आईची भाकरी

इतके वर्ष झाले तरी काही काहीच बदललं नाहीये . लग्न झालं घर बदललं , माणसं  , जागा , नाती , जबाबदाऱ्या , काम , अडचणी , भावना , कुटुंब सगळं बदलू शकत आयुष्यात ...

बस्स ..... मानेखाली हात धरून २ महिन्याच्या बाळाला  मान ताठ करायला शिकवणारी आई आणि ताठ झालेली मान आयुष्यभर कुणासमोरही वाकू द्यायची नाही ही शिकवण देणारे बाबा ..... कधीही बदलत नाहीत .

घरातले सगळे आपापल्या कामात मग्न असतात आणि अशावेळी एकदमच स्वयंपाक खोलीतून धाप धाप असा आवाज यायला सुरु होतो  .. त्यासोबत बांगड्याचा किणकिणाट ...त्याच लयीत चालणार

 ज्यांनी भाकरीची चव चखलीये त्यांना उठून आत जाऊन पाहण्याची गरजच नाही . बांगड्याचा आणि हात आपटण्याच्या लयीवरूनच समजून जात  . त्याच्या लगेच लक्षात येत .

 आई भाकरी थापतेय 

तांदळाच्या , ज्वारीच्या , नाचणीच्या , बाजरीच्या कित्ती प्रकार त्यातले रे बाबा ...
ते पीठ चाळणीने चालून कोंडा बाजूला ठेवायचा .... हो ..टाकून नाही द्यायचा काही . शेजारच्या आजीच्या कोंबड्या आवडीने खातात भिजवलेला कोंडा . त्याच्यासाठीच हा खाऊ

मग त्या चालेल्या कोरड्या पिठाला पाणी लावून लावून उभं आडवं दाबून , हाताच्या पंजाने दाबून , बोटात धरून , परातीत आपटून , मर्दुन भाकरीसाठी पीठ मळायचं . मऊ लुसलुशीत , एकही भेग न पडलेलं , कुठेही चिकटपणा नसणार , जो देईल तो आकार अलगद घेणार भाकरीच पीठ मळता  आलं की अर्धा किल्ला सर केला असा समजायचं  

मग परातभर पसरलेलं ते कोरडं पीठ , त्यावर आईने अलगद हाताने फिरवलेला गोळा मध्यभागी जाऊन बसतो . आणि मग माझी आई त्या धाप धाप आवाजाच्या लयीत गोल गोळ्याची पातळसर परातभर मावेल अशी भाकरी थापते .
थापताना ना कुठे लय चुकते ना कुठे भाकरी


भाकरी थापायलाही खूप सवय असावी लागते बरं का . इतक्या सहज सहजी जमणार काम न्हवे ते .हात फक्त डावीकडून उजवीकडे फिरवायचा . फक्त हातांसोबत भाकरीही फिरली पाहिजे परातीत . :D

पिठात एकदा हात घालून बघाच हो नक्की मग लक्षात येईल ... आई नेमकं काय दिव्य करत असेल .

खरी कसोटी तर याच्या पुठे आहे राव
भाकरी थापली तर खरी  .... पण  थापलेली  भाकरी परातीतून उचलून तव्यात टाकायची कशी ?????
याच कौशल्य शिकवायला शेजारी आईचं उभी असली पाहिजे .

भाकरी करायला शिकताना किती भाकऱ्या मोडल्या , किती परातीतच राहिल्या , किती तव्याच्या काठाशी येऊन पडल्या आणि कित्ती करपल्या याच गणित कुठल्याही मुलीकडे नसतं . बस्स .... ज्या दिवशी ती न तुटता तव्यात जाईल तो दिवस सुवर्णदिवस :)
तव्यातल्या भाकरीकडे पाहून टाकलेला एक मोठा उसासा ... अख्ख्या जगाचं ओझं खाण्यावरून उतरल्याचा अनुभव आणि मागे उभ्या असलेल्या आईने दिलेली शाबासकी

हो आणि आता ती फुगलीही पाहिजे ... ट ट ट ....म  

हाताची बोट पालथी घालून तापलेल्या भाकरीवरून पाणी पसरता पसरता बोट कधी तापतात कळताच नाही .
आणि इतक्या सगळ्या पर्यंत जर कुठल्या नवशिक्याची भाकरी मोडली नसेल तर मग भाकरी करणारी तव्याच्या प्रेमातच पडते .
आणि त्या प्रेमाचे रंग मग तिच्या गालावर, केसावर , कपड्यावर उठलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सगळ्या गावभर दिसतात .

" पोरगी भाकरी शिकतेय हो आमची. एक दोन दिवसात जमतंय बघा . :) "
आई आपली उगाच दारात उभी राहून दवंडी पिटते सगळ्या गावभर . आधीच टेन्शन कमी त्यात आता शेजारच्या कोंबड्यावाल्या आजी चवीला मागणार एक भाकरी .

मग ती प्रेमाने इतका वेळ तव्यात बसलेली भाकरी अग्निपरीक्षेला उतरल्यासारखी तव्यातून काढायची आणि धगधगत्या ज्योतीवर पालथी करायची .
कुठलही उलथनं , पळी , चमचा न वापरता हाताच्या चिमटीत उचलून पुन्हा फिरवून ज्योतीवर टाकायची .

३ सेकंद आपल्या त्वचेला अग्नी जाणवत नाही हे आईने भाकरी भाजताना उभ्या उभ्या दिलेलं ज्ञान . मग अगदी मनातल्या मनात १.... २.... ३.... मोजत घाबरत घाबरत चिमटीने गरम भाकरी उचलायची . आणि जर  १.... २.... ३.... च गणित चुकलंच तर मग आता पर्यंतची पांढरी शुभ्र भाकरी एका कोपऱ्यात करपलीच म्हणून समजा .  मग काय फुगते ही बया ....

हात भाजू न देता तितक्याच चलाखीने ज्या दिवशी ज्योतीवरून फिरवता येईल त्या दिवशी काम फत्ते......

स्वयंपाकाचा सगळ्यात अवघड किल्ला सर ! हुर्रे ....

उगाच म्हटलंय होय .... आधी हाताला चटके मग मिळते भाकर

मला अजूनही आठवतात ... माझा भाकरीचा हा किल्ला सर होई तोवर रोज संध्याकाळच्या भाकऱ्या माझ्याकडे असायच्या . चौकोनी , त्रिकोणी , तुटक्या , फाटक्या , अर्धवट कच्च्या , करपलेल्या , कडकडीत .... अरे रे .... कसल्या कसल्या नाही केल्या म्हणून सांगू .
पण यातली एकही भाकरी टाकून दिली नाही आईने . तेव्हा प्रत्येकवेळी मला याच नवल वाटायचं आणि अजूनही वाटत . आई आणि बाबा कुठलीही तक्रार न करता खूप आवडीने खायचे माझ्या चुकलेल्या भाकऱ्या .

कधी चिडचिड नाही , कधी रागावणं नाही , वैतागण नाही . उलट रोज प्रोत्साहन मिळायचं
"आग बघ ... कालपेक्षा छान झालीये . जमायला लागली की ग तुला . येईल आठवड्या भारत आई सारखी ट ट ट ..म ... फुगलेली "

मला काय वाटतं .....  भारतातील राहू द्या पण कमीत कमी महाराष्ट्रातील तरी प्रत्येक गृहिणीला भाकरी थापता आलीच पाहिजे .
या मटण , चिकन आणि माश्याच्या कालवनांसोबत भाकरी खाण्यात जी मजा आहे ती चपातीमध्ये नाही हो
काहीही म्हणा ..

आणि पटलं तर शिकून घ्या भाकऱ्या  :)  मदतीला मी आहेच  :p

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे बाबानी काल मला तांदळाच्या उकडीच्या भाकऱ्या कशा करायच्या हे सांगितलं . माझ्यासाठी नवीन होतं पण माझ्या लेकाला भाकरी आवडते आणि यावेळीही आई बाबानी "जमेल ग तुला . कर  तरी एकदा " म्हटलं म्हणून ही करून पहिली . भारी जमली राव !!

तुम्हाला जर माझी भाकरी माझ्या स्वयंपाकघरात फोटोसहित पाहायची असेल तर इथे क्लिक करा .

थँक क्यू आई बाबा :)

म्हणूनच तर मी सुरवातीलाच म्हटलं

इतके वर्ष झाले तरी काही काहीच बदललं नाहीये . लग्न झालं घर बदललं , माणसं  , जागा , नाती , जबाबदाऱ्या , काम , अडचणी , भावना , कुटुंब सगळं बदलू शकत आयुष्यात ...

बस्स ..... मानेखाली हात धरून २ महिन्याच्या बाळाला  मान ताठ करायला शिकवणारी आई आणि ताठ झालेली मान आयुष्यभर कुणासमोरही वाकू द्यायची नाही ही शिकवण देणारे बाबा ..... कधीही बदलत नाहीत .



Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)