Showing posts with label आर्य. Show all posts
Showing posts with label आर्य. Show all posts

गोंधळ.....मातृदिनाचा

मातृदिन आलो की हो या रविवारी ...

ओह ... सॉरी बरं  का ... मातृदिन म्हणजे Mother 's Day  हो ....
मातृदिन वगैरे असा अवघड भाषेत बोललं की १० पैकी ८ जणांच्या भुवयांच्या कमानी उंचावतात आणि त्या कमानीखालच्या डोळयांची होते एक प्रश्नार्थक हालचाल .

विषय पटकन लक्षात यावा म्हणून आपलं सगळ्यांना कळेल अशा आपल्या बोलीभाषेतच (आपली मातृभाषा कुठली याबद्दल अजून गोंधळात आहे बरं का मी ) सुरुवात केलेली बरी .

आता या रविवारी बघा कस्सलं प्रेम उफाळून येईल सगळ्यांचं आईवरचं . फेसबुक काय , व्हाट्सअप काय ... सगळीकडे अचानक एक दिवसांसाठी आईचे फोटो दिसायला लागतात .  माझं आईवरच हे प्रेम चुकून जरा २ दिवस आधी उफाळून आलं . त्याबद्दल ही कैफियत

दोनशे -  तीनशे मातृदिनाच्या लेखांच्या ढिगात माझा अजून एक .... बाकी नवल काहीच नाही .


तर सांगायचं मुद्दा असा ...

सुरुवातीलाच प्रामाणिकपणे मान्य करते की मातृदिन आहे याची मला पुसटशीही कल्पना न्हवती.  ७ तारखेच्या संध्याकाळी हे मला कळलं याला कारण म्हणजे लेकाच्या शाळेतून  आलेलं आमंत्रण . हो ..... भलंमोठं पत्र छापून आलं होत ना माझ्या नावे :) . "१3 तारखेला शाळेत मातृदिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत हजर रहावे.  "

हे वाचून लेकाने विचारलंच (शंका न विचारानं राशीन बसत नाही आमच्या ) ...  " Mother 's Day जसा असतो तसा आज्जी डे करूया का आपण ? "
हा नातू आजीप्रेमी असल्याचा अजून एक पुरावा ... घ्या
त्याची idea ऐकून भारी वाटलं . त्याचा आणि लाडक्या आज्जीचा एक जुना  फोटो मी माझ्या व्हाट्सअप अकाउंटच्या  स्टेटसला सेट केला.  (व्हाट्सअप अकाउंटच्या  स्टेटसला मराठीत काय म्हणतात ते काही मला माहित नाही त्यामळे चुकभुक माफी असावी )
गडी एकदम खुश . आजीच्या मांडीवर बसलेला फोटो बघून .

दुसऱ्या दिवशी  म्हणजे ८ तारखेला सकाळी सकाळीच मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला . "अगं बया , Mother 's  Day  आज नाहीये . तो १० तारखेला आहे . आज का लावलाय काकूंचा फोटो ?"

मी एकदम चूप ..... काही बोलायलाच सुचेना की हो . आता आईच्या प्रेमाला  मला या मुहूर्तासाठी २ दिवस थांबावं लागणार ? आणि खरंच मला आजचं सांगायचं असेल तिला "आई , तू कसली भारी आहेस ." तर मग ?  सगळे असाच समजतील का की हिच्या कॅलेंडरच्या तारखा विसकटल्या ?

तिचा हा फोन संपल्या संपल्या मी सगळ्यांचे स्टेटस धडाधडा वाचून काढले ... सगळीकडे आईच. मग लक्षात आलं , असा फोन करण्यामागे तिची काहीच चूक न्हवती . माझ्यासारखं अजून बऱ्याच लोकांचं आईप्रेम २ दिवस आधी उफाळून आलं . माझं कारण जरा वेगळं होत ही गोष्ट वेगळी , आमचं आज्जी प्रेम होत ओ ते...... आता अजून काय सांगणार .. जाऊ दे ...

मग काय .... Google आपला हक्काचा गुरु . त्याने सांगितलेलं ज्ञान . मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सर्वांनी आपल्या आईवर जीवापाड प्रेम करायचं . हा...... खरी गोम इथे आहे तर . २ वर्षांपूर्वी मी महिन्याचा दुसरा रविवार ८ तारखेला आला असणार ना . मग तीच तारीख नोंदवून घेतली मेंदूने आपल्या आणि म्हणून झालेला हा संगळ्यांचा मातृदिनाचा गोंधळ  :)

असो ... इतरांना काय वाटत यापेक्षा मला काय वाटतं हे ऐकून घ्या की एकदा ... आई म्हणजे तो काय सण आहे काय ज्या त्या तारखेला साजरा करायला ?

आई म्हणजे अख्ख आनंदपर्व आहे की आपल्या आयुष्यच . सगळं आनंद तिच्या आजूबाजूला घुटमळत असतो आपला . जरा २ मिनिट आई शेजारच्या काकूंकडे जाऊदे , का बरं लगेच शोधायला उठता तिला ? तुम्हाला खर तर काहीचं नको असतं त्यावेळी आईकडून . पण ती १ मिनिट डोळ्यासमोरून हलून चालत नाही . घर कसं खायला उठतं लगेच . एकटे वाटायला लागतो आपण .

म्हणूनच तर आनंदपर्व म्हटलं तिला . आपल्याला कित्ती भारी वाटतंय हे सुद्धा सांगायला आईच लागले  आणि तुम्हाला भारी वाटतंय हे बघून तिला त्याहून छान वाटतं . सगळ्या घरादारात मिसळूनहीगेली इतके वर्ष  स्वतःच वेगळं अस्तित्व टिकवून ठेवणारी आजवर पाहिलेली ही एकमेव व्यक्ती ...  आई.. मग ती माझी असो वा तुमची ...

सगळ्यांचीच आई कस्तुरीमृग असते .. ती जिकडे जिकडे जाते तिकडे तिकडे सुगंध दरवळत असतो . पण हा सुगंध कुठून आलाय हे कुणाच्या लक्षातही येत नाही . आणि आईला तर हे माहीतही नसत की अख्ख घर आपल्यामुळे दरवळतय. ती आपली अंगणातल्या जाईला , मोगऱ्याला , निशिगंधाला आणि रातराणीचा न चुकता पाणी घालते .

मी आपलं नेहमीप्रमाणे आजही आईला फोन केला . भरपूर वेळ आजही बोलले पण Happy Mother 's Day वगैरे असलं काही म्हटलं नाही बाबा . कसंय  ती मला माझ्या जन्माच्या आधीपासून ओळखते . कपाळावर पालथा हात लावून ताप चढलाय का मला हे बघायलाही कमी करायची नाही . वर  आणि माझंच हस व्हायचं .
   
अहो अहो ..... थांबा .... विषयांतर करतेय ... क्षमस्व ....

हे सगळं वाचून तुम्हाला नक्की वाटलं असणार मी असल्या Day च्या विरोधात आहे . तुम्ही काही प्रतिक्रिया देण्या अशीच माझी बाजू मांडते .... तसं अजिबात नाहीये .
३६५ दिवसांपैकी १ दिवस आईच्या नावे केला म्हणून काय झालं .... आई नाही का ९ महिने आपल्या नावे करत ? आणि त्यानंतरचही सगळं तिचं आपल्यासाठीच सुरु असत की .

Day मी ही करतेच की साजरे . आणि तुम्हाला काय वाटलं ? इतकं सगळं लिहिल्यावर मी काय लेकाच्या शाळेत Mother 's  Day ला जाणार नाही ? जाणार की हो .... अगदी हौसेनी . माझी ममा (आई म्हणायला शिकलाच नाही हो हा शेवटी ... अव्यक्त दुःख )  किती ग्रेट आहे हे कसल्या शब्दात सांगतोय हे मलाही ऐकायचं आहेच की .

माझा मुद्दा इतकाच ... तुमच्या माहितीपैकी कुणाचं आईप्रेम लवकर व्यक्त झालं असेल तर कृपा करून त्यांना तारखेची आठवण करून देऊ नका . तारखेने सण साजरे करणाऱ्यांपेक्षा आवडीने सोहळे मांडणारी माणसं खरचं भारी असतात आणि दुर्मिळही .

बाकी तुमच्यातल्या सगळ्यांना १3 तारखेच्या मातृदिनाच्या शुभेच्छा !

शुभेच्छेसोबत तारीखही टाकलीये .... अंगात कमी कळा नाहीत .... असच म्हटला ना मला :P


Love Drops .. तो सध्या काय करतो ?

ती सध्या काय करते ?
 बराच गाजलेला मराठी चित्रपट मी गेल्या काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच पाहत होते .  सोफ्यावर आमचे चिरंजीव बाबाला रेलून ... खूप मन लावून सगळे डायलॉग्ज ऐकणं सुरु होतं आणि मी आपली भारतीय बैठक मांडून , कन्यारत्नाला मांडीवर घेऊन 



तुम्ही म्हणाल ... हे काय  ? आमचाही पाहून झालाय ' ती सध्या काय करते ? ' 
हो .... कल्पना आहे मला . तुमचा नक्कीच एकपेक्षा जास्त वेळा पाहून झाला असेल आणि आता तुमच्यासाठी तो जुनाही झाला . 
काय करणार  :(     मी थोडी  (नाही बऱ्याचं ) उशिरा पाहते हल्ली मराठी कार्यक्रम ..... म्हणजे कसं  माहितीये . लोकांनी चावून चावून चोथा करून झाल्यावर मग मी जाते पाहायला नेमकं ती सध्या काय करतेय ते :D  


असो .... तर सांगायचं मुद्दा हा .... कि आमचे चिरंजीव फार मन लावून ऐकत होते सगळं 


 मध्यंतर नंतर बोस्टन वरून परत आलेली ' ती ' आणि तिचे बाबा यांच्यात एक संवाद दाखवलाय . तिच्या बाबाना ती पेल्यात बाटली रिकामी करून देते (आता कसली बाटली ??? हा प्रश्न कृपा करून नका विचारू)  बाटली रिकामी झालेली असतानाही तिचे बाबा ती पुन्हा उलटी ठेवतात ... का ?
ती ही असाच विचारते "अहो बाबा संपलीये ती "

आठवतंय ?? बाबा काय उत्तर देतो ?? 

" हे जे शेवटचे  उरलेले थेम्ब असतात ना त्यांना लव्ह ड्रॉप्स म्हणतात .....  जो हे पितो तो आयुष्यभर रोमँटीक राहतो म्हणे "  


स्क्रिनवरच हे वाक्य संपते न संपते तोवर इतका वेळ समाधी लावल्यासारखा बाबाना रेलून बसला होता तो आमचा चिरंजीव ताडकन उठून उभा राहिला . 

एकदा आईकडे आणि एकदा बाबांकडे फक्त डोळ्यांनीच बघून झालंही त्याच ..... मानेची अजिबात हालचाल न करता 


मला वाटलं नेहमी स्क्रिनवर असाल काही पाहील कि जे विचारतो त्याप्रमाणे परत याला काहीतरी शंका आली असणार . त्यामुळे त्याचा प्रश्न तोंडून बाहेर पडण्याआधीच  मी सांगून मोकळी झाले "अरे पिल्ला , ज्युस असतो तो ."


माझं वाक्य त्याने मधेच थांबवल .  बाबांकडे डोळे मोठे करून , भुवया उंचावून स्वारी एकदम आनंदात येऊन म्हणाली 

"बाबा , आपणपण आता रोमँटीक होणार .. "
आणि त्यानंतर घरी १ मिनिट स्मशान शांतात 


हे म्हणजे कसा झालं माहितीये का , असले झरे आमच्या घराकडे वळू नये म्हणून भक्कम बांध घालून ठेवलेत तरीही एका क्षणात आलेली शंका ... आमच्या अंगणात ओलं  आली कुठून ?



पण हा काहीतरी वेगळंच म्हणतोय हे त्याच्या आनंदी चेहऱ्याकडे बघून जाणवत होतं . 


डोळ्याला आठ्या पडून मी ही विचारलं "रोमँटीक ???? आपण ???? म्हणजे????"
एकतर हा काय म्हणतोय याच गूढ आणि दुसरं म्हणजे रोमँटीक  या शब्दाचा अर्थ याला कळतो ??? याचा धक्का 
सगळं एकदम पचवणं जरा अवघडच झालं होत मला . 


सोफ्यावरून दाणकन उडी मारून हा स्वयंपाक घरात गेला आणि काहीतरी हातातुन घेऊन आला . मांडी घालून माझ्या समोर बसत त्याने चक्क प्रात्यक्षिक सुरु केलं 



"मम्मा , ही टोमॅटो सॉसची बाटली . तू अशीच ठेवतेस की नाही नेहमी .. उलटी . आणि विचारल्यावर हेच सांगतेस वाया जायला नको म्हणून . 

मग ..... ते सिनेमामध्ये काका म्हटले तसं तूच घेतेस हा सॉस अगदी शेवटच्या थेंबापर्यंत . म्हणून ....... आपणसुद्धा असंच आयुष्यभर रोमँटीक राहणार  . "

आई ग ....... हसावं की रडावं हे मला अन अहो दोघांनाही समजेना 

त्याच्या सॉस ने माझा सास चा ठोकाच चुकवला  


बाबा डोक्याला हात लावून जोर जोरात हसत होता आणि हा पठ्ठ्या उलट्या सॉसच्या बाटलीतून कसे थेम्ब खाली पडतात ते नजर बारीक करून न्याहाळत होता  :)



भारी वाटलं ..... खरंच ... आपल्यासारख्या न बाटलेल्या माणसांच्या घरी सॉसचे थेम्बच लव्ह ड्रॉप्स असतात हा एक नवीन शोध लागला आज . 



पण या सगळ्यावरून एक गोष्ट नक्की कळली मला ..... " ती सध्या काय करते " हे नाही पाहिलंत तरी चालेलं पण मंडळी ..... 

तुमचा ६ वर्षांचा चिमुरडा .. तो सध्या काय करतो .. या कडे मात्र नक्कीच तुमचं लक्ष असं गरजेचं आहे . 
आपल्या बारीक सारीक  हालचालींवर ही या महाभागांचं फार लक्ष असतं बरं का !

:)


तर .... कसा वाटला माझा 

"तो सध्या काय करतो ?" ?

आवडला ना ??


Bunk Bed आणि मी


Bunk Bed ... माझ्या पिल्लाला आईच्या लांबसडक केसांनंतर भुरळ पडणारी ही दुसरी गोष्ट .

हो .... म्हणजे जेमतेम २ च वर्षांचा असेल तो . फॅमिली ट्रीपवेळी  हॉटेलमध्ये राहण्याच्या निम्मिताने त्याने हा बेड पहिल्यांदा पाहीला आणि काय सांगू जवळजवळ तो त्याच्या प्रेमात पडला  :D .
ट्रीपच्या सगळ्या रात्री त्याने त्या वरच्या मजल्यावर झोपून घालवल्या . आईच्या कुशीतून बाहेर झोपायची साहेबांची पहिलीच वेळ म्हणायची ती .
आणि त्यानंतर थोड्या थोड्या दिवसांनी आजपर्यंत बाबांना करून दिलेली आठवण.... "बाबा , आपण आणायचा हा मला तो बेड . "

गालांवर खळी , लुकलुकणाऱ्या काळ्याभोर डोळ्यांत उगवून आलेला आनंद , गोल फिरून ऊंच मारलेली एक उडी आणि बाबांना मारलेली घट्ट मिठी.. हे सगळं तो थांबवूच शकायचा नाही जेव्हा बाबा म्हणायचे " हो ..... आणायचा हा !! नक्की आणायचा  . "

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे त्याचा ' तो ' बेड आज उंबऱ्यातून आत आणल्यावर पुन्हा एकदा तशीच गोल फिरून ऊंच उडी मारत त्याने बाबांना मारलेली मिठी . :) 
अनपेक्षित आनंद म्हणजे काय हे आज त्याच्याकडे पाहून कळलं . त्या एवढ्याश्या जीवासाठी हे सगळं आश्चर्यकारक आणि गुपित होत .


स्वतःची खोली , खेळणी , आवडीचा पलंग , अंथरून सजवण्यात कसा दिवस संपला हे कळलंही नाही त्याला . रात्रीच्या दुधासाठीची  आज कुठलीही टाळाटाळ नाही . स्वेटरसाठी आठवणही नाही करून द्यावी लागली .  
स्वारी कधी न्हवे ते १० च्या ठोक्याला गुडूप ....... त्याच्या खोलीत जाऊन झोपलाही ?? आईचं आवरण्याआधी ?? 

त्याला इतका निवांत झोपलेला पाहून मला एक क्षणासाठी खूप आनंद झाला .. हो , एकचं क्षणासाठी . आणि दुसऱ्या क्षणी अस्वस्थ व्हायला सुरु झालं. कारणं जशी त्याला माझ्याशिवाय झोपण्याची सवय न्हवती तशी मलाही त्याच्याशिवाय झोपण्याची न्हवती . थोड्या वेळासाठी वाटलं की त्याला उठवावं आणि सांगावं , चल बाबा , माझ्याच जवळ झोप तू . 

डोळ्यांत टचकन पाणी साठलं . आपलं मुलं मोठं होतंय हे स्विकारणं एका आईसाठी खूप अवघड असतं .

मुलं लहान असतात तोवर आईच्या अवती भोवती घुटमळतात . एकदा मोठी व्हायला लागली की त्यांचं हे घुटमळणं आपोआपच कमी व्हायला लागतं. आई त्यांना स्वावलंबी व्हायला शिकवते खरी पण त्यांचं ते स्वावलंबी झालेलं पाहून तिच्या काळजाला पडणारी घरं आजवर कुणालाही दिसली नाहीत . 
 त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून वाटलं ......आता पुन्हा येईल का माझ्या जवळ झोपायला की नाहीच येणार कधी ? डोळे उघडल्यानंतर आईला न शोधणाऱ्या नजरेइतका खरंच मोठा झालास ?

इतक्या दिवसांचं वाट पाहिलेलं स्वप्न उशाला घेऊन तो झोपला खरा पण मला काही डोळा लागेल . मी आपली ह्या खोलीतून त्या खोलीत रात्रभर येरझाऱ्या मारतं  जागी . कधी त्याची चादर सरळ करायला . कधी तो जागा झालाय का पाहायला . तर कधी मला शोधतोय का हे बघायला :) 
आईचं काळीज ...... आजवर कळलंय का कुणाला ते आज कळणार होतं.

डोळ्यात सारखं दाटायला लागलेलं पाणी कुणालाही दिसू नये या प्रयत्नातच अख्खी रात्र संपून गेली माझी .  

सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये काम करणाऱ्या माझ्या पाठमोऱ्या कमरेला बिलगत पिल्लाने  विचारलं  " आई, आता मी एकटा झोपायला लागलो मग मी मोठा झालोय ? " 
त्याच्या या प्रश्नाला हो म्हणावं की नाही हेच मला कळेना . नुकतीच बोलायला शिकलेली लहान मुलं "तुला आई आवडते की बाबा " या प्रश्नाने जितकी भांबावून जातात कदाचित त्यापेक्षा जास्त भांबावून बघत होते मी त्याच्या डोळ्यात .


 "आता मोठा झालास तू . शिक झोपायला एकट्याने " असं रोज सांगणारी मी , तो मोठा होतोय हे मान्यच करायला तयार न्हवते . जितक्या वेगाने माझा श्वास ही न्हवता त्यापेक्षा जास्त वेगाने विचारचक्र धावायला लागली होती माझी . 

आज एकटा झोपायला शिकला . उद्या एकटा एकटा अभ्यासही करेल . मग मला सोडून रहायलाही शिकेल .आणि एके दिवशी खरंच एअरपोर्टच्या पट्ट्याच्या अलीकडून त्याची लांब जाणारी विरळ होणारी आकृती मी हात उंचावून पाहात राहीन . :)  

किंवा  मग  

कदाचित परत आजसारखा तो तेव्हाही माझ्या कमरेला बिलगून विचारेल "आई मी मोठा झालोय ? " आणि मग त्यावेळी माझ्या त्या भांबावून गेलेल्या नजरेला उत्तर तोच उत्तर देईल "हो , मोठा झालोय खरा पण तुझ्यासाठी नाही. तुझ्यासाठी अजूनही मी तुझा पिल्लाचं आहे. " :)


मुलं मोठी होतात पण आई कधीच मोठी होत नाही . मुलाला जन्म दिल्याक्षणी आई म्हणून तिचं जे वय असतं तेच वय तिचं शेवटपर्यंत असत . 

म्हणून तर ....... शाळेत बाळाला पहिल्या दिवशी एकटं सोडताना रडणारी आई आणि मुलगा शिकायला किंवा नोकरीसाठी लांब जाताना रडणारी आई एकच दिसते  . 

माझा ७ वर्षाचा मुलगा एकटा झोपायला शिकल्यानंतर मला कळलं माहेरून सासरी परततेवेळी मी दिसेनाशी होईतोवर आई बाबा हात उंचावून का निरोप देतात   :) 

मी मोठी होत गेले पण माझी आईही अजून तशीच आहे जशी मला पहिल्यांदा जवळ घेताना होती :) 


तूच माझा valentine





नमस्कार !!!

कदाचित तुम्ही मला ओळखत असाल . पण तरीही मी माझी ओळख करून देतोच … कसं आहे, ओळख असलेली बरी . कधीतरी अचानक तुमची अन माझी भेट झाली तर " तू कुणाचा रे ? " असं नको ना विचारायला कुणी

मी ( यांना नाव सांगू कि नको माझं) ……… जाऊ दे नाव कशाला हवंय तुम्हाला ???  मी माझ्या आईचं लाडकं पिल्लू आणि बाबांचा ठोंब्या . इतकीच ओळख माझी :) पुरेशी आहे ना ??  
वयानी थोडा लहानच आहे मी . तीन-साडेतीनच वर्षांचा आहे पण मला बडबड करायला आवडते .आईच तोंड दुखायला लागलय माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन म्हणून म्हटलं आज जरा तुमच्याशी बोलावं  .

मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे …… हो पण कंटाळणार नसाल तरंच बंर का . सांगू ??? 

आज मी एकदम खुश आहे …. म्हणजे किती माहित आहे का ? एवढा (…. ) या बॉल एवढा , नाही अजून जास्त त्या ……. ढगाएवढा… खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त  …… आभाळाएवढा . 

आता विचारा " का खुश आहेस ? " विचारा ना ……राहू  दे मीचं सांगतो तुम्हाला

गेल्या काही दिवसांपासून मला स्वतःलाच थोड मोठ झाल्यासारख वाटतंय . हो थोडंच बंर . जास्त मोठा झालोय असं सांगितलं तर लगेच एखादी गोष्ट सांग पाहू आम्हाला किंवा कविता म्हणून दाखव , तुझं नाव लिहून दाखवं अशी प्रात्यक्षिक करून घ्याल माझ्याकडून . म्हणून थोडं ..च मोठ झाल्यासारखं वाटतंय असं सांगतोय 

आता यालाही एक गोड गोड कारण आहे . दादा म्हणणारी बहीण आलीये ना आता मला . .
अहह… अहो नाही नाही माझ्या घरी नाही काही , माझ्या मावशीच्या घरी . कित्ती छोटी आहे माहिती आहे का ती ? तिला अजून दातच आले नाहीत . शू शू पण पँट मधेच करते ती .बोलताही नाही येत तिला . पण मी फोनवरून हाक मारली की काहीतरी बोलायचा प्रयत्न करते . मावशी म्हणते ती "दादा …. " म्हणते . असेल बुवा , फक्त मावशीलाच कळते तिची अ , उ ,आ ,ए  ची भाषा . हो पण ही डॉक्टर काकांकडून ही बहीण आणून बरेचं दिवस झाले आता . मी खुश असायचं कारण वेगळंच आहे हो …

आता मी दादा झालो म्हटल्यावर थोडं शहाण्यासारखं , मोठ्या सारखं वागलं पाहिजेच ना . तर आता मी मोठा झालोय . त्यामुळे मोठ्या दादासारखं वागायला पाहतोय . स्वतःच्या हाताने पोळी भाजी खातो . चमच्याने भात खातो ( अहो हाताने खाल्लं की माझ्या टीचर स्पूनने खायला शिकवतात ना म्हणून ) . काल आईला सांगितलं संत्र्याचा ज्यूस नको करत जाऊ आता . मी सोलून खाईन आपल्या हाताने . :) 

शाळेतही  माझ्या माझ्या सायकल वरून जातो . ती सायकल हो …… त्यावर उभं राहून एका पायाने चालवायची असते ती . माझ्या शाळेत सगळे फ्रेंड्स अशीच सायकल घेऊन येतात . पाठीला दप्तर लावून बर्फातून वाट काढत काढत सकाळी सकाळी शाळेत जायला मज्जा येते . आई माझ्या कडेकडेने रस्ताभर पळत असते तेव्हा खूप गोड दिसते . 

मी आणि माझा बाबा तसे आम्ही रोजच एकत्र बाहेर पडतो जायला पण बाबा  ऑफिस ला जातो आणि मी शाळेत . दोघेही सायकलवरूनच . बाबाची सायकल मोठी आहे . बाबाएवढीच. कधी कधी मलाही फेरी मिळते या सायकलची पण फक्त सुट्टी दिवशीच . 

पण आज काय झाल माहित आहे ??????  माझा बाबा त्याची सकाळची ऑफिसची मिटींग रद्द करून माझ्यासोबत शाळेपर्यंत आला . म्हटला "चल , आज रेस लावू दोघे . कोण पहिला येईल तो मोठा . " 

कित्ती बरं वाटलं मला . खूप खूप वेगात चालवली आज सायकल मी . बाबाला हरवायचं होत ना . इतका मोठा आहे माझ्यापेक्षा पण माझ्या इतकी वेगात नाही चालावता येत त्याला त्याची सायकल . फार मागे पडला होता माझ्या . आणि मी पहिला पोहोचल्यावर मागे उभा राहून जोर जोराने टाळ्या ही वाजवत होता :)

बाबापेक्षा पुढे गेल्यावर मला खूप मस्त वाटल , कळल जिंकल्यावर कित्ती छान वाटत ते . …… मावशीने बाळ आणल्यावर वाटलं होत त्यापेक्षाही जास्त …

तेवढ्यात  मला काहीतरी आठवलं …… रात्री आई बाबा valentines day की काय असं काहीतरी बोलत बसले होते . मला काही फारसं कळल नाही त्यातलं पण मी आईला विचारलं " valentines day म्हणजे काय ग आई ?  काय करायचं असत ? " मग तिने मला हेच सांगितलं की जर आपल्याला कुणी खूप खूप आवडत असेल म्हणजे कित्ती माहिती आहे का ?? त्या …. ढगाएवढ तर मग आपण त्याला सांगायचं की तू मला खूप आवडतोस आणि जर वाटलंच तर छान छान फुलं द्यायची ….   बस एवढंच  

माझ्या आई बाबांचा असा एक फोटो आहे माझ्या घरी … पाहिलाय एकदा मी . बाबा फार आनंदात दिसत होता त्या फोटो मध्ये . पण आज त्यापेक्षाही जास्त आनंदात दिसत होता आज . माझ्याबरोबरची रेस हरून सुद्धा . मला जरा गंमतच वाटली .

बाबा टाळ्या वाजवत होता तेव्हा मी धावत त्याच्याकडे गेलो . त्याच्या शर्ट ला धरून त्याला खाली ओढलं . आणि हळूच कानात सांगितलं  " बाबा …… तू मला खूप आवडतोस . तूच  माझा valentine. आज आपल्या दोघांचा फोटो काढू . " आणि एक गोड गोड पाप दिला .

कित्ती आनंद झाला म्हणून सांगू  बाबाला……. त्याने मला वर उचललं आणि आभाळभर गोल गोल गोल गोल फिरवल . कित्ती छान वाटलं . जणू काही मला आज उडताच येत होत त्या पक्षासारख . आभाळाला हात पोहोचतात का हे बघत होतो मी .

आणि गम्मत म्हणजे खरंच आज हात आभाळाला पोहोचला …… बाबाने वर उडवलं तेव्हा :)

माझा बाबा मला त्या आभाळाएवढा आवडतो……

या ३ वर्षात त्याने मला ३००० वेळा तरी सांगितलं असेलच कि मी त्याला कित्ती आवडतो ते …… पण आज मी पहिल्यांदा सांगितलं त्याला आणि आभाळातला पाउस त्याच्या डोळ्यात उतरताना पहिला . आणि आईच्या डोळ्यातून तो कोसळताना    :)

शाळेतून घरी आलो तर माझ्या खेळण्यांची टोपली गुलाबाच्या फुलांनी भरली होती . आणि बाबा ऑफिसला दांडी मारून घरी माझी वाट पाहत होता .  

View Facebook Comments




चिमुकल्याची शाळा ……


२५ वर्षांपूर्वीच आपल्यावेळचं गणित फारच वेगळ होत . १ ते १० अंक , २-३ कविता आणि ' बबन कमळ बघ ' हे शिशुवाचनातील पाहिलं पुस्तक न अडखळता वाचता आलं की आपल्या आई बाबांसाठी हा आपण बालवाडीत मेरीट मध्ये आल्याचा आनंद असायचा. पण आता अस नाही हो …

वर्ष पुढे सरकत गेली तसे दिवस बदलले . आता १० अंकांवर आणि २ कवितांवर काही भागत नाही . माझा मुलगा जेमतेम ३ वर्षांचा आहे . त्यावरून सांगते . तो आणि त्याच्या वयाची इतर मुले सर्वांनाच यापेक्षाही पुष्कळ काही येत हो . Nursery rhymes च अख्ख पुस्तक तोंडपाठ, प्राणी , पक्षी , अवयव , फळ , फुलं इ . यांची नावं हे अगदी ओघाने आलंच .  एखाद दुसरी स्टोरी ही सांगतात हे चिमुरडे आणि ते ही अगदी हावभावसहित. वर्तमानपत्र समोर आलं की लहान लहान शब्द वाचायचा प्रयत्न करतात . चार-चौघात गेलं की ओळख असो व नसो , संभाषण सुरु करतात . 'भाषा' हा अडसर कधीही त्यांना जाणवत नाही .

माझ्या मुलाला इथे जर्मन kindergarten मध्ये सोडताना मला हीच एक भीती होती . इतरांशी हा कसा संवाद साधणार ? पण जेमतेम ३ आठवड्यात ही माझी भिती त्याने पळवून लावली . आता घरी येउन आई बाबांना शिकवतो नवीन भाषा बोलायला . ह्याचं सगळ श्रेय त्याच्या शाळेला . जर्मन भाषा येत नाही माहित असूनही एकही इंग्रजी शब्द न बोलत शिकवण महादिव्य म्हणावं लागेल . वयाच्या तिसऱ्या वर्षी इंग्रजी म्हणजे काय हे ही माहित नसावं कदाचित मला . पण ह्याला बोलताना ऐकल की वाटत ऐकत रहावं :)  

त्याची ही शाळा म्हणजे माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव आहे . भारतातील शाळांपेक्षा इथली शिक्षण पद्धती फारच वेगळी आहे . कुणालाही कमी लेखायचा इथे उद्देश नाही . पण दोन्ही गोष्टी फार जवळून पाहील्या की तुलना ओघाने आलीच . 

लिहिण्या वाचण्यासारख्या मुलांना जाचक वाटणाऱ्या गोष्टींचा इथे kindergarten शी काहीही संबंध नाही . जे काही लिहायला सुरु करायचं ते इयत्ता पहिलीपासून . kindergarten  म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आई बाबा घरी नसताना / कुणाच्याही मदतीशिवाय करायला शिकवणारी एक सुंदर जागा . आणि ह्याची सुरवात शाळेच्या गेट पासूनच . 

गेट स्वतः उघडणे , आपली सायकल आपण लावणे , फक्त आपल्याच ग्रुपची बेल वाजवणे . शाळेत पाऊल टाकल्यावर आपल्या कपाटातील शाळेत घालायचे शूज स्वतः बदलणे ( मला इयत्ता दुसरी पर्यंत माझ्या बुटाची नाडी बांधता आली नाही ) . जाकेट , टोपी जगाच्या जागी . आपली प्लेट घेऊन खायला dining table वरच आणि खाऊन झाल्यावर खुर्ची परत होती तशी , आपली जागा होती तशी स्वच्छ करून ठेवणे , सगळ अगदी व्यवस्थित . कुणीही सांगायला नसतानाही . म्हणजे शिस्त आणि नीटनेटकेपणा लहानपणापासून अंगात आपोआप भिनतो . 

जबाबदारी घेत यावी यासाठी इथे प्रत्येक मोठ्या मुलाला एक लहान मुलगा जोडून दिलेला असतो . त्या लहान मित्राचं अगदी सगळ ही मोठी पाहतात . गरज पडल्यास कपडे बदलतात , खायला खेळायला शिकवतात , लहानांचा खेळण्याचा पसारा आवरतात. त्यांना हाताला धरून जिन्यावरून उतरवतात . आणि हे सगळ अगदी हौसेने . प्रत्येक वर्गाबाहेर या अशा जोड्यांचे फोटो लावलेले पाहिलेत मी .   



अभ्यासाव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी असतात इथे . वर्गातील मुलांसाठी लागणारा आठवडी बाजार ट्राफिकचे सगळे नियम पळून दुकानातून घेऊन येतात ही मुलं . त्याचा हिशेब लावताना अंकगणित आपोआप शिकतात .  स्वयंपाक घरासाठी मुली - मुल हा भेद इथे नाही . kindergarten च्या kitchen मध्ये या चिमुकल्यांना पदार्थ बनवायलाही शिकवतात . आठवड्यातून एकदा शाळेबाहेर शहरातील एखाद्या ठिकाणी खरेदी म्हणजे व्यवहारज्ञान. शाळेतील छोट्या छोट्या इवेन्ट्सची जबाबदारी म्हणजे व्यवस्थापन , स्वच्छता करणाऱ्या मुलांचा ग्रुप वेगळा , हिशेब ठेवणारे वेगळे , हजर - गैरहजर याची नोंद ठेवणार कुणीतरी एखादा . बाथरूमची स्वच्छता , फ्लश होइतोवर थांबणे , आपला इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी . आणि सगळ घड्याळाच्या काट्यावर . वेळ कुणीही मोडत नाही इथे .  आणि हे सगळ वयाच्या तिसऱ्या वर्षापासून . 

यांचे शाळेचे ड्रेस तर कित्ती रे बाबा ……. आमचा एकाच असायचा , गणवेश . त्यावर सगळ व्हायचं खेळ , अभ्यास ( इतर काही नसायचच म्हणा ) यांचा रोज बागेत जातानाचा ड्रेस वेगळा , बर्फातला वेगळा , रंगरंगोटी शिकतानाच वेगळा , चप्पलचही असच. प्रत्येक ग्रुपच चपलांच कपाट वेगळ . वर्गातून बाहेर येतात रांगेत जो पहिला असेल त्याने ते कपाट आणायचं आणि सर्वांचे चप्पल बदलून झाले की जो रांगेत शेवट असेल त्याने  नेवून जागी ठेवायचं. कुठेही गडबड नाही गोंधळ नाही . इथे कुणीही रांग मोडताना पाहील नाही मी . आई समोर दिसली तरीही माझा मुलगा रांग मोडून धावत येत नाही :) छान वाटत तो सगळ स्वतः हून करताना पाहताना .      

यांची शिक्षिका स्वतः गिटार वाजवून कविता म्हणायला शिकवते . मुलानाही म्हणायला उत्साह येतो . जो कोणी उत्तम म्हणेल त्याला आपली गिटार वाजवायलाही देते :)  माती चिखल खेळायला देतात , बर्फात खेळायला देतात , धान्यात खेळायला देतात , रंगात खेळवतात , अंघोळ करायाल देतात पण तरीही शाळेतून परत येताना मुलं स्वच्छ आणि सुंदर असतात .   

घरी आल्यावर माझा चिमुकला गणपती बाप्पासमोर डोक टेकून काय मागतो माहित आहे ???

" चांगली बुद्धी आणि भरपूर गोड गोड मित्र "

म्हणतात ना आपलं घर शेवटी आपलं असत . मला हसायला येत . जर्मनीतील मित्र मिळायला भारतातल्या देव्हाऱ्यातल्या बाप्पा समोरच वाकावं लागत. 



Golden boy

गोड या शब्दाचा गोडसरपणा मला याआधी कदाचीत कधी कळलाच नसावा .कुणी इतकं गोड कसं  असू शकत ?   माझीच  नजर तर नसेल ना लागत कधी ? पापणी लववावीशीच नाही वाटत . एकटक नुसत पाहत राहावं त्याच्याकडे . 

किती आणि कुठून सुचतात तुला इतके सगळे प्रश्न ? कुठल्या मातीचा बनवलाय तुझा मेंदू देव बाप्पाने ? डॉक्टर काकांनी डिलिव्हरी रूममध्ये तुझं  ठेवलेलं नावाचं योग्य आहे अगदी  " Golden boy …….  दसऱ्या दिवशी देवबाप्पाच्या घरून चालत आलेलं सोन आहे हे :) " हो …… अगदी असंच म्हणाले होते .  

तुझ्या  सोनेरी पावलांनी आजीच घर भरून टाकलस तू . अन बाबा तर काय ……. स्वर्ग सुख अनुभवत असतात तुझ्यासोबत . 




सांगू का बाबांना …. तुमच्या लाडक्या लेकाने रडून गोंधळ घातला म्हणून . बंर …… कारण काय असावं तर तुझ्या आणि बाबांच्या लग्नात मला का नाही नेलं  बरोबर :) :) कसले भारी प्रश्न पडतात रे तुला …… आता काय उत्तर देऊ ??????

हो ……. आणि तुझ्या Cockroach fly ची गम्मतही सांगितली बर मी सगळ्यांना . Butterfly … fly करत म्हणून त्याला Butterfly म्हणतात तर Cockroach ला Cockroach fly का नाही म्हणत ? आई शप्पथ सांगते …. २५ वर्षांच्या या आयुष्यात मला हा प्रश्न कधीही पडला नाही . खरंच …… म्हणूनच त्या दिवसापासून तुझ्या आई बाबांसाठी Cockroach fly हेच बरोबर 

आता त्या दिवशीचच घ्या ना . 10 Little Fireman म्हणत बसला होता एकटा एकटाच . मध्येच काय झालं धावत आला स्वयंपाक खोलीत "आई, Fireman काय करतात ग ? " त्याला समजेत अशा शब्दात मी त्याच्या प्रश्नच समाधानकारक उत्तर दिलं . (माझ्या बाबांनी मला १० वेळा सांगितलंय . त्याच्या प्रत्येक प्रश्नच समाधानकारक उत्तर तुला देता आलं पाहिजे. ते जर नाही जमलं  तर तुझी सगळी प्रशस्तिपत्र वाया … हो अगदी UT सुद्धा  :) ) माझं  वाक्य पूर्ण होण्याआधी त्याचा पुढचा प्रश्न " Postman आपली letter post करतो ना . मग म्हणून तो postman . मग fireman चूक आहे ……. त्याला waterman म्हटलं पाहिजे . तो fire विझवतो . लावत नाही काही . त्या book  वाल्या काकांना काही ……. कळत नाही . " आता झाली न रावं पंचाईत . २ मिनिटासाठी वाटलं  जर आता नाही उत्तर सुचल तर गेली ……. माझी सगळी बुद्धी वाया गेली आज  :)  

आई चिडली तर तिला कसं शांत करायचं याचही टेकनिक आहे त्याच्याकडे . इतक्या वेळा समजावूनही एके दिवशी तो आईच्या औषधाच्या स्ट्रीपकडे पाळला  . मी सूर चढवला "पिल्ला …कित्तीवेळा सांगितलंय ???? दुसऱ्यांच्या औषधाला हात लावायचा नाही " माझ्या डोळ्यांपेक्षा मोठे डोळे करत जवळ आला आणि म्हणाला "दुसऱ्याची मम्मा आहेस तू ? मम्मा माझी … मग ते औषधही माझंच झाल ना . " एकदम impressive उत्तर दिलं पठ्ठ्याने :)




झालय काय माहिती आहे का … जर्मनीमध्ये आला तेव्हा खूपच लहान होता ना हा बाळकृष्ण . पण आता लागलाय Chaou , Tschüss करायला . इंडिया ट्रीप ही कारणा कारणानेच होते म्हणा ना . म्हणजे इथे आल्यापासून २ वेळाच . पहिली मामाच्या लग्नासाठी आणि दुसरी काकाच्या लग्नासाठी . त्यामुळे त्याला वाटत आजीकडे जायचं ते फक्त लग्नासाठीच . कुणीही विचारा "आता कधी येशील परत ?" पटकन उत्तर देतो "आता लग्नाला " :) 

मामाचं लग्न झाल्यावर मामी घरी आली. काकाने काकी आणली . मला म्हणतो कसा "का ग ……. मामी , काकी आता तिच्या आईकडे नाही राहणार ? त्या दोघांना आवडल्या त्या म्हणून घेऊन आलो आपण त्यांना आपल्या घरी ?" मी ही तितकंच सहज उत्तर दिलं "हो ……… आवडल्या म्हणून आणल्या . " झालं …. दिवसभर डोक्यात हेच चक्र सुरु होत दिवसभर साहेबांच्या . निरभ्र आकाश पाहत संध्याकाळी मी गच्चीत उभी असताना मला त्याचा आवाज आला . म्हणजे तो बोलत होता कोणाशीतरी . " आता तुझ आणि माझ लग्न झालंय . तू मला आवडतेस . मी घरी घेऊन जाणार तुला . आजपासून तू माझ्या बरोबर रहायचास . आई राहते न बाबाच्या घरी … तशीच " मला रहावेना . मी पटकन डोकावून पाहील तर हा त्याच्या आवडीच्या गाडीशी बोलत होता :) बाबांनी वाढदिवसाला गिफ्ट दिलेली कार एकदम प्रिय बंर आम्हाला :) तांदळाचे चार दाणे घेऊन तिच्यावर उधळत होता . 

आकाशाची निरभ्रता फिकी वाटावी इतकी स्वच्छ असतात ही चिमुरडी मनं . कुणीतरी आवडलं की घरी आणायचं असेल तर लग्न करायचं इतकच माहीत त्याला :) . मग मी ही सामील झाले  त्याच्या या खेळत . टाकले मी ही चार दाणे अक्षता म्हणून . कित्ती आनंद झाला म्हणून सांगू त्याला . पळत येउन इतका छान बिलगला मला . म्हणतात ना … जगातील सगळी सुखं एकीकडे आणि आई होण्याच सुख एकीकडे . त्याची तुलना कशाशीही नाही . :) 

View Facebook Comments



कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही


स्विमिंग स्विमिंग खेळताना , पोटावर आईच्या अलगतच घेतली उडी
काठीच घेऊन आले हे बाबा … वाटलं देतात आता एखादी छडी
तसा माझा बाबा कध्धी कध्धी चिडत नाही
डोळे करतो मोठे मोठे , पण त्याचा आवाज कधी वाढत नाही
आईला होता विचारात …. लागलं का ग फार ???
विचारतोस का रे कधी मला  …. खाल्ल्यावर आईचा मार ?
त्याचं हे असलं वागण माझ्या डोक्यातच शिरत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही

" कर रे अभ्यास " म्हटल्या म्हटल्या येउन बसतो ना मी मांडीवर
आता कसं कळेल मला पोपट पिंजऱ्यात राहतो की फांदीवर
परवा नाही का , मामा आजोबांच्या गेलो होतो घरी
पोपट चावला बोटाला तुझ्या …. तेव्हा घाबरली होतीस खरी
आता मग हा पिंजऱ्यातून फांदीवर उडाला बर कधी ?
पुस्तकवाल्या काकांना सांग …. पोपटाच घर पिंजरा… असं लिहा आधी
पुस्तकात वाचून पाठ करायला … मी काय रट्टा मारत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही

काल आई म्हणाली चल तुला A B C D शिकवते
फळ्यावर लिहिताना ही I  ची दांडी कशाला इतकी वाकवते ?
विचारलं तर म्हटली …… याला J म्हणतात रे बाळा
पण परवा मी याच J मध्ये पाहीला … माझ्या छत्रीचा अडकलेला गळा
त्याला म्हणे म्हणतात छत्रीचा वाकलेला दांडा
हिला  काही अभ्यास येत नाही हो …… म्हटलं उगाच कशाला हिच्याशी भांडा ?
दांडी बिंडी वाकवायला …… मी काय तुझ्या I चा एकुलता एक पाय चोरत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही


म्हणाली D  for  Dog, पण D  ला काढलीच नाही शेपूट
कधी सांगते B  for  Ball  तर कधी सांगते बूट
बिना शेपटीचा Dog कधी कसा असू शकतो ?
दर वेळी वाद घालून शेवटी मी मात्र थकतो
O  for Orange म्हणताना करते चंबू ओठांचा
Potter का काहीतरी शिकवते , जे गारवा देतात माठांचा
या Potter  आणि Porter मधील फरक काही केल्या डोक्यात शिरत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही

वैताकून म्हटली … चल तोंडी अभ्यास करू
बोलायला आपल्याला कारणच लागत … माझ्या तोंडाचा पट्टा सुरु
१० तोंडवाल्या राक्षसाच विचारत होती मला नाव
दसऱ्याला जाळला म्हणतात …… नको त्याची आठवण कशाला राव ?
त्या अशोक स्तंभवाल्या काकांनी ठरवलंय म्हणे ४ सिहांना पाळायच
(भारताच्या प्रतिक चिन्हाचा अपमान करण्याचा हेतू नाही …… इथे बालमन बोलताय )
मला वाटलं …… भरपूर तोंड असणाऱ्या सगळ्यांनाच जाळायचं
४ असले की आदर …… आणि १० वाल्याला जाळण , ही आकडेमोड आता परत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही


अलिमन्स अलिमन्स म्हटलं तर तिला काही काही कळेना
( अलिमन्स  बंर का …अनिमल्स नाही )
कपाळावरच्या  आठ्यांचा गणित तिच्या काहीच कसं जुळेना
बाई …… Tiger , Lion , Elephant ला अलिमन्स म्हणतात , शेवटी सांगितलं हो समजावून
वेड्यासारखी अलिमन्सवर दिवसभर हसली मला कडेवर घेऊन
अशी कशी सगळ विसरते ही …. टिचरची भिती कशी मनात धरत नाही ?
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही

झाली आज्जीशी बोलायची वेळ सांगून काढला कसातरी पळ
भोकाड पसरून बसेल उगाचम्हणून सोसली इतकी कळ
S  for Skype दिसलं ना ……… laptop सुरु झाल्यावर :D
हात जोडून राहिली हो उभी , हुशारीच दर्शन झाल्यावर
मी ही देऊन टाकला आशीर्वाद ……
बाप्पा तुला अभ्यास करायची बुद्धी देओ, आपण आईची तक्रार बाप्पाजवळही करत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही


Happy Birthday Mumma........



He bent down......

Got on one knee.....

Kissed my hand 
and said 

" Happy Birthday Mumma ..."

And I was like Ohh My God  :O
Its a best birthday wish ever for me 

Thank you so much my little master. 
Love you a lot 

:-*




Sometimes smallest thing take up the most room in your heart.

Birthdays come and go , gifts are opened and thrown , candle blows , many hands come together to wish you.

   Those balloons, cream of you cake, so many gift wraps , parties  ......... that special day spent with all special ones for you .

Those phone calls at late night, specially your number is getting busy to everyone at 12 O' Clock .

Surprise from your mom, dad, friends  and a lovely husband.

                    Someone is waiting for you with bunch of roses in his hand. A tight hug , no words to say thank you , eye language saying "Just be with me as always !"

Everything is sweet. But yesterday's wish was so special for me .

My 2 years child was wishing me in that stylish way .The biggest surprise for me was knowing that my prince is growing so fast :)  


I will promise you my little heart ...... I will keep growing younger and younger as years passes by just for you .... To enjoy your childhood  with you :)






हल्लीची मुलं


हल्लीची पिढी आपल्या पुढे एक पाऊल आहे असं म्हणतो सगळे आपण . पण माझ्या घरी दोन दिवसांपूर्वी जो अनुभव आला त्यानंतर अजूनही मी पावलच मोजत बसली आहे . किती पुढे गेलीत आमची पिल्ले याचा अंदाजही नाही लागत आहे .

तर झाल अस ………. माझी एक जिवाभावाची मैत्रीण . अश्विनी . आयुष्यात काही माणस कुठल्याही साबबीशिवाय  मनात स्थान निर्माण करतत. अगदी मनापासून आवडतात . त्यांपैकी अश्विनी एक . तसं पाहायला गेल तर माझ्याआधी ह्यांची मैत्रीण आहे ती पण आता माझी जास्त जवळची :)

तिच्याही घरी आर्यच्या वयाची एक परीराणी आहे , फारतर ३ - ४ महिन्यांनी लहान असेल त्याच्यापेक्षा . फार गोंडस आहे तीच हे पिल्लू . युक्ता ( अश्विनी , तुझ्या परवानगीशिवाय माझ्या ब्लॉगमध्ये तुमचा उल्लेख केल्याबद्दल तुझी काहीही हरकत असेल तरी माझ्या परीबद्दल मी लिहिणार :) ) तर सांगण्याचा मुद्दा असा की तिने काही दिवसांपूर्वी परीचे ( मी परीच म्हणते तिला ) फोटो अपलोड केले होते फेसबुकला. फोटोमधून का होईना पण मी ही फार दिवसांनी पाहत होते तिला. तितक्यात माझं पिल्लू आल जवळ . आईचा laptop हे त्याच हक्काचं ठिकाण झालाय आता . काही विचारण्यापूर्वी सगळी सूत्र आपल्या हाती घेऊन रिकामा होतो .

तसा दिवसभर त्याच्या प्रश्नांचा भडीमार सुरूच असतो माझ्यावर . तेव्हाही परीचे फोटो पाहून त्याने विचारलं "कोण आहे ग ही ? कोणाचे फोटो पाहते आहेस ?" मी ही त्याला तितकच बालिश उत्तर दिलं "मैत्रीण आहे ती आर्यची. युक्ता !!!!! " बापरे ! त्याला इतका आनंद झाला. त्याच्या या नव्या मैत्रीबद्दल त्याचं पहिलं-वहील वाक्य "माझी मैत्रीण आहे ना . मग ping करू का मी तिला ? "
मी तर पहातच राहिले या हिरोकडे . काय सांगावं ? हो की नाही काहीच कळेना . आईच्या उत्सुकतेपोटी मी विचारलं " काय रे ping करणं म्हणजे काय ? तुला काय कळत ? " . तर अगदी जग जिंकल्याच्या अविर्भावात महाशय उत्तरले "ह्म्म्म …… कळत मला सगळ. तू नाही का तुझ्या मैत्रिणीशी ping करून बोलतेस :) तसच ग …… काय मम्मा तू पण !! "  :O

हे घरी आल्या आल्या त्यांच्या कानावर घातला घडला प्रकार मी . ते ही निशब्द . मुलगा मोठा होतोय याची पहिली घंटा वाजली होती आमच्या घरी आज :)

आता या ping च काय घेऊन बसलात …… skype वरून आजीला call लावता येतो याला . फोनमध्ये याच्या पोएमंचा व्हिडीओ सापडेना तर बाबांना सांगत होता म्हणे " YouTube लावा YouTube "  तिथेही शोधाशोधीची भानगड नको म्हणून त्याने अजून एक सोपा मार्ग शोधून काढलाय . Google's voice recognition software उघडून कवितेची पहिली ओळ गुणगुणली की लगेच सापडते आपली कविता हे माहीत झालंय आता त्याला . Laptop चे right click , double click हे अनु असे बरेच उद्योग त्याला कळतात याचा मलाही धक्काच बसला . हो ना धक्काच म्हणावं लागतंय आता . 

कुणी म्हणेल का हो की हा मुलगा २ वर्षांचा आहे ? म्हणजे प्रामाणिकपणे मान्य करते मी की हे सगळे प्रकार मला दुसऱ्या वर्षी सोडाच पण दुसऱ्या इयत्तेत गेले तरी न्हवते येत . ह्याच्या वयाची इतरही मुलं अशीच आहेत का हो ? म्हणजे काळजीपोटी विचारते आहे हा ……     

तसं पाहायला गेल तर हा काही laptopi किडा वैगरे नाही . अभ्यासही वयाच्या मानाने बराच येतो म्हणायला हरकत नाही . दिवसातून जेमतेम ५ मिनिट मिळत असेल त्याला . पण कौतुकाची गोष्ट ही की या मुलांची निरीक्षणशक्ती फार वाढलेली आहे . आई बाबा ही वस्तू हाताळताना काय काय आणि कुठली कुठली बटन दाबतात याची नुसती टूकुटूकू पाहणी चाललेली असते . 

निष्कर्षाचा मुद्दा इतकाच ………. हल्लीची मुलं फक्त एक पाऊल पुढे नाहीत तर चांगलं मैलभर अंतर पार केलय यांनी . :) कौतुक वाटत आणि त्यापेक्षा जास्त काळजी :) 



NRI ............... येणार आहे


" NRI……  अनिवासी भारतीय " हा शिक्का एकदा का तुमच्या कपाळी पडला की लोकांच्या तुमच्याकडे बघण्याच्या नजरा बदलतात . त्याला कारण म्हणजे  तुमच्यामध्ये झालेले बदल ,जे मायभूमीवर पाऊल टाकल्या टाकल्या सगळ्यांच्या नजरेत भरतात .

दिवस फार लवकर बदलतात . पूर्वी मैत्रिणीला सांगायला कौतुक वाटायचं " सुट्टीला मामाच्या, मावशीच्या, आत्याच्या घरी राहून आले " . आणि आता …. "सुट्टीला इंडियामध्ये जाऊन आलो " या वाक्यात कौतुकापेक्षा प्रदर्शनचं खचखचुन भरलंय हे लक्षात यायला वेळ लागत नाही .  त्यातही भारताचा ' इंडिया ' असा उल्लेख करणं हा पहिला लक्षणीय बदल :)

असो … ज्या तळ्यातील पाणी आपण पितो त्यात जास्त  दगडफेक करणं बर न्हवे . उठलेले तरंग आपल्यापर्यंतही येउन पोहोचतील याचं भान ठेवत अनिवासी भारतीय याबद्दलची चर्चा इथेच थांबवू . बाकी आपण सूज्ञ आहात . :)

आज हे सगळ सुचण्याच कारण म्हणजे आईच्या घरून परत येवून आठवडाच झाला ( आईच घर म्हणजे इंडियातून  :P ) पण जेवणाची चव अजून नाही गेली जिभेवरची . तश्या आठवणी बऱ्याच आहेत सांगण्यासारख्या आणि सांभाळून ठेवण्यासारख्या पण मला पहिलं आठवेल ते भरलेलं वांग . विमानतळावरून घरी पोहोचायला रात्रीचे ३ वाजले मला त्या दिवशी . आणि इतक्या रात्रीही मी काकुच्या हातचं भरलेलं वांग , मसाले  भात , पुरी वर ताव मारत होते . शेवटी जवळ जवळ एका वर्षांनी घराच्या जेवणाची डिश समोर आली होती माझ्या .

घरी आले खरी पण आमचे बाळराजे कुठे झोपायला तयार ? त्याच्या डोक्यात अजून जर्मनीच घड्याळ टिकटिकत होत ना … त्याबरोबर पहिल्या दिवशी सहन न होणारी उष्णता . AC मधून भट्टीत येउन पाडल्यासारखं  झालं होत . पिल्ला तर कपडे काढून फरशीवर लोळायला सुरु झालाही . तोवर त्याच्या तळपायाला कुठूनतरी धुळीचा कण येउन चिकटला . "मम्मा शी ……. " साहेब सुरात ओरडले . त्या दिवसापासून पायात चढवलेले बूट त्याने अंघोळी व्यतिरिक्त कधीही काढले नाहीत :)

ह्याच्या रात्रीच्या पराक्रमांची यादी करते न करते तोच सकाळी सकाळी हा मला झाडू घेऊन धावत जाताना दिसला . बाहेर जाऊन पाहीलं  तर सनई चौघडे वाले :) गेलेल्या दुसर्याच दिवशी भावाचं लग्न होत माझ्या . आणि माझ्या लेकराला इतक्या शांततेतून गेल्यावर तो गोंगाट सहन होईना . सनईवाल्याच्या मागे झाडूच घेऊन लागला पठ्ठ्या . आता त्याला ओरडावं म्हटलं त्यात त्याची काहीही चूक न्हवती . मलाही आवाजातला फरक लक्षणीय जाणवत होता . लग्नादिवाशी कार्यालयभर हा सगळे कपडे काढूनचं  फिरत होता . आणि त्याच्यामागे मी नऊवारी नेसून……  त्याच धोतर हातात घेऊन मागे मागे धावत  :)

हे सगळे झाले सुरुवातीचे किस्से पण नंतर एकदम मस्त रमला तो…… घरातल्या सगळ्या बाटल्या, रिकामे डब्बे गोळा करून हा " डब्बा डब्बा " म्हणत डब्बा एक्स्प्रेस खेळायला शिकला . शेजारच्या मुलांचा आवाज आला रे आला की लपंडावसाठी धावायचा. रात्री आजीच्या हाताचं चविष्ट जेवण झाल की हा झालाच सुरू  " आजोबा …चला शेकोटी " आणि आजोबाना रोज शेकोटी करायला लावायचा . (जर्मनीत परत आल्यावरही त्याचा हा शेकोटी प्रकार सुरु आहेच . फक्त आग लावत नाही . बाबांचे खराब पेपर बॉल करून रचून ठेवतो :) आणि आई बाबानाही शेकायला बसवतो )

माझं माहेर म्हणजे एकत्र कुटुंब . मुलांना भरपूर मामा मिळाले की ती फार आगाऊ होतात याचा मला प्रत्यय आला . या मामा लोकांनी माझ्या लेकराला पार काहीच्या काही शिकवून सोडला . दुधाचा पेला घेऊन आई येताना दिसली की हा एकदम एका पायावर उडी घेत , टाळ्या वाजवत  "कब्बडी कब्बडी " सुरु व्ह्यायचा . मग याला पकडून पकडून मला एक एक घोट पाजवावा लागायचा . आजोबांनी आणलेल्या सायकलची तर त्याने " धूम धूम " करत अगदीच वाईट अवस्था करून ठेवली होती . आता घरचे हौशी म्हटल्यावर रोज हरभऱ्यासाठी आणि वाटाण्यासाठी  भाजीवाल्याकडे याच रतीभ सुरु झालं होत  .

कौतुक करून घ्यायची एकही संधी सोडली नाही बहादराने. मामाचं लग्न , काकाचा साखरपुडा सगळीकडे याचेच फोटो जास्त .

इथे असताना Autumn त्याने मस्त एन्जोय केला होता . त्याचाच परिणाम की  काय , समोरच्या आजीने साठवून ठेवलेला पाचोळा आणि राख याने एके दिवशी डोक्यावर उधळून घेतली . बम्बातील राख कलर समजून मिशा काढून आला . (समोरच्या आजीच या गुलामाने 'बोक्याची आजी ' असं नामकरणही  केलं आहे ) 

खरेदीसाठी बाहेर पडायचं म्हटलं की नको वाटायचं याला . कारण काय तर बस शी असते , रिक्षामध्ये मान डुगडूगु हलते ( खड्ड्यांचा परिणाम हो )…. म्हणे " बाबा मला एरोप्लेन पाठवा " कशाला तर महाद्वाररोड वर जायला  :) आता झाली न पंचाईत . ड्रेस खरेदीला गेले तर दुकानातून पळून आला . "मला नको द्रेस. आहेत भरपूर माझ्याकडे " म्हणत .  घरी आल्यावर थोड लाडीगोडीने विचारलं तर म्हणतोय कसा "कसलं होत ते शॉप . खेळायला काहीच न्हवत मला . मग कपडे कसले असणार तिथे ?" (जर्मनीमध्ये असलेल्या children's play zone ची सवय झालीये त्याला )

असे बरेच किस्से माझ्या बालकृष्णाचे . जावयाच्या कौतुकाच्या आठवणी , कोल्हापुरी तांबडा पांढरा आणि बरचं  काही  

सगळंच छान छान आणि गोड वाटतंय पण टेन्शन एकाच गोष्टीचं आहे . परत भारतात आल्यावर या माझ्या पिल्लाला सेट व्ह्यायला किती दिवस जातात कोणास माहीत ????

View Facebook Comments 



चिमुकला जीव




घरभर खेळणी पसरलेली असतात माझ्या
नीटनेटका नसतोच कुठला कोपरा
हाताचे ठसे , A B C D , नारळाच झाड आणि बरंच काही
भिंतीचा फळाही पडतोय अपुरा
बाबाचे शूज घालून घरभर धावण
आईची लिपस्टिक कपाळावर लावण
२ मिनिट बाप्पासारखा शांत बस जरा
चिमुकला जीव आता दमवतोय खरा :)


स्टंट करत बेडच्या चालतो आता काठावरून
चिउताईच्या घासासाठी आईला रोज उठवतो ताटावरून
papmpers चा ढीग रचून तयार केलेली शिडी
कशी विसरू बाबाच्या पोटावर मारलेली उडी ?
ई-लार्निंग चे धडे गिरवतोय आत्तापासून
लाठी-काठी शिकलाय Skype समोर बसून    
(मामाने शिकवलंय ह हे सगळ आम्हाला …… कोल्हापुरात नसलो म्हणून काय झाल ?)
शेजारणीच्या डोअर बेलवर सारख्या याच्या नजरा
चिमुकला जीव आता दमवतोय खरा :)

Fecebook , YouTube तर नाचतंय हाताच्या बोटांवर
Nursery rhymes ही पक्के बसलेत या छोट्याश्या ओठांवर
फोनवरून विक्स ही फासल आम्ही काकाच्या नाकाला
( त्यानंतर आईच्या फोनला झालेली सर्दी बरीच झाली नाही :P )
कोण शिकवत हे सगळ माझ्या लेकाला ?
इवालाल्या फुलपाखराला ओंजळीने देत राहतो सावली
तळ्याकाठच्या बदकासाठी स्वारी स्वेटर घेऊन धावली
आत्ता वाटतय , माझा रांगणारा बाळकृष्णच बारा
चिमुकला जीव आता दमवतोय खरा :)


When every leaf is a flower


एका निःशब्द पायवाटेवरून
बोचऱ्या थंडीशी हातमिळवणी करत
ढगाआडून डोकावणारा एक सूर्यकिरण शोधायला
नजर वर करावी
अन
एखाद पिकलं पान गळून अंगावर पडाव

सो-सो करणारी वाऱ्याची एक झुळूक
अन
झोपळ्यावर झुलणाऱ्या पोरासारख
एकेक पान भिरभिरत उडायला लागत
लाल पिवळ्या रंगांच्या सूर्यकिरणानी स्वतःला नटवून  

वाटत … हे पानांचं आणि वाऱ्याच संभाषण मला का नाही आलं ऐकू ?

म्हणाला असेल वारा ….

"पिकल्या पानांनो ……

काय झाली थंडी पडली म्हणून
सोनेरी लाल स्वेटर देतो न मी आणून

असं कसं कुणी घरातून नाही बाहेर पडत
सजवू ना रस्ता आपण , पानाला पान जोडत "

अन या वाऱ्याच्या एका विनंतीवर
एका मागोमाग एक सगळीच्या सगळी पान गळायला सुरु झाली
जणू काही ……
ती मातीच्या प्रेमात पडली होती
इतक्या दिवसांचा देठाशी असलेला बंध तोडून
आवेगान रस्त्याशी लोळण घ्यायला तयार :)
जस काही
Fall is falling in love with the ground

महिन्यापूर्वी हिरवीगार दिसणारी झाडं
त्यांच्या तर नुसत्या रिकाम्या फांद्याच राहिल्या आता

आणि त्या खालची जमीन ……
तो तर बिछाना झालाय
बर्फाची पांढरी शुभ्र मऊशार रजई अंगावर ओढून घ्यायला तयार :)

आश्चर्य फक्त याचंच वाटतंय ……
पानगळ ही इतकी देखणी आणि सुरेख असू शकते ?

इथं प्रत्येक पिकल्या पानच आज फुल झालंय :)

असेल तुझा तो हिरा



बालरूप तुझ्या खोड्या 
बोले शेजारीण मला 
" धाकात ठेव ग जरा,
असेल तुझा तो हिरा "

इवालाल्या हातांनी 
किती कुरवाळशील आई ?
मायेची कोवळी गंगा 
दोन्ही डोळ्यातून वाही 
ओठाच्या पाकळ्यांना 
निजू दे अजून थोडे 
किलबिल बोबड्या शब्दांची 
कसे पळती सुसाट हे घोडे
पेल्यातल्या दुधालाही की रे 
फुटला आता घाम 
पावलांची दुडूदुड बोले 
कान्हा थोडा वेळ थांब

पायात थुई थुई नाचून 
पैंजणाचा नाद थकला 
तुझ्याशी खेळ खेळून 
सुर्यदादा ही क्षितिजाशी झुकला

पेंग अंगाईला आली 
तरी उघडे तुझे टपोरे मोती 
काळोखाच्या कुशीतून चांदण्या 
बघ कृष्णाचा पाळणा गाती 

फुगलेल्या भाकारीमागे 
गेला कुठे तुझा चंदा मामा ?
सगळी तुझी रासलीला 
यशोदेच्या पदराखाली जमा 


  

असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा




ms paint मध्ये अस ठेवलंय काय ?
काळ्या पाटीची सर दुसऱ्या कशालाच  नाय   
की - बोर्ड म्हणजे अहो नुसता बटनांचा मारा 
त्याहून माझा अ - आ - इ - ई चा तक्ताच बरा 
इंग्लिश म्युझिक हवंय कशाला ? 
बस …. आईने पुन्हा एकदा शिवाजीचा पाळणा गावा 
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा

३ बी एच के flat  मध्ये असं किती लोळायचंय ? 
खरतर मला दिवाळी किल्ल्याचा मातीत खेळायचय
स्काय डायव्हिंग मध्ये कसल आलय राव थ्रील
घसरगुंडीवरून खाली यायलाच लागत जास्त स्किल
अदिदास चे महागडे शूज नकोय रे मला 
छोटासा लाईट चा बुटच हवा  
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा

euro च्या rate शी माझं न देण न घेण 
दिवसभराच्या खाऊसाठी पुरत मला १ रुपयाच नाण 
रेनकोट आणि स्वेटर चा थर कशाला ?
सूर … सू …. र आवाजाचा गारेगार शेकतो की घशाला
इंडिया - जर्मनी - इटली च्या कुणी सांगितल्यात वाऱ्या ?
बरा वाटतो चोर पोलिस खेळणारा गल्लीतला पोरांचा थवा  
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा 
  
विटी दांडू खेळताना होती फोडली आजी ची काच 
भाड्याची सायकल दिवसभर पळवली हातावर टेकवून रुपये ५ ( दर वाढलेत आता …. )
स्विमिंग पूलच्या पाण्याला रंकाळ्याची ऊब कुठली ?
फुटबॉल पेक्षा मज्जा  येते उडवायला डबा एक्स्प्रेस ची बाटली :P 
व्हिडीओ गेम पेक्षा गिफ्ट आणा मला सापशिडीचा बोर्ड नवा 
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा

View Facebook Comments