सोडून द्यावं म्हणतेय

सोडून द्यावं म्हणतेय तुझ्या मागे धावणं
आतड्याला ओढ लागेतोवर तुला जीव लावणं
गर्दीतला एकटेपणा स्वीकारून टाकते एकदाचा
शेवटपर्यंत नुसत्याच तडा गेलेल्या काचा

हिरवाकंच चुडा , पाठभर वेणी 
देखणेपण बघायला बाजूला चार जणी
काजळानही लाजावं असे काळेभोर डोळे
अन पापणीच्या काठावर येऊन थांबलेलं पाणी

सोडून द्यावं म्हणतेय तुझ्यासाठी झुरणं 
कितीदा सहन करायचं तुझ्याकडून हरणं
सैल पडू दे की दोर माझ्याही बाजूचा जरा
मग तरी दिसतील तळहातावरच्या चिरा

नाकासमोरच्या भांगात लालचुटुक रंग
कुणीही मोहावं असं मऊ लोण्यासारखं अंग
चित्रकाराने कोराव्या अशा भुवयीच्या कमानी
अन त्याखाली काळवंडलेली ही तिची जवानी