Showing posts with label kokani. Show all posts
Showing posts with label kokani. Show all posts

गणपती बाप्पा मोरया




रायाच्या घरात बाप्पाची इवलुशी मूर्ती . आणि त्याच्याभोवती त्याने पूर्ण टेबलभर केलेली भलीमोठी आरास . त्याच्या कोकणातल्या घरातला गणोबाही मोठा असेल त्याहून .  पण आता तो गणोबाही दूर आणि कोकणही .

नोकरी निमित्ताने त्याने देश सोडल्या दिवसापासून तो काही गोष्टी अजूनही न चुकता करतो . काचेच्या पेल्यातून  का होईना पण सूर्याला अर्घ्य देतो . पांढऱ्या शुभ्र रंगाच जानवं हाताच्या दोन्ही बोटात एका विशिष्ठ पद्धतीने अडकवून सूर्याला दाखवून मगच परिधान करतो . ऑफिस मधून परतल्यावर न चुकता संध्या . आणि सकाळी उठल्यावर गणपती बाप्पाचं स्तोत्र .

घरातून बाहेर पडताना उंबऱ्याजवळ आईच्या पायाशी आशीर्वाद घेण्यासाठी वाकला अन आईला पावलांवर ओलसरपणा जाणवला . हनवूटी वर केल्यावर त्याच्या भरल्या डोळ्यात तिला एकटेपणाच आभाळ दिसलं . ती तशीच आत निघून गेली . लगबगीने काहीतरी पदरात झाकून आणल . अन त्याच्या हातात ठेवत म्हणाली "कित रडतला ???? ह्यो बाप्पा …… तुले सोबत करीन " .  हीच ती बाप्पाची इवलुशी मूर्ती . जी रायाने इथे आलेल्या दिवसापासून पुजली . मिळेल त्या सामानाची पूजा मांडली . शेवटी भाव महत्वाचा

लोकं परदेशी राहायला जातात म्हणजे नक्की काय होत हो ? फुलपाखरू हातातून सुटताना बोटांवर रंग सोडून जात तसंच काहीसं होत असावं त्याचं . देश सुटतो पण संस्कार आणि सण सावलीसारखे जगभर घेऊन फिरतात . जगाच्या पाठीवर कुठेही जा …… "गणपती बाप्पा ……. " ओरडल्यावर "मोरया " ची आरोळी देणार नाही असा एकही भारतीय शोधून सापडायचा नाही .

आज गणेश चतुर्थी …. गेले आठवडाभर रायाची एकट्याची जी धावपळ दिसत होती ती यामुळेच . ६ खोल्यांच्या घरी एकटाच राहतो  असं नाहीच म्हणता येणार . कारण एक खोली त्याच्या बाप्पाची आहे . छोटस टेबल त्यावर ती देखणी मूर्ती . २१ च मोठ होईल म्हणून ५ च वस्त्र . हळद , कुंकू , अक्षता , धूप  आणि साखरेची वाटी . बसं …… इतकंच  असत तिथे . संकष्टीला दिव्यांऐवजी २ मेणबत्या पेटवून आरती मात्र नक्की करतो .  ऑफिसच्या कामातून त्याला आरास करायचं सामान शोधायला वेळ नाही मिळत आणि तसही तो जिथे राहतो तिथे मिळतही नाही फारस काही . बाप्पाच्या पूजेसाठी लागणार सगळ तो घरी आल्यावर स्वतः तयार करतो . पुठ्ठ्याची गुलाबाची फुलं , कोल्ड कॉफी चे रिकामे राहिलेले पेले कापून बनवलेली फुलपाखर जी त्याच्या भिंतींवर अगदी खऱ्या सारखी वाटतात . कॉर्नफ्लेक्स चे बॉक्स एकमेकावर रचून त्याने त्याच्या बाप्पाच्या आसनाची तयारीही केली . काय सुरेख चौरंग बनवला होता त्याने …… आणि त्यावरच्या चंदेरी कागदामुळे तर तो अजूनच छान वाटत होता .


काल घरी परत येताना त्याने गुलाबाची मिळतील तितकी सगळी फुलं विकत आणली . बाप्पाची खोली घमघमत होती सुगंधाने . रायाच्या इथल्या बाप्पाला नवीन नवीन फळ नैवेद्याला मिळतात . म्हणजे कोकणातल्या सारखं पेरू , सीताफळ नाही मिळालं इथे म्हणून चेरी , प्लम , रासबेरी , लिची अशी इथल्या हंगामाची फळ त्याने पूजेसाठी आणून ठेवली

रोज ७ चा गजर बंद करून ८ वाजता उठणारा राया आज ५ च्या ठोक्याला अंथरुणातून बाहेर ……. बाप्पाची ओढ दुसर काय . अभ्यंग आटोपून तो पूजेला बसला . राया पूजा करायला बसला की कुणीही नुसतं पहात राहावं त्याच्याकडे असा दिसतो . राया गणपतीसामोर हात जोडतो तेव्हा पाहावं . त्याच्याकडे पाहताना खुद्द गणपतीला काय वाटत असेल ?? वक्रतुंड महाकाय म्हटल्याशिवाय घरातून पाऊलही बाहेर न काढणाऱ्या लेकरासाठीच सगळ देवपण घेऊन किती समाधान वाटत असेल . बाप्पाची कुठेही कधीही कोंडी नाही केली त्याने . सुखं  मिळाल ते बाप्पाच्या आशीर्वादाने आणि दुखः पूर्वजन्मीच उरलेलं माप म्हणत वेळोवेळी त्याने बाप्पाची सुटकाच केली अस म्हणावं लागेल . राया पूजा करणार म्हटल्यावर बाप्पा आसनावर आपणच विराजमान होत असेल . आपल्याला या गोष्टी कशा दिसायच्या ?

पूजेसाठी आसनावर बसल्या क्षणापासून रायाचे ओठ हालत असतात . लखलखणाऱ्या मखरासमोर पाठीत किंचित झुकून हात जोडून मस्तकी टिळा  लावून बाप्पाकडे एकटक पाहणारी रायाची नजर . त्याचा तो कोकणस्थ ब्राम्हणाचा गोरा वर्ण ज्योतीच्या प्रकाशात पिवळसर दिसायला सुरु होतो. मूर्तीला पंचामृताच स्नान घालताना आज त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होत . घराच्या गणपतीची आठवण कासावीस करत होती  त्याचा जीव . गणेश चतुर्थीच्या दिवशीही माझ्या गणपतीला दुर्वांची जुडी आणि आगाड्याच पान नाही मिळालं म्हणून चुटपूटत होता . आता येशुसमोर मेणबत्या पेटवणाऱ्या देशात कुठून उगवेल दुर्वा आणि आगाडा  

पण त्याची नैवेद्याची तयारी पाहून लंबोदर आज खरच भरपेट जेवेल अस वाटण साहजिक होत . स्वयंपाक खोलीत मोदक उकडताना पौरुष्याचा अहंकार त्याला कधीही शिवला नाही . उलट तो म्हणायचं "अन्नपूर्णे इतकं कुठलही काम अवघड नाही . चव उतरावी लागते हाताची त्यात . नुसतं सामान पुरेस असून नाही चालत "त्या मोदकासाठीही त्याला कष्ट घ्यावेच लागले . मोदकपात्र नाही , चाळण नाही . उकडीच्या मोदकाची झाली ना पंचाईत . जिथे लोकं ब्रेड आणि बटर शिवाय दुसर काहीच खात नाहीत तिथे कुठून मिळणार मोदकपात्र आणि चाळण . पण रायाचा गणपती बाप्पा उपाशी पोटी त्याच्या समोर पान मांडून बसला होता …… उकडीच्या मोदकाची वाट पाहत . त्याचं मन मोडवेल तर राया कसला ???? एक स्वछ रुमाल घेऊन त्याने एका भांड्याला घट्ट बांधला आणि केले त्यावर उकडीचे मोदक :) बाप्पा खुश , राया खुश 

कोकणातल्या बाप्पाच्या आरतीलाही तो सकाळी संध्याकाळी हजर राहायचा .पूर्वी  गावी असताना रायाच्या हातात टाळ आणि घंटा असायची आणि आता हातात फोन घेऊन उभा असतो . त्याची आई घराच्या गणपतीची आरती सुरु झाली कि रायाला फोन करते .  तो ही इतक्या लांबून बाप्पाच्या आरतीला टाळ्या वाजवतो . आरती संपली की  त्याच्या घरातल्या  इवलुश्या मूर्तीसमोर "गणपती बाप्पा मोरया " म्हणून एकटाच जोर जोरात ओरडतो . कोकणातल्या बाप्पाच्या मखराचा  लखलखाट रायाच्या घरी अन चेहऱ्यावरच तेज रायाच्या तोंडावर दिसायला सुरु होत . अन मग अजून एखादा थेंब त्याच्या डोळ्यातून वाहत खाली येतो … 

नेमके त्याचवेळी त्याचे बाबा बाप्पाच्या नैवेद्या भोवती पळी पंचपात्र हातात घेऊन पाणी ओवाळत होते . आता त्यात पळी पंचापात्रातील पाणी किती आणि रायाच्या डोळ्यातील पाणी किती हे त्या बाप्पालाच ठाऊक …….  बाप्पाच्या डोक्यावरच लाल गुलाबाचं फुलं त्याच्या उजव्या पायाशी येउन पडलं . नैवेद्य , आरती पूर्णत्वास आली . 

आई डोक्यावरचा पदर सांभाळीत ओठातच पुटपुटली "रायाने मनापासून नमस्कार केला असणार माझ्या . पोहोचला बाप्पा पर्यंत "

 !! गणपती बाप्पा मोरया !!  !! मंगलमुर्ती मोरया !!

अस्सो नशिलो गाव ...


हा माझा पहिलाच प्रयत्न ... कोकणीत लिहिण्याचा 
माझ्या सासरी सगळेच कोकणी बोलतात ... अजून बोलत नाही येत मला . पण आता समजते . 
२ वर्षांपूर्वी माप ओलांडून या घरी आले तेव्हा काहीच समजत न्हवत ते कोकणी. 
कोणी काहीही विचारलं तरी " होय " इतकच म्हणायची मी :) ..देव जाणो .. कोणत्या कोणत्या प्रश्नांना मी " होय " असं उत्तर दिलय :)
जितक काही कोकणी मला येत .. ते माझ्या अहो... नी शिकवलंय   

माणसतली माणुसकी संपत आलीये ... पैसा म्हणजे सर्वस्व ..
यासाठी हे सगळ लिहील  
खूब दिसांनी हाव
म्हज्या गावांत परत इलो 
हंग्याल पळे ... हंग्याल बी पळे 
हावं वतना ह्यो गाव 
हावं वतना ह्यो रस्तो 
अस्सो नाशिलो ...

सगलीकडेन अश्शिली मानसो ... प्रेमल 
ह्ये खयच दिसेना 
तांचो आकडो उनो जाला 
थयसर आयला  होडले होडले बंगलो 
अन एक व्हड ऑफिस 
मन हंगा बसना ..मनाक शांती भेटना 
म्हनिले ... वच वच .... फाटल्यान रस्तो 

हंगा आठवड्याक बझार भरला 
ह्यो दुकानवाला खय करतंय ?
"दुकानाचेर बसून मी धन शिपडताय "
ह्या दुकानांनी विकपाक असा .... धन , कुस्केपन , राग , त्रास , दुक    

अस्सो नशिलो गाव ...
अशे कशे हे जाला ...मनसीपण खै गेला ...
सगळे प्रेम सल्ले .... 

मात्यार माळून फुला ..... आंब्याचे झाड सोबती झाला
त्या अमब्याक जय बसून हाव शीतळ वारो घेतलो  
हाव .... एक वाटसरू....थकून गेला  
सोदून सोदून थकल ...
आता मित्रांचो आपलेपानाचो आवाज दुर्मिळ जाला 

तुमका जाला री कित्ते ?
अशी तुमची काळाज कशी जाला ?
मनशा मानाशामदी आपुलकी 
तुमका जमना व्हय ? 
कित्याक तुमी खेळटाक नुसते पैशाची हि होळी 
तुमचे मनसीपण अशे मरपाक 
कारन कित्ते ?
तुमका जाला  री कित्ते?