रघु - भाग ३

रघु - भाग १

रघु - भाग २




नवीन घराच्या वास्तुशांतीचा मुहूर्त होता त्या दिवशी . सगळ अगदी साधेपणाने चालू असलं तरी लगबग ही होतीच . गंगा आजी एका कोपऱ्यात बसून इलाश्याच्या बायकोला सगळ्या रिती सांगत होती . घर उभं करण्या आधी इलाश्याने एक गायही घेतली होती . याच कारण एकचं, रघुला घरचं ताजं ताजं दुध मिळावं . नवीन घराच्या परसदारी त्या गायीचा गोठा . 

सगळी पूजा - अर्चा  आटोपल्यावर गंगा आजीने इलाश्याच्या बायकोला गायीचा नैवेद्य भरायला सांगितला . केळीच्या पानावर एका बाजूला तूप भाताची मुदी , वरून जाडसर वरण , सुगरणीच्या हाताच्या कापसाहून मऊ लुसलुशीत पुरण पोळ्या , बेदाणे घालून केलेली शेवयाची खीर , तोंडी लावायला आंब्याच लोणचं , आमसुलाची चटणी , पापड , नेहमीप्रमाणे नैवेद्यात ठरलेली बटाट्याची भाजी , जोडीला मटकीची उसळही , काकडीची कोशिंबीर …… अगदी व्यवस्थित नैवेद्य भरला होता तिने . कुणालाही जेवायला बसायची इच्छा व्हावी असा जेवणाचा बेत. 

एका हातात नैवेद्याचं पान अन दुसऱ्या हातात पळीपंचपात्र , डोक्यावरचा पदर सावरत ती गायीचा नैवेद्य घेऊन जायला निघाली. पायऱ्या उतरून खाली आली तोच तिच्या लक्षात आलं की तिने चुलीवर दुध गरम करत ठेवाल होत . आल्या वेगानेच ती परत चुलीजवळ धावली पण ती जायीतोवर निम्म्याहून जास्त दुध उतू गेल होत . गंगा आजी समोरच बसली होती पण तिने भांड उचलून बाजूला केलं नाही . का ? हे रघूच्या आईलाही कळेना . 

शेवटी तिच्या चेहऱ्यावरच्या   प्रश्नाचं उत्तर देत गंगा आजी म्हणाली "पोरी नवीन घर बांधल आहेस . नवा संसार आहे . ज्या चुलीने इतका गोड घास दिला पहिले तिला तृप्त करावं . कधी काही कमी पडत नाही . आणि तसही शुभ कामावेळी दुध उतू जाण चांगल असत असं म्हणतात . काहीतरी चांगली बातमी घेऊन नशीब तुझी वाट बघत बसलंय " . रघुची आई नुसतीच हसली . तिला हे सगळ मनापासून पटलं होत आणि मनातल्या मनात देवाचे आभार मनात होती . 

घरात जेष्ठ व्यक्ती असण याच कारणासाठी महत्वाच असत . या अशा गोष्टी फक्त त्यांनाच माहित असतात . आपण जितका आपल्या भल्याचा विचार करतो त्याहूनही जास्त ही मोठी लोकं आपल्यासाठी प्रार्थना करत असतात . असं म्हणतात की आई बाबाची पुण्याई मुलांच्या कमी येते हे कदाचित खरंच असेल आणि ते ही यामुळेच . 

उतू गेलेल्या दुधाकडे समाधानाने पाहत नैवेद्याचं ताट हातात घेऊन ती गायीच्या गोठ्याकडे निघाली . गाय , गोठा , ताजं दुध या सगळ्या गोष्टींची किमया फक्त त्यालाच कळते ज्याने ती अनुभवली आहे . सकाळी सकाळी ऐकू येणारा गायीचा हंबरडा , तिच्या शेणाने रोज सरावल जाणार अंगण , त्यावर उठून दिसणारी ती सुरेख , देखणी , पांढरी शुभ्र रांगोळी . गायीला चारा घालताना तिच्या डोळ्यात दिसणारा आपलेपणा , प्रेम . रोज दुध काढताना तिच्याशी चाललेल्या गप्पा , अंघोळ घालताना पाठीवरून हात फिरवल्यावर एक वेगळ्याच प्रकारे हलणारी तिची त्वचा ……सगळ अगदी जवळून पाहील्याशिवाय न उमगणारी गोडी . तिला थोड्या दिवसांनी जनावर म्हणायलाही जीभ धजत नाही इतकी मिसळून जाते ती आपल्या कुटुंबात . कुटुंबाचा एक सदस्य बनून जाते 

याचं गायीला  रघुची आई रोज चार घालायची . ती खाई तोवर मायेने पाठीवरून हात फिरवत रहायची .देत होती  रघूची आई चारा घेऊन येताना दिसली की ही गाय हंबरायला सुरु करायची . पण आज चित्र वेगळच होत . रघुची आई येताना दिसली तरी तिने तिच्याकडे पाहून अगदीच दुर्लक्ष केल्यासारखी मान वळवली . कारण काय समजावं म्हणून नैवेद्याचं ताट हातातच घेऊन रघुची आई गोठ्यात पाहण्यासाठी खाली वाकली आणि तिने जे काही पाहिलं त्यानंतर तिला काहीच सुचेना . 

महिन्या  - दीड महिन्याच एक गोंडस कन्यारत्न गायीच्या शेपटाशी खेळत गोठ्यातल्या भाऱ्यावर निवांत पडून होत . अन ती गाय तिला उन्हापासून आडोसा  
देत होती. कुणाचं होत ते बाळ , कुणी आणून ठेवलं काहीच समजल नाही .   

पण त्या दिवसापासून रघुला एक बहिण मिळाली - भद्रा … गोठ्यात सापडली म्हणून तिचं हेच नाव ठेवल गेल . बेटी  म्हणजे धनाची पेटी याचाही प्रत्यय आला इलाश्याला . घर , शेत  सगळ दुध दुभात्यान , धान्याच्या राशीने भरून गेल   

दोन्ही मुलं नावारूपाला आली . आता दोघे मिळून एक संस्था चालवतात . ज्या वयस्कर लोकांकडे त्यांच्या मुलांनी तोंड फिरवलं अश्या लोकांना आसरा म्हणून आणि ज्या लहानग्यांना आई वडील म्हणजे काय हे कळायच्या आधीच दुरावतात त्यांना कुटुंब म्हणून . 

माळावरच्या झोपडीच एका मोठ्या इमारतीत रुपांतर झालाय . आणि त्या झोपडीत जन्माला आलेला त्या इमारतीत जवळ जवळ पन्नास लोकांच कुटुंब चालवतो . गळ्यात एक डोरलं, पाठीचा ताठ कणा  आणि मनगटात बळ इतकचं सोबतीला घेऊन सुरु केलेल्या संसाराला समाधानाची फळ लगडलेली असतात . आता इलाश्या , त्याची बायको आणि गंगा आजी तिघे मिळून मुलांच्या प्रगतीची प्रार्थना करतात . 

।। इति श्री रघु कथा संपूर्णम ।।

:) 

तुम्हा सर्वाना आवडली असेल ही अपेक्षा …  





रघु - भाग २

रघु - भाग १


संध्याकाळची दिवेलागणीची वेळ  , पाऊस तर नुसता धो धो कोसळत होता . कोपऱ्यावर एक वयस्कर बाई कंदील घेऊन उभी .  पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडली आणि पावसात अडकली .  दूरवर एका झोपडीत तिला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला . पण कुणीही दिसेना .

झोपडीच्या एका फटीतून थोडासा प्रकाश दिसला . वात विझण्याच्या वाटेवर होती . हातातला कंदील वर करून तिले पाहायचा प्रयत्नही केला पण तेवढ्यात ती वाऱ्याशी भांडत इतका वेळ तग धरून बसलेली वातही विझली . काळाकुट अंधार , माळाच्या दुसऱ्या टोकाला एखाद्या कुत्र्याचा आवाज . बसं … बाकी कुणीच नाही .

म्हातारीला काय करावं सुचेना . पुढे जाऊन पहावं तर भितीने हात कापायला सुरु झाला . अन काही ऐकलंच नाही असं समजून पुढे रस्ता धरावा तर लेकराचा आवाज मागे तिला ओढत होता . बराच वेळ ती नुसतीच बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकत उभी राहिली . माळावरच्या भुताखेताच्या बऱ्याच गोष्टी आजवर ऐकल्या होत्या त्या वय झालेल्या कानांनी .  कुणी सांगावं खऱ्या असतीलही …… की खरंच कुणा तान्ह्या जीवाचा हंबरडा असेल हा .

शेवटी न राहवून तिने झोपडीच्या दिशेने पहिलं पाऊल धाडसाने उचललं . इवल्याश्या कंदिलाच्या प्रकाशात तिला पायाखालचा रस्ताही धड दिसत न्हवता . हळू हळू थोडा अंदाज घेत ती झोपडीच्या दाराजवळ येउन थांबली आणि बाहेरूनच आवाज दिला "कुणी आहे का आंत ??? का रडतंय बाळ इतकं ? " . पलीकडून कुणीही उत्तर देईना .

कंदील कानाजवळ येईल इतका वर करून तिने झोपडीचा मोडकळीस आलेला दरवाजा उघडला आणि सोमर हे पाहून ती दारातच थांबली . नुकतंच जन्माला आलेलं एक लेकरू अन त्याची माय एकमेकांना बिलगून बसले होते . त्या मुलाचा बाप म्हणवणारा गडी , लेकराला आणि बायकोला आडोसा देऊन उभा होता . कोसळणाऱ्या पावसापासून बचावं करत . तिघेही थंडीने कपात होते . त्या मुलाच्या अंगावर तर एक फाटकी चिंधी कापडही न्हवत . चार ठिकाणी ठिगळ लावलेल्या साडीच्या पदराने त्या माउलीचा त्याला कसबस लपेटून घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न सुरु होता .

म्हातारी हे पाहून हबकलीच . आजच्या जमान्यात कुणा तान्ह्याचा जन्म असाही होऊ शकतो ? जन्माला आल्या आल्या जगण्यासाठी लागणाऱ्या उबीसाठीही  संघर्ष करावा लागावा . कसलं नशीब घेऊन जन्माला घातलंय वरच्याने याला . पण पुढच्याच क्षणी ती त्याच्या जवळ गेली . अंगात घातलेलं स्वेटर काढून तिने त्या मुलाच्या अंगावर लपेटलं . हातातली काठी समोर उभ्या असलेल्या , म्हातारीकडे आश्चर्याच्या नजरेने पाहणाऱ्या बापाकडे दिला . वेदनेत कन्हनाऱ्या  त्या आईला आपल्या थरथरनाऱ्या हाताने आधार देत उभी केली . बाळाला कुशीत घेतलं आणि एवढंच बोलली "चला . माझ एवढ मोठ घर रिकाम पडलेलं असताना या मुलाला मी पावसात नाही सोडणार "

मुलाचा बाप तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला . ते पाहून ती म्हणाली "बाबा रे …… एका मुलाचा बाप आहेस आता तू . हात जोडून काय उभा आहेस . छाती आनंदाने भरून आली पाहिजे ." हा हात जोडून उभ राहिलेला ईश्वर म्हणजे  इलश्या. आई वडिलानंतर आयुष्यात पहिल्यांदा कुणासमोर तरी हात जोडून , मन खाली घालून उभा होता .   

म्हातारीने ईश्वरच्या लेकाला आपल्या घरी नेलं . कडकडीत पाण्याने अंघोळ घातली . आपलं वापरून मऊ झालेलं लुगड चारपदरी अंथरून त्यात त्याला गुंडाळून त्याच्या आईच्या कुशीत झोपवल . स्वतःचा पलंग त्या दिवसापासून तिने ईश्वरच्या बायकोला देऊन टाकला . " बाळ झाल्यानंतरच्या विश्रांती साठीचा पलंग आईने द्यायचा असतो . म्हणून हा माझ्याकडून तुला ग पोरी " म्हणत तिने न कळत एक नवीन नातंही जोडून टाकलं . 

 पेठ्यारात कुठेतरी जपून ठेवलेला एक सोन्याचा जुना तुकडा काढला . चमचाभर मधात बुडवून तिने त्या सोन्याच्या तुकड्याने बाळाच्या जिभेवर ॐ काढला .  म्हणे असं केल्याने बाळाच्या वाणीवर आयुष्यभर सरस्वती वास करते . :)  बाळाच्या तोंडात पाण्याचा पहिला घोट या म्हातारीने घातला म्हणून तिचं  नाव गंगा आजी

त्या दिवसानंतर जवळ जवळ २ वर्ष ईश्वरच कुटुंब गंगा आजीच्या घरीच राहत होत . ईश्वर आणि त्याची बायको दोघेही दिवसभर पाटलांच्या घरी कामासाठी जायचे . तेव्हा या गंगा आजीनेच सांभाळ केला त्याच्या मुलाचा . " रघु " हे नावही तिनेच ठेवलंय .   रघु - म्हणजे भगवान श्रीरामाचे कुटुंब . रघुच्या जन्मावेळी त्याचे माय बाप झोपडीत राहायचे म्हणून गंगा आजीने त्या श्रीरामाच्या कुटुंबातील गोंडस पिल्लाला रघु हे नाव दिलं .  

पुढे पाटलांच्या मदतीने इलश्याच गावात एक छोटस घरही झालं . रघु तेव्हा जेमतेम ३ वर्षांचा होता . गंगा आजीच्या हाते त्या घराच्या पायाभरणीची पूजा झाली म्हणून इतकी भरभराट झाली असं इलश्या  आणि त्याची बायको अजून सगळ्या गावाला सांगतात .   

क्रमशः ………  





रघु - भाग १

Anuvin-Siddheshwar03


पायातील पायतानाचा कर्र…. कर्र आवाज करत रघु घराबाहेरच्या कट्ट्यावर येउन बसला . तोंडाला लावलेला पाण्याचा तांब्या त्याने तो संपल्यावरच खाली ठेवला . एवढा मोठा कांदा एका बुक्कीत फोडून चुलीवरच्या गरम भाकरी सोबत खायलाही सुरु केला . 


हो...... पण रोजच्या प्रमाणे न चुकता पहिला घास गंगा आजीला . :)

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कधी खोट बोलत नाहीत . गंगा आजीचा तो सुरकुतलेला चेहरा सांगायचा त्या एका घासातल समाधान . 
इतका मोठा झाला तरी रघुच्या गालावरून हात फिरवत गंगा आजीने आजही कडकड बोट मोडली . अंधुक झालेल्या नजरेतूनही तिला रघुच्या कपाळावरची आठी दिसायची . त्याला असं बोट मोडून प्रेम करणं आवडायचं नाही .

म्हणायचा ……

"आज्जे कशाला माझ्या नावाने रोज बोट मोडतीस . त्या बदल्यात अजून एखादी भाकरी थाप माझ्यासाठी  . का थापू मीचं ? तुझ्या हातात आता कितीसा जीव उरलाय ?"
तो तिचा सगळा स्वयंपाक स्वतःच करून द्यायचा. हे असं रोजचं चालायचं . तिचं जेवण करून द्यायला तो दुपारी ११ च्या ठोक्याला तिच्या दारात हजर असायचा . अगदी न चुकता.

गंगा आजीची इतक्या मायेने विचारपूस करणारा गावातला हा एकटाच असावा . कारणही   होतचं म्हणा त्याला ……. 
अगदी २ दिवसांचा असल्यापासून गंगा आजीने त्याला जीव लावला . तेलाने चोळून अंघोळ , काजळाचा टिळा , रोज सायंकाळी त्या किलकिल्या डोळ्यांची , पिटुकल्या गोजिऱ्या रुपड्याची दृष्ट . .त्याला घातलेला पहिला वहीला धूप . उभ्या आयुष्यात त्याला मिळालेला एकुलता एक दागिना , गंगा आजीने दिलेला चांदीचा करदोडा

 शेजारी राहत असली तरी सख्ख्याहून जास्त माया लावली तिने . आई शेतावर गेली की त्याला स्वतःच्या घरी घेऊन येउन दिवसभर मायेने  रघुची काळजी घेणारी ही एकटीच . रघुला ना मामा होता न मावशी न कुणी जवळचा काका .  आजी आजोबांचा तर चेहराही न्हवत पाहीला त्याने कधी . तसे ते नुसते नावाचेच आजी आजोबा होते असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही .

इलश्या , रघुचा बाबा . खरतर त्याच नाव ईश्वर होत पण पाळण्यात नाव ठेवल्यानंतर त्याला या नावाने कुणीच हाक नाही मारली . " इलश्या " सोपं वाटायचं म्हणायला,  मग तेच नाव पडलं त्याचं .

या ईश्वरालाही टाकीचे घाव सोसावेच लागले देवपण यायला .

लेकाची, रघुच्या बाबाची,  थोडी पडती बाजू आल्यावर पोटाशी कवटाळणाऱ्या आई बापाने रघुच्या बाबांना घराचा अन गावाचा रस्ता कायमचा बंद करून टाकला .

गळ्यात एक डोरलं, पाठीचा ताठ कणा  आणि मनगटात बळ इतकचं सोबतीला घेऊन त्याच्या बायकोने  सासरचा उंबरा पुन्हा ओलांडला …… परत कधीही न ओलांडण्याच्या निश्चयाने  . पुढे पाऊल टाकताना तिने अन ईश्वरने एकदाही मागे वळून पाहिलं नाही . पुढचा रस्ता अवघड होता . मागचा कधीच तुटला होता.

रघुची आईचं म्हणून नवऱ्यापाठी इतक्या खंबीरपणे उभी राहिली . बायको इतर वेळी बायको असली तरी नवरा कोलमडून पडल्यावर ती आईच्या मायेने जवळ घेते याचा अनुभव इलश्याला या काळात बऱ्याच वेळा येउन गेला . 

एक लेकरू पोटात असताना उघड्या माळावर झोपडी बांधताना नारळाच्या झावळ्या ओढून आणणारी बायको पाहीली की  इलश्याच्या पोटात गोळा यायचा . आतड तुटायचं तिची अवस्था पाहून पण त्याच्यापुढे पर्याय न्हवता .तीन दगडांची चूल मांडून सुरु केलेला नवा संसार कुठवर काठाला जाईल याची काळजी कधीच नाही केली त्या माउलीने.उन्हाळ्यात निरभ्र आकाशात रात्रभर चांदण्यात काहीतरी शोधत जागी असायची . पावसाळ्यात पावसाच्या धारा पाहत आणि थंडीच्या दिवसात इलाश्याच्या कुशीत ऊब शोधत बिलगून रहायची   

पण म्हणतात तसंच झालं . . . वाईट दिवस जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगात निघूनही जातात . प्रश्न उरतो तो फक्त आपण कितपत तग धरू शकतो हाचं. 

माळावरच्या झोपडीतही समाधानाने राहणाऱ्या  इलश्याला गावच्या पाटलांच्या शेतावर काम मिळालं . आणि त्याच्या बायकोला पाटलांच्या घरचं . अंगात रग होती ती सगळी इलश्याने कामात ओतून दिली . पाटलांच्या माळ्याला फुलवायचं काम मनावर घेतलं होत त्याने . धुणी भांडी करायची सवय असल्याने त्याच्या बायकोलाही काहीच अवघड गेलं नाही  .डोक्यावर दिवसभर छत मिळालं हेच फार होत या दिवसात तिच्यासाठी .जोडीला काम संपवून घरी येताना पाटलीणबाई काही ना काही खायचं बांधून द्यायच्या . दिवसाही काहीबाही सुरूच असायचं त्याचं आणि सगळे पदार्थ चवीला हिला आणून द्यायच्या  . तिच्या पोटातल्या बाळाचा भुकेचा टाहोचं जणू ऐकू यायचा पाटलीनीला.

ईश्वर बाभळे . या आडनावाप्रमाणेच इलश्याच्या आयुष्याची कहाणी . जी बाळाच्या जन्मानंतर पार पालटली .
असं म्हणतात की काही मुलं आई बाबाचं नशीब तळहातात घेऊन जन्माला येतात .

पाहता पाहता नऊ महिने संपले

माळावरच्या झोपडीत जन्माला आला एक चिरंजीव .

कुमार . रघु ईश्वर बाभळे .

क्रमशः.......

View Facebook Comments