आठवण होते

उंबऱ्यावर पाय रेलून उभी राहून 
खापऱ्यानी आखलेल्या चौकटी मोजताना 
आठवण होते .....
हातून बालपण निसटत चालल्याची 

पहिलच पाउल उंबऱ्यावर अडखळत 
सांडलेले चार तांदळाचे दाणे वेचताना 
आठवण होते ....
माप ओलांडून आत आलेल्या दिवसाची   

ढग दाटून आलेल्या संध्याकाळी 
निळ्या कॅनवास वरचे पांढरे आकार न्याहाळताना 
आठवण होते 
निराभ्रपणे आकाशाकडे पाहायला विसरलोय याची 

नात्यांची वीण गळ्याभोवती आवळत चाललीये म्हणून 
गच्चीतल्या कोपर्यात तोंड खुपसुन रडत बसल्यावर 
आठवण होते 
नात्यातले बंधच सैल पडल्याची

कॉलेजचा ग्रुप फोटो कचऱ्यात सापडतो 
पायरीवरून खाली येणारे प्रोफेसर हि अर्धे उमटलेले असतात या फोटोत 
पण त्यांचं नाव काही केल्या आठवायला तयार होत नाही 
मग आठवण होते 
आठवणी ... सोनेरी क्षण ...  पुसट  होत चालल्याची  

रात्र रात्र जागून त्या मैत्रिणीशी गप्पा मारल्या होत्या 
बरीच गुपित तिनेही फोडली त्या रात्री तुमच्या समोर 
पण आज ... ७ महिने होत आले ... साधा फोन हि नाही आला तिचा 
आठवण होते 
प्रत्येक भेटीतील ओढ काही होत गेल्याची 

आठवण होते .....

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)