दुरावला आज चंद्र

दुरावला आज चंद्र
कुणासाठी रात्र जागु
मिटल्या पापण्यात दिसेना
कुणासाठी झोप मागू

नाही दिव्यात या वात
कसे जुळतील हात
वाहणाऱ्या जखमेला
नाही कुठलीच जात

कशी चालू अनवाणी
भेगाळली इथे माती
नाही आवाजाची साथ
सूर एकटेच गाती

भरलेल्या आठवणी
मी लोटला दिवस
कसे सांगू चांदण्यांना
इथे रोजची अवस

कोण सांगेल वाऱ्याला
आज तू हि नको वाहू
दूर गेलेल्या वाटेत
दोघे एकटेच राहू

पाषाणातली हि मूर्ती
तिला देऊ किती हाक
माती भिजली रडून
नभा आज तरी वाक

सोसाट्याचा आज वर
पानाफुलात वाहिला
चंद्र माझा पौर्णिमेचा
कुठे एकटा राहिला

तिमिराच्या सोबतीला
पाणी डोळ्यात साठले
सांग माझ्या या चंद्राला
गाली चांदणे सांडले

चार दिसांची कहाणी
अधुरीच कशी राही
दुरावल्या चंद्रासाठी
आज रात जागी राही

सांजवेळची सावली
आली कुठल्या वाटेला
पाठवला इथे सूर्य
त्याने माझ्याच भेटीला
दुरावला आज चंद्र ......

~ अमृता

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)