मी दादा झालोय....

आई ही अशी एकच व्यक्ती असते जिला आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक …. अगदी त्याच्या रडण्याच्या स्टाईल पासून त्याच्या फुगणाऱ्या गालापर्यंत. त्यामुळे ही गोष्ट इथे लिहिताना मी ही एक अशीच आई आहे , जिला आपल्या पिल्लाच्या कौतुकाचा मोह आवरता आला नाही ……. असं समजायला काहीच हरकत नाही :)

खंर सांगायचं तर लिहायला बसले की मी कोणत्याही विषयावर लिहू शकते …… कोणत्याही या अर्थाने कितीही क्षुल्लक विषयावर …. ज्याचा तुम्ही आम्ही कधी इतका विचारही केलेला नसतो किंबहुना हे विषय अगदी सहजपणे दुर्लक्ष केलेलं असत .

प्रस्तावना आवरती घेत पोस्ट ला सुरुवात केलेली बरी , नाहीतर हे सगळ सुरुवातीलाच रटाळ वाटायला लागेल .

……….

……….


एका गुप्त आणि कुतूहलपूर्ण विषयावर पिल्लने आजीशी केलेली हितगुज ,  त्यांच्याच भाषेत लिहायचा हा एक वेगळा प्रयत्न  

दिवस … गणेश चतुर्थी
आजी …… आज आमच्या घरी गणपती बाप्पा आलेत राहायला . जर्मनी मध्ये आल्यापासून पहिल्यांदाच कुणीतरी राहायला आलाय घरी . खूप मस्त वाटतंय . तुझ्या घरी मी आल्यावर जितके लाड तू माझे करतेस तेवढेच लाड आई ही करतेय बाप्पाचे . मोदक काय , लाडू काय, खीर काय …. मज्जाच मज्जा  :) मी नी बाबा एकदम खुश . बाबा ने बाप्पासाठी भरपूर गुलाबांचा गुच्छ आणलाय …… कसल्ला मस्त वास सुटलाय म्हणून सांगू तुला घरात … ये की ग तू ही इकडे एकदा …
बर ऐक ना …… तू एकदा म्हणाली होतीस आठवतंय ? तुला काय हवं असेल तर बाप्पा कडे माग . तो सगळ देतो आपल्याला . मी सकाळ पासून विचार करतोय , काय मागू याच्याकडे ? काही सुचतच नाहीये बघ लवकर .

दिवस …… गणेश चतुर्थी चा तिसरा
आजी , रात्रभर विचार करून मी आज ठरवलंय बाप्पा कडे काय मागायचं ते . जे मी फक्त तुला सांगेन . बर नको , बाबा ला ही सांगतो . तो ही मला फार आवडतो . आज सकाळची आरती झाल्या झाल्या बाप्पा समोर डोक टेकून मी सांगणार आहे …. आम्हाला एक बेबी हवंय . :) देईल काय ग तो ? डॉक्टर काकांसारखा याच्याकडे ही असेल का फ्रीज बाळांनी भरलेला ?

दिवस …. गणेश चतुर्थी चा पाचवा
अग आज गंमतच झाली बर का ……. आमचे बाप्पा पाहायला माझा जर्मनीतील एक मित्र आणि त्याचे आई बाबा आले होते . आरती झाल्या झाल्या मी ठरल्या प्रमाणे बाप्पा कडे बेबी मागून घेतलं . डोक टेकून नमस्कार केला आणि त्याला सांगितलं "बाप्पा , आम्हाला एक बेबी दे " … आणि काय झाल काय माहित ? सगळे एकदमच शांत झाले . नंतर माझ्या मित्राचे आई बाबा , माझ्या बाबाकडे बघून हसत होते. बाबा कडे पाहिलं तर तो भुवया उंचावून हसत हसत काहीतरी आईला विचारात होता … आणि आई , बाबाकडे डोळे मोठे करून बघत होती . अग तिला सवयच आहे , मी भात नाही खाल्ला की माझ्याकडेही अशीच डोळे मोठे करून पाहते . बाबा प्रसाद खाणार नाही म्हटला असेल म्हणून डोळे मोठे केले असतील कदाचित तिने …… जाऊ दे , मी माझ्या मित्राला ही सांगितलं तू ही मग बाप्पा कडे हवं ते . देईल तो . त्याने चॉकलेट मागितलं . वेडाच आहे … ते काय बाबा कडूनही मिळेल        

मार्च महिना -  तारीख २०
आई आज फार दमल्या सारखी वाटत होती ग …. कदाचित बर नाही वाटत आहे तिला . बाबा आज असं का सांगत होता ? पिल्ला आता आई ला त्रास नको देऊ . एकटा झोपायला शिक . माझ्या हाताने भरवेन ह मी तुला भात , खायचा पटकन . मला शाळेत सोडून कदाचित ते दोघे डॉक्टरकडे गेले होते . मी औषध पहिली टेबलवर . माझ्यासाठी घेतो का हा बाबा सुट्टी ? आई साठी बरी घेतली लगेच आज . मोठी आहे ती . कित्ती काळजी करतो तिची .

मार्च महिना - तारीख २७
आई चा वाढदिवस आहे का ग आज ? नाही ना. झाला की काही दिवसांपूर्वीच  …… मग बाबाचा ? त्याचा ही नाही . त्याचा अजून खूप लांब आहे म्हणे . माझा असेल मग :)
माझाही नाही …… मग बाबाने केक का आणला आज ?
असंच …….बाबा असंच कधी केक नाही घेऊन येत . दुसर काहीतरी आणतो माझ्या आवडीच . मला केक नाही आवडत ग .
आई खूप छान दिसत होती आज . बाबा तिला जवळ घेऊन बसला होता . दोघे काहीही बोलत न्हवते पण मला Thank you म्हणाले . मी काय केल ग ?

एप्रिल महिना
आज आई मला ही घेऊन गेली होती दवाखान्यात तिच्या बरोबर . डॉक्टर विचारात होते मला …. तुला कुणाशी खेळायला आवडेल ? Boy की  Girl ???
मी बोललो नाही काही … पण संध्याकाळी आल्यावर बाबाला सांगितलं . Girl ला फुटबाल नाही खेळता येत . आई कशी तिरकी मारते . मला boy शी खेळायला आवडत .  तू कसा मस्त खेळतोस माझ्याशी . तुझा ball लांब पर्यंत जातो

मे महिना - तारीख ४
अग आजी , मी आणि आई तुझ्याकडे येतोय . बाबा कसा काय तयार झालाय आईला सोडून राहायला काय माहित ?   तो तिला सोडून राहत नाही कधी एकटा .  पण मला एकदम छान वाटतंय . तिकीट ही बुक झालाय आमचं Sunday च .
आई रात्री बाबाला समजावत होती …. नीट राहा , लवकर या मी वाट पाहतेय , पिल्लाची काळजी करू नका  वेळच्या वेळी जेवत जा . जास्त खाऊ नका बाहेरचं , पोट बिघडेल . औषधांची पाकिटे वरच्या डब्ब्यात ठेवली आहेत . बंर वाटत नसेल तर मला फोन करा, मी सांगेन कुठली घ्यायची गोळी . आजारी पडू नका …  वगैरे वगैरे. मला फार बओर झालं . झोपलो जाऊन मी आत एकटाच .

मे महिना - तारीख ८
अग आजी , जर्मनीच्या डॉक्टरनी आमचं बेबी चुकून तुझ्या इथे पाठवलय म्हणे . ते घ्यायला आम्ही येतोय इंडियाला . बाबानेच सांगितलं मला सकाळी अंघोळ घालताना . गेल्या  महिन्या पासून सगळ तोच करतो माझं….
आई शपथ , काय मस्त आहे हा बाप्पा …… :)    मागितलं की खरंच देतो . पण अड्रेस चुकला बहुतेक :) असो , आम्ही येतोय

 
मे महिना - तारीख १०
आलो की ग तुझ्या घरी मी …. तुझ्या इथे राहायला आवडत ग मला पण झोपणार मी माझ्या मम्माजवळच . शेजारच्या राऊला मी सांगितलं बेबी घेऊन जाणार आहे आम्ही परत . तर तो म्हणाला लगेच नाही मिळत ते . पोटात असत मम्माच्या भरपूर दिवस लागतात म्हणे …… वेडा आहे ग तो … आपल्या गणपती बाप्पा ची ओळख नाहीये त्याची .

जून महिना
आजी , नको न खायला घालू मम्मा ला इतक . तिचं पोट बघ मोठ मोठ होतंय . तिला आवडत नाही पोट मोठ झाल्यावर . बाबाला ओरडायची ती . सूर्यनमस्कार घालायला लावायची . सांग तू ही तिला घालायला .

तुझ्या इथली नवी शाळा खूप सुंदर आहे ग . मला नवीन मित्र मिळाले . पियुशा , माझी शाळेतली मैत्रीण ग …. सांगत होती तिच्याही आई ने बेबी बॉय आणलाय . म्हणे पोटातून बाहेर येत ते . दिवसभर मैत्रीणीना ती हेच सांगत होती . बाळ असं रडत , असं झोपत , दुध पीत . या मुली फार बडबड करत असतात स्कूलमध्ये . मी उद्या नाव सांगणार आहे टीचरना

जुलै महिना
अग आजी , आज आपण ज्या डॉक्टर काकांकडे गेलो होतो ना त्यांच्या फ्रीजमधुनच आणलय म्हणे मम्मा ने मला. त्यांना भेटायचं होत मला म्हणून घेऊन आलीये ती आज मला इकडे . अग , खरच खूप छान आहेत हे काका . मस्त गप्पा मारत बसले होते माझ्याशी . पेरूही दिला त्यांनी मला खायला . त्यांच्या झाडाचा आहे म्हणे . गोड आहे .
आणखी एक गम्मत आहे … अग , ती पियुशा खरंच सांगत होती वाटत . बाळ पोटात असत . डॉक्टर काकांनी दाखवलं मला आज स्क्रीनवर . अजून छोट आहे म्हणे . दिवाळीला देतील आपल्याला . तोवर मोठ होईल . आजी ……. आपल बाल काळ आहे वाटत ग …. स्क्रीनवर तसच दिसत होत मला . मी विचारलं तर काका खूप हसत होते मला .  

ऑगस्ट महिना - तारीख २२
आज बाबाचा वाढदिवस आहे . लक्षात आहे ना आजी तुझ्या ? कि विसरलीस .
बाबाने केक आणला नाहीये . तो इकडे आला की आम्ही दोघे जाणार आहे त्याचा केक आणायला . मी विचारलं त्याला "बाबा , तुला काय गिफ्ट हवंय ? सांग …. मी देतो तुला लग्गेच . " तो म्हणाला "माझ्या पिल्लाचा एक गोड गोड पा …" दिला मी :)
आणखी एक बाळाच्याही वाटणीचा
आईचा देऊ का विचारलं तर म्हंटला " नको ,  मी घेईन तिच्याकडून तिचं तिचं गिफ्ट " . जाऊ दे ……. मला काय करायचं .
तो आल्यावर एक मस्त केक आणणार आणि मी तो कापणार … मेणबत्त्या फुंकायला खूप भारी वाटत मला :)


महिना सप्टेंबर
कस्सला भारी गणपती बाप्पा येतो ग तुझ्या घरी . माझ्या जर्मनीच्या घरी खूप छोटा होता . हा एकदम छान आहे दिसायला . पण याला बालगणेश का म्हणतात ? बाळासारखा दिसतो म्हणून ? आजोबा सांगत होते रात्री …. मी आलो होतो त्या वर्षीही बालगणेश आणला होता म्हणे आणि  या वर्षीही . आपण अजून एक बाळ आणणार ना म्हणून :)
मला खूप मोठे मोठे बाप्पा दाखवून आणले मामा ने . सुपाएवढे कान ,  मोठच्या मोठ पोट, लांबसडक सोंड आणि हातात एक मोदक …… मस्त .
दिसणाऱ्या प्रत्येक बाप्पाला मी Thank You म्हणणार आहे . मी मागितलं होत त्याच्याकडे baby . तो देतोय म्हणे आता दिवाळी पर्यंत .
बाबाने शिकवलंय . कुणी आपल्याला काही दिलं तर त्याला न विसरता Thank You म्हणावं :) . जर्मनीच्या ऑफिस मधले काका म्हणतात "तुझा बाबा एकदम छान आहे ." मी सांगितलं "मला माहितीये हे आधी पासूनच "    

आणि हो … Thank You तुलाही . इतका गोड नटवला होतास तू मला . खऱ्या खऱ्या कृष्णासारखा.  बाबाला खूप आवडलं . म्हणत होता "पुढच्या वर्षी आपण राधा ही नटवून घ्यायची आजी कडून :) " 

महिना ऑक्टोबर
अग अ आजी …… माझा वाढदिवस आहे आज . विसरशील बघ . तसं  मी या आधी बऱ्याच वेळा  झालीये , गिफ्ट ही आणून झालाय . बस्स , आज बाबाने पाठवलेल्या केक ची वाट पाहतोय . त्याने सांगितलाय, " पिल्लाचा आवडीचा केक आणि गिफ्ट पोहोचेल संध्याकाळ पर्यंत " .

आजी , आपल्या बाळाच्या वाढ दिवशीही आणू न आपण केक ? कसला आणायचं ग ? मला खायला देशील ना ? आणि हो …. माझे कसे दोन दोन वाढदिवस असतात बेबीचेही असतील ? एक तारखेने आणि एक दसऱ्याला :)

महिना नोव्हेंबर
आई फारच कंटाळली आहे ग …. माझा अभ्यासही नाही घेत रोज . होमवर्क शिवाय जास्तीच काहीच करून घेत नाही . म्हणे , बसायचा बसायचा कंटाळा येतो . आता हिने केला तर चालतो ग कंटाळा ? मी एक दिवस नाही म्हटलं अभ्यासाला तर ओरडते की लगेच . जाऊ  दे , सगळी मोठी लोकं अशीच असतात . बाबालाही सांगितलं तर तो ही आई ची बाजू घेतो नेहमी .
बरंय … डॉक्टर काका दिवाळीला बेबी देतील . ते माझ्या सारख छोटुस असेल . 

दिवस …… दिवाळी पाडवा
ये …… जिंकले , जिंकले …… :) आम्हाला डॉक्टर काकांनी एक गोड गोड बाळ दिलय. बेबी गर्ल …. मी दादा झालो . आर्य दादा ……. :)
हो , ती आता मला दादा म्हणेल . मी तिला मांडीवर घेऊन बसलो होतो . इवलुशे हात, इवलुशे पाय , काळेभोर डोळे , भरपूर केस . खूप खूप मस्त वाटतंय मला आज . गणपती बाप्पा ला आठवणीने Thank You  म्हटलं मी . बाबाने सांगितलाय ना .
बाळ आल्या आल्या पहिला फोन बाबाला केला . काहीच बोलायला सुचेना त्याला :) तो ही खूप खुश आहे .   
मी हाक दिली कि खूप गोड हसते बेबी गर्ल . मी तिला आवडतो  आणि मला ती :)