When every leaf is a flower


एका निःशब्द पायवाटेवरून
बोचऱ्या थंडीशी हातमिळवणी करत
ढगाआडून डोकावणारा एक सूर्यकिरण शोधायला
नजर वर करावी
अन
एखाद पिकलं पान गळून अंगावर पडाव

सो-सो करणारी वाऱ्याची एक झुळूक
अन
झोपळ्यावर झुलणाऱ्या पोरासारख
एकेक पान भिरभिरत उडायला लागत
लाल पिवळ्या रंगांच्या सूर्यकिरणानी स्वतःला नटवून  

वाटत … हे पानांचं आणि वाऱ्याच संभाषण मला का नाही आलं ऐकू ?

म्हणाला असेल वारा ….

"पिकल्या पानांनो ……

काय झाली थंडी पडली म्हणून
सोनेरी लाल स्वेटर देतो न मी आणून

असं कसं कुणी घरातून नाही बाहेर पडत
सजवू ना रस्ता आपण , पानाला पान जोडत "

अन या वाऱ्याच्या एका विनंतीवर
एका मागोमाग एक सगळीच्या सगळी पान गळायला सुरु झाली
जणू काही ……
ती मातीच्या प्रेमात पडली होती
इतक्या दिवसांचा देठाशी असलेला बंध तोडून
आवेगान रस्त्याशी लोळण घ्यायला तयार :)
जस काही
Fall is falling in love with the ground

महिन्यापूर्वी हिरवीगार दिसणारी झाडं
त्यांच्या तर नुसत्या रिकाम्या फांद्याच राहिल्या आता

आणि त्या खालची जमीन ……
तो तर बिछाना झालाय
बर्फाची पांढरी शुभ्र मऊशार रजई अंगावर ओढून घ्यायला तयार :)

आश्चर्य फक्त याचंच वाटतंय ……
पानगळ ही इतकी देखणी आणि सुरेख असू शकते ?

इथं प्रत्येक पिकल्या पानच आज फुल झालंय :)

शिंग फुटली का ?

काही दिवसांपूर्वी हाउसवाईफ ही पोस्ट लिहिली होती . तशी मलाही आवडली होती हि पोस्ट फार. म्हटलं करावी पब्लिश एखाद्या सोशल नेटवर्क साईट वर (जाणून बुजून नाव घेण टाळल . बाकी तुम्ही सुज्ञ आहात :))

हे कसं लिहिलंय , आवडलं कि नाही हे सांगायला बऱ्याच लोकांचे मेसेज आले . अगदी अनपेक्षितपणे . आणि सगळ्यांच शेवटच वाक्य "काय झालाय ग ? ठीक आहे ना सगळ ? काही बिनसलय का ? कि काही वाद झालेत "
आता यावर मी काय बोलणार … एवढंच सांगितलं "हा माझा ब्लॉग आहे . आत्मचरित्र न्हवे . माझी लिहिण्याची हौस भागवते इथे मी " :) असो …… हे सगळ सांगण्याच कारण एकच. आजची पोस्ट वाचून कुणी विचारू नये "काय झालाय ग …… " :D

" शिंग फुटली आहेत तुला " बऱ्याच दिवसांनी हे वाक्य ऐकायला मिळाल परवा . आणि त्यावरून हे सगळ सुचल.

लहान असताना आजीच्या तपकीरीला एकदा ' नाही ' म्हटलं . चिडली न माझ्यावर . थोड्या चेष्टेच्या स्वरात म्हणालो 'वाकलीस ग …. वाकलीस कमरेत आता . पावसाळा आहे . ढगाला चीर पडलीये . बघ स्वर्गाच दार चुकून उघड असेल . घाई कर जरा ' त्या दिवशी तिने मला माझ्या नवीन अवयवाची ओळख करून दिली . " शिंग फुटली का ? "

थोडी मोठी झाले म्हणजे खुट्ट्यातून वर येईन इतकीच . अभ्यासाच्या ओझ्याने वाकून जीव मेटाकुटीला आला होता . ' नाही करणार आज अभ्यास ' इतक्या सभ्यपणे सांगितलं असत तर बाबा थोडीच ऐकून घेतले  असते शांतपणे ?  म्हणून हळूच विचारलं 'बाबा …… हा प्रोग्राम संपल्यावर करू ?' आणि आजीच वाक्य परत ऐकायला मिळाल " शिंग फुटली का ? "

अशीच शिंग मोजत शाळा संपली . कॉलेज लाईफ सुरु झाल . रोजच नटण मुरडण आई कपाळाला आठ्या पडून बघायची . नाटकाच्या तयारीमुळे रात्री घरी यायला उशीर होणार . बिचारी उगाच काळजी करत बसेल म्हणून आपल चुकून बोलले …. येईल ग कुणीतरी सोडायला नाहीतर राहू कोणाच्यातरी रूम वर …. हो कुठून  बुद्धी सुचली आणि बोलले अस वाटल. काय होणार ……. पंचारती , करंड्या भरून फुल पडली अंगावर " शिंग फुटली का ? " हे परत एकदा ऐकल्यावर खरच डोक्यावर हात फिरवून पहिला :)  डोक्यावर दोन शिंग आणि त्याला लाल गोंडे लावलेत फितीचे अस काहीतरी डोळ्यासमोर यायला लागलं

झाल …लग्न झालं तेव्हा वाटल ही शिंग आतातरी पाठ सोडतील . नवरा तरी ही पदवी देणार नाही . नाही आपल्याच पायावर दगड कोण मारून घेईल हो ? पण कुठल काय . हे सगळ पाचवीला पुजाल्यासारख वाटतंय .  २५ वर्ष माहेरी एकत्र कुटुंबात काढल्यावर एकट राहण अवघड जाणारच हो थोड . रविवार संपूच नये असा वाटायचं . काय करणार बडबड करायची सवय नडली आमची . इथे बोलायला कुणी नाही म्हटल्यावर जीव घुसमटतो . घड्याळाच्या ठोक्याकडे बघत कसाबसा दिवस संपतो . पण नवरदेवांच आपल रविवारीही काम चालूच . असहकार दाखवायचा एक प्रयत्न आणि परत ती शिंग वर डोक काढून उभी राहिली " शिंग फुटली का ?"   :)

आता कोण समजावणार …. शिंग नाही हो फुटली … एकटेपणाने उन्मळून पडलंय सगळ भोवातालच जग.

कसय …… आई , बाबा आजीने हे म्हटल्यावर इतक बोचत नाही हो  

अजून तुझा विश्वास नाही


पाठीवरची नितळ कांती
स्कार्फने तरी ठेव झाकून
निदान मार्करचा तरी ठिपका लाव
दोन भुवयांमध्ये चुकून

भांगातल्या कुंकवालाच
असतो खरा देखणेपणा
पॉईंट हीलच्या नादात
तिरपा झालाय बघ तुझा कणा

कशी येईल आय - लायनरला
आजीने पडलेल्या काजळाची सर
चेहरा म्हणजे न्हवे पेंटिंग बुक
अग मेकउप थोडा कमी कर  

नखं खराब होतील म्हणून
म्हणे नाहीस निवडत मेथी
आणि सूर्याशी तर तुझं कट्टर वैर
स्किन tan व्ह्यायची भिती

मनापासून सांगतोय  .......

बाईक वरून फिरवतील मित्र
पण आईशी ओळख नाही देणार करून
बायको त्यांना "साडीतली सुगरण" च लागते
जरी बसले तुला व्हालेनटाईन डे ला घेरून

सौंदर्य तुझ राखून ठेव
मला त्याची आस नाही
पूर्ण कपड्यातच मुलगी सुंदर दिसते
यावर अजून तुझा विश्वास नाही

View Facebook Comments


पत्रास कारण की ….


पत्रास कारण की …. 

सकाळपासून कोसळतोय नुसता धो धो 
तुझ्यासारखाच …… अचानक बरसायची सवयच त्याचीही  

थोडस भिजून घ्यावं म्हणून बाहेर गेले आणि बंद झाला 
तु ही असाच शांत व्हायाचास , मी दिसल्यावर 

म्हटलं , आलेच आहे बाहेर तर थोडे पाय रिकामे करावेत 
आता थांबलाच आहेस तर कशाला लागते छत्री 
आणि पुन्हा तुझ्यासारखाच तो ही कोपऱ्यावरून मागे फिरला 
तू मला विसरलीस कशी …. याची आठवण करून द्यायला

चिंब भिजायला ठरवून थोडीच बाहेर पडत कुणी ?
सगळ अस न ठरवताच घडत गेल …… आपल्या नात्यासारख 

भिजलेल्या अंगाला मग रस्त्याकडेची पानगळ येवून चिकटली 
हल्ली तुझ्या आठवणी ही अशाच बिलगतात रे …. 
वाळलेली पान जास्त आवाज करतात ते त्यांना बाजूला करायला गेल की लक्षात  येत 
आठवणींच ही तच काहीस , नो एन्ट्री चा बोर्ड दिसला की पहिल्या रांगेत येउन बसतात :)

आता म्हटलं जाव घरी , बराच उशीर फिरले थेंबाबरोबर
अचानक वाऱ्याचा वेग वाढला 
कुठल्या रस्त्याने जावं घरी काहीच सुचेना 
तू ही असाच ……  पुढे यायचास आवेगाने , वाट अडवायला माझी :)

कित्ती वेळा अडवली असशील रे माझी वाट ?
काहीच हिशोब नाही लागत त्याचा आणि या बरसणाऱ्या थेम्बांचाही
खरच मोजायला सुरवात करायची की भिजायचं तुझ्यात मनसोक्त 
आजही ठरवता नाही आल मला 

कशीबशी पोहोचले घरी , परत लोकांची नजर चुकवत
नाही … परत म्हणतील "हे काय वय आहे हे सगळ करण्याच ?"
चिंब भिजायला वयाची नाही तरुण मनाची गरज असते 
पावसातही आणि प्रेमातही 
नाही रे कळल अजूनही यांना 
असो …. 

आता काय, मस्त गरमा गरम अल्ल्याचा चहा 
तुझ्या श्वासासारख्या …. चहाच्या वाफाही रेंगाळतात गालांवर 

आता जरा बर वाटतंय …… 

थंडी नाही गेली अंगातली 
पण ……. मनमुराद भिजल्याचा आनंद 
आणि तो ही असा अचानक , न ठरवता 
रस्ता क्रॉस करताना तू दिसलास परवा … 
तेव्हा झाला ना अगदी तसाच 

बाकी अजूनही ठरल्याप्रमाणे 
तू तुझी वाट माझ्यासाठी वाकडी केली नाहीस 
आणि मी …… तु घालून दिलेली रेष ओलांडायची नाही म्हणून अजून तिथेच 
तुझ्या वाटेला कुठे वळण लागतय का …. आपल्या घरी येणार ?
याची वाट पहात :)
थांबेन …… थांबेन मी 

माहित आहे मला 
तू परतून येणार 
आजच्या पावसा सारखाच, कोपर्यावरून 
मी फिरायला बाहेर पडलेय हे कळल की :)

बाकी ठीक ……. छान चालू आहे सगळ 

अर्रे थांब , एक सांगायचं राहिलच बघ परत
माती चीप्प भिजली होती पावसाने …
पण हल्ली तिन दरवळायचं सोडून दिलंय :)      



देव बसलेत

हो …. म्हणे देव बसलेत

पण हे देव का बसलेत ? कशासाठी ? घटस्थापना म्हणजे काय ?
आत्ता तुम्ही म्हणाल … घटस्थापना म्हणजे इतक काय अवघड आहे सांगायला ?

आईने शेतातून आणलेली २ दिवस चांगली वळवलेली काळी माती मडक्याभोवती गोळा करून रचायची आणि सगळी धान्य त्यात थोडी थोडी पेरायची …. झाल

अगदी बरोबर …. हेच करायचं . पण हे सगळ काय माहीत आहे ?


हे म्हणजे बळीराजाने धरणीमातेला घातलेलं साकड . काळ्या मातीत धान्य पेरून तो ९ दिवस वाट पाहतो कौल द्यायची . आता हा कौल वगैरे प्रकार कोकणात जास्त चालतो . माझ सासर कोकणातलं त्यामुळे हे सगळ मी पाहिलंय .

कौल मागायचा झालाच तर कोकणात एक प्रथा आहे . चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून मंदिरात जायचं, आपल म्हणन पुजाऱ्याना सांगायचं मग पुजारी देवासमोर गाऱ्हाण मांडतो . मोठ्या आवाजात . जे काही असेल ते देवाच्या कानावर घालायचं . पुजाऱ्याकरवे .
कोकणी म्हणजे साधी माणस हो . पोटात एक अन ओठात एक नाही जमत त्यांना . नवस बोलायचं ते ही गावात सगळ्यांसमोर गाऱ्हाण मांडून हेच त्यांना माहीत . म्हणजे हे असं

रे म्हाराज्या ! बारा वहिवटीच्या म्हाराज्या !!
बा म्हाराजा रवळनाथा
आम्ही आज गाऱ्हाण घालतो . ता ध्यानात ठेव म्हाराजा !

हे देवा , ह्या दोन लेकरांचा नवा संसार उभा कर !
आमच्या ह्या गोतावळ्याक या नवीन पोरीक सुखी ठेव !
हेंची सदैव भरभराट होऊ दे !
तेंका उदंड आयुष दी !
ह्या जोडप्याक सुखी ठेव !
वेलिक लवकर फुल येवाक पाहिजे !
 असा आमचा तुका हात जोडून सांगणा !

शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास,
किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास ,
किंवा,  तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास,
किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास,  आमका सगळ्याक, क्षमा कर.

पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या,  तुका अखेरचा सांगणा !

 हे म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा कुलदैवतास गेल्यावर माझ्या दिराने पुजाऱ्याकरवी आम्हा दोघांसाठी घातलेलं गाऱ्हाण :)
आणि पुजार्याच्या प्रत्येक वाक्यानंतर "व्हय म्हाराजा !" म्हणत स्वतःच्या समत्तीची जाहीर कबूलही द्यावी लागते

बाकी मूळ मुद्दा काय …. घटस्थापना म्हणजे एक गाऱ्हाणंच

सगळी धान्य घटात पेरून शेतकरी देवाच्या म्हणजे निसर्गाच्या कौलाची वाट पाहत ९ दिवस गाऱ्हाणं ऐकवतो .

" हे धरणीमाते ,
या वर्षी ज्या धान्याला वातावरण पोषक असेल ते धान्य घटात भरभरून येऊ दे
त्यानेच मी माझी जमीन पेरेन "

दिवस जसजसे पुढे सरकतील तसतशी हिरवी पाती घाटातून डोकावायला सुरु होतात आणि एखादाच कोंब सगळ्यात जास्त उंच वाढतो . हाच तो कौल निसर्गाचा :)

देवांना खाऊच्या पानावर बसवायचं आणि ९ दिवस निवांत वेळ द्यायचा .  मग जो काही त्या घटाचा कौल तीच पेरण करायची या वर्षीही . अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून :)

म्हणे नवरात्र संपल्याशिवाय लग्नाची बोलणीही करत नाहीत . आता का ? तर हे अस …… financially आपण पुढच्या वर्षभरात किती stable असू त्यावर लग्नाचा खर्च अवलंबून …… बरोबर कि नाही ? मग पेरणी कुठली करायची यावर सुनेला किती दागिने घालायचे हे ठरवायचं :P

बाकी देवी आहेच आपल्यापाठी …… शक्ती द्यायला :)

सर्वाना नवरात्रीच्या शुभेच्छा :)

बाबा कधीच मोठे होत नाहीत

आज हे सगळ सुचण्याच कारण म्हणजे बाबांचा वाढदिवस . तसं दरवर्षी केक वैगरे नाही कापत बाबा पण घरी एक मस्त वातावरण असत . त्यात भरीला भर म्हणजे संध्याकाळची बाबांच्या आवडीची आईच्या हातची बासुंदी :)

आता हे बासुंदी प्रकरण माझ्या घरच्यांनाच माहित आहे . आणि आमच्या लग्नानंतर माझ्या 'श्री' ना माहित झालय :). असो……  आता हे बा . सुं . दी . म्हणजे नक्की काय हे मी तुम्हा सगळ्यांना सांगितल तर माझ्या बाबांचा पुढच्या मिनिटाला फोन येईल "अमू …. काय हे ? …… " त्यामुळे क्षमस्व . बासुंदी इथेच संपवत आहे :)





बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


डॉक्टर काकांकडून बाळ विकत आणायला खाऊचे पैसे भिशीत साठवणारी मी आणि भिशी इतक्यात भरू नये म्हणून रोज माझ्या नकळत माझ्या भिशितला १  रुपया काढून घेणारे बाबा :)

आईने सांगितल्याप्रमाणे मला इतकच माहित होत की बाळ डॉक्टर काकांकडे विकत मिळत . आणि नेमकी मी त्यांच्याकडे गेले की  त्यांच्या फ्रीजमधली सगळी बाळ संपलेली असायची :P

बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


"बाबा कुठ गेले ?" हे माझ पाहिलं वहिल वाक्य ऐकून पळत येउन मारलेली मिठी . जेमतेम ९ महिन्यांची असेन मी . पण आठवतंय हे सगळ मला


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


रुमालाची घडी करून तयार केलेली बेडकी .  बँकेमधून यायला रोज कितीही उशीर झाला तरी माझ्याशी रुमालाच्या बेडकीने मनसोक्त खेळणारे बाबा आणि त्यानंतरच ते वाडीलालच आईस्क्रीम :)  " तुमची मुलगी वाडीलाल सोडून दुसर कुठलच आईस्क्रीम खात नाही " अस कितीतरीवेळा ऐकून घ्यावं लागलाय त्यांना माझ्यामुळे    

   
बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……

चौथीच्या स्कॉलरशीपच्या वेळी खाल्लेला ओरडा "किती करशील अभ्यास ? जा …. खेळून ये जा थोडा वेळ " आणि मुलगी नंबरात आली म्हणून त्यांनीच देवासमोर ठेवलेला तो पेढ्याचा पुडा


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


माझी अंगठ्यांनी भरलेली आठही बोट . पोरीला सोन्याची हौस म्हणून वार्षिक निकालाच्या आदल्या दिवशीच माझी नवीन अंगठी तयार असायची . आणि त्याच हौसेने बहुदा मी शाळेतला नंबर सोडला नसावा :)


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


"इंजिनीअरिंग ला अडमिशन हव असेल तर स्वतः मार्क मिळावा बर …… " हे अगदी कुठल्याही मुलीला कौतुक वाटावं असं वाक्य  आणि  इंजिनीअरिंगच्या पहिल्या दिवशीचा त्यांचा तो सल्ला "४० मार्क मिळाव आणि हसत खेळत शिक . फार त्रास नको करून घेऊ :)" मला आठवतंय तितकं मी बाबांचा न ऐकलेला हा एकच सल्ला असावा . बाकी इतर वेळी ते म्हणतील ती पूर्व


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


लग्नाच्या दिवशी उंबरा ओलांडताना मारलेली मिठी.  "पोरीला सांभाळा" हे सांगणारा ओला आवाज


आणि बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


नातवाशी म्हणजे माझ्या पिल्लाशी त्याच बेडकीच्या रुमालाने खेळणारे आजोबा . त्याच गोष्टी सांगणारे , तीच अंगाई २५ वर्षांनी तितक्याच सुरात म्हणणारे  माझे बाबा :)


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……

जावयांच्या "बाबा …. आज काय स्पेशल ?" या प्रश्नावर त्याचं ते चिरतरुण उत्तर " बा सुं दी ……… "

मी मोठी झाले , लग्न झाल , बाळ झालं पण सगळ अजून तसच आहे . मुलं मोठी होतात बाबा कधीच मोठे होत नाहीत :)


View Facebook Comments