......आणि कुणीतरी पाहिलं


पापणीही न लवता
बघत एकसारख कुणीतरी
डोळ्यातला आपलेपणा 
सांगते नजर खरी

आपोआप पावलं 
कोणासाठी तरी थांबतात
मागे कुणी असो नसो
नजरेचा एक कटाक्ष टाकतात

नेहमीच्या शब्दांना 
अर्थ येतो वेगळा
नुकताच फुललेला वसंत
रंग बदलून जातो सगळा

कुठल्यातरी पायरीकडे बघून
उगाचच येत हसायला
मग आठवणीही येतात 
सोबतीला बसायला

अनोळखी पाउलवाट 
रस्त्याच्या कडेला
प्रत्येक प्रसंग आठवतो 
जणूकाही तो आजच घडलेला

हल्ली हे असच होत
का ? कळत नाही
कुणीतरी हळूच वाकून बघत 
पण तिथे कुणीच दिसत नाही

नजर शोधत असते
पाय लयीत चालतात
ओठ बंद असतात 
डोळे मात्र बोलतात

पुढच्याच वळणावर कुणीतरी
पाहत असत वाट 
लपवताच येत नाही 
डोळ्यात आनंदाची लाट

न लवणाऱ्या पापण्यात 
नजर भारदस्त
एकच पाऊल पुढे येऊन 
सुंदरस स्मितहास्य 

किती गोन्धळल्यासारख होत
हे सगळ अचानक घडल्यावर
आपण शोधत होतो
आणि कुणीतरी पाहिलं 
हे आपल्याच लक्षात आल्यावर 

~  अमृता 

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)