळ 
म्हटलं चला …… 
मिळेल तितका सुगंध वेचू पदरात
लयीत चालणारे श्वासाचे गाणे ओळखीचे , हक्काचे होते 

ती जाईची फुलही तशी सुंदरच होती 
म्हटलं लांबसडक वेणीला दिसतील शोभून  
म्हणून त्यांना विचारलं … माळू का तुम्हाला ?

तुझा वाऱ्यावर हेंदकाळणारा सुगंध कस्सला रे चालू ????
भराभर सगळ्या फुलांवर जावून बसला 
शेवटी तो सुगंध माझ्यासाठीच होता ……. 
कित्ती कित्ती वेळा ओंजळीने हुंगले त्यांना मी सांगू ……. 

त्यांना घेऊन सगळ्या परड्यात एकटीच नाचले 
दाखवलं …… सगळ दाखवलं त्याला 
तुझ्यासाठी फुलपाखराच्या पंखावर 
जपून ठेवलेले रंग ,
मातीत लपवून ठेवलेला पावसाचा गंध 
आपल्या दोघांचा आवडता तो एकच तेजस्वी तारा 

नुकतच अंकुर फुटलेलं 
सुर्याच पाहिलं पहिल वहील किरण 
तुझ्या रात्रीसाठी जपून ठेवलेला 
ढगाआडचा भाकरी एवढा चंद्र  

पण एक सांगू ??
भारीच आगाऊ निघाला जाईचा सुगंध 
गजरा माळला वेणीत तर एक एक फुल निसटत गेल 
घरभर विखुरली सगळी वेल माझी 
आई विचारात होती …… 
"आख्ख घर दरवळतय. काय ' अहो '  नि पाठवला कि काय हा गजरा ?"
आता किती आणि कुठे कुठे गोळा करू मी तुला ?

बर ऐक ना …… 
ओंजळीने गालाजवळ आणत तुझ्या जाईला विचारलं मी 
"ए सांग ग … किती आठवण काढतो तो माझी ?" 
त्या शुभ्र पांढऱ्या फुलानाही रंग चढायला लागला 
मी ही त्या रंगात भिजवून घेतलं स्वतः ला 

आणि असेच मैफिलीचे रंग चढत असताना 
अचानक …… 
घुंगराची लय चुकावी तशी भानावर आले 
दार कुणीतरी वाजवल माझं 

इतक्या अलगद कोण ठोठावेल माझ दार ?
अरे देवा !!!!!!
नशीब , गजऱ्याचा वेडेपणा आईला नाही सांगितला मी :)

दारात चक्क तू उभा 
नेहमीप्रमाणे  , माझ्यासाठी मोगऱ्याचा , जाईचा गजरा घेऊन 
"सौ . बघ आलो मी " म्हणत गालात हसणारा 
कस सांगू रे तुला ?
एक महिना … 
एक महिना वाट पाहतेय तुझी 
३०  दिवस तुझे श्वास ह्या जाईच्या फुलात शोधले
आणि आज ते मला तुझ्या ओंजळीत सापडले