Repotting Aloe Vera Pups - कोरफडीची नवीन रोपे कशी तयार कराल?




गेल्या आठवड्यामध्ये मी *कोरफडीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी ?* याबद्दल माहिती लिहिली होती. 

ही माहिती तुम्ही इथे वाचू शकता . 👇👇

कोरफडीच्या रोपांची काळजी कशी घ्याल ?

तुम्हा सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मनापासून आभार.

माझ्या कोरफडी ला भरपूर छोटी रोप आली होती. म्हणून मी त्याचे वेगवेगळ्या कुंड्यात repotting केले. सध्या तरी ७ नवीन 

कोरफड रोपे तयार झाली. अजून ही बरीच होतील. 

जर तुमचे कोरफड सुदृढ आणि आनंदी असेल तर त्याच्या आजबाजूला नक्की नवीन रोपे येतील. 

फोटो १ : मुख्य रोप आणि सोबत नवी उगवलेली रोपे


Mother Aloe Vera पासून तिचे pups वेगळे लागवड करताना काय काळजी घ्यावी लागते याबद्दल थोडेसे ....

१. रोपे भरपूर आली असतील तरच repotting साठी वेगळे काढा.

२. मुख्य रोप म्हणजे mother plant ला अजिबात हलवू नका.

३. Pups वेगळे काढताना त्याच्या बाजूची माती हलकी करून घ्या. Repotting करावयाचे रोप खालच्या बाजूने मुळासहित उचलणे खूप गरजेचे आहे . या रोपाची सर्व मुळे त्याच्यासोबत वर आली पाहिजे. 

४. जर लहान रोपे एकमेकात गुंतली असतील तर वरच्या बाजूने हलके दाब देवून / मातीला छेद देवून वेगळी करून घ्या.

५. वेगळी केलेली रोपे मी खाली फोटोमध्ये दाखवली आहेत. 

६. एकवेळी थोडीच रोपे काढून घ्या. मुख्य रोपाला पूर्ण एकटे करू नका.


७. नवीन कुंडीत लावताना पहिला मातीचा थर मग १ चमचा शेणखत , यावर अजून एक मातीचा थर आणि मगच मुख्य झाडापासून वेगळे केलेले रोप लावा.

८. बाजूने माती भरून हाताने दाबून घ्या. आजूबाजूची माती सैल पडली तर रोप सरळ उभे राहणार नाही.

९. पाण्याचा निचरा होण्यासाठी  खाली छेद असणारी च कुंडी निवडा. कोरफड ला पाण्याचा निचरा खूप गरजेचे आहे

१०. २-४ इंच उंचीची कुंडी पुरेशी आहे. 




११. लागवड केलेल्या नवीन रोपाला पाहिले १ आठवडा घराच्या आत राहू द्या. फार जास्त थंडी / जास्त ऊन लगेच सहन होणार नाही.

१२. पाणी आठवड्यातून १/२ वेळा द्या. ते ही मातीचा वरचा थर सुकल्यावर.


माझ्या एका रोपाची सध्या ८ रोपे झाली. कुठलीही वेगळी काळजी न घेता. निसर्ग भरभरून देतो. घ्यायला शिका 😊🙏



फोटो  :  उरलेले मुख्य रोपं




~ अमृता पेडणेकर




कोरफडीच्या रोपाची काळजी कशी घ्याल ?

 






या फोटो मधील माझे कोरफडीच्या रोप आता साधारण ३ वर्षांचे आहे. खरेदी केले तेव्हा खूपच लहान आणि एकच देठ होते . आता याची भरपूर रोप झाली आहेत. याची जोपासना करताना माझ्या लक्षात आलेल्या काही गोष्टी इथे नमूद करत आहे. कोणालातरी या अनुभवाचा उपयोग व्हावा म्हणून.


कोरफडीची वाढ इतर रोपांपेक्षा खूप संथ असते. याला वाढताना पाहायचे असेल तर तुमच्यामध्ये खूप संयम असायला हवा


माझ्या माहितीप्रमाणे याला खूप कमी पाणी लागते. मी आठवड्यातून एकदा आणि खूप उन्हाळा असेल तर २ वेळा देते.मातीचा वरचा थर नेहमी मोकळा असेल याची काळजी घा. जास्त पाण्याने झालेला चिखल या रोपाला आवडत नाहीं. माती फारच मऊ आणि चिकट असेल तर त्यात थोडी वाळू एकत्र करावी. 


बऱ्याच वेळा कोरफड फक्त जास्त पाणी घातल्यामुळे आणि मातीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मारून जाऊ शकते. 


पाणी जास्त झाले तर याची पाने तपकिरी होऊन गळून पडताना मी पहिली आहेत. ही पाने सुकलेल्या पांनांपेक्षा वेगळी दिसतात. यामध्ये आतून पाणी भरलेले दिसते. 


मी कोरफड साठी कुंडी निवडताना पसरट कुंडी निवडली होती. ज्याला पाण्याचा निचरा होण्यासाठी खाली रिकामी जागा होती. कदाचित यामुळे माझे रोप पसरट वाढले असावे.

याच्या मुळांपासून नवीन फुटवे येऊन नवी रोप आजूबाजूने तयार होतात. 


जर कधी वातावरण फार जास्त थंड असेल तर हे रोप घराच्या आत घ्या. थंड वातावरणात हे रोप खराब होते. मी याला ४ महिने indoor आणि ८ महिने outdoor ठेवते. 


सुकलेली पाने हाताने ताकद लावून उपसण्याचा प्रयत्न करू नका. रोप अगदी खोलवर गेले नसेल तर मुळा सहित हातात येऊ शकते. शक्यतो कात्रीने हलके कापून घ्या.


या झाडाला कोणत्याची खताची सहसा गरज नसते. वर्षातून एकदा मी शेणखत वापरले आहे.