वेळ नाही

 श्वास घ्यायला वेळ नाही

श्वास सोडायला ही नाही 

आणि या गडबडीत एखाद्यावेळी घेतलाच नाही तर... 

किंवा

एक श्वास चुकला आणि अचानक सगळच थांबलं तर

हे मला कळण्या इतका ही  माझ्याकडे वेळ नाही 


देवासमोर हात जोडायला वेळ नाही

त्याला काही मागावं तर वेळ नाही

त्याने खूप सारं दिलं म्हणून आभार मानावे तर तो ही वेळ नाही

कधीतरी जर खरच भेटला तो मला तर तोच येऊन गेला 

हे मला कळण्या इतका ही  माझ्याकडे वेळ नाही 


लेकरांना ओरडायला वेळ नाही

त्यांना मायेने जवळ घ्यायलाही वेळ नाही

उद्या पाखर उडून जातील पंखांना बळ आल्यावर

त्यांची झेप बघायला ही माझ्याकडे वेळ नाही


रडायला वेळ नाही

हसायला वेळ नाही

स्वतःकडे एक सेकंद आरशात पाहायला ही वेळ नाही


नको ते देवा... इतकं व्यापून नको टाकू मला 

की मला हे ही कळेनास  होईल... 

हे जग भिंगरी सारख गरगर माझ्याभोवती फिरत आहे

की मीच भिंगरी होऊन फिरते आहे 


"या हातांना इतकं काम दे, की त्यांना दमण्यासाठीही वेळ मिळायला नको" 

या प्रार्थनेच असं उत्तर मिळेल असं स्वप्नातही न्हवत वाटलं 🙂