एक प्रवास ..... जगाच्या पाठीवर


२ वर्षे १३ दिवस उलटून गेले या गोष्टीला . पण अजूनही आठवण आली की शहारून येत अंग. ' विसरणं निव्वळ अशक्य ' च्या यादीतील ही एक घटना .  

टर्मिनल २ गेट नंबर ५ …… बोर्डिंग पास हातात गच्च धरून शेवटचं एकदा दाराकडे पाहील . पहिलाच श्वास कंठापर्यंत येवून थांबला . आई बाबा इवलासा चेहरा करून माझ्याकडे पहात होते . डोळ्यातलं पाणी लपवायचा होईल तितका कसोशीचा प्रयत्न सुरु होता त्यांचा . मला सासरी  पाठवतानाही इतकी घालमेल नसेल झाली त्यांची . पण दोघानाही आज काहीही सुचत न्हवत. बाबा तर नजरेनेच मला धीर द्यायला पहात होते . इतका मोठा प्रवास , एकटीने करायचा आणि तो ही दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन ……. 

मोठ्या दिरांनी काचेमागुनच हात हलवून निरोप घेतला . दीर कसले …… मित्र जास्त आहेत माझे . पापणी ही हलत न्हवती त्यांची आम्हाला जाताना पाहून . त्यांची ही अवस्था मी प्रथमच अनुभवत होते . दोन पावलं चालून पुढेही यायचं धाडस नाही झाल त्याचं . मी ही जबरदस्ती हात उंचावून निरोप घेतला . पिल्लाला हाताला घट्ट धरलं आणि पटापट आतल्या दिशेने चालायला लागले . शक्य तेवढ वळून पाहणे टाळत होते . कारण माहीत होत , मी जर आत्ता परत वळून पाहील आली बाबांच्या डोळ्यात पाणी दिसलं तर मला एकही पाऊल पुढे टाकायला होणार नाही . आईच्या हुंदक्याची रेष ओलांडयाची शक्ती माझ्यात न्हवती . आणि टाचा उंचावून पिल्लाकडे पाहणाऱ्या दिराचा पुन्हा एकदा हात उंचावून निरोप मला नसता घेता आला .  

आदल्या दिवशी आईच्या घरी भेटायला आलेल्या मैत्रिणीने केलेला प्रश्न … " आम्रे , काहीच कसं वाटत नाही ग तुला ? सगळ्या आपल्या माणसाना सोडून जाताना इतकी कशी शांत राहू शकतेस तू ? " … उत्तर देण टाळण्यासाठी दिलेलं खोट स्मितहास्य मला आठवलं . कोपऱ्यात बसून रडून रडून डोळे लालबुंद करून घेतलेल्या लहान बहिणीचा रागाचा स्वर …. "दीदी , रडू कसं  नाही ग येत तुला ? आठवण नाही का ग येणार आमची तिकडे ? खरंच इतकी वाट पहात होतीस या दिवसाची ? " :) आता काय देणार मी तिला या अशा प्रश्नांची उत्तरं .… बाबांचा आवंढा गिळत काळजी पोटी डोक्यावर हात ठेवत दिलेला दिलासा …. "जाशील न एकटी नीट ? घाबरणार नाहीस तशी तू माहीत आहे मला … पण तरीही काळजी घ्या बाळाची . आणि तुझीही " . 

घरातून बाहेर  पडताना आईकडे तर मी पाहिलंच नाही . इतकी धीट नाही झालीये अजून की माझ्या डोळ्यातील पाणी तिच्याही समोर वाहणार नाही . आजी , आजोबा , काका , काकी सगळ्यांना नमस्कार करून घरातून बाहेर पडताना खांद्यावर शेवटचा हात जाणवला . लहान भाऊ …… "दीदी , नीट जा . पोहोचलीस की फोन कर . तू नको काळजी करू इथली . " :) आज फार जबाबदारीने बोलत होता . माझ्या लग्नादिवशीही ह्याच्या जवळ येउन असंच बोलला होता तो "भाऊजी , काळजी घ्या तिची . " 

माझी पावलं जसजशी  गेट च्या दिशेने चालायला सुरु झाली तसं हे सगळ डोळ्यासमोरून झर झर …. सरकून गेल आणि माझ्या  बद्दलच्या सगळ्या समजुती खोट्या ठरवत अश्रू मोकाट झाले होते .  शेजारी बसलेल्या ६० एक वर्षांच्या आजोबांनी विचारलं "बाळ , पहिल्यांदाच जाते आहेस का घरापासून दूर ? " त्यांची नजर चुकवत  , पिल्लापासून लपवत "हो…. " म्हणत डोळे पुसले गडबडीने . आई रडतेय कळल तर हा चिमुकला ही सुरु होईल रडायला हाची भीती 

जस जसं विमानाने जमीन सोडली तशी मनात जाणवणारी पोकळी वाढायला लागली . कुठेतरी अधांतरी लटकतोय आपण , जमीन सरकलीये पाया खालची ही  भावना . थोड्या वेळा पूर्वी आजोबांनी विचारलेल्या प्रश्नाने डोक्यात थैमान घातलं . खरंच आज मी घरापासून दूर जातेय ? हजार फुटांवरून खाली पाहिल्यावर माझ्या घराचा एक कोपराही दिसेना मला . पण मग मी जातेय ते ही माझंच घर आहे की . एका घरापासून दुसऱ्या घराकडे 

पण हा प्रवास जीवघेणा होता . पहिलं घर , माणस सगळ सगळ मागे पडलं होत . आणि दुसर अजून बरंच लांब होत. 

पिल्लाला छातीशी कवटाळून बराच प्रयत्न केला झोपण्याचा पण काही केल्या डोळा लागलाच नाही . ११ - १२ तासानंतर ढगात वाटणारा अधांतरीपणा कमी झाला . हिरवळ , थोडा बर्फ , उंचावरून झार्यासारख्या दिसणाऱ्या नद्या … आत्ता कुठे काहीतरी नजरेस पडायला लागलं होत . जीवात जीव आला . डोळ्यातील पाणी हलकेच टीपत सगळ्यावर एक स्वच्छ नजर टाकली . नवा निसर्ग , नवीन देश , भरभरून वाहणाऱ्या नद्या …… त्या ही माझ्याच सारख्या वाटल्या . रिसीव्ह करायला येणाऱ्या सागराच्या ओढीने वेगात वाहणाऱ्या  

" अहो " आमच्या येण्याआधीच विमानतळावर पोहोचले होते . लेकाच्या ओढीने जीव कासावीन झाला होता बाबाचा . दीड वर्षाचं पिल्लू आपली आपली सामानाची bag हौसेने ओढून आणतंय हे पाहून फार कौतुक वाटलं ह्यांना . दोघेही एकमेकांना धावत येउन बिलगले . काल आई बाबांना सोडून  येताना जे चित्र होत बरोबर त्याच्या उलट हे चित्र . ह्यांना पाहून माझ्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं . कुशीत शिरून आत्ता मनसोक्त रडून घेतलं .  

हाताची मिठी घट्ट करत ह्यांनी विचारलं "आठवण येतेय का घरच्यांची ? "  ज्याचं उतरं मला त्या दिवशी देता आलं नाही . डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याकडे पाहून ह्यांनी जे समजायचं ते समजून घेतलं . आणि या  गेल्या २ वर्षात दर वेळी हे अन्नुतरीत पाणी समजून घेतलं . 

हे सगळ आठवण्याचं कारण एकच …… सहज डोक्यात विचार आला , हा प्रवास उलटा करण्याची वेळ आली तर ह्यापेक्षाही अवघड जाईल कदाचित :)

गणपती बाप्पा …… बळ दे रे पुन्हा एकदा

View Facebook Comments

4 comments:

Thank you for your comment :)