नवनीतची वही

ते दिवसच मंतरलेले . नवनीत ची एखादी नवी कोरी वही . तिचा तो नवेपणाचा पुन्हा पुन्हा हुंगावा वाटणारा वास . पहिल्या पानाच्या डोक्यावर ।। श्री ।। आणि त्या खालोखाल स्वतःच कोरून लिहिलेलं नाव . त्याच्या बाजूला फुलांची नाजूक नक्षी ……
हिरोचा शाई पेन . कितीही कंटाळून लिहिलं तरी सुरेख अक्षर येणार हा विश्वास ते चकाकणार सोनेरी टोपण नेहमीच देत रहायचं . शेजारी शाईने भरलेली दौत . टोकाला रंग बदलून निळं झालेलं एखादं कापड

शब्दांची फौजच्या फौज चालत यायची डोक्यात . खळखळून हसायला लावणार सुख असो वा डोळ्यात टचकन पाणी यावं असं मन चिरत जाणार दुखः असो … मनात काहीही साचून राहायचं नाही . असंच्या असं कागदावर उतरायचं . जितक्या उस्फुर्तपणे मनामध्ये वाहायचं तितक्याच उत्कटतेने लेखणीतूनही उमटायचं .

कदाचित साचून राहण ही अवस्थाच अनोळखी होती त्या दिवसात . खळखळत्या झऱ्यासारख शब्द वाहत राहिले की मन स्वच्छ आणि निर्मळ राहत म्हणे . सलणारी सल , खोलवर झालेले घाव , डोळ्यांसमोर तुटलेला विश्वास , दुरावत जाणारी माणसं हे सगळ जेव्हापासून मनात साचायला सुरु झाल तेव्हापासून गढूळ होण हे त्याबरोबर आलंच .

गाठीला गाठ बांधत शब्द कधीही मनाभोवती कुंपण करून उभे राहायचे . मग ते कागदावर उतरल्या वाचून त्या कुंपणातून सुटका नाही …. अगदी मध्यानी रात्र असो वा स्वयंपाकावेळचे कामाचे गुरफटलेले तास असोत .

त्या नवनीतच्या वहीची त्यामुळे केव्हाही गरज पडायची . सुचेल तसं उमटवत जायचं त्यात अन पुन्हा केव्हा वेळ मिळेल रिकामा तेव्हा त्याला सजवत बसायचं . कदाचित याच सवयीमुळे , २४ तास उपलब्ध सुविधा …. सारखी ती वही गादीवर पडून असायची . एखाद गुपित सामावून घेतलं असेल तिने तर मग उशीच्या खाली सापडायची . पण तिने कधी साथ नाही सोडली .

मन रिकाम करणारी सखीचं होती ती .पण हल्ली सगळंच चित्र बदललंय . मन सोडा साधं पाय रिकामे करायलाही जमेना झालंय . अपार्टमेंटच्या जगात राहणारी माणसं आपण . जोडीदार नाही म्हणून घरातून बाहेर पडायचे बंद झालो आणि मनाचं म्हणाल तर त्याची धास्ती वाटते म्हणून ते ही रिकाम करायला धजत नाही .

पोकळी सापडली की कोणत्याही आधाराविना उभा राहिलेलं , गच्च भरून आलेलं आभाळ ही कोसळायला सुरु होत . रिकाम होण्याच्या आशेने … म्हणूनच की काय हल्ली आपण ही पोकळीच तयार होऊ देत नाही मनात . रिकाम होईल , व्यक्त होईल या भीतीने . दिवसातले सगळे तास ठाचून भरलेले असतात कामाने …. विचार करायला , व्यक्त व्हायला वेळ मिळूच नये या एकाच कारणासाठी आपण स्वतःला खूप व्यग्र  घेतलंय .

सकाळी ८ ची बस पकडायची असेल तर ७:३० गजर असतो … पुढच्या अर्ध्या तासात पटकन आवरायचं … बस मधेही कानात काहीतरी लटकावून आवडीची असो वा नसो पण गाणी ऐकायची . पुढचा दिवस ऑफिसच्या कामात आपली जागा शोधून ऐसपैस बसतो . संध्याकाळी घरी आल्यावर हातात टीव्ही चा रिमोट अथवा laptop …. रात्री झोप ही लागत नाही हल्ली धड . दिवसभर साचून राहिलेलं बाहेर कुठे पडलय हो अजून ? हे वेळापत्रक रोजचंच झालंय . त्याला मोडावं इतकी हिम्मत नाही राहीली .

नवनीतची जुनी वही कपाटाच्या खालच्या कप्प्यात … अडगळीच्या सामनाबरोबर . पापण्यांचा असहकार सुरु झाला की ताजेल्या रात्री कप्पा आवरायला घेतल्यावर आपसूकच हात त्या वहीकडे जातो . मलाही मिळाली अशाच एका रात्री माझी जुनी सखी , वही .


कधी एके काळी माझ अक्षर इतक सुंदर होत हे विसरूनच गेले होते मी . एक एक पान उघडून वाचायला सुरु केल तश्या सगळ्या आठवणी उलगडत गेल्या . हे सगळ मी लिहिलंय ? विश्वासच बसत न्हवता . बऱ्याच दिवसांपासून अडगळीत पडल्यामुळे परकं वाटत होत . मी इतकं छान लिहू शकते याचा नव्यानेच शोध लागला त्या रात्री …. पुन्हा एकदा.

त्या रात्री लक्षात आलं … हल्ली डोक इतकं जड का वाटतंय ? मन इतकं कोरड का पडलंय ? साचून राहिलेलं गढूळ का झालंय ? डोळ्यातला पाऊस मला एकटी असतानाच का गाठतो ? माणसावर विश्वास ठेवायची आता का इतकी भीती वाटतेय ? का कोणासामोरच व्यक्त नाही करत मी स्वतःला ? आणि इतर बरेच अन्नुतरीत राहिलेले प्रश्न

सकाळी उठून पहिला एक नवनीत ची वही विकत घेणार आहे … हिरोचा पेनही बरेच दिवस नाही वापरला . जड झालेलं डोकं हलकं करायला रोज एक पान लिखाण पुरेसं आहे ना ? पूर्वीचे ते दिवस परत आणायचा विचार करतेय ? कसा वाटतोय ?

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)