रायाच्या घरात बाप्पाची इवलुशी मूर्ती . आणि त्याच्याभोवती त्याने पूर्ण टेबलभर केलेली भलीमोठी आरास . त्याच्या कोकणातल्या घरातला गणोबाही मोठा असेल त्याहून . पण आता तो गणोबाही दूर आणि कोकणही .
नोकरी निमित्ताने त्याने देश सोडल्या दिवसापासून तो काही गोष्टी अजूनही न चुकता करतो . काचेच्या पेल्यातून का होईना पण सूर्याला अर्घ्य देतो . पांढऱ्या शुभ्र रंगाच जानवं हाताच्या दोन्ही बोटात एका विशिष्ठ पद्धतीने अडकवून सूर्याला दाखवून मगच परिधान करतो . ऑफिस मधून परतल्यावर न चुकता संध्या . आणि सकाळी उठल्यावर गणपती बाप्पाचं स्तोत्र .
घरातून बाहेर पडताना उंबऱ्याजवळ आईच्या पायाशी आशीर्वाद घेण्यासाठी वाकला अन आईला पावलांवर ओलसरपणा जाणवला . हनवूटी वर केल्यावर त्याच्या भरल्या डोळ्यात तिला एकटेपणाच आभाळ दिसलं . ती तशीच आत निघून गेली . लगबगीने काहीतरी पदरात झाकून आणल . अन त्याच्या हातात ठेवत म्हणाली "कित रडतला ???? ह्यो बाप्पा …… तुले सोबत करीन " . हीच ती बाप्पाची इवलुशी मूर्ती . जी रायाने इथे आलेल्या दिवसापासून पुजली . मिळेल त्या सामानाची पूजा मांडली . शेवटी भाव महत्वाचा
लोकं परदेशी राहायला जातात म्हणजे नक्की काय होत हो ? फुलपाखरू हातातून सुटताना बोटांवर रंग सोडून जात तसंच काहीसं होत असावं त्याचं . देश सुटतो पण संस्कार आणि सण सावलीसारखे जगभर घेऊन फिरतात . जगाच्या पाठीवर कुठेही जा …… "गणपती बाप्पा ……. " ओरडल्यावर "मोरया " ची आरोळी देणार नाही असा एकही भारतीय शोधून सापडायचा नाही .
आज गणेश चतुर्थी …. गेले आठवडाभर रायाची एकट्याची जी धावपळ दिसत होती ती यामुळेच . ६ खोल्यांच्या घरी एकटाच राहतो असं नाहीच म्हणता येणार . कारण एक खोली त्याच्या बाप्पाची आहे . छोटस टेबल त्यावर ती देखणी मूर्ती . २१ च मोठ होईल म्हणून ५ च वस्त्र . हळद , कुंकू , अक्षता , धूप आणि साखरेची वाटी . बसं …… इतकंच असत तिथे . संकष्टीला दिव्यांऐवजी २ मेणबत्या पेटवून आरती मात्र नक्की करतो . ऑफिसच्या कामातून त्याला आरास करायचं सामान शोधायला वेळ नाही मिळत आणि तसही तो जिथे राहतो तिथे मिळतही नाही फारस काही . बाप्पाच्या पूजेसाठी लागणार सगळ तो घरी आल्यावर स्वतः तयार करतो . पुठ्ठ्याची गुलाबाची फुलं , कोल्ड कॉफी चे रिकामे राहिलेले पेले कापून बनवलेली फुलपाखर जी त्याच्या भिंतींवर अगदी खऱ्या सारखी वाटतात . कॉर्नफ्लेक्स चे बॉक्स एकमेकावर रचून त्याने त्याच्या बाप्पाच्या आसनाची तयारीही केली . काय सुरेख चौरंग बनवला होता त्याने …… आणि त्यावरच्या चंदेरी कागदामुळे तर तो अजूनच छान वाटत होता .
काल घरी परत येताना त्याने गुलाबाची मिळतील तितकी सगळी फुलं विकत आणली . बाप्पाची खोली घमघमत होती सुगंधाने . रायाच्या इथल्या बाप्पाला नवीन नवीन फळ नैवेद्याला मिळतात . म्हणजे कोकणातल्या सारखं पेरू , सीताफळ नाही मिळालं इथे म्हणून चेरी , प्लम , रासबेरी , लिची अशी इथल्या हंगामाची फळ त्याने पूजेसाठी आणून ठेवली
रोज ७ चा गजर बंद करून ८ वाजता उठणारा राया आज ५ च्या ठोक्याला अंथरुणातून बाहेर ……. बाप्पाची ओढ दुसर काय . अभ्यंग आटोपून तो पूजेला बसला . राया पूजा करायला बसला की कुणीही नुसतं पहात राहावं त्याच्याकडे असा दिसतो . राया गणपतीसामोर हात जोडतो तेव्हा पाहावं . त्याच्याकडे पाहताना खुद्द गणपतीला काय वाटत असेल ?? वक्रतुंड महाकाय म्हटल्याशिवाय घरातून पाऊलही बाहेर न काढणाऱ्या लेकरासाठीच सगळ देवपण घेऊन किती समाधान वाटत असेल . बाप्पाची कुठेही कधीही कोंडी नाही केली त्याने . सुखं मिळाल ते बाप्पाच्या आशीर्वादाने आणि दुखः पूर्वजन्मीच उरलेलं माप म्हणत वेळोवेळी त्याने बाप्पाची सुटकाच केली अस म्हणावं लागेल . राया पूजा करणार म्हटल्यावर बाप्पा आसनावर आपणच विराजमान होत असेल . आपल्याला या गोष्टी कशा दिसायच्या ?
पूजेसाठी आसनावर बसल्या क्षणापासून रायाचे ओठ हालत असतात . लखलखणाऱ्या मखरासमोर पाठीत किंचित झुकून हात जोडून मस्तकी टिळा लावून बाप्पाकडे एकटक पाहणारी रायाची नजर . त्याचा तो कोकणस्थ ब्राम्हणाचा गोरा वर्ण ज्योतीच्या प्रकाशात पिवळसर दिसायला सुरु होतो. मूर्तीला पंचामृताच स्नान घालताना आज त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होत . घराच्या गणपतीची आठवण कासावीस करत होती त्याचा जीव . गणेश चतुर्थीच्या दिवशीही माझ्या गणपतीला दुर्वांची जुडी आणि आगाड्याच पान नाही मिळालं म्हणून चुटपूटत होता . आता येशुसमोर मेणबत्या पेटवणाऱ्या देशात कुठून उगवेल दुर्वा आणि आगाडा
पण त्याची नैवेद्याची तयारी पाहून लंबोदर आज खरच भरपेट जेवेल अस वाटण साहजिक होत . स्वयंपाक खोलीत मोदक उकडताना पौरुष्याचा अहंकार त्याला कधीही शिवला नाही . उलट तो म्हणायचं "अन्नपूर्णे इतकं कुठलही काम अवघड नाही . चव उतरावी लागते हाताची त्यात . नुसतं सामान पुरेस असून नाही चालत "त्या मोदकासाठीही त्याला कष्ट घ्यावेच लागले . मोदकपात्र नाही , चाळण नाही . उकडीच्या मोदकाची झाली ना पंचाईत . जिथे लोकं ब्रेड आणि बटर शिवाय दुसर काहीच खात नाहीत तिथे कुठून मिळणार मोदकपात्र आणि चाळण . पण रायाचा गणपती बाप्पा उपाशी पोटी त्याच्या समोर पान मांडून बसला होता …… उकडीच्या मोदकाची वाट पाहत . त्याचं मन मोडवेल तर राया कसला ???? एक स्वछ रुमाल घेऊन त्याने एका भांड्याला घट्ट बांधला आणि केले त्यावर उकडीचे मोदक :) बाप्पा खुश , राया खुश
कोकणातल्या बाप्पाच्या आरतीलाही तो सकाळी संध्याकाळी हजर राहायचा .पूर्वी गावी असताना रायाच्या हातात टाळ आणि घंटा असायची आणि आता हातात फोन घेऊन उभा असतो . त्याची आई घराच्या गणपतीची आरती सुरु झाली कि रायाला फोन करते . तो ही इतक्या लांबून बाप्पाच्या आरतीला टाळ्या वाजवतो . आरती संपली की त्याच्या घरातल्या इवलुश्या मूर्तीसमोर "गणपती बाप्पा मोरया " म्हणून एकटाच जोर जोरात ओरडतो . कोकणातल्या बाप्पाच्या मखराचा लखलखाट रायाच्या घरी अन चेहऱ्यावरच तेज रायाच्या तोंडावर दिसायला सुरु होत . अन मग अजून एखादा थेंब त्याच्या डोळ्यातून वाहत खाली येतो …
नेमके त्याचवेळी त्याचे बाबा बाप्पाच्या नैवेद्या भोवती पळी पंचपात्र हातात घेऊन पाणी ओवाळत होते . आता त्यात पळी पंचापात्रातील पाणी किती आणि रायाच्या डोळ्यातील पाणी किती हे त्या बाप्पालाच ठाऊक ……. बाप्पाच्या डोक्यावरच लाल गुलाबाचं फुलं त्याच्या उजव्या पायाशी येउन पडलं . नैवेद्य , आरती पूर्णत्वास आली .
आई डोक्यावरचा पदर सांभाळीत ओठातच पुटपुटली "रायाने मनापासून नमस्कार केला असणार माझ्या . पोहोचला बाप्पा पर्यंत "
!! गणपती बाप्पा मोरया !! !! मंगलमुर्ती मोरया !!
Har bar ki tarah emotional bana dia...
ReplyDelete:)
DeleteHa raya kon?? Khup chhan lihila ahes
ReplyDeleteThank you for a comment . राया ह़ी व्यक्तिरेखा काल्पनिक अहे
ReplyDelete