रघु - भाग १

Anuvin-Siddheshwar03


पायातील पायतानाचा कर्र…. कर्र आवाज करत रघु घराबाहेरच्या कट्ट्यावर येउन बसला . तोंडाला लावलेला पाण्याचा तांब्या त्याने तो संपल्यावरच खाली ठेवला . एवढा मोठा कांदा एका बुक्कीत फोडून चुलीवरच्या गरम भाकरी सोबत खायलाही सुरु केला . 


हो...... पण रोजच्या प्रमाणे न चुकता पहिला घास गंगा आजीला . :)

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कधी खोट बोलत नाहीत . गंगा आजीचा तो सुरकुतलेला चेहरा सांगायचा त्या एका घासातल समाधान . 
इतका मोठा झाला तरी रघुच्या गालावरून हात फिरवत गंगा आजीने आजही कडकड बोट मोडली . अंधुक झालेल्या नजरेतूनही तिला रघुच्या कपाळावरची आठी दिसायची . त्याला असं बोट मोडून प्रेम करणं आवडायचं नाही .

म्हणायचा ……

"आज्जे कशाला माझ्या नावाने रोज बोट मोडतीस . त्या बदल्यात अजून एखादी भाकरी थाप माझ्यासाठी  . का थापू मीचं ? तुझ्या हातात आता कितीसा जीव उरलाय ?"
तो तिचा सगळा स्वयंपाक स्वतःच करून द्यायचा. हे असं रोजचं चालायचं . तिचं जेवण करून द्यायला तो दुपारी ११ च्या ठोक्याला तिच्या दारात हजर असायचा . अगदी न चुकता.

गंगा आजीची इतक्या मायेने विचारपूस करणारा गावातला हा एकटाच असावा . कारणही   होतचं म्हणा त्याला ……. 
अगदी २ दिवसांचा असल्यापासून गंगा आजीने त्याला जीव लावला . तेलाने चोळून अंघोळ , काजळाचा टिळा , रोज सायंकाळी त्या किलकिल्या डोळ्यांची , पिटुकल्या गोजिऱ्या रुपड्याची दृष्ट . .त्याला घातलेला पहिला वहीला धूप . उभ्या आयुष्यात त्याला मिळालेला एकुलता एक दागिना , गंगा आजीने दिलेला चांदीचा करदोडा

 शेजारी राहत असली तरी सख्ख्याहून जास्त माया लावली तिने . आई शेतावर गेली की त्याला स्वतःच्या घरी घेऊन येउन दिवसभर मायेने  रघुची काळजी घेणारी ही एकटीच . रघुला ना मामा होता न मावशी न कुणी जवळचा काका .  आजी आजोबांचा तर चेहराही न्हवत पाहीला त्याने कधी . तसे ते नुसते नावाचेच आजी आजोबा होते असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही .

इलश्या , रघुचा बाबा . खरतर त्याच नाव ईश्वर होत पण पाळण्यात नाव ठेवल्यानंतर त्याला या नावाने कुणीच हाक नाही मारली . " इलश्या " सोपं वाटायचं म्हणायला,  मग तेच नाव पडलं त्याचं .

या ईश्वरालाही टाकीचे घाव सोसावेच लागले देवपण यायला .

लेकाची, रघुच्या बाबाची,  थोडी पडती बाजू आल्यावर पोटाशी कवटाळणाऱ्या आई बापाने रघुच्या बाबांना घराचा अन गावाचा रस्ता कायमचा बंद करून टाकला .

गळ्यात एक डोरलं, पाठीचा ताठ कणा  आणि मनगटात बळ इतकचं सोबतीला घेऊन त्याच्या बायकोने  सासरचा उंबरा पुन्हा ओलांडला …… परत कधीही न ओलांडण्याच्या निश्चयाने  . पुढे पाऊल टाकताना तिने अन ईश्वरने एकदाही मागे वळून पाहिलं नाही . पुढचा रस्ता अवघड होता . मागचा कधीच तुटला होता.

रघुची आईचं म्हणून नवऱ्यापाठी इतक्या खंबीरपणे उभी राहिली . बायको इतर वेळी बायको असली तरी नवरा कोलमडून पडल्यावर ती आईच्या मायेने जवळ घेते याचा अनुभव इलश्याला या काळात बऱ्याच वेळा येउन गेला . 

एक लेकरू पोटात असताना उघड्या माळावर झोपडी बांधताना नारळाच्या झावळ्या ओढून आणणारी बायको पाहीली की  इलश्याच्या पोटात गोळा यायचा . आतड तुटायचं तिची अवस्था पाहून पण त्याच्यापुढे पर्याय न्हवता .तीन दगडांची चूल मांडून सुरु केलेला नवा संसार कुठवर काठाला जाईल याची काळजी कधीच नाही केली त्या माउलीने.उन्हाळ्यात निरभ्र आकाशात रात्रभर चांदण्यात काहीतरी शोधत जागी असायची . पावसाळ्यात पावसाच्या धारा पाहत आणि थंडीच्या दिवसात इलाश्याच्या कुशीत ऊब शोधत बिलगून रहायची   

पण म्हणतात तसंच झालं . . . वाईट दिवस जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगात निघूनही जातात . प्रश्न उरतो तो फक्त आपण कितपत तग धरू शकतो हाचं. 

माळावरच्या झोपडीतही समाधानाने राहणाऱ्या  इलश्याला गावच्या पाटलांच्या शेतावर काम मिळालं . आणि त्याच्या बायकोला पाटलांच्या घरचं . अंगात रग होती ती सगळी इलश्याने कामात ओतून दिली . पाटलांच्या माळ्याला फुलवायचं काम मनावर घेतलं होत त्याने . धुणी भांडी करायची सवय असल्याने त्याच्या बायकोलाही काहीच अवघड गेलं नाही  .डोक्यावर दिवसभर छत मिळालं हेच फार होत या दिवसात तिच्यासाठी .जोडीला काम संपवून घरी येताना पाटलीणबाई काही ना काही खायचं बांधून द्यायच्या . दिवसाही काहीबाही सुरूच असायचं त्याचं आणि सगळे पदार्थ चवीला हिला आणून द्यायच्या  . तिच्या पोटातल्या बाळाचा भुकेचा टाहोचं जणू ऐकू यायचा पाटलीनीला.

ईश्वर बाभळे . या आडनावाप्रमाणेच इलश्याच्या आयुष्याची कहाणी . जी बाळाच्या जन्मानंतर पार पालटली .
असं म्हणतात की काही मुलं आई बाबाचं नशीब तळहातात घेऊन जन्माला येतात .

पाहता पाहता नऊ महिने संपले

माळावरच्या झोपडीत जन्माला आला एक चिरंजीव .

कुमार . रघु ईश्वर बाभळे .

क्रमशः.......

View Facebook Comments



Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)