निखारा

पाय पोळला पायात
निखार्याच अंथरून
परी सांगे हा निखारा
पोरी चाल सावरून

पोळलेला पाय तुझा
नाही होणार सहन
टाक पाऊल पुढचं 
काळजीच हे चालण

धगधगती धरित्री 
वर आकाश तापल 
मधल्या या पोकळीला
लाही कळणार काय ?

नको सोबत शोधूस
एकट्याच हे चालण
एकट्यानं चालायचं
आपापल सावरून 

नसे कुणाला सुतक
कुठल्याश्या मयताच 
नको फिरुस माघारी
ऐटदार  तुझी चाल

चार लोक वळतील 
नको मिळवू नजर
कुणासाठीतरी जप 
तुझ्या नजरेची धार

तापलेला हा निखारा
तुझा तूच कर शांत
काचेच हे घर तुझ
त्याला दगडी कुंपण

जप तुझ्या या काचेला
त्याला हिर्याची चकाकी
जरी तापला निखारा
हिरा जळणार नाही

~ अमृता 

......आणि कुणीतरी पाहिलं


पापणीही न लवता
बघत एकसारख कुणीतरी
डोळ्यातला आपलेपणा 
सांगते नजर खरी

आपोआप पावलं 
कोणासाठी तरी थांबतात
मागे कुणी असो नसो
नजरेचा एक कटाक्ष टाकतात

नेहमीच्या शब्दांना 
अर्थ येतो वेगळा
नुकताच फुललेला वसंत
रंग बदलून जातो सगळा

कुठल्यातरी पायरीकडे बघून
उगाचच येत हसायला
मग आठवणीही येतात 
सोबतीला बसायला

अनोळखी पाउलवाट 
रस्त्याच्या कडेला
प्रत्येक प्रसंग आठवतो 
जणूकाही तो आजच घडलेला

हल्ली हे असच होत
का ? कळत नाही
कुणीतरी हळूच वाकून बघत 
पण तिथे कुणीच दिसत नाही

नजर शोधत असते
पाय लयीत चालतात
ओठ बंद असतात 
डोळे मात्र बोलतात

पुढच्याच वळणावर कुणीतरी
पाहत असत वाट 
लपवताच येत नाही 
डोळ्यात आनंदाची लाट

न लवणाऱ्या पापण्यात 
नजर भारदस्त
एकच पाऊल पुढे येऊन 
सुंदरस स्मितहास्य 

किती गोन्धळल्यासारख होत
हे सगळ अचानक घडल्यावर
आपण शोधत होतो
आणि कुणीतरी पाहिलं 
हे आपल्याच लक्षात आल्यावर 

~  अमृता 

चांदण.. मुक्याने बरसणार


चारचौघात बसून बोलताना 
शब्दानाही तोलाव लागत 
ओठापर्यंत आलेल तुझ नाव 
ओठावरच झेलाव लागत

निघालाच विषय तुझा 
तरी मला बोलता येत नाही 
मुक्याने बरसणार चांदण 
पण मला वेचता येत नाही

बोलणारा बोलत जातो
आठवणींची गाठ सोडत जातो
अन अश्रूंचा तो नाजूक बांध
बघता बघता मोडत जातो
तरीही प्रत्येक थेंब 
डोळ्यातच जिरवावा लागतो
सरावाचाच धडा 
पुन्हा एकदा गिरवावा लागतो

मला एकटीला गाठून हा थेंब 
धबधब्यासारखा कोसळतो
आठवणीचा शांत समुद्र 
नको इतका उसळतो

बाहेर रणरणत उन
मी मात्र भिजलेली
कारण पेटलेली प्रत्येक ज्योत 
तुझ्या पावसात येऊन विझलेली 

~ अमृता 

सुटत चाललेली वीण


आजपर्यंत त्या झाडाकडे
खुपदा वळून पाहिलं होतं
त्याच्याच सावलीला माझ मन
एकदा विसाव्याला राहील होतं

प्रत्येक फांदीच प्रत्येक पान 
अजूनही बघून हसत 
एकटी दिसल्यावर मी
सोबतीला येऊन बसत

का कुणास ठाऊक 
पण मला नेहमी वाटत
आठवणींच कोवळ  उन 
मला याच सावलीत मिळत

याच झाडाचा सुगंध 
हरवलेलं सगळ परत करेल
माझ्या डोळ्यातले मोती 
माझ्याच ओंजळीत भरेल

नात्यांची वीण बांधायला 
या फुलांनी शिकवलं
विखुरलेलं सांधायच कस
हे हि त्यांनीच दाखवलं

कारण ....
एकदा वीण सुटत गेली 
कि सारी नाती तुटत जातात 
नात्यातले घट्ट बंधही
अलगद सुटत जातात 

म्हणूनच पुन्हा वळून 
पाहीली ती सावली 
सुटत चाललेली वीण 
जिन मला बांधायला लावली 

भरदुपारी आज सावली 
झाडाच्या पारावर बसली होती
आठवणींचा फुललेला वसंत पाहून
माझ्याशी मुक्यानेच हसली होती 

~ अमृता

सगळ्यांपासून दूर ..


मनातल्या गोष्टी मनातच ठेवून
मनापासून हसल्यावर 
हासुद्धा भासच वाटतो
आपल माणूस समोर दिसल्यावर

मनातली वेदना मनातच जपून
मनापासून रडल्यावर 
नको इतक रिकाम वाटत 
भरलेलं आकाश पडल्यावर

मनातला राग मनातच धरून
मनापासून रुसल्यावर
पुन्हा एकदा रुसावस वाटत
समजूत घालणार कुणी असल्यावर

मनातली भीती मनातच लपवून 
मनापासून घाबरल्यावर
रोजचाच काळोख दाटल्यासारखा वाटतो 
कुणीच सोबत नसल्यावर

मनातल प्रेम मनातच साठवून 
मनापासून प्रेम केल्यावर
सगळेच भोवती जमल्यासारखे वाटतात
सगळ्यांपासून दूर गेल्यावर

सगळ्याच भावना मनात गुंफून 
मनापासून विणाल्यावर
जरीकाट उजळल्यासारखा वाटतो
भोगल आयुष्य डोळ्यासमोरून सरल्यावर 

~ अमृता 

दुरावला आज चंद्र

दुरावला आज चंद्र
कुणासाठी रात्र जागु
मिटल्या पापण्यात दिसेना
कुणासाठी झोप मागू

नाही दिव्यात या वात
कसे जुळतील हात
वाहणाऱ्या जखमेला
नाही कुठलीच जात

कशी चालू अनवाणी
भेगाळली इथे माती
नाही आवाजाची साथ
सूर एकटेच गाती

भरलेल्या आठवणी
मी लोटला दिवस
कसे सांगू चांदण्यांना
इथे रोजची अवस

कोण सांगेल वाऱ्याला
आज तू हि नको वाहू
दूर गेलेल्या वाटेत
दोघे एकटेच राहू

पाषाणातली हि मूर्ती
तिला देऊ किती हाक
माती भिजली रडून
नभा आज तरी वाक

सोसाट्याचा आज वर
पानाफुलात वाहिला
चंद्र माझा पौर्णिमेचा
कुठे एकटा राहिला

तिमिराच्या सोबतीला
पाणी डोळ्यात साठले
सांग माझ्या या चंद्राला
गाली चांदणे सांडले

चार दिसांची कहाणी
अधुरीच कशी राही
दुरावल्या चंद्रासाठी
आज रात जागी राही

सांजवेळची सावली
आली कुठल्या वाटेला
पाठवला इथे सूर्य
त्याने माझ्याच भेटीला
दुरावला आज चंद्र ......

~ अमृता

समोरच कोसळल्या


भरतीच्या लाटा 
किनार्यावर येऊन शांत झाल्या
तुला न्हवत्याच दाखवायच्या
डोळ्यात नकळत दाटून आल्या

खाली झुकली नजर
पापण्याही ओशाळल्या 
भरून आलेल्या मेघधारा 
तुझ्या समोरच कोसळल्या

डोळे माझे असले तरी 
आज तुला साथ दिली
ठेवल होतं समजावून
पण ऐनवेळी फितुरी केली

जिंकावास तू म्हणून खेळलेल्या डावात 
तुझ्या समोरच येऊन हरले
कळलंच नाही कसली ही हार 
हसतानाही डोळे भरले

अनिर्णीत डाव नुसता 
भावनांचा खेळ नसतो
सोन्गट्या कशाही विखुरल्या 
मेळ घालणारा कुठेतरी असतो 

नजर नुसती खिळवून 
येतात सोन्गट्या सुद्धा हलवता 
माझ्यातर भावना होतं
बाहेर पडल्या न बोलावता  

~ अमृता 

भावनांचा गुंता

नको विचारू रंग फुलाचा
वळणावरच्या वठलेल्या झाडाला
ऐकवू नको विजयी इतिहास 
बुरुज ढासळलेल्या विद्रूप गडाला

मागू नको प्रेमासाठी सुगंध
विरहात रडणाऱ्या पारिजाताच्या झाडाला
सांगू नको तुझी प्रेम कहाणी
गावाबाहेरच्या एकाकी वाडयाला

नको देवू गाणी पावसाची
रणरणत्या उन्हात तापलेल्या रेतीला
दाखवू नको शीतल चांदण 
दिव्याबरोबर जळणाऱ्या वातीला

नको विचारू गाभार्यातल्या  देवाला
ओठापर्यंत येऊन थांबलेल्या शब्दाचा अर्थ
शब्दांच्याही पुढचा एक जग असत
शब्दांचा खेळ हा सारा व्यर्थ

दुखाचा डोन्गर सुखाची राई
प्रयत्न नको करू सोडवण्याचा 
फुललेला वसंत आज न उद्या जाणारच 
अट्टाहास नको त्याला अडवण्याचा 

शेवटपर्यंत साद घाल
उंच आकाश कुठेतरी वाकेल
सुटेल हा भावनांचा गुंता
जिथे तुझा माथा टेकेल 

~ अमृता  

"प्रेमात कुणी पडलय का ?"

चंद्राला सोबत म्हणून
डोळे रोज जागतात
लुकलुकणाऱ्या तार्याप्रमाणे 
का वेड्यासारखे वागतात ?
चांदण्यांशी  गप्पा मारत 
रात्र कधी सरलीये का ?
पहाटेच्या सूर्यासाठी 
कधीतरी ती उरलीये का ?
हरवलेल्या रात्रीमुळे 
उजाडायच  अडलंय का ?
क्षितिजावरचा सूर्य विचारतोय 
"प्रेमात कुणी पडलय का ?" 

पारिजाताचा सदा पाहून
रोज वाईट वाटत
का कुणास ठाऊक पण
डोळ्यात पाणी साठत
प्रत्येक फुलासाठी रडून
आजतरी पाणी थांबलय का ?
एकाचा तरी आयुश्य  
क्षणभरासाठी तरी लांबलय का ?
झाडापासून वेगळा होऊन 
एकतरी फुल साडलय का ?
झाडावरच फुल विचारताय 
"प्रेमात कुणी पडलय का ?" 

तलावाच्या काठाला
पाय रोज वळतात
काठावरची सगळी गुपित 
जणू त्याला कळतात
तलावात खडे मारून
संध्याकाळ संपेल का ?
मारलेल्या खड्यामुळे 
तलाव कधी चिडलाय का ?
पाण्यावरचा तरंग विचारतोय 
"प्रेमात कुणी पडलय का ?" 

'तिच्या' फक्त होकारासाठी
खरच 'त्याच ' अडलंय का ?
गालावरची खळी कधी
तिच्यासाठी खुललीये का ?
रातराणी डोळ्यातली
खरच कधी फुलालीये का ?
ओठ्वारच गाण त्याने 
तिच्यासाठी खुडलय का ? 
आपल्या ओंजळीतल  सुख 
तिच्या ओंजळीत सोडलंय का ?
गोन्धळलेल मन विचारतंय
"प्रेमात कुणी पडलय का ?" 

प्रत्येकाचा एकाच प्रश्न 
"प्रेमात कुणी पडलय का ?" 
या ओठांचा एकाच उत्तर
प्रेमाशिवाय कोणाच अडलंय का ?
सगळ्यांनी विचारण्याइतक 
काहीतरी घडलंय का ?
कुणाच्यातरी विरहात कुणाच 
मन कधी रडलाय का ?
ओठावरच हास्य विचारतंय 
"प्रेमात कुणी पडलय का ?" 

पण .....

न झेपणारे घाव
कधीही कुणी झेलू नये
न पेलणार गुपित 
कुणासमोरही बोलू नये

उघड्या डोळ्यांनी प्रेम कराव
न बंद डोळ्यांनी आठवावं
आठवणींच उठलेलं वादळ 
डोळ्यातच साठवावं 

कधीतरी 'ती' समोर येवून
सुंदरस हसेल 
तिचं हे हसण आज 
फक्त त्याच्यासाठी असेल

~ अमृता 


चंद्राबरोबर तू ही हवा होतास

पक्षांचा किलबिलाट
दिवसभर त्या झाडावर होता
आणि त्याच्याच सावलीत 
रात्री मोगरा फुलला होता
 
संथ वाहणाऱ्या वाऱ्याला
जरा जास्तच वेग होता
सुगंधासाठी मोगार्याकडे 
तो गयावया  करत होता 

मस्तक हलवून उडत जात
हसत हसत गावातच पात 
त्याच्या प्रीतीसाठी मात्र 
विशाल रेगीस्तान जळत राहत 

पानांची सळसळ 
भंगत होती शांतता  
निजलेली चिऊपिल्ले
वाऱ्याची अंगाई ऐकता 

शीतल चांदणे धरणीवर
चंद्र आकाशात
काळोख  हा पसरला 
तो एकटाच प्रकाशात
 
हवी होती सोबत
म्हनुन् त्याने हात  पुढे केला
नि माझं हात आज
अलगद वर झाला 

खरच तो हात
तिथे पोहोचायला हवं होता 
चंद्र माझ्या हाती
लागायला हवा होता

चांदण्यांचा आयुष्य
जागून बघितलं असत 
एका क्षणासाठी का होईना 
आकाश अनुभवलं असत 

तरीही हा चंद्र 
माझ्यासाठी  आज पुन्हा उगवला 
त्यावेळी झालेला अश्रूंचा उल्कापात 
आणि तो मातीत विरल्यावर 
फुललेला मोगरा 

खरच .....
हे बघायला आज 
चंद्राबरोबर तू ही हवा होतास 

ओठावरच हसर गाणं...देठासहित खुडून दिलस

          सुप्रभातीची कोवळी सूर्यकिरणे दवबिंदूच्या तलावात बुडवून पारिजाताच्या शब्दांची माणिकमोत्यांची कविता फुलपाखराच्या पंखांच्या ताम्रपत्रावर  लिहून  गुलाबाच्या करंडीतून तुझ्यापर्यंत पोहोचवावी म्हणून कितीतरी दिवसांनी आज पिसारा फुलवलाय .जे णे करून तुझ्या मनात भरून आलेले ढग एकदाचे बरसून जाऊ देत आणि पुन्हा एकदा आकाश निरभ्र होऊ दे . आकाशात हिरांची उधळण करणारा तो धवलमय तेजस्वी  चंद्र त्याच्या देखण्या चेहऱ्याच दर्शन घडवू दे . शुक्राची हि चांदणी तो पर्यंत त्याला साद घालील जोपर्यंत तिच्या काळोखाच्या कुशीत शिरून पाहिलेल्या सोनेरी स्वप्नांचा इंद्रधनू होत नाही .
          मातीच्या कुशीत सोन होवून उगवणाऱ्या सोनाचाफ्यालासुद्धा समाजात कि आपला सुगंध कुणालातरी हास्याचा खळखळणारा झरा होवून आपल्याबरोबर वाहून आणत .काळ्या पाषाणातून उद्या घेत उंचावरून कोशालानार्या धबधब्याला , कुणाच्यातरी वेड्या मनाला अल्लड व्हायला लावत . 'त्या ' च्या आठवणीने बैचेन करणाऱ्या 'तिला' भरकटलेला पाखरू परतून यावा तसं सार काही सोनचाफ्याच्या मिटलेल्या ओंजळीत सापडत. जिथं तिला खात्री असते , मिटलेल्या ओंजळीतील आठवणी जेव्हा उमलतील तेव्हा तिच्या फुललेल्या पायघड्यावरून नक्षत्राच्या पावलांनी तो तिच्यासाठी तिच्याकडे वाऱ्यासारखा धावत येईल . आणि मऊ धुक्याच्या पालखीतून तिला आपल्याबरोबर घेऊन जाईल . तुझ्यासारखे त्या सोनाचाफ्याला माझ्या हसणाऱ्या, रडणाऱ्या, लाजळूसारख्या रुसणाऱ्या, रागावाणाऱ्या चेहऱ्यावरचे भाव जरी वाचता येत नसले, जरी तुझ्यासारख्या भेदक नजरेने त्याला पाहता येत नसले तरी माझ्या नाजुकश्या मनात झालेला भावनांचा गुंता आणि तो सोडवताना माझ्या गालांवरून एकसारखे ओघळणारे थेंबांचे लयदार पण कुठेतरी जखमा करणारे , कुठल्यातरी जखमेवरची खपली काढणारे अश्रुंचे संगीत त्या सोनाचाफ्याला एका नजरेत कळले. पण तू .... धरीत्रीच्या आठवणीने व्याकुळ होऊन तिला भेटायला झुकलेल्या क्षितिजावरच्या आकाशासारख निस्सिम प्रेम राहू दे पण खडकावर आपटणार्या लाटेसारख एका क्षणाच आयुष्यही आज माझ्यासाठी आणल नाहीस.
         रोजचा उगवणारा दिवससुद्धा अनोळख्या प्रत्येक माणसासाठी     नवीन  प्रेम , नवा रंग , नवी आशा , नवीन आकाश , नवा सूर्य, नवा चंद्र  सारकाही न मागता आणून देतो पण तू मात्र आज धो धो कोसळणाऱ्या पावसात उभा राहून दुष्काळ पडल्याचा खोटा भाव आणलास
         एका दिवसाचा पाउस तुझा
         सगळ्याला बहार आला
         ओंजळ जरी भरलेली असली
         तरी हात आज तुझा
          रिकामाच राहिला
                     तुझ्या डोळ्यातील
                     माझ्या डोळ्याचं स्वप्न
                      बघायचाच राहून गेला
                      जरी चेहरा नाही दिसला तुझा
                      तरी मी तुला नखशिखांत पाहिलं

       तहानेने व्याकुळ झालेल्याच्या ओठापर्यंतचा पाण्याने भरलेला द्रोण जर काढून घेतला तर झालेल्या वेदनाही कमीच असतील. त्यापेक्षाही तीव्र अस्वस्थता आयुष्यात पहिल्यांदा अनुभवली . ज्याच्यासाठी अवसेच्या रात्रीही मि माझ्या भावनांचं चांदण अंथरल तो पौर्णिमेचा चंद्र माझ्या नकळत उगवला . इतरांनी त्याला पाहीला पण माझ्या समोर का ढगाआड गेला ? तक्रार करू ती कुणाकडे ? त्या चंद्राला आपल्या झगमगीत रजईत  लपवून इतरांचे दिवे मालवल्यावर बाहेर काढणाऱ्या सूर्याकडे कि आपल्या सुंदरशा शुभ्र महालाच्या मध्यावर असलेल्या तलावात लपायला जागा देणाऱ्या त्या ढगाकडे ?
        मै जिसे चाहती हू
        उसे जमानाभी चाहता है
        सोचा खुदासे शिकायत करू
        लेकीन खुदा भी उस से मोहोब्बत करता है 

    
        गळून पडणाऱ्या पिकलेल्या पानालाही झाड सावली देत ..... का ?? आज कळल .... कारण रस्ताकडे पाठ करून वाट पाहणाऱ्याच्या जखमा राक्ताबाम्बळ होऊन वाहत असतात. ज्या मला सहन झाल्या नसत्या . दूरपर्यंत पोहोचलेल्या पायवाटेवर उठलेल्या वावातालीसारख माझ येण, अगदी अचानक, अनपेक्षित, तितक्याच वेगात. त्या वावटळीत माझा तरी चेहरा दिसला का रे तुला ? एकदाही न पाळतात अतानालेल्या प्रत्यंचेवरून सुटलेल्या बाणासारखी निघून गेले . तुझ्या एका नजरेचीही अपेक्षा न  करता. अथांग पसरलेली सागरासारख शुध्द , अनंत , अभ्येद्य अशा तुझ्या प्रेमाचा साक्षीदार करून घेतलस मला 
        विचारणार नाही तुला
       तू मला काय दिलस
       ओठावरच हसर गाणं
       देठासहित खुडून दिलस
       हे काय थोडं केलस

       माथ्यावर  आलेल्या भास्करासारखा माझा तप्त राग या अश्रूसागरात बुडून मावळतीच्या किनाऱ्यावर येऊन शांत झाला . भर दुपारी सूर्य ढगांनी झाकालावा अशी तुझ्या चेहऱ्याची एक झलक , माझ्यासाठी आणलेल्या त्या तुझ्या डोळ्यातील आत्मीयता तुझ्या पाठमोर्या आकृती ऐवजी मिळाली असती तर प्रत्यंचेतून सुटलेल्या बाणाने उन्हात तुझ्यासाठी चांदण सांडलं असत . रिकाम्या राहिलेल्या तुझ्या हातात नक्षत्रांची वेल गुंफून  दिली असती . ऋषींनी समाधी लावली असा निश्चल उभा होतास . मला काय हवं आहे ? विचारावं ही वाटल नाही की खूप काही विचारायचं होतं, खूप काही सांगायचं होतं पण हिरव्यागार  लवलवणाऱ्या पात्यासारख न दिसायच्या आधीच अदृश्य झालेलं माझं येणंच तुला दिसलं नाही ? 
        पुढल्या वेळी येताना सूर्याकडून दिवे घेऊन ये. यावेळी तुझ्या समोरून येईन . पण त्या तेजाने माझे डोळे दिपणार नाहीत. एकच प्रार्थना करते या सुर्यणारायनाकडे .....
       'सूर्यदीपांच्या तेजाने माझ्या काळ्याभोर डोळ्यांच्या कडांवर येऊन  थांबलेल्यापैकी एकही दवबिंदू चमकू नये. त्यातला एकही दवबिंदू त्या भेदक  नजरेला दिसू नये '  


 

होईल ... हळूहळू याचीही

किती वेळ मी वाट पहायची ?
किती वेळ नजर तिष्ठत ठेवायची ?
अन् किती वेळ या ऑफीस ची ओझी
माझया खांद्यानी वाहायची ?

          घड्याळाने मागे सोडलेले प्रत्येक क्षण
          गुंतलेली वीण सोडवत जाईल
          डोळ्यात प्राण आणून वाट पाहणार पाणी
          गालांवरच सुकून जाईल
          होईल ...
          हळूहळू याचीही मला सवय होईल

तुझ्या वाटेकडे डोळे लावून
थकलेली ती नजर
अन् कधीही न वाजणारा
तुझ्या घड्याळाचा गजर
उंच उंच राहून दमलेल आभाळ
थोड्या वेळाने जमिनिशी
अलगद झुकून जाईल
होईल ...
हळूहळू याचीही मला सवय होईल

         मनात दाटून आलेल प्रेम
         भोवतीला स्वप्न सजलेली
         अन् तुझ्या onsite च्या issue त
         माझी रात्र भिजलेली
         डोळ्यांची मंद वात
         नंदादीपसारखी विझून जाईल
         होईल ...
         हळूहळू याचीही मला सवय होईल

घरभर उठलेला मोगार्‍याचा दरवळ
अन् तुझ्या श्वासाच्या सुगंधान
माझया अंगात उठलेल कहर
मनात उठलेला आठवणीच मोहोळ
असच एकटेपणात वाहून जाईल
होईल ...
हळूहळू याचीही मला सवय होईल

        मग....
        कंठापर्यंत येऊन थांबलेला माझा श्वास
        अन् कुठेतरी गळ्यातच गुदमरलेला
        छोटासा आवाज
        माझा राग काढत काढत
        तुलाच चोरून चोरून हसू येईल
        होईल ...
         हळूहळू याचीही मला सवय होईल

'कधी येशील रे घरी ?'
उत्तर माहीत असूनही
विचारलेल मी नेहमीच कोड
'माहीत नाही' या एका वाक्यावर
तुझ नेहमीच अडलेल घोड
सोबतीसाठी तुझ्या लांबलेला हात
कुठपर्यंत एकटा राहील ?
होईल ...
हळूहळू याचीही मला सवय होईल

माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा

निरभ्र आकाश घेऊन पहाट जन्माला यावी आणि ऐन मध्यानीला सूर्य झाकाळला जावा . इतका निस्तेज आहे का माझा सूर्य ? इतका कमकुवत झालाय का माझा मन ?
       हजार पारंब्यांनी जमिनीशी नळ जोडून क्षितीजाचाही अंत शोधणारा माझा वटवृक्ष . पण बुन्द्याशी बिलगलेला सायलीचा वेळ खुडल्यावर उन्मळून पडावा तसा निश्चल आणि निपचित पडलाय . असा का ?    ज्या वाऱ्याशी स्पर्धा करून त्याला वावटळीतल्या पाचोळ्या सारखा उडवून लावलं, त्याच वाऱ्याशी आणखी एकदा स्पर्धा करायचा मोहच कसा होत नाही ?
       मन .... समुद्राहून खोल .... हक्काचे मोती शोधायला त्याचा कोपरा न कोपरा पिंजून काढला होता . आठवतात ला ते शुभ्र मोती ? भिजलेल्या पावसाच्या ओल्याचिंब पाठीवरून सूर्य किरणांनी  स्पर्श केल्यावर नखशिखांत उठलेला शहारा ..... आणि त्याचा झालेला तो इंद्रधनू  ... इतक्याच .... कदाचित त्यापेक्षाही जास्त मोहकपणे त्या मोत्यांची माळ गुंफली होती . हौसेचा किनारा गाठणं तर राहू देच पण एक औपचारिकता म्हणूनही ती माळ पुन्हा घालावीशी नाही वाटत. इतका परकेपण ???? इतका एकटेपणा ????
       परिसराचा मौन म्हणजे एकांत आणि कुटुंबात राहून एकट  वाटणं म्हणजे एकाकीपणा. पण ज्याचा कुटुंबच हरवलाय त्याने काय करायचं ? एका किनाऱ्यावर मी नी दुसऱ्या किनाऱ्यावर माझा घर.... मधल्या डोहाला पोहून पार करायला एकही होडी नाही. पोहूनच पार करायचं म्हटलं तर बुडायची भीती नाही. पण एखादा कालिया फणा काढून समोर उभा राहिला तर त्याच्या विषाने अपवित्र होण्याचा धोकाच जास्त वाटतोय .

रडून लालबुंद झालेला सूर्य 
गालावरून ओघळणारी पावसाची सर
ओंजळीत अश्रू वेचायला 
समुद्राशी वाकलेलं क्षितीज 
अन किनाऱ्याची सीमा ओलांडून 
लाटेसरशी येणारा हुंदका 
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा

रात्रभर तेवणारी नंदादीपाची वात
साथीला जगणारी अवसेची रात
प्रकाश वेचायला मिटलेल्या 
तळहाताची ओंजळ
अन श्वासाच्या लयीत
फडफडणारी एकटीच ज्योत 
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा

वार्धक्याकडे झुकलेलं झाड
आयुष्यभर जवळ राहिलेली
त्याची सावली
पिकलेल्या पानाचा वाकलेला देठ
अन हलक्याश्या वार्यात
विरलेला शेवटचा श्वास 
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा

घरट बांधणारी दोन पाखरं
हळुवार गुंफलेला एकेक धागा
पिलाला भरवायला आतुर
आईची चोच 
अन अगदी हक्काने घरट मोडणारा 
मुसळधार पाउस 
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा

रात्रीच्या आकाशात छोटासा तारा 
त्यावर जीव ओवाळून टाकणारा  चंद्र
रात्रभर रंगलेल्या गप्पांचा 
चढलेला रंग 
अन अंधार चिरत जाणार 
विजेचा कडकडती हास्य 
 वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा

मिटलेल्या डोळ्यांची मखमली रजई
पापण्यांशी लपंडाव खेळणारी धुंद झोप
पहाटेच्या पडद्याआड लपलेला 
एक गोंडस स्वप्नं
अन ढगांनी अचानक झाकालालेल्ला
उगवतीचा सूर्य
वाटत हाच ...
माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा

आठवतंय तुला ???



कोसळणार आभाळ पाहिलं  
की तुझी आठवण येते 
अन  तुझ्या मिठीत मला 
चिंब भिजवून जाते 

सूर्यास्ताचा सूर्यही अगदी 
मला तुझ्यासारखा वाटतो
 वाट पाहणाऱ्या क्षितिजाला 
तो  ही असाच ..... कडकडून भेटतो 

वाळूत उमटणारी पावलंही 
तुझीच असल्याचा भास 
आशेने तुझ्या सोबतीच्या 
सुरु केलेला प्रवास 

काळ्याभोर केसात आज मी 
गजरा मळलाय 
तुझ्यासारखा तो ही 
या काळेपणावर भाळलाय 

तुला स्पर्शून आलेला वारा 
मला येऊन बिलगतो 
अन प्रत्येक श्वासाची 
तो ओळख करून देतो 

झाडावरून ओघळणारा 
आज प्राजक्त पाहीलाय 
तुझ्या इतक्याच विश्वासाने 
तो माझ्या ओंजळीत राहिलंय 

लाजाळूच्या पानांना 
पाहिलं आहेस कधी मिटताना ?
इतक्या हळुवारपणे एकमेकांना भेटताना 

रात्रभर चांदण्यात 
चंद्र माझ्या सोबत फिरला 
अन स्वप्नातही मी 
तुझाच हात धरला 

आठवतंय तुला ???
          आठवतंय तुला ??? 
हातात हात होते 
           डोळे पाण्याने विझलेले 
दोघांचेही श्वास कुठेतरी 
           खोलवर रुजलेले 
खूप होता बोलायचं 
           पण शब्द ओठातच भिजलेले 
फक्त एका क्षणासाठी 
           तुझ्या खांद्यावर निजलेले 
अन ....
अमृताचे चार कण 
            एकमेकांसाठी मोजलेले 

आठवतंय तुला ???
            आठवतंय  ???

बघ माझी आठवण येते का


वेळेआधी पोहोचलास तू
गाडीलाच यायला उशीर झाला
पण उशीर झाला म्हणून ओरडणार
शेजारी कुणीच न्हवत
घड्याळाचा आवाज कान देऊन ऐक
बघ  माझी आठवण येते का

खिडकीतून शिरणारा वारा
आज अंगाशी झोंबेल
अन येऊन तो कापाळाशी थांबेल
खेळू दे त्याला तुझ्या केसांशी
विस्कटलेल्या केसातून एकदा हात फिरव
बघ  माझी आठवण येते का 

मग  तू हातांच्या बोटांकडे पहा
पण हातात धरून ठेवायला
कोणाचाच हात नसेल
अवलालेल्या मुठीत कुठेतरी उब  जाणवेल
बघ  माझी आठवण येते का

अंधारात वाट चुकल्यासारखा
सैरभैर होशील
आठवणींच्या रस्त्यावर हरवून जाशील
मग स्वतःलाच एक प्रश्न विचार
"घर कधी येणार रे ?"
बघ  माझी आठवण येते का

झोपायला जाशील तेव्हा आठव
कुणीतरी तुझी वाट पाहताय
पण कुशीत शिरायला आज
कोणच नसेल
"झोप आलीये रे मला "
फक्त एकदा म्हण
बघ  माझी आठवण येते का

गरम हवेने तुझा जीव
कासावीस होईल
पण तुझ्या हक्काचा गारवा आज
तुला मिळणार नाही
डोळे बंद कर आणि ओठांच्या पाकळ्या उघड
बघ  माझी आठवण येते का

रात्री अचानक जाग  येईल
"झोपलाय बघ कसा " हे आठवून
स्वतःशीच हसशील
पण जवळ घ्यायला कोणाच नसेल
ओल्या पायांनी पावलांना स्पर्श कर
बघ  माझी आठवण येते का

सकाळी थोडी उशीरच जाग येईल
उठायचं तसा आळसच येईल
"झोप अजून थोडावेळ " सांगायला
आज कोणाच नसेल
थोडावेळ अंथरुणात लोळून काढ
बघ  माझी आठवण येते का

डोळ्यात साठलेल्या पाण्याला आता
गालांवर ओघळू दे
वात फार तपालीये
आज मेणाला पाघळू दे
भरलेल्या डोळ्यांनी आरशासमोर उभा रहा
बघ  माझी आठवण येते का

एकटीला  ठेवून गेलास
रिकामी माझी ओंजळ
पाण्याने भरून दिलास
अन थांबलेल्या हुंदक्यानं
छोटासा रस्ता केलास
अश्रुनी भिजलेल्या मातीत
तुला दोन पावलं दिसतील
एकदा निरखून पहा
ती तुझ्याकडेच येत असतील
बघ  माझी आठवण येते का

NOTE
Inspiration by http://marathikavitaa.blogspot.in/2008/06/blog-post_3921.html 

मुलगा असते तर....



विश्वनिर्मात्याला खुपदा धन्यवाद  द्यावेसे वाटतात मला मुलगी बनवल्याबद्दल. बरयाच गोष्टी नाही करता येत मुलांसारख्या हे मान्य . पण तरीही ... मुलगी म्हणजे ... विश्वनिर्मात्याला पहाटेच्या साखरझोपेत एक सुंदर स्वप्नं पडाव ... अशी निर्मिती ..

एक पायरी जास्त चढले असते
प्रत्येक युद्ध दिमाखात लढले असते
मित्राच्या खांद्यावर मनसोक्त रडले असते
कॉलेज कट्ट्यावर नोटस काढले असते
खरच....
       मुलगा असते तर
दिवस असेच काढले असते

कुणावर तरी मनापासून प्रेम केला असतं
रोज एकदातरी तिला फिरायला नेलं असतं
अभ्यासावरच लक्षही उडून गेला असत
valentine day ला छानस rose दिला असत
सोडून जाताना तिला डोळ्यात पाणीही आला असत
खरच....
       मुलगा असते तर
हे असच झालं असत

रात्री १२ वाजता Birthday cake   कापला असता
आई न मग मला चांगलाच झापला असता
कुणाचा तरी फोटो पाकिटात जपला असता
मागे उभा राहून नकळत तिचा केस ही मापला असता
डोळ्यातला  थेंब पापणीच्या आताच लपला असता
खरच....
       मुलगा असते तर
कुठलाही वार झेपला  असता

प्रत्येक ट्रेकिंग चा आनंद लुटला असता
स्वर्ग मला चार पावलावर भेटला असता
election ला माझा ही silencer फुटला असता
कोसळणार पाऊस असा ओंजळीत राहिला नसता
चिंब भिजताना आणखीच सुन्दर वाटला असता
खरच....
       मुलगा असते तर
माझा वारू असच सुटला असता

Bike ही खूप fast चालवली  असती
मित्रांच्या गप्पात रात्र घालवली असती
कुणाच्यातरी आठवणीत सायंकाळ मालवली असती
मनगटातल्या  बळावर कुंडलीही हलवली असती
खरच....
       मुलगा असते तर
सगळी ओझी पेलवली असती

सगळे डाव अगदी मनापासून खेळले असते
कधीतरी bat शी माझे ही सूर जुळले असते
कुठल्याही गलक्यात अगदी सहजपणे रुळले असते
Exam ला जाताना कितीतरी chapters गाळले असते
पण आजच्यासारखे तेव्हाही topper पण पाळले असते
खरच....
       मुलगा असते तर
आयुष्यातले कण न कण चाळले असते

आवडलेल्या मैत्रिणीसाठी बाबांकडे हट्ट केला असता
आई ला तिचा फोटो दाखवायला नेलं असता
तिच्या सोबतीसाठी माझा हात पुढे झालं असता
तिला आवडीचा perfume gift दिला असता
यशासाठी तिच्या देवाकडे नवस केल असता
खरच....
       मुलगा असते तर
माझा  प्रेमविवाहाच झालं असता

बाहेर पडताना उम्बरयातून पाय थांबला नसता
आईच्या डोळ्यात पाहताना माझा श्वास लांबला नसता
नजरेचा तीर कुणाचाही मला कधीच झोंबला नसता
शब्दाचा प्रत्येक  वार कनकीसारखा तिम्बला असता
क्षितिजाला स्पर्शायला हात कितीही लांबला असता
खरच....
       मुलगा असते तर
काळ माझ्यासाठी थांबला असता

आजही वाटत..
मुलगा झाले असते तर
खर स्वातंत्र्य पाहिलं असत
मनापासून एक फुल
देवाला वाहील असत
पोर्णिमेच  आकाश
यशाच्या चांदण्यात न्हाल असत

पण....
आजच्यासारख कदाचित आयुष्य
इतका सुंदर राहिलं नसत
खरच....
       मुलगा असते तर
निळाशार आकाश कधीच
निराभ्रपणे पाहिलं नसत
साखरझोपेतल एक सुंदरस स्वप्नं
अर्ध्यावरच राहील असत
खरच....
       मुलगा असते तर

माझाच कुणीतरी

जखमा  कशा सुगंदी झाल्यात
काळजाला केलेत वर ज्याने
तो मोगरा असावा
                                          टोचलेला कट खोलवर तुटलाय
                                          असह्य वेदना देणारा
                                          तो गुलाबच असावा
अश्रुनाही झालाय आनंद
गालावर हलकेच शिंपल  पांणी
ते श्रावण असावा

                                          एकटी असते काळोखी रात्र
                                         चंदना पाठवला ज्याने सोबतीला
                                          तो पौर्णिमेचा चंद्र असावा

वाट पाहणारे सुखावलेत डोळेही
वाटेवरची स्वप्नं बहरली वाटेतच
तो क्षितिजावरचा सूर्य असावा

                                         वेदनाही आज सुरात गात आहेत
                                         भावनांचा खेळला घेल ज्याने
                                         ते पावसाळी मेघ असावा

हसणाऱ्या चेहर्याला रडणाऱ्या मनाला
कापसासारखा पिंजून काढला
नक्कीच तो रेशीमधागा असावा

                                         माझेच ओठ माझाच श्वास
                                         सुरात जुळवताना
                                        हृदयाला भिडणारा ताल धरला ज्याने
                                        तो माझाच कुणीतरी असावा

फक्त एकदा येऊन जा

श्वास कंठाशी आलाय
प्राण डोळ्यात साठलेत
ओठांवर उतरलेला रंग पाहून जा
फक्त
एकदा येऊन जा

वेलीवरच मोगरा
आज ओंजळीत फुललाय
रात्रीच्या सोबतीला तू 
दोन फुल  घेऊन जा 
फक्त 
एकदा येऊन जा 

चंद्र ढगाशी टांगलेला
रात्र अंधारात हरवली
तुझी शुक्राची चांदणी
मला  देऊन जा
फक्त
एकदा येऊन जा

सूर्य क्षितिजावर बुडाला
माझी एकाकी संध्याकाळ
पुसटशी तुझी सावली
माझ्या सोबतीला ठेवून जा
फक्त
एकदा येऊन जा

गार वर अंगाशी 
नको इतका झोंबतो
हात धरून तुझ्यासोबत 
मलाही घेऊन जा
फक्त
एकदा येऊन जा

कोसळणार आभाळ
दाराशी येऊन थांबलाय
ओंजळीच्या शिंपल्यात 
मोती वेचून जा
फक्त
एकदा येऊन जा

पायाखालची वाट
नको इतकी लाम्बलीये
वळणं वरची धूळही
उडायची थांबली आहे
उठलेल्या वावटळीला मिठीत घेऊन जा
फक्त 
एकदा येऊन जा

पहाटेचा सूर्य हि मला
पाहायचा नाही
मिटलेल्या पापणीत
तुझं स्वप्न देऊन जा
फक्त
एकदा येऊन जा

वाट पाहणारे
पाणावलेत डोळे 
एका क्षण साठी आज माझा होऊन जा
फक्त 
एकदा येऊन जा
फक्त...
एकदा...
एकदाच...