सगळं इथेच .... ते ही व्याजासहित



" सगळं काही इथेच फेडाव लागतं आणि ते ही व्याजासहित "

आज इतक्या वर्षांनी  माझ्या आजीच तोंडून कधीतरी ऐकलेल हे वाक्य कानात घुमत होतं. सगळे हिशोब आपोआप जुळून आले की काय अशी भीती वाटून गेली.

या भीतीची सुरवात तिच्या फोन पासून झाली

सकाळी एका मैत्रिणीशी बोलणं झालं ... Coronavirus चा लॉक डाऊन असल्यामुळे फोनवरच गप्पा ...  तिच्या आईबद्दल चौकशी केल्यावर , बोलता बोलता ती बोलून गेली

" ट्रेन चं तिकीट रद्द केलं बघ आताच . वर्षभर साठवून ठेवली होती रजा, आईकडे जाऊन राहता येईल सुट्टीला म्हणून .. आणि नेमका हा व्हायरस .  आता कधी माहेरी जायला मिळतंय देव जाणे .
 रात्री गादीला पाठ टेकली की डोळ्यातून पाणी वाहायला सुरू होतं आई बाबांच्या आठवणीने .  जीव कासावीस झाल्यासारखं काहीतरी. नेमकं काय होतंय कळतंच नाही. पोटातल्या आतड्याला पीळ पडल्यासारखं अस्वस्थ मन ... कोणाला सांगता ही नाही येत.
सगळं इथेच फेडाव लागतं का ग खरंच ? कर्म वैगरे खरं असेल ? "

मला तिच्या या बोलण्याचा सुर आईच्या आठवणी पासून कर्म वगैरे पर्यंत का अणि कसा गेला ?  हे काही कळेना ...
थोडासा उलघडा करून विचारलं तर सगळं सविस्तर .... मनाने मोकळी झाली .

८ वर्षापूर्वीची गोष्ट ... तीच पिल्लू जेमतेम ६ महिन्यांचं आणि नेमकी हिची टाळता न येण्यासारखी अडचण . त्यामुळे पिल्लाला  आईकडे ठेवून तिने ऑफिस सुरू केलं . तशी दर आठवड्याला भेटायला जायची ती बाळाला पण ६ महिन्याच्या पोरासाठी ६ दिवस आईवाचुंन काढणे म्हणजे दिव्य. तिची सुध्दा घालमेलच की... बाळाच्या डोळ्यात पाणी बघून शेवटी कसेतरी ४ महिने काम करून तिने कायमच सोडून दिलं.  बाळाच्या वाट पाहणाऱ्या नजरेला पुर्ण विराम .

आणि आज इतक्या वर्षांनी पुर्ण जगावर बेतलेल्या अनपेक्षित संकटामुळे माहेरी जाण्यासाठी बघावी लागणारी वाट, रात्रभर डोळ्यातून वाहणार पाणी, कुणालाही न सांगता येणार शल्य ... या सगळ्या मुळे तिला ८ वर्षांपूर्वीच सगळं डोळ्यासमोर उभ राहत होते.

" बाळाच्या डोळ्यातून वाहून गेलेल्या प्रत्येक थेंबाचा हिशेब तर नसेल मांडला गणपती बाप्पाने ?
६ महिन्यांच्या बाळाला आईपासून लांब रहावं लागलं काही दिवस .... त्याची ती वेदना आज  माझ्यासमोर उकल न  सापडलेली कोडी म्हणून उभी राहिली असतील का ?
आईची वाट पाहणाऱ्या त्याच्या नजरेचा सगळा हिशोब आज माझ्या नजरेला फेडावा लागतोय का ? आणि तो ही व्याजासहीत ?
आणि जे जर खरं असेल तर .....
गणपती बाप्पा समोर हात जोडून मदत मागण्याची तरी योग्यता असेल का माझी उरली ? "

सगळे प्रश्न एका दमात विचारून घेतले तिने . ज्यातील एकही प्रश्नाचं उत्तर आज माझ्याकडे नाही.

सगळं काही इथेच फेडाव लागतं आणि ते ही व्याजासहित.... आजीच हे एकच वाक्यं पुढच्या क्षणाला माझ्या डोक्यात चमकून गेलं .

तिला जे वाटतंय तसं कदाचित नसेलही काही ..
म्हणतात ना मन चींती ते वैरी न चिंती ... तसं उगाचच भीती वाटून गेली असेल तिला
 कदाचित ..... असेलही
बाप्पाने लेकाच्या डोळ्यातला वाहून गेलेला पुर आज हिच्या डोळ्यातून वाहून रिकामा करायचं ठरवलंच असेल तर ?

कोण सांगावं?
या कोरोना मुळे पटावरचे सगळे फासे उलटे पडलेत. प्राणी संग्रहालय पाहायला जाणारी मंडळी, खिडकीच्या गजातून रस्त्यावर मुक्त विहार करणारे मोर केविलवाण्या नजरेने पाहत आहेत .

लंबोदरा ... तुझ्या उदरा इतका मोठेपणा दाखव आणि सगळ्या चुका पोटात घे .... 🙏
अखंड भारताने एकत्र येऊन ९ मिनिटांसाठी तुझ्यासमोर लावलेला दिवा ... खूप मनापासून प्रार्थना करत होता .
बळ दे . 🙏


Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)