निरोप शेवटचा !!!

मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार !!! आणि ते ही तुझ्या स्टाईल मध्ये . ३ उदगारवाचक चिंन्हासहित :)

का ? इतका का आश्चर्याने पाहतो आहेस ? याशिवाय काही वेगळ अपेक्षित होत का माझ्या तोंडून ? नक्कीच असेल . पण मी त्यातील काही बोलायचं नाही असं ठरवलंय . माझं मौन हिचं तुझी शिक्षा .

अभिनंदन यासाठी की तू मला हरवलस आणि आभार … मला भानावर आणल्या बद्दल .  इतके वर्ष माझं मन याच साखरेत घोळत पडलं होत , विश्वास आणि प्रेम असेल तर घट्ट धरलेला हात कधीही सुटत नाही . पण असंच नसतं नेहमी हे तू सिध्द करून दाखवलस . नाहीतर कोण जाणे अजून किती दिवस त्या उसन्या साखरेची गोडी मला समाधान देत राहिली असती .

प्रत्येकाचं स्वप्न असतं , मनाजोग स्वतःच एक घर असावं . पण त्या होऊन ही सुंदर गोष्ट म्हणजे  दुसऱ्याच्या मनात घर करून राहण . तुझ्यामुळे ही सुंदर गोष्ट माझ्या वाट्याला आलीये . तुझ्या आयुष्यातील माझ्या जागेला दुसरी पर्यायी व्यक्ती नाही … ती जागा आजपासून रिकामीच राहील . वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी एकतरी दिवस तू नक्की ती पोकळी बघून झुरशील . डोळे भरून आठवण काढशील माझी . आणि तीचं मी बांधलेल्या नात्याची विजयी सलामी ….

तुझी आठवण यापूर्वी ही प्रिय होती मला …… आता पूर्वी पेक्षा जास्त येईल . कदाचित रोज . मी काहीच गमावलं नाहीये . I did not loose anything . You lost me .

परिस्थिती माणसाला काहीही करायला भाग  पाडते म्हणतात त्यामुळे तुझ्याकडे सगळ्याची कारणं ही असतीलच की . झाल्या प्रकारात तुझी कितपत चूक आहे मला कल्पना नाही . नसेलही कदाचित . माझा जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही . मी मात्र विनाकारण होरपळले .  माणसांवर जीव लावल्याची खूप मोठी किंमत मोजली मी . " यापुढे कुणावरही डोळे झाकून प्रेम करू नकोस " या शिकवणी बद्दल कसे आभार मानू तुझे . समोर उभा असणारा प्रत्येकजण चांगलाच आहे आणि चांगलाच वागेल असंच मानायची मी . तू मला या जगाची खरी ओळख पटवून दिलीस .

तुला असणारी माझी गरज ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मी स्वतः एक भक्कम निर्णय घेईन याची कल्पना आधीच होती तुला . हो भक्कम … मुद्दामच कठोर हा शब्द वापरायच टाळल . आठवतंय तुला …… तूचं म्हणाला होतास " तू कठोर नाहीस . लगेच हळवी होतेस. फार लवकर मनाला लागतात तुझ्या गोष्टी " . तुझं हे वाक्य मला खोटं पडायचं नाही म्हणून … भक्कम निर्णय म्हटलं

ओंजळीतील सुकलेली फुलं टाकून देण्याच धाडस मला दिलंस . निदान तुझ्यामुळे ओंजळ तरी रिकामी झाली माझी . नवीन फुलं वेचायला जागा रिकामी झाली . वर्षाच्या अखेरीस सगळ मागे सोडून पुढे वाटचाल करायचं ठरवलंय मी . पुन्हा सगळ्याची नव्याने सुरुवात . पाटी कोरी असली की लिहिलेली अक्षर ठळक उमटतात म्हणे .

असा का अनोळखी नजरेने न्याहाळतो आहेस मला . माझं हे रूप पाहायला मिळालं नाही तुला पूर्वी कधी हा तुझा चांगुलपणा म्हणून . केल्या काही दिवसात बरंच काही बदललस तू . मग मी ही थोडी बदलले तर कुठे बिघडलं . मी ही स्वीकारलाच ना तुझा नकार ? एक ही प्रश्न न करता . आता माझा कोरडेपणा तू ही गोड मानून जप .

अरे हो …… एक निरोप द्यायचा होता . राहूनच गेलं बघ . तुला भेटलं की हे असं सगळ विसरायला होत. मी तुझ्यावर चिडले आहे हे ही .  :) असो .
निरोप हा की …… तुझ्या बद्दलच्या माझ्या सगळ्या भावना मेल्या . तू मारल्यास . पुन्हा कुणाच्या भावनांच्या खुनाचा गुन्हा माथ्यावर घेऊ नको . उजळ माथ्याने जगायला हिम्मत नाही तर मनाचा प्रामाणिकपणा जास्त गरजेचा असतो . एकटा असताना तुझंच मन तुला खात राहील असं पुन्हा कधीही वागू नको .

निघते मी …."येते " अस म्हणायचं टाळल . आता पुन्हा मागे वळून पाहणार नाही असं ठरवलंय . कितीही इच्छा होवो . माझ्या जाण्याने सुखावला असशील तर तू तरी आनंदी रहा.
 " चल , निघू मी ? " असंच विचारायचे ना नेहमी ? आज नाही विचारलं . सवयी प्रमाणे चुकून तू "नको" म्हणालास तर ……. तुझं मन मोडायची ताकद अजूनही नाही एकवटली माझ्यात .

गळ्यात दाटलेला आवंढा गीळ . निरोपाचा हुंकार ही फुटेनासा झालाय तुला . डोळे ओले करू नकोस . समोरचं उभी आहे मी अजून . पुन्हा डोळ्यात प्रतिबिंब दिसेल माझंच . मी गेल्यावर कोसळ कित्ती कोसळायचा तो .

नवीन वर्षाची सुरुवात नव्याने कर . तुझ्या आनंदासाठी माझ्या शुभेच्छा !!!

:)




8 comments:

  1. dukhavlel man bharun vahayla lagal ki paan hi kasa apura padat.... :(
    kshama.... karan sopp asta pan tyat swatah purn horpalun nighalyavar tya kshamela ani kshama magnaryala kahich arth urat nahi...
    urto to fakt asach ek shevtcha nirop...

    chaan lihila ahes... :)
    Happy new year to u... :)

    ReplyDelete
  2. मनातला राग ही इतक्या शांत आणि सभ्य शब्दात व्यक्त व्ह्यायला लागला तर कसं होणार ग तुझं ?

    उसळत नाही ते रक्त काय कामाचं ?

    बाकी …. जे लिहिलं आहेस ते उत्तम जमलंय .

    नूतन वर्षाच्या शुभेच्छा !!! ( ३ उद्गारवाचक सहित :p )

    ReplyDelete
    Replies
    1. पायल … Thank you. :)

      राग आल्यावर ओरडायला जास्त ताकद लागत नाही
      खरी ताकद लागते ती राग आल्यावर शांत राहायला

      Delete

Thank you for your comment :)