आई …. देवाघरी गेलीये


एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

पोरीच्या लांबसडक केसांची अंघोळ राहिलीये रीठ्याची
बघ …पुरण राहिलंय अजून , फक्त पूजाच केलीये पाट्याची
ह्यांच्या पिवळ्या सदऱ्याच परवा तुटलंय म्हणे बटन
शेजारच्या सखुला ही सांगितलय उद्या तिला देईन  मटण
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

धाकटा सकाळीच मागत होता खोबऱ्याची वडी
ताईने घेतलेल्या साडीची मोडलीही नाही मी अजून घडी
शाळेतून आल्यावर पोर हंबरडा फोडील रे
उद्या पासून आई नाही , कुशीत घेऊन एकदा समजाऊ दे
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

तिकटीवरच्या आजीची वाटी राहिलीये द्यायची परत
गोठ्यातली गायसुद्धा नाही माझ्याशिवाय चरत
पोरीला फक्त लग्न करून सासरी पाठवते
शेवटचीच तिला एकदा मनासारखी नटवते
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

दिराचे हात पिवळे करून अजून जाऊ पण नाही आणली घरी
मी गेल्यावर चूल सांभाळणारी सुगरण असलेली बरी
 कामावरून परत आल्यावर आल्ल्याचा चहा लागतो रे ह्यांना
"सांभाळून रहा " म्हणून सांगून तरी येते त्यांना
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

पिल्लू बघ रे कधीच … दुधासाठी रडतंय
प्रत्येकजण आज कसं त्याच्यावर इतक  चिडतय
तुळशीतल्या दिव्याची वात ही संपत आलीये
पिळूच्या पिशवीची शोधाशोध सुरु झालीये
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

पुन्हा येईन येईन परतून मी , काळजी नको करू
एकदा आत झोपवून येते तिला , उंबऱ्यात वाट बघत बसलय लेकरू
संसार एकट्यान ओढायची नवऱ्याला ताकद देऊन येते
अर्ध्यावरच सोडून आलीये …… थोड आवरून तरी घेते
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा

View Facebook Comments


आलीस का गौराबाई, आले गं बाई

सखू आणि चिऊ …. दोघी मायलेकी . देवाने जणू त्यांना एकमेकीसाठीच बनवलं होत. आता चिऊच लग्न झालय पण म्हणून काय झाल ? सखू साठी ती अजूनही आंब्याच्या लोणच्यासाठी स्वयंपाक कट्ट्यावर चढणारी तिची नाजूक परीच आहे . :) मुलं मोठी होतात पण आई नाही होत कधी मोठी……. असो 

आज हे सगळ आठवायचं कारण म्हणजे गौराबाई … गणपती उत्सवातील हा तिसरा दिवस . गौरी आल्या न आज घरी . 

सखूची गौराई मात्र राहिली यावेळी लांब . काय करणार ? सप्तपदीवेळी वचन दिल्याप्रमाणे चिऊला जावच लागलं नवऱ्याबरोबर , तो नेईल तिकडे … अहो चिऊ गेली परदेशी तिच्या नवऱ्याबरोबर तिच्या पिल्लाला घेऊन . झाले आता त्याला ६ महिने पूर्ण होतील . 

तसं पाहिलं तर रोजच सखू कासावीस व्ह्यायची नातवाच्या आणि मुलीच्या आठवणीने पण आज तिला राहवतच न्हवत . घरची गौराई म्हटलं की सखुला तिची गौराई ….  चिऊच येते समोर . आणि का नाही येणार ? पोरगीला गौरीचा खेळ खेळायची हौस म्हणून चिऊला चालायला यायला लागल्यापासून सखूने तिच्या अंगणात डाव मांडला . पोर पण खेळायचीच हो अगदी अंगात भिनल्यासारखी. पन्नास एक गाणी तोंडपाठ असतील तिला . तिने झिम्मा धरला कि नाहीच तुटायचं तासतासभर . अशी  एकामागोमाग सांगायची गाणी ती . केवड्यातल्या नागासारखी तिची लांबसडक वेणी घागर घुमावाताना कुठल्या कुठे जायची तिलाही भान नसायचं. हौसेन नऊवारी नेसून खऱ्याखुऱ्या गौरीसारखी नटायची .  पाटील काका नेहमी म्हणायचे "सुनबाई …. पोरीला नजर लागेल हो कोणाचीतरी " पण आजी लावायची ना काजळाचा टिळा कानामागे    

लोकं म्हणतात हे गौरीचे खेळ वगैरे सगळे खेडवळ प्रकार . पण त्या लोकांच्या नाकावर टिच्चून चिऊ सगळ्या वाडीचा कौतुकाचा विषय होती . आई बाबांच्या मनासारखी पोरगी खूप शिकली . laptop च्या keyboard वर जितक्या लयीत तिची बोट चालायची त्यापेक्ष्या जास्त गौरीचा भानुरा वाजवताना हलायची  (भानुरा म्हणजे परात पालथी घालून रवीने वाजवत गौरीचे कान उघडायला ) जितक्या आवडीने जीन्स घालायची तितक्याच आवडीने नाकात नथ ही घालायची सणाला . गौरी घरात घेताना आईने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना तो नथेचा मोती नेहमीच टोचायचा तिला  

सखू  विचारायची "कशावरून आली ?"
चिऊच आपलं नेहमीच उत्तर " हत्तीवरून " लक्ष्मी येते ना हत्तीवरून म्हणून …… मनात म्हणायची माझ्या बाबांच्या घराचा उंबरा सोन्याचा होऊ दे :)

"कशाच्या पावलांनी आली ?"
…. हळदी कुंकवाच्या , सोन्यामोत्याच्या 

" काय ल्याली? "
…. पिवळ पितांबर 

  " काय खाल्ली ?"
…भाजी भाकरी 

मग सगळ्या घरभर फिरून सखुची गौराई , चिऊ विचारायची "इकडे काय ? इकडे काय ?" सखू पण सगळ सगळ फिरून दाखवायची "हा दिवाणखाना , ही  मोरी , हे देवघर , हे दुधदुभत " चिऊला लहानपणी प्रश्न पडायचा ही गौरी कोण ? माझ्या हातातल्या कालाशातले घडे , की हे डहाळे  की मी ?

मग सगळ घरदार फिरून झाल्यावर गौराबाई बाप्पाशेजारी विराजमान व्ह्यायच्या . शेपू भाजी आणि वडी भाकरीचा आनंद घ्यायला .  गौरीला आल्याआल्या भाजी भाकरी का द्यावी लागते ह्याच उत्तर चिऊला तिचं लग्न झाल्यावर अपोआप मिळाल . "चिऊ … फुगली ग तुझी भाकरी . घे ताट वाढून " अस जेव्हा सखू माहेरी राहायला आलेल्या चिऊला म्हणायची तेव्हा तिला पुरणपोळी ही नको वाटायची त्या बदल्यात. कुणीतरी म्हटलंच आहे "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते " 

हे सगळ असच्या अस्स घडतंय हा भास चिऊ ला आज सकाळपासूनच होत होता . कशातच लक्ष लागेना पोरीच . इतक्या लांब राहायला गेली होती मग तिथे कुठला आलाय गणपती आणि गौरी ? तिथे नुसते चर्च पण तरीही चिउने घराच्या गणपतीची छोटीशी आरास केली होती खीर मोदकाचा नैवेद्य देखील केला . गौरीचा नैवेद्य करायला शेपू सारखी कुठलीच भाजी नाही मिळत म्हणे तिकडे आणि भाकरी करायचा तर प्रश्नच नाही इलेक्ट्रिक शेगडी आहे आता तिच्या घरी :)  गौरीच्या खेळाची हौस पुरवायची म्हणून चिऊ गेले २ दिवस ठरवून रात्री उशिरा फोन करायची सखुला …. माहेरी कुणी डाव मांडला असेल तर आवाज तरी पडेल कानी झिम्म्याचा . पण यावेळी सखूच अंगणही तिच्यासारखाच शांत शांत होत . खेळाचा डाव मांडायला खेळणारी लाडकी लेक नाही म्हटल्यावर तीलातरी कुठला हुरूप येईल हो . गेल्या २० वर्षात तिचं अंगण आज पहिल्यांदा शांत होत . तिच्या माहेरवाशिणीची, चिऊची वाट बघत   

कसातरी करून स्वतःला आवरलं होत आज सखूने पण सकाळी गौरी घरात घ्यायची वेळ झाली आणि तिची घालमेल वाढली . पोरीचा चेहरा डोळ्यासमोरून हलेना . तशीच दिसत होती चिऊ तिला समोर "आई तुझी जोडवी दे ग हाताच्या बोटात घालायला …. अजून जास्त वाजेल घागर माझी  " म्हणणारी.…  दोन वर्षापूर्वी तर चिउने कहरच केला . नको नको म्हणताना ८ व्या महिन्याचं पोट घेऊन नाचवली घागर . बाकीच्यांना टेन्शन "पोटातला हिचा गणोबा काय करतोय काय माहीत :)"  

ह्या सगळ्या आठवणी मनात दाबून कंठाशी आलेला आवंढा गिळत सखु आज तिची गौराबाई घरात घेत होती . इतक्यात फोन वाजला . हातातलं सगळ जागीच टाकून सखु पाळली "माझ्या लेकीचाच असणार … जीव नसेल लागत सकाळपासून तिचा तिकडे " 

"आई …. गौरी घेतल्यास ग ? " 
चिऊच्या कापणारा आवाज त्यामागचा ओलावा सखुला जाणवला 
"पोरी … माझी गौराबाई रडत नाही येत घरात आईच्या. माहेरच्या भरभराटीसाठी हसत आत ये  "
आणि चिऊ ओक्साबोक्शी रडायला लागली फोनवरच . 

ती फोनवर बोलते आहे तोवर तिच्या पिल्लाचा एक पराक्रम चालू होता …. आता फार उद्योगी झालाय न हा कृष्ण तिचा . आता आईची अंगाई  नको असते त्याला . Justin Bieber च " baby baby " म्हणायला लावतो आई बाबांना . 

चिउने आरास केलेल्या गणपतीसामोरच कुंकू घेऊन साहेब सगळ्या कपाळाला फासत होते . चिऊ ओरडली "पिल्ला थांब … देवबाप्पाच आहे ते "
तिची हाक कानापर्यंत जाईतोवर तो कुंकवाची एक चिमट जमिनीवर सांडून त्यातून दुडूदुडू पळत सगळ्या घरभर नाचला . आणि त्याची इवली इवली कुंकवाने भरलेली पावलं घरभर उमटली
  
सखुने एक क्षण थांबून विचारलं "काय झाल ग चिऊ …. का उगाच ओरडते आहेस त्याला ? बोल का फोन केलास आत्ता ?"
"काही नाही ग आई …… गौराबाई तू घरात घेतलीस आणि हळदी कुंकवाची पावलं माझ्या घरी उमटली :) "

आमची चिऊ म्हणजे हा असाच प्रकार आहे … तिला जे हव असत ते समोरच्या प्रत्येक गोष्टीत शोधायचा प्रयत्न करते आणि सापडलं कि आनंद गगनात मावत नाही 

आईचा फोन ठेवल्यापासून स्वारी खुशीत आहे एकदम :) 

मानल तर सगळ आहे इथे आणि नाही मानल तर काहीच नाही सापडत 

गणेशोत्सवात ती येउन गेल्यावर प्रश्न पडतो - कोण आलं होत ? खडयाची, मुखवट्याची , एरंडाची , मातीची गौराई की लग्न होऊन सासरी गेलेली आपली लेक ? 

View Facebook Comments


कांदे पोहे

मुलगी पाहायचा कार्यक्रम बहुतेक प्रत्येक मुलीला करावा लागतो … 
एक प्रयत्न , नेमक काय चालू असत त्यावेळी मनामध्ये तिच्या ?




त्याची अन तिची तशी पहिलीच ही भेट 
साडी नेसून १ तास झाला , किती करायला लावशील wait ?
मनुमावाशी म्हणत होती  , गोरापान आहे नवरामुलगा 
पण या मोठ्यांच्यातून नजर वर करायला असणार आहे कुठे तिला जागा ?
म्हणे ६० हजार  पगार आणि  ९ लाखाची आहे त्याची गाडी
हुंड्याला नाही सांगा आधीच , जर पडली पसंत ही पाटलांची वाडी 

आलीच वाटत मंडळी , आईने पदर घेतला ना डोक्यावर 
१ तास उशीर झालाय आणि म्हणे आम्ही घड्याळाच्या ठोक्यावर 
एवढा मोठ्ठा लवाजमा , यांचा साखरपुड्याचा नाही न बेत
पहिल्या वहिल्या भेटीसाठी कुणी इतके जण नाही घेवून येत 
जाऊ दे …… मला काय , नुसत जाउन खुर्चीतच तर आहे बसायचं
आज पुन्हा एकदा जमिनीला नजर खिळवून हसायचं   

इतका कुणाचा आवाज हसण्याचा बायकांच्या खोलीतून ?
आजी …. कुणासाठी खुडतेय जाई परड्यातल्या माझ्या वेलीतून ?
वातावरण इतक कस वाटतंय निवांत आणि हसर
दादाच्या आगाऊ smile मागे मला जाणवतच होत काहीतरी फ़सर
ही आता कोण चिमुरडी खेटतेय बाबाच्या येवून अंगाला
काहीतरी वेगळा वास येतोय मला या कांदे पोह्याच्या सोंगाला  

पुन्हा एकदा कापेल माझा हात , चहाच्या त्या ट्रे मागून
अन मिशीवाला सासरा  म्हणेल " पोरी … नाव काय तुमच ?" माझ्याकडे बघून 
( सासरा … होणारा की न होणारा अजून ठरलं नाहीये )
ठरल्याप्रमाणे पोह्याची प्लेट आत्या आतून घेवून येईल
अन समोर बसलेला ' तो ' , चव न घेताच घास गिळून घेईल 
असंच असत हो हे … उत्तरं द्यायला आवाजच नाही फुटत
अन धडधडणारा श्वास आतल्या आत सुटकेसाठी धडपडत    

लागला तर jackpot नाही तर ठणठणाट
कधी कुणी click होईल सांगता येत नाही क्षणात 
आईला आवडलेली मुलगी , पोराच्या स्टेटस ला नसते होत म्याच 
आणि सगळ जुळून आल तर कुंडलीतले २६  गुण असतातच घ्यायला कॅच
कपातल हे वादळ शांत व्हायला थंड डोक्याच घर लागत मिळाव
कुंडलीतले ग्रह जुळवत बसण्यापेक्षा घरातल्या मनांनी जुळाव 

(झालं …… डोक्यातले विचार नेहमीप्रमाणे डोक्यापर्यंतच थांबले …)

अजून कस कुणी मला नाही आल बोलवायला ?
मुलगी पाहायला आलेत की घराचे वासे पाहायला ?
सासू म्हणवणारी प्रेमळ बाई अचानक खोलीत आली 
"बघण्याचा कार्यक्रम करायला ,आमची सून शोभेची वस्तू नाही " डोक्यावर हात ठेवत म्हणाली 
एक एक करत मग सगळ्याचा झाला मला उलगडा
किणकिण आवाज करत होता माझा हिरवा चुडा 

अख्ख्या ट्रेकिंगचा क्षीण घालवणारा हाच तो (माझा नवरा?) महाभाग 
का आवडली आईच्या 'त्या ' मैत्रिणीला (माझी होणारी सासू हो) माझी जाईची बाग
मनुमावाशीच्या वास्तुशांतीत मिशीवाल्या काकांनी (हे म्हणजे आमचे सासरे बुवा) वाढला होत एक एक्स्ट्रा गुलाबजाम
अन ट्रेकिंगमध्येही माझ्या चुकून झालेल्या स्पर्शाने का फुटला त्याला दरदरून घाम :)
" पाहण्याचा " कार्यक्रम असा मुलगी न पाहताच झाला
अन आईच्या डोळ्यातला थेंब , दादा माझ्या नकळत पुसून गेला