असेल तुझा तो हिरा



बालरूप तुझ्या खोड्या 
बोले शेजारीण मला 
" धाकात ठेव ग जरा,
असेल तुझा तो हिरा "

इवालाल्या हातांनी 
किती कुरवाळशील आई ?
मायेची कोवळी गंगा 
दोन्ही डोळ्यातून वाही 
ओठाच्या पाकळ्यांना 
निजू दे अजून थोडे 
किलबिल बोबड्या शब्दांची 
कसे पळती सुसाट हे घोडे
पेल्यातल्या दुधालाही की रे 
फुटला आता घाम 
पावलांची दुडूदुड बोले 
कान्हा थोडा वेळ थांब

पायात थुई थुई नाचून 
पैंजणाचा नाद थकला 
तुझ्याशी खेळ खेळून 
सुर्यदादा ही क्षितिजाशी झुकला

पेंग अंगाईला आली 
तरी उघडे तुझे टपोरे मोती 
काळोखाच्या कुशीतून चांदण्या 
बघ कृष्णाचा पाळणा गाती 

फुगलेल्या भाकारीमागे 
गेला कुठे तुझा चंदा मामा ?
सगळी तुझी रासलीला 
यशोदेच्या पदराखाली जमा 


  

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)