बाबा कधीच मोठे होत नाहीत

आज हे सगळ सुचण्याच कारण म्हणजे बाबांचा वाढदिवस . तसं दरवर्षी केक वैगरे नाही कापत बाबा पण घरी एक मस्त वातावरण असत . त्यात भरीला भर म्हणजे संध्याकाळची बाबांच्या आवडीची आईच्या हातची बासुंदी :)

आता हे बासुंदी प्रकरण माझ्या घरच्यांनाच माहित आहे . आणि आमच्या लग्नानंतर माझ्या 'श्री' ना माहित झालय :). असो……  आता हे बा . सुं . दी . म्हणजे नक्की काय हे मी तुम्हा सगळ्यांना सांगितल तर माझ्या बाबांचा पुढच्या मिनिटाला फोन येईल "अमू …. काय हे ? …… " त्यामुळे क्षमस्व . बासुंदी इथेच संपवत आहे :)





बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


डॉक्टर काकांकडून बाळ विकत आणायला खाऊचे पैसे भिशीत साठवणारी मी आणि भिशी इतक्यात भरू नये म्हणून रोज माझ्या नकळत माझ्या भिशितला १  रुपया काढून घेणारे बाबा :)

आईने सांगितल्याप्रमाणे मला इतकच माहित होत की बाळ डॉक्टर काकांकडे विकत मिळत . आणि नेमकी मी त्यांच्याकडे गेले की  त्यांच्या फ्रीजमधली सगळी बाळ संपलेली असायची :P

बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


"बाबा कुठ गेले ?" हे माझ पाहिलं वहिल वाक्य ऐकून पळत येउन मारलेली मिठी . जेमतेम ९ महिन्यांची असेन मी . पण आठवतंय हे सगळ मला


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


रुमालाची घडी करून तयार केलेली बेडकी .  बँकेमधून यायला रोज कितीही उशीर झाला तरी माझ्याशी रुमालाच्या बेडकीने मनसोक्त खेळणारे बाबा आणि त्यानंतरच ते वाडीलालच आईस्क्रीम :)  " तुमची मुलगी वाडीलाल सोडून दुसर कुठलच आईस्क्रीम खात नाही " अस कितीतरीवेळा ऐकून घ्यावं लागलाय त्यांना माझ्यामुळे    

   
बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……

चौथीच्या स्कॉलरशीपच्या वेळी खाल्लेला ओरडा "किती करशील अभ्यास ? जा …. खेळून ये जा थोडा वेळ " आणि मुलगी नंबरात आली म्हणून त्यांनीच देवासमोर ठेवलेला तो पेढ्याचा पुडा


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


माझी अंगठ्यांनी भरलेली आठही बोट . पोरीला सोन्याची हौस म्हणून वार्षिक निकालाच्या आदल्या दिवशीच माझी नवीन अंगठी तयार असायची . आणि त्याच हौसेने बहुदा मी शाळेतला नंबर सोडला नसावा :)


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


"इंजिनीअरिंग ला अडमिशन हव असेल तर स्वतः मार्क मिळावा बर …… " हे अगदी कुठल्याही मुलीला कौतुक वाटावं असं वाक्य  आणि  इंजिनीअरिंगच्या पहिल्या दिवशीचा त्यांचा तो सल्ला "४० मार्क मिळाव आणि हसत खेळत शिक . फार त्रास नको करून घेऊ :)" मला आठवतंय तितकं मी बाबांचा न ऐकलेला हा एकच सल्ला असावा . बाकी इतर वेळी ते म्हणतील ती पूर्व


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


लग्नाच्या दिवशी उंबरा ओलांडताना मारलेली मिठी.  "पोरीला सांभाळा" हे सांगणारा ओला आवाज


आणि बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……


नातवाशी म्हणजे माझ्या पिल्लाशी त्याच बेडकीच्या रुमालाने खेळणारे आजोबा . त्याच गोष्टी सांगणारे , तीच अंगाई २५ वर्षांनी तितक्याच सुरात म्हणणारे  माझे बाबा :)


बाबा म्हटलं की  मला आठवत ते  ……

जावयांच्या "बाबा …. आज काय स्पेशल ?" या प्रश्नावर त्याचं ते चिरतरुण उत्तर " बा सुं दी ……… "

मी मोठी झाले , लग्न झाल , बाळ झालं पण सगळ अजून तसच आहे . मुलं मोठी होतात बाबा कधीच मोठे होत नाहीत :)


View Facebook Comments 

8 comments:

Thank you for your comment :)