Showing posts with label रंगलेल्या गोष्टी. Show all posts
Showing posts with label रंगलेल्या गोष्टी. Show all posts

रश्मी - सूर्याचं पहिलं किरण

नेहमीच्या कामाची लगबग सुरू असताना अचानक मोबाईल मध्ये तिचा मेसेज आला. " भारताचे पंतप्रधान येत आहेत जर्मनी मध्ये. तिथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. येशील का डान्स मध्ये ? मी घेईन तुझी तयारी करून. " 

दूरदर्शन वाहिनीचे प्रसारण अचानक बंद झाल्यावर टीव्ही वर काळया पांढऱ्या मुंग्या याव्या तशी माझी अवस्था. माझ्या डोकातल्या सगळ्या भावनांनी आपापली वारूळ सोडून दिशाहीन धावायला सुरुवात केली. माझ उत्तर त्या वारुळात हरवून गेले. तिच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हेच सुचेना मला. 

तुम्हाला आठवत का ? दूरदर्शन वर काळया पांढऱ्या मुंग्या येऊन गेल्यावर काय यायचं ? ते नाही का ... सात रंगी उभे पट्टे आणि सोबत तो कुईईई.... असा आवाज. 

माझ्याही डोक्यातल्या मुंग्या शांत झाल्यावर असाच एक होकराचा पुसट सप्तरंगी पट्टा डोळ्यासमोर उभा राहीला आणि सोबत , मनाच्या तळापासून फुटलेला एक आवाज. " हो म्हण . तिच्या मेसेज ला उत्तर दे. हो म्हणून सांग. जमेल तुला. रोज जे coding करतेस त्याहून नक्कीच सोप्प आहे. याहून सुंदर संधी पुन्हा मिळणार नाही. स्वतःहून चालत आलेली संधी सोडू नको. " आणि मी रश्मी ला डान्स साठी हो असं उत्तर दिलं.

खरी गंमत तर या पुढे ... आता एकदा होकार दिला तर पण नाहीच जमलं तर ? मुलांचं कसं adjust करणार ? हे आणि असे अनेक प्रश्न .  रश्मी म्हणे , तू ये तर खर आजच्या सरावासाठी . मग बघू आपण काय करायचं ते . झालं.... ठरल्या प्रमाणे मी सरावाच्या ठिकाणी पोहोचले. रश्मी दारातच उभी . माझ्या मनात अनेक विचार " हिला आत्ता ही नाही म्हणून दारातूनच जाव का परत ? तिच्या इतकं नाजूक, मोहक , भारी का काय म्हणतात ते - येईल का आपल्याला ? " 

पण तिने गेल्या गेल्या दारातच एक हलकी मिठी मारली मला आणि तिच्या या मिठीने माझं उत्तरच बदललं. मला त्याचं क्षणी जाणवलं, या मुलींमध्ये खूप convincing power आहे. एक शब्द ही न बोलता हिने माझ्यासारख्या निर्णयावर नेहमी ठाम राहणाऱ्या मुलीच मत बदललं. तिच्या त्या गोड अन् लाघवी हसण्यात माझे सगळे प्रश्न विरून गेले. 

या पुढचे ८ दिवस तिने माझ्या कडून खूप छान सराव करवून घेतला. अगदी बारीक सारीक हालचाली, प्रत्येक स्टेप्स साठीचे चेहऱ्यावरचे हावभाव, मान किती अंशात वाकली पाहिजे, हात कोणत्या बाजूने वळून कसा पुढे आला पाहिजे , कुठल्या पायावर जोर दिला तर पुढची move सोप्पी जाईल हे आणि असे बरेच बारकवे. अगदी डान्स साठी लागणारी साडी ही तिने आणून दिली मला.आता बोला..... 

Indian consulate कडून अचानक आलेल्या माहितीवरून आम्हाला कळाल की या डान्स साठी ३ दिवस Munich शहरात राहावं लागणार आहे. आता झाली ना पंचाईत. घरी असलेल्या २ छोटया पिल्लांच काय करायचं ? ही जबाबदारी अहो नी घेतली आणि माझं कोड सोडवाल. 

पण मी माझ्या कुटुंबाला सोडून अशी एकटी कधीच नाही राहिले बाहेर. मग काय ... अगदी प्रामाणिकपणे जाऊन सांगितलं रश्मी ला ... "जाव लागेल आपल्याला पण मी एकटी राहिली नाहीये कधी. "

तिने क्षणाचाही विलंब न करता मला उत्तर दिलं " तू काळजी नको करू. मी आहे. तुला कुठेही एकटं नाही सोडणार " .  Munich welcomes Modi event पूर्ण होऊन मी घरी परत येई तोवर तिने आपला शब्द पाळला. आपल्या डान्स ग्रुप ची प्रत्येक मुलगी ही आपली जबाबदारी आहे - हे कदाचित तिने स्वतःसाठी घालून घेतलेला नियमच जणू. 

३ दिवस मी माझ्या १२ जणींच्या डान्स ग्रुप सोबत Munich la राहिले. यातल्या प्रत्येकीने मला खूप सांभाळून घेतल. या सहवासात तिच्या स्वभावाच्या बऱ्याचश्या छटा जवळून पाहायला, अनुभवायला मिळाल्या

- सगळ्यांची जातीने काळजी घेणारी, विचारपूस करणारी रश्मी 🤗

- डान्स ची प्रत्येक स्टेप परफेक्ट व्हावी म्हणून धडपडणारी जिद्दी रश्मी 💯 

- डान्स practice हून परत आल्यावर सर्वांचा क्षीण घालवायला दिलखुलास गप्पा मारणारी अल्लड अवखळ लाटे सारखी रश्मी 

- स्वतःचा पायाला दुखापत असतानाही होणारी वेदना कोणालाही न सांगणारी सहनशील रश्मी 

- जे पोटात तेच ओठात असणारी पारदर्शी रश्मी 

+ ५०००-६००० प्रेक्षकांनी आमच्या डान्स ला दिलेला प्रतिसाद बघून भरून पावलेली भावुक रश्मी

हे आणि असे बरेच पैलू जवळून पाहिले 

तिची माणसांना जोडायची कला मला कमालीची भावून गेली.  Munich मध्ये practice साठी गेलो असताना तिच्या ओळखीचे बरेच लोकं तिला तिथे भेटले. पण प्रत्येकाला ती तितक्याच प्रेमाने आणि उत्साहाने भेटायची. स्वतः इतकी छान नृत्यांगना असल्याचा ना कुठे गर्व , ना त्याचा अहंकार .  || विद्या विनयेन शोभते || हे अगदी तिच्याच साठी तयार केलेलं वाक्य असावं असं वाटतं. ☺️

फक्त आणि फक्त तिच्याच मुळे मला इतक्या मोठ्या रंगमंचावर कला सादर करण्याची आणि माझ्या आवडत्या नेत्याला इतक्या जवळून पाहण्याची संधी मिळाली.  काही गोष्टींची कधी कधी आपण स्वप्न ही नसतात पाहिलेली पण घडून जातात. त्यातील एक म्हणजे मोदी यांची भेट 

त्याचा ही एक किस्सा आहे आम्हा दोघींचा. Munich welcomes Modi च्या आयोजकांनी अचानक सांगितलं की जे लोक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत त्यांना माननीय पंतप्रधान मोदी यांना पाहता येईल याची आम्ही काही ठाम शाश्वती देणार नाही. 

झालं .... माझा तर मुडच गेला .  काहीही करून मला मोदींना जवळून पहायचं होत. तशी मी हट्टी नाही पण मोदी यांचं live भाषण माझ्यासाठी once in a lifetime experience असणार होता जो मला कोणत्याची परिस्थितीमध्ये सोडायचा न्हावता. 

Practice च्या दिवशी मी कमीत कमी १० वेळा हेच वाक्य बोलले असेन * काहीही झालं तरी मला मोदींना पहायचं आहे " आणि हे रश्मी ने ही ऐकलं होत.  आजवर मला माहीत असणाऱ्या पैकी बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट हे तीनच हट्ट लोक पुरवतात. 

पण रश्मी हे एक अस दिलखुलास व्यक्तिमत्व जिने मैत्रहट्ट ही पूर्ण केला. फक्त आणि फक्त मला मोदींना पाहता यावं, माझा हट्ट पूर्ण व्हावा म्हणून ... इतकी थकलेली असतानाही स्वतःची झोप बाजूला सारून , अगदी स्वतःच्या नावाप्रमाणे रश्मी - सूर्याचे पहिले किरण ...पहाटे ४ ल उठून मला घेऊन गेली. तिला शक्य ते सर्व प्रयत्न करून तिने माझा हट्ट पूर्ण केला . माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्या इतकी ती ही खुश होती 🤗☺️ आयुष्यात अशीही एक मैत्रीण असावी , जी तुमचे हट्ट आनंदाने पूर्ण करेल. मला माझी मैत्रीण सापडली ☺️😊 माझ्यासोबत ती माझ्या दोन्ही मुलांची आता आवडीची मावशी ही झाली 🥰

दुसऱ्याच्या आनंदासाठी धडपड करणारी , दुसऱ्याच्या इच्छा पूर्ण करणारी आपले आई बाबा आणि नवरोबा सोडून किती लोकं प्रयत्न करतात ? खूप दुर्मिळ ...  याच दुर्मिळ लोकांच्या यादीतील हे नाव...  

रश्मी गावंडे.

सांस्कृतिक कार्यक्रम तर उत्तम होणार होताच . रश्मी आणि पूर्वा यांच्या कष्टाचं फळ खूप गोड असणार याची पहिल्या दिवस पासूनच सर्वांना कल्पना होती. 

तुम्हाला पहायचं आहे का आमचा dance performance ? खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आवडला तर कळायला विसरू नका 

We performed at a renowned stage to welcome our beloved Prime Minister Shri Narendra Modi Ji

 Watch our video

👇👇

https://youtu.be/HcniTnqI-SM

रश्मी नावाच्या माझ्या या मैत्रिणीसाठी पोत भरून टाळ्या, ट्रक भरून प्रेम , हांडे भरून कौतुक आणि मनापासून आभार. 

अशीच उंच भरारी घेत रहा.... तुझ आकाश तुला खुणावत आहे ☺️☺️👏👏👏👏👏👏👏

~ अमृता पेडणेकर 







आईची भाकरी

इतके वर्ष झाले तरी काही काहीच बदललं नाहीये . लग्न झालं घर बदललं , माणसं  , जागा , नाती , जबाबदाऱ्या , काम , अडचणी , भावना , कुटुंब सगळं बदलू शकत आयुष्यात ...

बस्स ..... मानेखाली हात धरून २ महिन्याच्या बाळाला  मान ताठ करायला शिकवणारी आई आणि ताठ झालेली मान आयुष्यभर कुणासमोरही वाकू द्यायची नाही ही शिकवण देणारे बाबा ..... कधीही बदलत नाहीत .

घरातले सगळे आपापल्या कामात मग्न असतात आणि अशावेळी एकदमच स्वयंपाक खोलीतून धाप धाप असा आवाज यायला सुरु होतो  .. त्यासोबत बांगड्याचा किणकिणाट ...त्याच लयीत चालणार

 ज्यांनी भाकरीची चव चखलीये त्यांना उठून आत जाऊन पाहण्याची गरजच नाही . बांगड्याचा आणि हात आपटण्याच्या लयीवरूनच समजून जात  . त्याच्या लगेच लक्षात येत .

 आई भाकरी थापतेय 

तांदळाच्या , ज्वारीच्या , नाचणीच्या , बाजरीच्या कित्ती प्रकार त्यातले रे बाबा ...
ते पीठ चाळणीने चालून कोंडा बाजूला ठेवायचा .... हो ..टाकून नाही द्यायचा काही . शेजारच्या आजीच्या कोंबड्या आवडीने खातात भिजवलेला कोंडा . त्याच्यासाठीच हा खाऊ

मग त्या चालेल्या कोरड्या पिठाला पाणी लावून लावून उभं आडवं दाबून , हाताच्या पंजाने दाबून , बोटात धरून , परातीत आपटून , मर्दुन भाकरीसाठी पीठ मळायचं . मऊ लुसलुशीत , एकही भेग न पडलेलं , कुठेही चिकटपणा नसणार , जो देईल तो आकार अलगद घेणार भाकरीच पीठ मळता  आलं की अर्धा किल्ला सर केला असा समजायचं  

मग परातभर पसरलेलं ते कोरडं पीठ , त्यावर आईने अलगद हाताने फिरवलेला गोळा मध्यभागी जाऊन बसतो . आणि मग माझी आई त्या धाप धाप आवाजाच्या लयीत गोल गोळ्याची पातळसर परातभर मावेल अशी भाकरी थापते .
थापताना ना कुठे लय चुकते ना कुठे भाकरी


भाकरी थापायलाही खूप सवय असावी लागते बरं का . इतक्या सहज सहजी जमणार काम न्हवे ते .हात फक्त डावीकडून उजवीकडे फिरवायचा . फक्त हातांसोबत भाकरीही फिरली पाहिजे परातीत . :D

पिठात एकदा हात घालून बघाच हो नक्की मग लक्षात येईल ... आई नेमकं काय दिव्य करत असेल .

खरी कसोटी तर याच्या पुठे आहे राव
भाकरी थापली तर खरी  .... पण  थापलेली  भाकरी परातीतून उचलून तव्यात टाकायची कशी ?????
याच कौशल्य शिकवायला शेजारी आईचं उभी असली पाहिजे .

भाकरी करायला शिकताना किती भाकऱ्या मोडल्या , किती परातीतच राहिल्या , किती तव्याच्या काठाशी येऊन पडल्या आणि कित्ती करपल्या याच गणित कुठल्याही मुलीकडे नसतं . बस्स .... ज्या दिवशी ती न तुटता तव्यात जाईल तो दिवस सुवर्णदिवस :)
तव्यातल्या भाकरीकडे पाहून टाकलेला एक मोठा उसासा ... अख्ख्या जगाचं ओझं खाण्यावरून उतरल्याचा अनुभव आणि मागे उभ्या असलेल्या आईने दिलेली शाबासकी

हो आणि आता ती फुगलीही पाहिजे ... ट ट ट ....म  

हाताची बोट पालथी घालून तापलेल्या भाकरीवरून पाणी पसरता पसरता बोट कधी तापतात कळताच नाही .
आणि इतक्या सगळ्या पर्यंत जर कुठल्या नवशिक्याची भाकरी मोडली नसेल तर मग भाकरी करणारी तव्याच्या प्रेमातच पडते .
आणि त्या प्रेमाचे रंग मग तिच्या गालावर, केसावर , कपड्यावर उठलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सगळ्या गावभर दिसतात .

" पोरगी भाकरी शिकतेय हो आमची. एक दोन दिवसात जमतंय बघा . :) "
आई आपली उगाच दारात उभी राहून दवंडी पिटते सगळ्या गावभर . आधीच टेन्शन कमी त्यात आता शेजारच्या कोंबड्यावाल्या आजी चवीला मागणार एक भाकरी .

मग ती प्रेमाने इतका वेळ तव्यात बसलेली भाकरी अग्निपरीक्षेला उतरल्यासारखी तव्यातून काढायची आणि धगधगत्या ज्योतीवर पालथी करायची .
कुठलही उलथनं , पळी , चमचा न वापरता हाताच्या चिमटीत उचलून पुन्हा फिरवून ज्योतीवर टाकायची .

३ सेकंद आपल्या त्वचेला अग्नी जाणवत नाही हे आईने भाकरी भाजताना उभ्या उभ्या दिलेलं ज्ञान . मग अगदी मनातल्या मनात १.... २.... ३.... मोजत घाबरत घाबरत चिमटीने गरम भाकरी उचलायची . आणि जर  १.... २.... ३.... च गणित चुकलंच तर मग आता पर्यंतची पांढरी शुभ्र भाकरी एका कोपऱ्यात करपलीच म्हणून समजा .  मग काय फुगते ही बया ....

हात भाजू न देता तितक्याच चलाखीने ज्या दिवशी ज्योतीवरून फिरवता येईल त्या दिवशी काम फत्ते......

स्वयंपाकाचा सगळ्यात अवघड किल्ला सर ! हुर्रे ....

उगाच म्हटलंय होय .... आधी हाताला चटके मग मिळते भाकर

मला अजूनही आठवतात ... माझा भाकरीचा हा किल्ला सर होई तोवर रोज संध्याकाळच्या भाकऱ्या माझ्याकडे असायच्या . चौकोनी , त्रिकोणी , तुटक्या , फाटक्या , अर्धवट कच्च्या , करपलेल्या , कडकडीत .... अरे रे .... कसल्या कसल्या नाही केल्या म्हणून सांगू .
पण यातली एकही भाकरी टाकून दिली नाही आईने . तेव्हा प्रत्येकवेळी मला याच नवल वाटायचं आणि अजूनही वाटत . आई आणि बाबा कुठलीही तक्रार न करता खूप आवडीने खायचे माझ्या चुकलेल्या भाकऱ्या .

कधी चिडचिड नाही , कधी रागावणं नाही , वैतागण नाही . उलट रोज प्रोत्साहन मिळायचं
"आग बघ ... कालपेक्षा छान झालीये . जमायला लागली की ग तुला . येईल आठवड्या भारत आई सारखी ट ट ट ..म ... फुगलेली "

मला काय वाटतं .....  भारतातील राहू द्या पण कमीत कमी महाराष्ट्रातील तरी प्रत्येक गृहिणीला भाकरी थापता आलीच पाहिजे .
या मटण , चिकन आणि माश्याच्या कालवनांसोबत भाकरी खाण्यात जी मजा आहे ती चपातीमध्ये नाही हो
काहीही म्हणा ..

आणि पटलं तर शिकून घ्या भाकऱ्या  :)  मदतीला मी आहेच  :p

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे बाबानी काल मला तांदळाच्या उकडीच्या भाकऱ्या कशा करायच्या हे सांगितलं . माझ्यासाठी नवीन होतं पण माझ्या लेकाला भाकरी आवडते आणि यावेळीही आई बाबानी "जमेल ग तुला . कर  तरी एकदा " म्हटलं म्हणून ही करून पहिली . भारी जमली राव !!

तुम्हाला जर माझी भाकरी माझ्या स्वयंपाकघरात फोटोसहित पाहायची असेल तर इथे क्लिक करा .

थँक क्यू आई बाबा :)

म्हणूनच तर मी सुरवातीलाच म्हटलं

इतके वर्ष झाले तरी काही काहीच बदललं नाहीये . लग्न झालं घर बदललं , माणसं  , जागा , नाती , जबाबदाऱ्या , काम , अडचणी , भावना , कुटुंब सगळं बदलू शकत आयुष्यात ...

बस्स ..... मानेखाली हात धरून २ महिन्याच्या बाळाला  मान ताठ करायला शिकवणारी आई आणि ताठ झालेली मान आयुष्यभर कुणासमोरही वाकू द्यायची नाही ही शिकवण देणारे बाबा ..... कधीही बदलत नाहीत .



माणसांना जीव लावला … इतकाच दोष !!!


वीणा आली होती आज घरी . बऱ्याच दिवसांनी दर्शन झाल आज तिच . आपल्याच मुला बाळांत गुंतलेली असते हल्ली . आज आली तेव्हा थोडी सुकल्यासारखी वाटली . बाकी इतर वेळी वीणा म्हणजे अखंड बडबड हे गणितच मांडल गेलय पण तिला अशी सुकलेली पाहून मनात कुठेतरी खोलवर कळ उठली . एखादी गोष्ट फार मनाला लागल्याशिवाय इतकी शांत नाही होत ती . आणि एकदा का शांत झाली की तिला बोलती करायची म्हणजे एक दिव्यच पार पाडाव लागत .

हातातील सगळी कामं बाजूला टाकून मी तिच्या समोर येउन बसले . नजरेला नजर देण टाळतच होती जणू . खिडकीच्या गाजबाहेरचा वाहणारा वारा शून्य नजरेतून न्याहाळत होती . मीचं विचाराल तिला "चहा घेतेस का आल्याचा  ? बंर वाटत नाहीये का ग तुला ? " . 
तशी शून्यातील नजर एकदम भानावर आल्यासारखी हळुवार हसत मला म्हटली "मंदाताई , जोवर वारा आपल्या घरात वाहत असतो तोवर तो आपला . अन खिडकीचे गज ओलांडून बाहेर गेला की तो बाहेरच्या सोसाट्यात विरघळतो . आपलं शिंपल्यातील सजवलेलं अस्तित्व सोडून फुलाचा सुगंध पसरवायला का म्हणून बाहेर पडत असेल ? अन बाहेरच्या जगालाही अशी कितीशी गरज असते ग त्याची ?  "  

  मला तिचा रोख नक्की कोणावर आहे हे अजून लक्षात येत न्हवत . अगदी तिच्या प्रश्नाला तिच्याच वाक्यात उत्तर द्यावं म्हणून मी ही बोलले "अग , वाराच तो . घरी काय आणि बाहेर काय …. वाहत राहण आणि सुगंध पसरवण इतकच त्याच काम . या चार भिंतीत कोंडलेल शिंपल्याच अस्तित्व काय कामाचं ग ? वाहू दे कि त्याला त्याच्या मर्जीने . बाहेरच्या जगाचच म्हणत असशील तर , तसाही एका झुळुकीने कुणाचंच काही अडणार नसत . पण एखाद्या कोपऱ्यातील एखादी पोकळी असते जी ज्याची त्यानेच भरावी म्हणतात ."  तिच्या लुकलुकणाऱ्या नजरेतून जाणवत होत की तिच्या खऱ्या प्रश्नाला जरी अजून मी स्पर्श केला नसला तरीही तिला हवी त्या कोड्याची उकल मला पहिल्या गाठीत सुटलीये .  

त्यावर तिचा पुढचा प्रश्न " हो…. हे झालं वाऱ्याच आणि झुळूकीच गणित . जे तू सोडवलस. पण मंदाताई , लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीच ही असच असत ना  ग ? आई बाबांच्या प्रेमाच , शिंपल्याच अस्तित्व सोडून , संसार करायच्या ओढीन माहेरचा उंबरा ओलांडून आपण मुली सासरी जातो . आणि तिथे तिची कोणाला गरजच नसेल तर ? "  इतकच बोलून ती थांबली . पुढंच वाक्य बोलण्याआधी घशात आलेला हुंदका आवरण गरजेच होत . अन हा सारा मुक्याने कोसळणारा पाऊस माझ्यापासून लपवण्याचा एक निष्फळ प्रयत्न चालला होता बिचारीचा . 

तिच्या मनाला पडलेलं कोड या प्रश्नातच आलं लक्षात माझ्या . मी ही समजुतीच्या स्वरात सांगितलं "कशाला मनाला लावून घेतेस वीणा . ज्याला तुझी खरंच गरज आहे तो आहेच कि तुझ्या सोबत . तुझ्या साठी नेहमीच थांबलेला . कशाला हवय तुला अजून कुणी ? आणि अपेक्षाच नाही ठेवल्या की अपेक्षाभंगाच दुःख्ख  ही वाट्याला नाही येत ."

"मंदाताई , पण गुंतलेल्या मनाच काय ? इतक्या सहजासहजी सुटतात हे पीळ ? " ……… काय उत्तरं देणार होते मी तिच्या या प्रश्नाचं ? फाटलेल्या आभाळाला कुठे कुठे म्हणून ठिगळ लावायची ? कधी न कधी उघड पडणारच हृदय   

वीणाला मी गेली ८ वर्ष ओळखते . अगदी तिच्या कॉलेजपासून. दुसऱ्याला कधीही स्वतः होऊन त्रास न देणार व्यक्तिमत्व . आजच्या तिच्या बोलण्यावरून तिच्या लग्नानंतरची  ही ५ वर्ष झरझर डोळ्याखालून सरकली . माणसांना जीव लावला इतकाच काय तो तिचा दोष . 

लग्न होऊन सासरी गेली पण घरी आपलं म्हणणार कुणीच नाही . अगदी उंबऱ्यावरचं माप ओलांडतानाच डोळ्यात टचकन पाणी यावं इतकं जाणवलं तिला . बोलक्या स्वभावामुळे आणि भरल्या घराच्या ओढीमुळे सासरच्या गर्दीचा एक भाग व्हायचा तिचा नेहमीचा प्रयत्न . हो …… गर्दीच म्हणावी लागेल . प्रेमाने बांधलेलं असत ते कुटुंब आणि नुसतेच एका छताखाली कुठल्याही जिव्हाळ्या शिवाय जमा होते ती गर्दी . 

नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने वीणा सासरच्या मूळ घरापासून लांब राहते . तसं पाहील तर ८ दिवसांपेक्षा जास्त ती कधीच सलग नाही राहिली तिथे . पण आईच घर सोडून आल्यावर हेच आपलं सर्वस्व मानणाऱ्या वीणाला नवीन घरात एकरूप होण्यापासून कुटुंबात नसणारा जिव्हाळा आड येत राहिला .  आपुलकीने कधीच कुणी विचारपूस नाही करत तिची . तीच करत राहते जमेल तसे फोन घरी , तिची गरज म्हणून . भरल्या घरात वाढलेली मुलगी . आपल कुटुंब भरायला पाहते नेहमी आणि हाती पडते ती निराशाच . तिच्या आपलेपणाची परतफेड म्हणून ही जाऊ दे पण दुधावरच्या सायीलाही प्रेम उत्पन्न होऊ नये कोणाला ? याचंच आश्चर्य वाटत राहत नेहमी तिला . 

हृद्य पिळवटून टाकणार दुःख होवो नाहीतर गगनचुंबी आनंद , हे सगळ वाटून घेणार मोहन हा एकमेव व्यक्ती आहे तिच्यासाठी . मोहन …… तिच्यावर तिच्यापेक्षाही जास्त प्रेम करणारा तिचा नवरा . त्याच्याकडे पाहून ती हे सगळे वार हसत पेलत राहते . "बसं ……. प्रेमाचा हात त्याने माथ्यावर ठेवलाय म्हणून मी कुणा दुसऱ्याच्या प्रेमळ नजरेचीही अपेक्षा नाही केली कधी " वीणा नेहमी म्हणते . नजर लागण्याजोगा जोडा . 

हे त्या दोघांमधील प्रेम मला ओळखीच म्हणूनच मी विचारलं तिला  " वीणा …… मनाची इतकीच घालमेल होतेय तर बोल एकदा मोहनशी . बंर वाटेल तुला जरा . तुला समजावण्याची ताकद फक्त त्याच्याच प्रेमात आहे बघ "

"बोलले ग मंदाताई . तो तरी किती समजावेल मला ? आज इतकच म्हणाला ."
 "वीणा , कुणाकडूनही अपेक्षा करणे नाही. तुला जे काही हवं असेल ते माझ्या जवळ माग . आणि तू तरी  अशी किती दिवस राहिली आहेस त्या घरी "

आता मलाही कळेना तिला वाईट काशाच वाटतंय ? प्रेम उधळणारा नवरा आहे की जोडीला . 

यावर तिने जे काही स्पष्टीकरण मला दिलं त्यातून मुलीला सासर कित्ती महत्वाच वाटत हे अजून एकदा कळल मला आज'. तीच म्हणन हेच

" मंदाताई , आपण लग्न कशासाठी करतो ? नवरा मिळावा म्हणून कि सासर मिळाव म्हणून ? मला नवरा तर मिळालाय …. पण सासर नाही . मी तरी अजून किती दिवस असं एकतर्फी प्रेम करत राहणार ? कुणाचही मन असो . प्रेमाच्या परतफेडीची अपेक्षा प्रत्येकाला असते. आणि मोहनच्या त्या एका वाक्याने मन चिरत गेलं ग माझं . 'तू तरी अशी किती दिवस राहिली आहेस त्या घरी ' . 

मंदाताई , मोहनसाठीच त्याच्या बरोबर त्याच्या सोबतच सावली सारखी फिरायेत ना ग मी ? आणि प्रत्येक वेळी प्रेम हे सहवासानेच उत्पन्न होण गरजेच नाही . मी नात्याने कुणीच नाही का माझ्या घरच्यांच्या ? शेवटी कसय …… मी मुलगी पडले ग . पुरुषांना असे प्रश्न फार सहज सोडवता येतात . भावनांचा गुंता त्याच्या जागी निसर्गानेच कमी जन्माला घातलेला असतो . मुलीने एकदा एखाद घर , एखाद माणूस आपलं म्हटलं की त्याची पाळमूळ फार घट्ट गेलेली असतात . प्रेमाचा हा गुंता इतक्या सहज सुटणारा नसतो . 

माणसांना जीव लावला इतकाच काय तो माझा दोष " 

मनातलं बोलून ती शांत झाली . डोळ्यातला पाऊस एव्हाना गालांच्या कोमलतेवर कोसळून रिकामा झाला होता . गजाआडच्या वाऱ्याच शिंपल्याच सजवलेलं अस्तित्व खरच खूप देखण आणि सुरक्षित असत . खिडकी बाहेरची वावटळ त्याला कधी पाचोळ्यासमान उडवून लावेल कुणी सांगू शकत नाही . फुलाच्या  सुगंधावर प्रेम करण हाच त्याचा गुन्हा !!!!!  




रघु - भाग ३

रघु - भाग १

रघु - भाग २




नवीन घराच्या वास्तुशांतीचा मुहूर्त होता त्या दिवशी . सगळ अगदी साधेपणाने चालू असलं तरी लगबग ही होतीच . गंगा आजी एका कोपऱ्यात बसून इलाश्याच्या बायकोला सगळ्या रिती सांगत होती . घर उभं करण्या आधी इलाश्याने एक गायही घेतली होती . याच कारण एकचं, रघुला घरचं ताजं ताजं दुध मिळावं . नवीन घराच्या परसदारी त्या गायीचा गोठा . 

सगळी पूजा - अर्चा  आटोपल्यावर गंगा आजीने इलाश्याच्या बायकोला गायीचा नैवेद्य भरायला सांगितला . केळीच्या पानावर एका बाजूला तूप भाताची मुदी , वरून जाडसर वरण , सुगरणीच्या हाताच्या कापसाहून मऊ लुसलुशीत पुरण पोळ्या , बेदाणे घालून केलेली शेवयाची खीर , तोंडी लावायला आंब्याच लोणचं , आमसुलाची चटणी , पापड , नेहमीप्रमाणे नैवेद्यात ठरलेली बटाट्याची भाजी , जोडीला मटकीची उसळही , काकडीची कोशिंबीर …… अगदी व्यवस्थित नैवेद्य भरला होता तिने . कुणालाही जेवायला बसायची इच्छा व्हावी असा जेवणाचा बेत. 

एका हातात नैवेद्याचं पान अन दुसऱ्या हातात पळीपंचपात्र , डोक्यावरचा पदर सावरत ती गायीचा नैवेद्य घेऊन जायला निघाली. पायऱ्या उतरून खाली आली तोच तिच्या लक्षात आलं की तिने चुलीवर दुध गरम करत ठेवाल होत . आल्या वेगानेच ती परत चुलीजवळ धावली पण ती जायीतोवर निम्म्याहून जास्त दुध उतू गेल होत . गंगा आजी समोरच बसली होती पण तिने भांड उचलून बाजूला केलं नाही . का ? हे रघूच्या आईलाही कळेना . 

शेवटी तिच्या चेहऱ्यावरच्या   प्रश्नाचं उत्तर देत गंगा आजी म्हणाली "पोरी नवीन घर बांधल आहेस . नवा संसार आहे . ज्या चुलीने इतका गोड घास दिला पहिले तिला तृप्त करावं . कधी काही कमी पडत नाही . आणि तसही शुभ कामावेळी दुध उतू जाण चांगल असत असं म्हणतात . काहीतरी चांगली बातमी घेऊन नशीब तुझी वाट बघत बसलंय " . रघुची आई नुसतीच हसली . तिला हे सगळ मनापासून पटलं होत आणि मनातल्या मनात देवाचे आभार मनात होती . 

घरात जेष्ठ व्यक्ती असण याच कारणासाठी महत्वाच असत . या अशा गोष्टी फक्त त्यांनाच माहित असतात . आपण जितका आपल्या भल्याचा विचार करतो त्याहूनही जास्त ही मोठी लोकं आपल्यासाठी प्रार्थना करत असतात . असं म्हणतात की आई बाबाची पुण्याई मुलांच्या कमी येते हे कदाचित खरंच असेल आणि ते ही यामुळेच . 

उतू गेलेल्या दुधाकडे समाधानाने पाहत नैवेद्याचं ताट हातात घेऊन ती गायीच्या गोठ्याकडे निघाली . गाय , गोठा , ताजं दुध या सगळ्या गोष्टींची किमया फक्त त्यालाच कळते ज्याने ती अनुभवली आहे . सकाळी सकाळी ऐकू येणारा गायीचा हंबरडा , तिच्या शेणाने रोज सरावल जाणार अंगण , त्यावर उठून दिसणारी ती सुरेख , देखणी , पांढरी शुभ्र रांगोळी . गायीला चारा घालताना तिच्या डोळ्यात दिसणारा आपलेपणा , प्रेम . रोज दुध काढताना तिच्याशी चाललेल्या गप्पा , अंघोळ घालताना पाठीवरून हात फिरवल्यावर एक वेगळ्याच प्रकारे हलणारी तिची त्वचा ……सगळ अगदी जवळून पाहील्याशिवाय न उमगणारी गोडी . तिला थोड्या दिवसांनी जनावर म्हणायलाही जीभ धजत नाही इतकी मिसळून जाते ती आपल्या कुटुंबात . कुटुंबाचा एक सदस्य बनून जाते 

याचं गायीला  रघुची आई रोज चार घालायची . ती खाई तोवर मायेने पाठीवरून हात फिरवत रहायची .देत होती  रघूची आई चारा घेऊन येताना दिसली की ही गाय हंबरायला सुरु करायची . पण आज चित्र वेगळच होत . रघुची आई येताना दिसली तरी तिने तिच्याकडे पाहून अगदीच दुर्लक्ष केल्यासारखी मान वळवली . कारण काय समजावं म्हणून नैवेद्याचं ताट हातातच घेऊन रघुची आई गोठ्यात पाहण्यासाठी खाली वाकली आणि तिने जे काही पाहिलं त्यानंतर तिला काहीच सुचेना . 

महिन्या  - दीड महिन्याच एक गोंडस कन्यारत्न गायीच्या शेपटाशी खेळत गोठ्यातल्या भाऱ्यावर निवांत पडून होत . अन ती गाय तिला उन्हापासून आडोसा  
देत होती. कुणाचं होत ते बाळ , कुणी आणून ठेवलं काहीच समजल नाही .   

पण त्या दिवसापासून रघुला एक बहिण मिळाली - भद्रा … गोठ्यात सापडली म्हणून तिचं हेच नाव ठेवल गेल . बेटी  म्हणजे धनाची पेटी याचाही प्रत्यय आला इलाश्याला . घर , शेत  सगळ दुध दुभात्यान , धान्याच्या राशीने भरून गेल   

दोन्ही मुलं नावारूपाला आली . आता दोघे मिळून एक संस्था चालवतात . ज्या वयस्कर लोकांकडे त्यांच्या मुलांनी तोंड फिरवलं अश्या लोकांना आसरा म्हणून आणि ज्या लहानग्यांना आई वडील म्हणजे काय हे कळायच्या आधीच दुरावतात त्यांना कुटुंब म्हणून . 

माळावरच्या झोपडीच एका मोठ्या इमारतीत रुपांतर झालाय . आणि त्या झोपडीत जन्माला आलेला त्या इमारतीत जवळ जवळ पन्नास लोकांच कुटुंब चालवतो . गळ्यात एक डोरलं, पाठीचा ताठ कणा  आणि मनगटात बळ इतकचं सोबतीला घेऊन सुरु केलेल्या संसाराला समाधानाची फळ लगडलेली असतात . आता इलाश्या , त्याची बायको आणि गंगा आजी तिघे मिळून मुलांच्या प्रगतीची प्रार्थना करतात . 

।। इति श्री रघु कथा संपूर्णम ।।

:) 

तुम्हा सर्वाना आवडली असेल ही अपेक्षा …  





रघु - भाग २

रघु - भाग १


संध्याकाळची दिवेलागणीची वेळ  , पाऊस तर नुसता धो धो कोसळत होता . कोपऱ्यावर एक वयस्कर बाई कंदील घेऊन उभी .  पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडली आणि पावसात अडकली .  दूरवर एका झोपडीत तिला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला . पण कुणीही दिसेना .

झोपडीच्या एका फटीतून थोडासा प्रकाश दिसला . वात विझण्याच्या वाटेवर होती . हातातला कंदील वर करून तिले पाहायचा प्रयत्नही केला पण तेवढ्यात ती वाऱ्याशी भांडत इतका वेळ तग धरून बसलेली वातही विझली . काळाकुट अंधार , माळाच्या दुसऱ्या टोकाला एखाद्या कुत्र्याचा आवाज . बसं … बाकी कुणीच नाही .

म्हातारीला काय करावं सुचेना . पुढे जाऊन पहावं तर भितीने हात कापायला सुरु झाला . अन काही ऐकलंच नाही असं समजून पुढे रस्ता धरावा तर लेकराचा आवाज मागे तिला ओढत होता . बराच वेळ ती नुसतीच बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकत उभी राहिली . माळावरच्या भुताखेताच्या बऱ्याच गोष्टी आजवर ऐकल्या होत्या त्या वय झालेल्या कानांनी .  कुणी सांगावं खऱ्या असतीलही …… की खरंच कुणा तान्ह्या जीवाचा हंबरडा असेल हा .

शेवटी न राहवून तिने झोपडीच्या दिशेने पहिलं पाऊल धाडसाने उचललं . इवल्याश्या कंदिलाच्या प्रकाशात तिला पायाखालचा रस्ताही धड दिसत न्हवता . हळू हळू थोडा अंदाज घेत ती झोपडीच्या दाराजवळ येउन थांबली आणि बाहेरूनच आवाज दिला "कुणी आहे का आंत ??? का रडतंय बाळ इतकं ? " . पलीकडून कुणीही उत्तर देईना .

कंदील कानाजवळ येईल इतका वर करून तिने झोपडीचा मोडकळीस आलेला दरवाजा उघडला आणि सोमर हे पाहून ती दारातच थांबली . नुकतंच जन्माला आलेलं एक लेकरू अन त्याची माय एकमेकांना बिलगून बसले होते . त्या मुलाचा बाप म्हणवणारा गडी , लेकराला आणि बायकोला आडोसा देऊन उभा होता . कोसळणाऱ्या पावसापासून बचावं करत . तिघेही थंडीने कपात होते . त्या मुलाच्या अंगावर तर एक फाटकी चिंधी कापडही न्हवत . चार ठिकाणी ठिगळ लावलेल्या साडीच्या पदराने त्या माउलीचा त्याला कसबस लपेटून घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न सुरु होता .

म्हातारी हे पाहून हबकलीच . आजच्या जमान्यात कुणा तान्ह्याचा जन्म असाही होऊ शकतो ? जन्माला आल्या आल्या जगण्यासाठी लागणाऱ्या उबीसाठीही  संघर्ष करावा लागावा . कसलं नशीब घेऊन जन्माला घातलंय वरच्याने याला . पण पुढच्याच क्षणी ती त्याच्या जवळ गेली . अंगात घातलेलं स्वेटर काढून तिने त्या मुलाच्या अंगावर लपेटलं . हातातली काठी समोर उभ्या असलेल्या , म्हातारीकडे आश्चर्याच्या नजरेने पाहणाऱ्या बापाकडे दिला . वेदनेत कन्हनाऱ्या  त्या आईला आपल्या थरथरनाऱ्या हाताने आधार देत उभी केली . बाळाला कुशीत घेतलं आणि एवढंच बोलली "चला . माझ एवढ मोठ घर रिकाम पडलेलं असताना या मुलाला मी पावसात नाही सोडणार "

मुलाचा बाप तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला . ते पाहून ती म्हणाली "बाबा रे …… एका मुलाचा बाप आहेस आता तू . हात जोडून काय उभा आहेस . छाती आनंदाने भरून आली पाहिजे ." हा हात जोडून उभ राहिलेला ईश्वर म्हणजे  इलश्या. आई वडिलानंतर आयुष्यात पहिल्यांदा कुणासमोर तरी हात जोडून , मन खाली घालून उभा होता .   

म्हातारीने ईश्वरच्या लेकाला आपल्या घरी नेलं . कडकडीत पाण्याने अंघोळ घातली . आपलं वापरून मऊ झालेलं लुगड चारपदरी अंथरून त्यात त्याला गुंडाळून त्याच्या आईच्या कुशीत झोपवल . स्वतःचा पलंग त्या दिवसापासून तिने ईश्वरच्या बायकोला देऊन टाकला . " बाळ झाल्यानंतरच्या विश्रांती साठीचा पलंग आईने द्यायचा असतो . म्हणून हा माझ्याकडून तुला ग पोरी " म्हणत तिने न कळत एक नवीन नातंही जोडून टाकलं . 

 पेठ्यारात कुठेतरी जपून ठेवलेला एक सोन्याचा जुना तुकडा काढला . चमचाभर मधात बुडवून तिने त्या सोन्याच्या तुकड्याने बाळाच्या जिभेवर ॐ काढला .  म्हणे असं केल्याने बाळाच्या वाणीवर आयुष्यभर सरस्वती वास करते . :)  बाळाच्या तोंडात पाण्याचा पहिला घोट या म्हातारीने घातला म्हणून तिचं  नाव गंगा आजी

त्या दिवसानंतर जवळ जवळ २ वर्ष ईश्वरच कुटुंब गंगा आजीच्या घरीच राहत होत . ईश्वर आणि त्याची बायको दोघेही दिवसभर पाटलांच्या घरी कामासाठी जायचे . तेव्हा या गंगा आजीनेच सांभाळ केला त्याच्या मुलाचा . " रघु " हे नावही तिनेच ठेवलंय .   रघु - म्हणजे भगवान श्रीरामाचे कुटुंब . रघुच्या जन्मावेळी त्याचे माय बाप झोपडीत राहायचे म्हणून गंगा आजीने त्या श्रीरामाच्या कुटुंबातील गोंडस पिल्लाला रघु हे नाव दिलं .  

पुढे पाटलांच्या मदतीने इलश्याच गावात एक छोटस घरही झालं . रघु तेव्हा जेमतेम ३ वर्षांचा होता . गंगा आजीच्या हाते त्या घराच्या पायाभरणीची पूजा झाली म्हणून इतकी भरभराट झाली असं इलश्या  आणि त्याची बायको अजून सगळ्या गावाला सांगतात .   

क्रमशः ………  





रघु - भाग १

Anuvin-Siddheshwar03


पायातील पायतानाचा कर्र…. कर्र आवाज करत रघु घराबाहेरच्या कट्ट्यावर येउन बसला . तोंडाला लावलेला पाण्याचा तांब्या त्याने तो संपल्यावरच खाली ठेवला . एवढा मोठा कांदा एका बुक्कीत फोडून चुलीवरच्या गरम भाकरी सोबत खायलाही सुरु केला . 


हो...... पण रोजच्या प्रमाणे न चुकता पहिला घास गंगा आजीला . :)

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कधी खोट बोलत नाहीत . गंगा आजीचा तो सुरकुतलेला चेहरा सांगायचा त्या एका घासातल समाधान . 
इतका मोठा झाला तरी रघुच्या गालावरून हात फिरवत गंगा आजीने आजही कडकड बोट मोडली . अंधुक झालेल्या नजरेतूनही तिला रघुच्या कपाळावरची आठी दिसायची . त्याला असं बोट मोडून प्रेम करणं आवडायचं नाही .

म्हणायचा ……

"आज्जे कशाला माझ्या नावाने रोज बोट मोडतीस . त्या बदल्यात अजून एखादी भाकरी थाप माझ्यासाठी  . का थापू मीचं ? तुझ्या हातात आता कितीसा जीव उरलाय ?"
तो तिचा सगळा स्वयंपाक स्वतःच करून द्यायचा. हे असं रोजचं चालायचं . तिचं जेवण करून द्यायला तो दुपारी ११ च्या ठोक्याला तिच्या दारात हजर असायचा . अगदी न चुकता.

गंगा आजीची इतक्या मायेने विचारपूस करणारा गावातला हा एकटाच असावा . कारणही   होतचं म्हणा त्याला ……. 
अगदी २ दिवसांचा असल्यापासून गंगा आजीने त्याला जीव लावला . तेलाने चोळून अंघोळ , काजळाचा टिळा , रोज सायंकाळी त्या किलकिल्या डोळ्यांची , पिटुकल्या गोजिऱ्या रुपड्याची दृष्ट . .त्याला घातलेला पहिला वहीला धूप . उभ्या आयुष्यात त्याला मिळालेला एकुलता एक दागिना , गंगा आजीने दिलेला चांदीचा करदोडा

 शेजारी राहत असली तरी सख्ख्याहून जास्त माया लावली तिने . आई शेतावर गेली की त्याला स्वतःच्या घरी घेऊन येउन दिवसभर मायेने  रघुची काळजी घेणारी ही एकटीच . रघुला ना मामा होता न मावशी न कुणी जवळचा काका .  आजी आजोबांचा तर चेहराही न्हवत पाहीला त्याने कधी . तसे ते नुसते नावाचेच आजी आजोबा होते असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही .

इलश्या , रघुचा बाबा . खरतर त्याच नाव ईश्वर होत पण पाळण्यात नाव ठेवल्यानंतर त्याला या नावाने कुणीच हाक नाही मारली . " इलश्या " सोपं वाटायचं म्हणायला,  मग तेच नाव पडलं त्याचं .

या ईश्वरालाही टाकीचे घाव सोसावेच लागले देवपण यायला .

लेकाची, रघुच्या बाबाची,  थोडी पडती बाजू आल्यावर पोटाशी कवटाळणाऱ्या आई बापाने रघुच्या बाबांना घराचा अन गावाचा रस्ता कायमचा बंद करून टाकला .

गळ्यात एक डोरलं, पाठीचा ताठ कणा  आणि मनगटात बळ इतकचं सोबतीला घेऊन त्याच्या बायकोने  सासरचा उंबरा पुन्हा ओलांडला …… परत कधीही न ओलांडण्याच्या निश्चयाने  . पुढे पाऊल टाकताना तिने अन ईश्वरने एकदाही मागे वळून पाहिलं नाही . पुढचा रस्ता अवघड होता . मागचा कधीच तुटला होता.

रघुची आईचं म्हणून नवऱ्यापाठी इतक्या खंबीरपणे उभी राहिली . बायको इतर वेळी बायको असली तरी नवरा कोलमडून पडल्यावर ती आईच्या मायेने जवळ घेते याचा अनुभव इलश्याला या काळात बऱ्याच वेळा येउन गेला . 

एक लेकरू पोटात असताना उघड्या माळावर झोपडी बांधताना नारळाच्या झावळ्या ओढून आणणारी बायको पाहीली की  इलश्याच्या पोटात गोळा यायचा . आतड तुटायचं तिची अवस्था पाहून पण त्याच्यापुढे पर्याय न्हवता .तीन दगडांची चूल मांडून सुरु केलेला नवा संसार कुठवर काठाला जाईल याची काळजी कधीच नाही केली त्या माउलीने.उन्हाळ्यात निरभ्र आकाशात रात्रभर चांदण्यात काहीतरी शोधत जागी असायची . पावसाळ्यात पावसाच्या धारा पाहत आणि थंडीच्या दिवसात इलाश्याच्या कुशीत ऊब शोधत बिलगून रहायची   

पण म्हणतात तसंच झालं . . . वाईट दिवस जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगात निघूनही जातात . प्रश्न उरतो तो फक्त आपण कितपत तग धरू शकतो हाचं. 

माळावरच्या झोपडीतही समाधानाने राहणाऱ्या  इलश्याला गावच्या पाटलांच्या शेतावर काम मिळालं . आणि त्याच्या बायकोला पाटलांच्या घरचं . अंगात रग होती ती सगळी इलश्याने कामात ओतून दिली . पाटलांच्या माळ्याला फुलवायचं काम मनावर घेतलं होत त्याने . धुणी भांडी करायची सवय असल्याने त्याच्या बायकोलाही काहीच अवघड गेलं नाही  .डोक्यावर दिवसभर छत मिळालं हेच फार होत या दिवसात तिच्यासाठी .जोडीला काम संपवून घरी येताना पाटलीणबाई काही ना काही खायचं बांधून द्यायच्या . दिवसाही काहीबाही सुरूच असायचं त्याचं आणि सगळे पदार्थ चवीला हिला आणून द्यायच्या  . तिच्या पोटातल्या बाळाचा भुकेचा टाहोचं जणू ऐकू यायचा पाटलीनीला.

ईश्वर बाभळे . या आडनावाप्रमाणेच इलश्याच्या आयुष्याची कहाणी . जी बाळाच्या जन्मानंतर पार पालटली .
असं म्हणतात की काही मुलं आई बाबाचं नशीब तळहातात घेऊन जन्माला येतात .

पाहता पाहता नऊ महिने संपले

माळावरच्या झोपडीत जन्माला आला एक चिरंजीव .

कुमार . रघु ईश्वर बाभळे .

क्रमशः.......

View Facebook Comments