मला इतकच कळत



असच काहीस ... आर्यच्या वयाला साजेस ... 




त्याच्या इतक लहान होऊन ...एक प्रयत्न .. 
त्याच्या लेखणीतून लिहिण्याचा :)
एक निरागस भाव ... चिमुकल्या डोळ्यात दाटलेला 

आई ....तुला वाटतंय मला अजून काहीच समजत नाही

रोज संध्याकाळी ... देव्हाऱ्यासमोर बसून 
गणपती बाप्पाच स्तोत्र म्हणत असतेस 
मला इतकच कळत
इथे राहतो माझा बाप्पा .... आणि तो रोज तुझ्याशी बोलतो
छानस लाल फुल त्याला मी वाहील कि त्याचा मोठा मोठा कान ही हलतो 

कुठे थोडासा ताप आला मला काल ... 
(नवीन नवीन दात येणार म्हटल्यावर इतक होणारच ग आई )
अख्खी रात्र तू माझ्याशेजारी जागून काढलीस 
मला इतकच कळत
डॉक्टर काका नुसतेच कडू गोळ्या देतात ...... बरं नाही करत
तू नुसत एकदा जवळ घ्यायची फुरसत ... ताप येतच नाही परत :)  

उगाच का ग वेड्यासारखी काढतेस पाणी डोळ्यातून ?
विचारलं तर म्हणे..... कचरा पडलाय spider च्या जाळ्यातून 
मला इतकच कळत
बाबांची आठवण आली की .... रडल तरी चालत 
तुझ्या एका हुंदाक्यावर माझ्या बाबाच सगळ जग हालत 
  
माझ्या पेल्यातल दुध संपेतोवर तू अखंड बडबडत असतेस 
त्यातला शेवटचा घोट तुला प्यायला दिल्यावर ... कित्ती मनापासून हसतेस
मला इतकच कळत
वरण भात खाताना .... माझ आवडीच माकड रोज बेडवरून पडत 
(Five little monkeys jumping on the bed हि आमची favourite poem आहे बर का ......)
अन मला हसताना पाहिलं कि आपोआप तुझ पोट भरत

लापछपीच्या आपल्या डावात , राज्य नेहमी तुझ्यावरच ग कस येत ?
कधीतरी लपून बस तू ही
भिंतीत तोंड खुपसुन १०...२०....३० मलाही म्हणता येत 
मला इतकच कळत
तू डोळे मिटल्यावर , लपायचं कुठे ? कळतच नाही काही 
कुठूनही शोधून काढशील मला तू .... 
फक्त तुझ्या ओढणीत येउन लपल्यावर मी तुला कधीच सापडत नाही :)

आणि आई ....तुला अजूनही वाटतंय मला काहीच समजत नाही :)

View Facebook Comments

4 comments:

Thank you for your comment :)