NRI ............... येणार आहे


" NRI……  अनिवासी भारतीय " हा शिक्का एकदा का तुमच्या कपाळी पडला की लोकांच्या तुमच्याकडे बघण्याच्या नजरा बदलतात . त्याला कारण म्हणजे  तुमच्यामध्ये झालेले बदल ,जे मायभूमीवर पाऊल टाकल्या टाकल्या सगळ्यांच्या नजरेत भरतात .

दिवस फार लवकर बदलतात . पूर्वी मैत्रिणीला सांगायला कौतुक वाटायचं " सुट्टीला मामाच्या, मावशीच्या, आत्याच्या घरी राहून आले " . आणि आता …. "सुट्टीला इंडियामध्ये जाऊन आलो " या वाक्यात कौतुकापेक्षा प्रदर्शनचं खचखचुन भरलंय हे लक्षात यायला वेळ लागत नाही .  त्यातही भारताचा ' इंडिया ' असा उल्लेख करणं हा पहिला लक्षणीय बदल :)

असो … ज्या तळ्यातील पाणी आपण पितो त्यात जास्त  दगडफेक करणं बर न्हवे . उठलेले तरंग आपल्यापर्यंतही येउन पोहोचतील याचं भान ठेवत अनिवासी भारतीय याबद्दलची चर्चा इथेच थांबवू . बाकी आपण सूज्ञ आहात . :)

आज हे सगळ सुचण्याच कारण म्हणजे आईच्या घरून परत येवून आठवडाच झाला ( आईच घर म्हणजे इंडियातून  :P ) पण जेवणाची चव अजून नाही गेली जिभेवरची . तश्या आठवणी बऱ्याच आहेत सांगण्यासारख्या आणि सांभाळून ठेवण्यासारख्या पण मला पहिलं आठवेल ते भरलेलं वांग . विमानतळावरून घरी पोहोचायला रात्रीचे ३ वाजले मला त्या दिवशी . आणि इतक्या रात्रीही मी काकुच्या हातचं भरलेलं वांग , मसाले  भात , पुरी वर ताव मारत होते . शेवटी जवळ जवळ एका वर्षांनी घराच्या जेवणाची डिश समोर आली होती माझ्या .

घरी आले खरी पण आमचे बाळराजे कुठे झोपायला तयार ? त्याच्या डोक्यात अजून जर्मनीच घड्याळ टिकटिकत होत ना … त्याबरोबर पहिल्या दिवशी सहन न होणारी उष्णता . AC मधून भट्टीत येउन पाडल्यासारखं  झालं होत . पिल्ला तर कपडे काढून फरशीवर लोळायला सुरु झालाही . तोवर त्याच्या तळपायाला कुठूनतरी धुळीचा कण येउन चिकटला . "मम्मा शी ……. " साहेब सुरात ओरडले . त्या दिवसापासून पायात चढवलेले बूट त्याने अंघोळी व्यतिरिक्त कधीही काढले नाहीत :)

ह्याच्या रात्रीच्या पराक्रमांची यादी करते न करते तोच सकाळी सकाळी हा मला झाडू घेऊन धावत जाताना दिसला . बाहेर जाऊन पाहीलं  तर सनई चौघडे वाले :) गेलेल्या दुसर्याच दिवशी भावाचं लग्न होत माझ्या . आणि माझ्या लेकराला इतक्या शांततेतून गेल्यावर तो गोंगाट सहन होईना . सनईवाल्याच्या मागे झाडूच घेऊन लागला पठ्ठ्या . आता त्याला ओरडावं म्हटलं त्यात त्याची काहीही चूक न्हवती . मलाही आवाजातला फरक लक्षणीय जाणवत होता . लग्नादिवाशी कार्यालयभर हा सगळे कपडे काढूनचं  फिरत होता . आणि त्याच्यामागे मी नऊवारी नेसून……  त्याच धोतर हातात घेऊन मागे मागे धावत  :)

हे सगळे झाले सुरुवातीचे किस्से पण नंतर एकदम मस्त रमला तो…… घरातल्या सगळ्या बाटल्या, रिकामे डब्बे गोळा करून हा " डब्बा डब्बा " म्हणत डब्बा एक्स्प्रेस खेळायला शिकला . शेजारच्या मुलांचा आवाज आला रे आला की लपंडावसाठी धावायचा. रात्री आजीच्या हाताचं चविष्ट जेवण झाल की हा झालाच सुरू  " आजोबा …चला शेकोटी " आणि आजोबाना रोज शेकोटी करायला लावायचा . (जर्मनीत परत आल्यावरही त्याचा हा शेकोटी प्रकार सुरु आहेच . फक्त आग लावत नाही . बाबांचे खराब पेपर बॉल करून रचून ठेवतो :) आणि आई बाबानाही शेकायला बसवतो )

माझं माहेर म्हणजे एकत्र कुटुंब . मुलांना भरपूर मामा मिळाले की ती फार आगाऊ होतात याचा मला प्रत्यय आला . या मामा लोकांनी माझ्या लेकराला पार काहीच्या काही शिकवून सोडला . दुधाचा पेला घेऊन आई येताना दिसली की हा एकदम एका पायावर उडी घेत , टाळ्या वाजवत  "कब्बडी कब्बडी " सुरु व्ह्यायचा . मग याला पकडून पकडून मला एक एक घोट पाजवावा लागायचा . आजोबांनी आणलेल्या सायकलची तर त्याने " धूम धूम " करत अगदीच वाईट अवस्था करून ठेवली होती . आता घरचे हौशी म्हटल्यावर रोज हरभऱ्यासाठी आणि वाटाण्यासाठी  भाजीवाल्याकडे याच रतीभ सुरु झालं होत  .

कौतुक करून घ्यायची एकही संधी सोडली नाही बहादराने. मामाचं लग्न , काकाचा साखरपुडा सगळीकडे याचेच फोटो जास्त .

इथे असताना Autumn त्याने मस्त एन्जोय केला होता . त्याचाच परिणाम की  काय , समोरच्या आजीने साठवून ठेवलेला पाचोळा आणि राख याने एके दिवशी डोक्यावर उधळून घेतली . बम्बातील राख कलर समजून मिशा काढून आला . (समोरच्या आजीच या गुलामाने 'बोक्याची आजी ' असं नामकरणही  केलं आहे ) 

खरेदीसाठी बाहेर पडायचं म्हटलं की नको वाटायचं याला . कारण काय तर बस शी असते , रिक्षामध्ये मान डुगडूगु हलते ( खड्ड्यांचा परिणाम हो )…. म्हणे " बाबा मला एरोप्लेन पाठवा " कशाला तर महाद्वाररोड वर जायला  :) आता झाली न पंचाईत . ड्रेस खरेदीला गेले तर दुकानातून पळून आला . "मला नको द्रेस. आहेत भरपूर माझ्याकडे " म्हणत .  घरी आल्यावर थोड लाडीगोडीने विचारलं तर म्हणतोय कसा "कसलं होत ते शॉप . खेळायला काहीच न्हवत मला . मग कपडे कसले असणार तिथे ?" (जर्मनीमध्ये असलेल्या children's play zone ची सवय झालीये त्याला )

असे बरेच किस्से माझ्या बालकृष्णाचे . जावयाच्या कौतुकाच्या आठवणी , कोल्हापुरी तांबडा पांढरा आणि बरचं  काही  

सगळंच छान छान आणि गोड वाटतंय पण टेन्शन एकाच गोष्टीचं आहे . परत भारतात आल्यावर या माझ्या पिल्लाला सेट व्ह्यायला किती दिवस जातात कोणास माहीत ????

View Facebook Comments 



4 comments:

  1. Kiti gondas ahe g tuza balkrushna

    ReplyDelete
  2. सुंदर . तुम्हा दोघाना इंडिया नवा नव्हता पण आर्यकरीता पुर्ण नवा अनुभव होता. तो ईथे रमला याचे कारण आजी आजोबांचे प्रेम होय.

    ReplyDelete
    Replies
    1. That is absolutely true. Its all because of their love :)

      Delete

Thank you for your comment :)