Bunk Bed आणि मी


Bunk Bed ... माझ्या पिल्लाला आईच्या लांबसडक केसांनंतर भुरळ पडणारी ही दुसरी गोष्ट .

हो .... म्हणजे जेमतेम २ च वर्षांचा असेल तो . फॅमिली ट्रीपवेळी  हॉटेलमध्ये राहण्याच्या निम्मिताने त्याने हा बेड पहिल्यांदा पाहीला आणि काय सांगू जवळजवळ तो त्याच्या प्रेमात पडला  :D .
ट्रीपच्या सगळ्या रात्री त्याने त्या वरच्या मजल्यावर झोपून घालवल्या . आईच्या कुशीतून बाहेर झोपायची साहेबांची पहिलीच वेळ म्हणायची ती .
आणि त्यानंतर थोड्या थोड्या दिवसांनी आजपर्यंत बाबांना करून दिलेली आठवण.... "बाबा , आपण आणायचा हा मला तो बेड . "

गालांवर खळी , लुकलुकणाऱ्या काळ्याभोर डोळ्यांत उगवून आलेला आनंद , गोल फिरून ऊंच मारलेली एक उडी आणि बाबांना मारलेली घट्ट मिठी.. हे सगळं तो थांबवूच शकायचा नाही जेव्हा बाबा म्हणायचे " हो ..... आणायचा हा !! नक्की आणायचा  . "

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे त्याचा ' तो ' बेड आज उंबऱ्यातून आत आणल्यावर पुन्हा एकदा तशीच गोल फिरून ऊंच उडी मारत त्याने बाबांना मारलेली मिठी . :) 
अनपेक्षित आनंद म्हणजे काय हे आज त्याच्याकडे पाहून कळलं . त्या एवढ्याश्या जीवासाठी हे सगळं आश्चर्यकारक आणि गुपित होत .


स्वतःची खोली , खेळणी , आवडीचा पलंग , अंथरून सजवण्यात कसा दिवस संपला हे कळलंही नाही त्याला . रात्रीच्या दुधासाठीची  आज कुठलीही टाळाटाळ नाही . स्वेटरसाठी आठवणही नाही करून द्यावी लागली .  
स्वारी कधी न्हवे ते १० च्या ठोक्याला गुडूप ....... त्याच्या खोलीत जाऊन झोपलाही ?? आईचं आवरण्याआधी ?? 

त्याला इतका निवांत झोपलेला पाहून मला एक क्षणासाठी खूप आनंद झाला .. हो , एकचं क्षणासाठी . आणि दुसऱ्या क्षणी अस्वस्थ व्हायला सुरु झालं. कारणं जशी त्याला माझ्याशिवाय झोपण्याची सवय न्हवती तशी मलाही त्याच्याशिवाय झोपण्याची न्हवती . थोड्या वेळासाठी वाटलं की त्याला उठवावं आणि सांगावं , चल बाबा , माझ्याच जवळ झोप तू . 

डोळ्यांत टचकन पाणी साठलं . आपलं मुलं मोठं होतंय हे स्विकारणं एका आईसाठी खूप अवघड असतं .

मुलं लहान असतात तोवर आईच्या अवती भोवती घुटमळतात . एकदा मोठी व्हायला लागली की त्यांचं हे घुटमळणं आपोआपच कमी व्हायला लागतं. आई त्यांना स्वावलंबी व्हायला शिकवते खरी पण त्यांचं ते स्वावलंबी झालेलं पाहून तिच्या काळजाला पडणारी घरं आजवर कुणालाही दिसली नाहीत . 
 त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून वाटलं ......आता पुन्हा येईल का माझ्या जवळ झोपायला की नाहीच येणार कधी ? डोळे उघडल्यानंतर आईला न शोधणाऱ्या नजरेइतका खरंच मोठा झालास ?

इतक्या दिवसांचं वाट पाहिलेलं स्वप्न उशाला घेऊन तो झोपला खरा पण मला काही डोळा लागेल . मी आपली ह्या खोलीतून त्या खोलीत रात्रभर येरझाऱ्या मारतं  जागी . कधी त्याची चादर सरळ करायला . कधी तो जागा झालाय का पाहायला . तर कधी मला शोधतोय का हे बघायला :) 
आईचं काळीज ...... आजवर कळलंय का कुणाला ते आज कळणार होतं.

डोळ्यात सारखं दाटायला लागलेलं पाणी कुणालाही दिसू नये या प्रयत्नातच अख्खी रात्र संपून गेली माझी .  

सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये काम करणाऱ्या माझ्या पाठमोऱ्या कमरेला बिलगत पिल्लाने  विचारलं  " आई, आता मी एकटा झोपायला लागलो मग मी मोठा झालोय ? " 
त्याच्या या प्रश्नाला हो म्हणावं की नाही हेच मला कळेना . नुकतीच बोलायला शिकलेली लहान मुलं "तुला आई आवडते की बाबा " या प्रश्नाने जितकी भांबावून जातात कदाचित त्यापेक्षा जास्त भांबावून बघत होते मी त्याच्या डोळ्यात .


 "आता मोठा झालास तू . शिक झोपायला एकट्याने " असं रोज सांगणारी मी , तो मोठा होतोय हे मान्यच करायला तयार न्हवते . जितक्या वेगाने माझा श्वास ही न्हवता त्यापेक्षा जास्त वेगाने विचारचक्र धावायला लागली होती माझी . 

आज एकटा झोपायला शिकला . उद्या एकटा एकटा अभ्यासही करेल . मग मला सोडून रहायलाही शिकेल .आणि एके दिवशी खरंच एअरपोर्टच्या पट्ट्याच्या अलीकडून त्याची लांब जाणारी विरळ होणारी आकृती मी हात उंचावून पाहात राहीन . :)  

किंवा  मग  

कदाचित परत आजसारखा तो तेव्हाही माझ्या कमरेला बिलगून विचारेल "आई मी मोठा झालोय ? " आणि मग त्यावेळी माझ्या त्या भांबावून गेलेल्या नजरेला उत्तर तोच उत्तर देईल "हो , मोठा झालोय खरा पण तुझ्यासाठी नाही. तुझ्यासाठी अजूनही मी तुझा पिल्लाचं आहे. " :)


मुलं मोठी होतात पण आई कधीच मोठी होत नाही . मुलाला जन्म दिल्याक्षणी आई म्हणून तिचं जे वय असतं तेच वय तिचं शेवटपर्यंत असत . 

म्हणून तर ....... शाळेत बाळाला पहिल्या दिवशी एकटं सोडताना रडणारी आई आणि मुलगा शिकायला किंवा नोकरीसाठी लांब जाताना रडणारी आई एकच दिसते  . 

माझा ७ वर्षाचा मुलगा एकटा झोपायला शिकल्यानंतर मला कळलं माहेरून सासरी परततेवेळी मी दिसेनाशी होईतोवर आई बाबा हात उंचावून का निरोप देतात   :) 

मी मोठी होत गेले पण माझी आईही अजून तशीच आहे जशी मला पहिल्यांदा जवळ घेताना होती :)