भरून आलेलं आभाळ



तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने गाडी सुरु केली सुद्धा . रागाच्या भरात गेला असेलही …… पण तिचं न ऐकून घेता तो निघून गेला यायचं तिला दिवसभर वाईट वाटत होत . 

काहीतरी गहिवरून आलंय …… मन भरून आलंय म्हणून होता तो तिचा सकाळी सकाळी झालेला गडगडाट.  पण काळवंडून आलेल्या आभाळाकडे दुर्लक्ष करत ढगाच्या आवाजालाही कुणी जुमानत नाही याचं शल्य मनात घेऊन त्या पावसाने धो धो कोसळाव ……. अगदी तशीच रडतं राहिली ती दिवसभर ……. एकटीच 

संध्याकाळी तो घरी आला तर घराची अवस्था पाहवत न्हवती त्याला . एकही वस्तू आज जागेवर न्हवती गेली . कचराही नावापुरताच काढला असावा . कागदाचे कपटे खोलीच्या कोपऱ्यात रचलेले . वावटळ येवून गेल्यावर अंगणभर पालापाचोळा पसरतो ना …. तसा हा अवतार . 
गणपतीच्या मूर्तीसमोर तिचं लिहायला बसायचं नेहमीच ठिकाण . म्हणे ……. मन मोकळ करायला कुणी नाही मिळालं तर या गणपतीबाप्पाशी गप्पा मारत ती तिचं  मनाचं मळभ कागदावर उतरवते . त्या खोलीची खिडकीही उघडीच पडली होती . सायंकाळच्या वाऱ्याने तिच्या डायरीची पानं फडफड करत होती . 

स्वयंपाक घरात जाऊन पाहिलं तर आज शेगडीही थंडच . काहीच शिजवलं न्हवत दिवसभर कदाचित तिने आज . उपाशी आहे का ती ? त्याच्या मनात पटकन काहीतरी डोकावून गेल्यासारख झाल . पण आहे कुठे ? गेली कुठे ती ? या वेळी अशी न सांगता कधीही नाही जात घराबाहेर . अजून चिडली असेल का ?  ऐकून घ्यायला हवं होत का मी सकाळी ? कमीत कमी विचारायला तरी हवं होत ……. का इतकी अस्वस्थ आहेस ? कशाचा त्रास होतोय तुला ?  २ मिनिट बोललं तिच्याशी की होते ती शांत लगेच .     

त्याने पटकन तिला फोन लावला पण तो गादीवरच वाजत होता . ती तिचा फोन घरीच विसरून गेली होती . विसरली की ठेवून गेली होती ? 

त्याच्या मनाची घालमेल वाढतच होती . रागाच्या भरात वाद घालणारी असली तरी त्याला ती हवी होती … आत्ता या क्षणी , त्याच्या जवळ …… कुठे शोधाव काहीच सुचेना …. आल्या पावली तो तसाच घराबाहेर पडला तिला शोधायला …

तळयाकाठच्या गणपतीचं मंदिर तिचं आवडीच ठिकाण . पण तिथेही न्हवती ती …… मंदिरात जाऊन बाप्पासमोर हात जोडायची हिम्मतही होईना त्याची . फक्त येता येता तिला मागून घेतलं बाप्पाकडे त्याने ……. पुन्हा एकदा 

पुन्हा एकदा म्हणजे …… ज्या दिवशी तो तिला लग्नासाठी विचारायला गेला तेव्हाही या मंदिरात येउन गेला होता …. ती हो म्हणावी म्हणून साकड घालायला …… आणि त्या गणपतीने इतका चांगला नवरा पदरात घातला म्हणून तो तिच्या आवडीचा झाला ……. त्याला म्हणायची नेहमी ती … तुझं ऐकतो मग माझाही ऐकतच असेल ना सगळ ? माझी बडबड ऐकायला याची मूर्ती पुरेशी आहे मला 

गणपतीच्या शिखराला पापण्यानीच नमस्कार करून तो धावत सुटला . पण कुठे धावायचं हेच कळेना …….  पण त्याचं मन सांगत होत इथेच असेल ती . एकट वाटलं की गणपती बाप्पाशीच वाद घालते वेड्यासारखा …. " कुणालाही हेवा वाटावा इतकं सुखं दिलंस मला पण मन मोकळ करायला अजून एखाद जवळच माणूस ठेवायला हवं होतंस "

मंदिरामागच्या तळ्याकडे त्याची पावलं वळली . कुणीच न्हवत तळ्याकाठी . सगळ काही शांत …… निश्चल . पण मग हा पाण्यावरचा तरंग कुठला ? वाराही वाहत न्हवता म्हणावा तितका . मग तरंग कसा उठला ? कुणालाही दिसणार नाही याची काळजी घेत ती तळ्याचा कोपऱ्याशी पाण्यात आपलाच चेहरा पाहत बसली होती . तिच्या गालावरून ओघळणाऱ्या थेम्बाने जलाशयावर उठवलेला हा तरंग 

एका क्षणासाठी त्याच्या मनात येउन गेल …… एवढा मोठा जलाशय , तिच्या एका थेम्बाने हलला आणि मला जाणवलं ही नाही ती दिवसभर रडतेय ? एकही तरंग माझ्या मनात नाही उठला ? का ? 

खरंच…. एकटी आहे ती ? मी असून नसल्यासारखा ……. घरातल्या गुलाबाला कधी कळी येते आणि फुल कधी होत याचं काहीच माहित नसत मला . आणि ती … कळीच फुल होइतोवर रोज फोटो घेत एक मस्त पोस्टर बनवलंय घरी . माझ्या झाडाचं पाहिलं फुलं …… 

तो तिच्या जवळ गेला …… शेजारी जाऊन बसला . काहीच नाही बोलली ती . गालावरच पाणी आणि डोळ्यात उतरलेला लालसरपणा लपवायचा एक  अयशस्वी प्रयत्न चालला होता तिचा . चटकन तळ्यातल्या थंड पाण्याचे हबके मारून घेतले तिने चेहऱ्यावर . चेहरा रडून भिजला होता हे लपवायला . त्याने रुमाल पुढे केला . आपल्या पदरानेच पुसून घेतला तिने चेहरा . 

जागेवरून उठली . "चल …… एकट आहे घर माझं केव्हापासून . गुलाबाचं फुलही कालच उमललय . भूक लागली असेल ना तुला . अजून काहीच नाही बनवलं आज . देवासमोर दिवाही लावायचा आहे . तुळस वाट पाहत असेल . उठतोस ना ?"

हातात हात घेत त्याने तिला बसायला सांगितलं . "२ मिनिट …… शांत वाटेल तुला "

एक औपचारिकता म्हणून हसली ती . "मी शांत होईन हिचं भीती वाटते मला ." आणि घराकडे निघून गेली . 

बाप्पाची आरती सुरु झाली वाटत . मंदिरातल्या घंटेचा आवाज साऱ्या परिसरात घुमत होता . त्याच्या शिखराकडे एक नजर टाकली त्याने . सगळ आभाळ रिकाम होत . एकही ढग नाही . गडगड आवाज नाही . वारा नाही . क्षितिजा पर्यंत फक्त शांतता . 

बाप्पाच्या प्रसादाच पंचामृत घेऊन जाणाऱ्या आजींनी विचारलं "लेका …. काय पाहतो आहेस इतका निरखून आभाळात ?"     

"ढग शोधतोय …… एखादा ओळखीचा "

"आला होता रे सकाळी भरून . पण कोसळला दिवसभर …. त्याची रिपरिप मी ऐकली.  आता रिकाम झालंय हे आभाळ . आता कोसळून गेल्यावर ढग शोधून काय उपयोग ? त्याच्या गडगडाटाला मोकळ भिजायला तुझा खांदा मिळाला असता तर लवकर शांत झालं असतं .……. जा घरी . पाउस काय …. आज कोसळला तसा पुन्हा कधीतरी येईल … गेलेला दिवस आणि तिचा एकटेपणा नाही परत यायचा "    

View Facebook Comments





2 comments:

Thank you for your comment :)