माणसांना जीव लावला … इतकाच दोष !!!


वीणा आली होती आज घरी . बऱ्याच दिवसांनी दर्शन झाल आज तिच . आपल्याच मुला बाळांत गुंतलेली असते हल्ली . आज आली तेव्हा थोडी सुकल्यासारखी वाटली . बाकी इतर वेळी वीणा म्हणजे अखंड बडबड हे गणितच मांडल गेलय पण तिला अशी सुकलेली पाहून मनात कुठेतरी खोलवर कळ उठली . एखादी गोष्ट फार मनाला लागल्याशिवाय इतकी शांत नाही होत ती . आणि एकदा का शांत झाली की तिला बोलती करायची म्हणजे एक दिव्यच पार पाडाव लागत .

हातातील सगळी कामं बाजूला टाकून मी तिच्या समोर येउन बसले . नजरेला नजर देण टाळतच होती जणू . खिडकीच्या गाजबाहेरचा वाहणारा वारा शून्य नजरेतून न्याहाळत होती . मीचं विचाराल तिला "चहा घेतेस का आल्याचा  ? बंर वाटत नाहीये का ग तुला ? " . 
तशी शून्यातील नजर एकदम भानावर आल्यासारखी हळुवार हसत मला म्हटली "मंदाताई , जोवर वारा आपल्या घरात वाहत असतो तोवर तो आपला . अन खिडकीचे गज ओलांडून बाहेर गेला की तो बाहेरच्या सोसाट्यात विरघळतो . आपलं शिंपल्यातील सजवलेलं अस्तित्व सोडून फुलाचा सुगंध पसरवायला का म्हणून बाहेर पडत असेल ? अन बाहेरच्या जगालाही अशी कितीशी गरज असते ग त्याची ?  "  

  मला तिचा रोख नक्की कोणावर आहे हे अजून लक्षात येत न्हवत . अगदी तिच्या प्रश्नाला तिच्याच वाक्यात उत्तर द्यावं म्हणून मी ही बोलले "अग , वाराच तो . घरी काय आणि बाहेर काय …. वाहत राहण आणि सुगंध पसरवण इतकच त्याच काम . या चार भिंतीत कोंडलेल शिंपल्याच अस्तित्व काय कामाचं ग ? वाहू दे कि त्याला त्याच्या मर्जीने . बाहेरच्या जगाचच म्हणत असशील तर , तसाही एका झुळुकीने कुणाचंच काही अडणार नसत . पण एखाद्या कोपऱ्यातील एखादी पोकळी असते जी ज्याची त्यानेच भरावी म्हणतात ."  तिच्या लुकलुकणाऱ्या नजरेतून जाणवत होत की तिच्या खऱ्या प्रश्नाला जरी अजून मी स्पर्श केला नसला तरीही तिला हवी त्या कोड्याची उकल मला पहिल्या गाठीत सुटलीये .  

त्यावर तिचा पुढचा प्रश्न " हो…. हे झालं वाऱ्याच आणि झुळूकीच गणित . जे तू सोडवलस. पण मंदाताई , लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीच ही असच असत ना  ग ? आई बाबांच्या प्रेमाच , शिंपल्याच अस्तित्व सोडून , संसार करायच्या ओढीन माहेरचा उंबरा ओलांडून आपण मुली सासरी जातो . आणि तिथे तिची कोणाला गरजच नसेल तर ? "  इतकच बोलून ती थांबली . पुढंच वाक्य बोलण्याआधी घशात आलेला हुंदका आवरण गरजेच होत . अन हा सारा मुक्याने कोसळणारा पाऊस माझ्यापासून लपवण्याचा एक निष्फळ प्रयत्न चालला होता बिचारीचा . 

तिच्या मनाला पडलेलं कोड या प्रश्नातच आलं लक्षात माझ्या . मी ही समजुतीच्या स्वरात सांगितलं "कशाला मनाला लावून घेतेस वीणा . ज्याला तुझी खरंच गरज आहे तो आहेच कि तुझ्या सोबत . तुझ्या साठी नेहमीच थांबलेला . कशाला हवय तुला अजून कुणी ? आणि अपेक्षाच नाही ठेवल्या की अपेक्षाभंगाच दुःख्ख  ही वाट्याला नाही येत ."

"मंदाताई , पण गुंतलेल्या मनाच काय ? इतक्या सहजासहजी सुटतात हे पीळ ? " ……… काय उत्तरं देणार होते मी तिच्या या प्रश्नाचं ? फाटलेल्या आभाळाला कुठे कुठे म्हणून ठिगळ लावायची ? कधी न कधी उघड पडणारच हृदय   

वीणाला मी गेली ८ वर्ष ओळखते . अगदी तिच्या कॉलेजपासून. दुसऱ्याला कधीही स्वतः होऊन त्रास न देणार व्यक्तिमत्व . आजच्या तिच्या बोलण्यावरून तिच्या लग्नानंतरची  ही ५ वर्ष झरझर डोळ्याखालून सरकली . माणसांना जीव लावला इतकाच काय तो तिचा दोष . 

लग्न होऊन सासरी गेली पण घरी आपलं म्हणणार कुणीच नाही . अगदी उंबऱ्यावरचं माप ओलांडतानाच डोळ्यात टचकन पाणी यावं इतकं जाणवलं तिला . बोलक्या स्वभावामुळे आणि भरल्या घराच्या ओढीमुळे सासरच्या गर्दीचा एक भाग व्हायचा तिचा नेहमीचा प्रयत्न . हो …… गर्दीच म्हणावी लागेल . प्रेमाने बांधलेलं असत ते कुटुंब आणि नुसतेच एका छताखाली कुठल्याही जिव्हाळ्या शिवाय जमा होते ती गर्दी . 

नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने वीणा सासरच्या मूळ घरापासून लांब राहते . तसं पाहील तर ८ दिवसांपेक्षा जास्त ती कधीच सलग नाही राहिली तिथे . पण आईच घर सोडून आल्यावर हेच आपलं सर्वस्व मानणाऱ्या वीणाला नवीन घरात एकरूप होण्यापासून कुटुंबात नसणारा जिव्हाळा आड येत राहिला .  आपुलकीने कधीच कुणी विचारपूस नाही करत तिची . तीच करत राहते जमेल तसे फोन घरी , तिची गरज म्हणून . भरल्या घरात वाढलेली मुलगी . आपल कुटुंब भरायला पाहते नेहमी आणि हाती पडते ती निराशाच . तिच्या आपलेपणाची परतफेड म्हणून ही जाऊ दे पण दुधावरच्या सायीलाही प्रेम उत्पन्न होऊ नये कोणाला ? याचंच आश्चर्य वाटत राहत नेहमी तिला . 

हृद्य पिळवटून टाकणार दुःख होवो नाहीतर गगनचुंबी आनंद , हे सगळ वाटून घेणार मोहन हा एकमेव व्यक्ती आहे तिच्यासाठी . मोहन …… तिच्यावर तिच्यापेक्षाही जास्त प्रेम करणारा तिचा नवरा . त्याच्याकडे पाहून ती हे सगळे वार हसत पेलत राहते . "बसं ……. प्रेमाचा हात त्याने माथ्यावर ठेवलाय म्हणून मी कुणा दुसऱ्याच्या प्रेमळ नजरेचीही अपेक्षा नाही केली कधी " वीणा नेहमी म्हणते . नजर लागण्याजोगा जोडा . 

हे त्या दोघांमधील प्रेम मला ओळखीच म्हणूनच मी विचारलं तिला  " वीणा …… मनाची इतकीच घालमेल होतेय तर बोल एकदा मोहनशी . बंर वाटेल तुला जरा . तुला समजावण्याची ताकद फक्त त्याच्याच प्रेमात आहे बघ "

"बोलले ग मंदाताई . तो तरी किती समजावेल मला ? आज इतकच म्हणाला ."
 "वीणा , कुणाकडूनही अपेक्षा करणे नाही. तुला जे काही हवं असेल ते माझ्या जवळ माग . आणि तू तरी  अशी किती दिवस राहिली आहेस त्या घरी "

आता मलाही कळेना तिला वाईट काशाच वाटतंय ? प्रेम उधळणारा नवरा आहे की जोडीला . 

यावर तिने जे काही स्पष्टीकरण मला दिलं त्यातून मुलीला सासर कित्ती महत्वाच वाटत हे अजून एकदा कळल मला आज'. तीच म्हणन हेच

" मंदाताई , आपण लग्न कशासाठी करतो ? नवरा मिळावा म्हणून कि सासर मिळाव म्हणून ? मला नवरा तर मिळालाय …. पण सासर नाही . मी तरी अजून किती दिवस असं एकतर्फी प्रेम करत राहणार ? कुणाचही मन असो . प्रेमाच्या परतफेडीची अपेक्षा प्रत्येकाला असते. आणि मोहनच्या त्या एका वाक्याने मन चिरत गेलं ग माझं . 'तू तरी अशी किती दिवस राहिली आहेस त्या घरी ' . 

मंदाताई , मोहनसाठीच त्याच्या बरोबर त्याच्या सोबतच सावली सारखी फिरायेत ना ग मी ? आणि प्रत्येक वेळी प्रेम हे सहवासानेच उत्पन्न होण गरजेच नाही . मी नात्याने कुणीच नाही का माझ्या घरच्यांच्या ? शेवटी कसय …… मी मुलगी पडले ग . पुरुषांना असे प्रश्न फार सहज सोडवता येतात . भावनांचा गुंता त्याच्या जागी निसर्गानेच कमी जन्माला घातलेला असतो . मुलीने एकदा एखाद घर , एखाद माणूस आपलं म्हटलं की त्याची पाळमूळ फार घट्ट गेलेली असतात . प्रेमाचा हा गुंता इतक्या सहज सुटणारा नसतो . 

माणसांना जीव लावला इतकाच काय तो माझा दोष " 

मनातलं बोलून ती शांत झाली . डोळ्यातला पाऊस एव्हाना गालांच्या कोमलतेवर कोसळून रिकामा झाला होता . गजाआडच्या वाऱ्याच शिंपल्याच सजवलेलं अस्तित्व खरच खूप देखण आणि सुरक्षित असत . खिडकी बाहेरची वावटळ त्याला कधी पाचोळ्यासमान उडवून लावेल कुणी सांगू शकत नाही . फुलाच्या  सुगंधावर प्रेम करण हाच त्याचा गुन्हा !!!!!  




पण तो घरी नसतो तेव्हा ?

तो आहे ना . करेल तो , पाहील सगळ …… हे अगदी नेहमीचे शब्द . पण तो घरी नसतो तेव्हा ?

काहीतरी कारणाने एखाद्या दिवशी खरंच तो घरी नसतो …. घर खायला उठत राव !!!



सकाळपासून ३ वेळा तरी उघडलंच दार , माहीत आहे तो नाही येणार आज
पण मग पायऱ्या चढणाऱ्या त्याच्या पावलांचा कुठून आला आवाज ?
धुक्यापासून ते उन्ह डोक्यावर येईतोवर ८ फोन तरी झालेच की  हो करून
तरीही त्याचा तो आवाज मला असा का बसलाय घेरून ?
घर आज पहिल्यांदा इतक शांत शांत वाटतंय
२ दिवसांचाच तर प्रश्न , तरीही आठवणींच वादळ दाटतय

रोजच्या जेवणात ही आज केलाय फक्त वरण आणि  भात
कसय …… त्याच्याइतकं चवी - रवीच घरी कुणीच नाही खात
रोजच्या त्या स्पेशल डिश मागे माझा वेळ नाही पुरायचा
दिवसभर नवीन पदार्थांनी कसा स्वयंपाक कट्टा भरायचा
आज सकाळी अर्ध्या तासातच आटपल की हो दिवसभराच गाण
वाटतंय , उपाशी ठेवणार मला त्याच हे असं जाण :(

दिवस कसाही सारून जाईल , रात्र सरेल तर खरी
पिल्लू दाराशी उभारून विचारतंय "बाबा अजून कसे नाही आले घरी ?"
पंचाईत झालीये हो सगळी , बिचाऱ्याला खंर सांगताही येत नाही
मुसमुसू लागेल "जाताना बाबा मला का नेत नाही  ? "
कसातरी करून थांबवलाय … पूर डोळ्यात त्याच्या दाटलेला
डोळे बाबाच्या  वाटेवर , पतंग हातात धरून फाटलेला

रात्रीचा दुधाचा पेलाही थांबलाय बाबाच्या घोटासाठी 
अन कपाळावरचा गोड पापा , अजून जागतोय बाबाच्या ओठासाठी 
खेळून खेळून , घालून धिंगाणा , इटुकली पावलं शेवटी विसावली 
बाबाची चादर कवटाळून गच्च , गादीभर पसावली 
येईलच की २ दिवसात तो , समजावणार कोण या कृष्णाला
आठवणीने जीव कसा हा इतका कासावीस झाला  

घरी असतो तो …. कोपरा न कोपरा वसंतासारखा असतो जिवंत
सगळचं कसं थंडावलय आज , पहाटेच्या पहिल्या झुळुकीलाही त्याच्या नसण्याची खंत 
इतक्या पहाटे दारावरची बेल ????  तो एका दिवसातच आला परत ????
नाही रहायचंय एकट्याला मला …… म्हणाला टपोरे डोळे भरत    
तो आलाय ना , करेल तो , पाहील की सगळच ……. पुन्हा एकदा सावलीत त्याच्या शांत निवांत वाटलं 
अन हसर खेळत घर माझ , त्याच्या भरल्या डोळ्यात नटलं