तूच माझा valentine





नमस्कार !!!

कदाचित तुम्ही मला ओळखत असाल . पण तरीही मी माझी ओळख करून देतोच … कसं आहे, ओळख असलेली बरी . कधीतरी अचानक तुमची अन माझी भेट झाली तर " तू कुणाचा रे ? " असं नको ना विचारायला कुणी

मी ( यांना नाव सांगू कि नको माझं) ……… जाऊ दे नाव कशाला हवंय तुम्हाला ???  मी माझ्या आईचं लाडकं पिल्लू आणि बाबांचा ठोंब्या . इतकीच ओळख माझी :) पुरेशी आहे ना ??  
वयानी थोडा लहानच आहे मी . तीन-साडेतीनच वर्षांचा आहे पण मला बडबड करायला आवडते .आईच तोंड दुखायला लागलय माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन म्हणून म्हटलं आज जरा तुमच्याशी बोलावं  .

मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे …… हो पण कंटाळणार नसाल तरंच बंर का . सांगू ??? 

आज मी एकदम खुश आहे …. म्हणजे किती माहित आहे का ? एवढा (…. ) या बॉल एवढा , नाही अजून जास्त त्या ……. ढगाएवढा… खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त  …… आभाळाएवढा . 

आता विचारा " का खुश आहेस ? " विचारा ना ……राहू  दे मीचं सांगतो तुम्हाला

गेल्या काही दिवसांपासून मला स्वतःलाच थोड मोठ झाल्यासारख वाटतंय . हो थोडंच बंर . जास्त मोठा झालोय असं सांगितलं तर लगेच एखादी गोष्ट सांग पाहू आम्हाला किंवा कविता म्हणून दाखव , तुझं नाव लिहून दाखवं अशी प्रात्यक्षिक करून घ्याल माझ्याकडून . म्हणून थोडं ..च मोठ झाल्यासारखं वाटतंय असं सांगतोय 

आता यालाही एक गोड गोड कारण आहे . दादा म्हणणारी बहीण आलीये ना आता मला . .
अहह… अहो नाही नाही माझ्या घरी नाही काही , माझ्या मावशीच्या घरी . कित्ती छोटी आहे माहिती आहे का ती ? तिला अजून दातच आले नाहीत . शू शू पण पँट मधेच करते ती .बोलताही नाही येत तिला . पण मी फोनवरून हाक मारली की काहीतरी बोलायचा प्रयत्न करते . मावशी म्हणते ती "दादा …. " म्हणते . असेल बुवा , फक्त मावशीलाच कळते तिची अ , उ ,आ ,ए  ची भाषा . हो पण ही डॉक्टर काकांकडून ही बहीण आणून बरेचं दिवस झाले आता . मी खुश असायचं कारण वेगळंच आहे हो …

आता मी दादा झालो म्हटल्यावर थोडं शहाण्यासारखं , मोठ्या सारखं वागलं पाहिजेच ना . तर आता मी मोठा झालोय . त्यामुळे मोठ्या दादासारखं वागायला पाहतोय . स्वतःच्या हाताने पोळी भाजी खातो . चमच्याने भात खातो ( अहो हाताने खाल्लं की माझ्या टीचर स्पूनने खायला शिकवतात ना म्हणून ) . काल आईला सांगितलं संत्र्याचा ज्यूस नको करत जाऊ आता . मी सोलून खाईन आपल्या हाताने . :) 

शाळेतही  माझ्या माझ्या सायकल वरून जातो . ती सायकल हो …… त्यावर उभं राहून एका पायाने चालवायची असते ती . माझ्या शाळेत सगळे फ्रेंड्स अशीच सायकल घेऊन येतात . पाठीला दप्तर लावून बर्फातून वाट काढत काढत सकाळी सकाळी शाळेत जायला मज्जा येते . आई माझ्या कडेकडेने रस्ताभर पळत असते तेव्हा खूप गोड दिसते . 

मी आणि माझा बाबा तसे आम्ही रोजच एकत्र बाहेर पडतो जायला पण बाबा  ऑफिस ला जातो आणि मी शाळेत . दोघेही सायकलवरूनच . बाबाची सायकल मोठी आहे . बाबाएवढीच. कधी कधी मलाही फेरी मिळते या सायकलची पण फक्त सुट्टी दिवशीच . 

पण आज काय झाल माहित आहे ??????  माझा बाबा त्याची सकाळची ऑफिसची मिटींग रद्द करून माझ्यासोबत शाळेपर्यंत आला . म्हटला "चल , आज रेस लावू दोघे . कोण पहिला येईल तो मोठा . " 

कित्ती बरं वाटलं मला . खूप खूप वेगात चालवली आज सायकल मी . बाबाला हरवायचं होत ना . इतका मोठा आहे माझ्यापेक्षा पण माझ्या इतकी वेगात नाही चालावता येत त्याला त्याची सायकल . फार मागे पडला होता माझ्या . आणि मी पहिला पोहोचल्यावर मागे उभा राहून जोर जोराने टाळ्या ही वाजवत होता :)

बाबापेक्षा पुढे गेल्यावर मला खूप मस्त वाटल , कळल जिंकल्यावर कित्ती छान वाटत ते . …… मावशीने बाळ आणल्यावर वाटलं होत त्यापेक्षाही जास्त …

तेवढ्यात  मला काहीतरी आठवलं …… रात्री आई बाबा valentines day की काय असं काहीतरी बोलत बसले होते . मला काही फारसं कळल नाही त्यातलं पण मी आईला विचारलं " valentines day म्हणजे काय ग आई ?  काय करायचं असत ? " मग तिने मला हेच सांगितलं की जर आपल्याला कुणी खूप खूप आवडत असेल म्हणजे कित्ती माहिती आहे का ?? त्या …. ढगाएवढ तर मग आपण त्याला सांगायचं की तू मला खूप आवडतोस आणि जर वाटलंच तर छान छान फुलं द्यायची ….   बस एवढंच  

माझ्या आई बाबांचा असा एक फोटो आहे माझ्या घरी … पाहिलाय एकदा मी . बाबा फार आनंदात दिसत होता त्या फोटो मध्ये . पण आज त्यापेक्षाही जास्त आनंदात दिसत होता आज . माझ्याबरोबरची रेस हरून सुद्धा . मला जरा गंमतच वाटली .

बाबा टाळ्या वाजवत होता तेव्हा मी धावत त्याच्याकडे गेलो . त्याच्या शर्ट ला धरून त्याला खाली ओढलं . आणि हळूच कानात सांगितलं  " बाबा …… तू मला खूप आवडतोस . तूच  माझा valentine. आज आपल्या दोघांचा फोटो काढू . " आणि एक गोड गोड पाप दिला .

कित्ती आनंद झाला म्हणून सांगू  बाबाला……. त्याने मला वर उचललं आणि आभाळभर गोल गोल गोल गोल फिरवल . कित्ती छान वाटलं . जणू काही मला आज उडताच येत होत त्या पक्षासारख . आभाळाला हात पोहोचतात का हे बघत होतो मी .

आणि गम्मत म्हणजे खरंच आज हात आभाळाला पोहोचला …… बाबाने वर उडवलं तेव्हा :)

माझा बाबा मला त्या आभाळाएवढा आवडतो……

या ३ वर्षात त्याने मला ३००० वेळा तरी सांगितलं असेलच कि मी त्याला कित्ती आवडतो ते …… पण आज मी पहिल्यांदा सांगितलं त्याला आणि आभाळातला पाउस त्याच्या डोळ्यात उतरताना पहिला . आणि आईच्या डोळ्यातून तो कोसळताना    :)

शाळेतून घरी आलो तर माझ्या खेळण्यांची टोपली गुलाबाच्या फुलांनी भरली होती . आणि बाबा ऑफिसला दांडी मारून घरी माझी वाट पाहत होता .  

View Facebook Comments