आज झोपच आली नाही ....

एकाही कोड्याची उकल झाली नाही
गुंतलेली दोन टोकं सोडवता आली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

रात्र दाराशी उभी ,चंद्र उंबऱ्याशी थांबलेला 
पापण्यांची शिंपली बंदच झाली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

वाट पाहताना रस्ता लांबलेला 
पण वळणावरून सदाच आली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

ओंजळ प्रकाशाने भरलेली , दिवा तेवत ठेवलेला 
नंदादीपाची वात मंदच झाली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

पापण्यांच्या काठावर विसावलेले मोती
उठलेल्या तरंगाची लाटच झाली नाही 
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

कुठे खपली कुठे ओलावा , आत खोलवर दाह
वेदना या जखमेची सहनच झाली नाही
का कोण जाणे ?
आज झोपच आली नाही ....

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)