Showing posts with label Something special. Show all posts
Showing posts with label Something special. Show all posts

रश्मी - सूर्याचं पहिलं किरण

नेहमीच्या कामाची लगबग सुरू असताना अचानक मोबाईल मध्ये तिचा मेसेज आला. " भारताचे पंतप्रधान येत आहेत जर्मनी मध्ये. तिथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. येशील का डान्स मध्ये ? मी घेईन तुझी तयारी करून. " 

दूरदर्शन वाहिनीचे प्रसारण अचानक बंद झाल्यावर टीव्ही वर काळया पांढऱ्या मुंग्या याव्या तशी माझी अवस्था. माझ्या डोकातल्या सगळ्या भावनांनी आपापली वारूळ सोडून दिशाहीन धावायला सुरुवात केली. माझ उत्तर त्या वारुळात हरवून गेले. तिच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हेच सुचेना मला. 

तुम्हाला आठवत का ? दूरदर्शन वर काळया पांढऱ्या मुंग्या येऊन गेल्यावर काय यायचं ? ते नाही का ... सात रंगी उभे पट्टे आणि सोबत तो कुईईई.... असा आवाज. 

माझ्याही डोक्यातल्या मुंग्या शांत झाल्यावर असाच एक होकराचा पुसट सप्तरंगी पट्टा डोळ्यासमोर उभा राहीला आणि सोबत , मनाच्या तळापासून फुटलेला एक आवाज. " हो म्हण . तिच्या मेसेज ला उत्तर दे. हो म्हणून सांग. जमेल तुला. रोज जे coding करतेस त्याहून नक्कीच सोप्प आहे. याहून सुंदर संधी पुन्हा मिळणार नाही. स्वतःहून चालत आलेली संधी सोडू नको. " आणि मी रश्मी ला डान्स साठी हो असं उत्तर दिलं.

खरी गंमत तर या पुढे ... आता एकदा होकार दिला तर पण नाहीच जमलं तर ? मुलांचं कसं adjust करणार ? हे आणि असे अनेक प्रश्न .  रश्मी म्हणे , तू ये तर खर आजच्या सरावासाठी . मग बघू आपण काय करायचं ते . झालं.... ठरल्या प्रमाणे मी सरावाच्या ठिकाणी पोहोचले. रश्मी दारातच उभी . माझ्या मनात अनेक विचार " हिला आत्ता ही नाही म्हणून दारातूनच जाव का परत ? तिच्या इतकं नाजूक, मोहक , भारी का काय म्हणतात ते - येईल का आपल्याला ? " 

पण तिने गेल्या गेल्या दारातच एक हलकी मिठी मारली मला आणि तिच्या या मिठीने माझं उत्तरच बदललं. मला त्याचं क्षणी जाणवलं, या मुलींमध्ये खूप convincing power आहे. एक शब्द ही न बोलता हिने माझ्यासारख्या निर्णयावर नेहमी ठाम राहणाऱ्या मुलीच मत बदललं. तिच्या त्या गोड अन् लाघवी हसण्यात माझे सगळे प्रश्न विरून गेले. 

या पुढचे ८ दिवस तिने माझ्या कडून खूप छान सराव करवून घेतला. अगदी बारीक सारीक हालचाली, प्रत्येक स्टेप्स साठीचे चेहऱ्यावरचे हावभाव, मान किती अंशात वाकली पाहिजे, हात कोणत्या बाजूने वळून कसा पुढे आला पाहिजे , कुठल्या पायावर जोर दिला तर पुढची move सोप्पी जाईल हे आणि असे बरेच बारकवे. अगदी डान्स साठी लागणारी साडी ही तिने आणून दिली मला.आता बोला..... 

Indian consulate कडून अचानक आलेल्या माहितीवरून आम्हाला कळाल की या डान्स साठी ३ दिवस Munich शहरात राहावं लागणार आहे. आता झाली ना पंचाईत. घरी असलेल्या २ छोटया पिल्लांच काय करायचं ? ही जबाबदारी अहो नी घेतली आणि माझं कोड सोडवाल. 

पण मी माझ्या कुटुंबाला सोडून अशी एकटी कधीच नाही राहिले बाहेर. मग काय ... अगदी प्रामाणिकपणे जाऊन सांगितलं रश्मी ला ... "जाव लागेल आपल्याला पण मी एकटी राहिली नाहीये कधी. "

तिने क्षणाचाही विलंब न करता मला उत्तर दिलं " तू काळजी नको करू. मी आहे. तुला कुठेही एकटं नाही सोडणार " .  Munich welcomes Modi event पूर्ण होऊन मी घरी परत येई तोवर तिने आपला शब्द पाळला. आपल्या डान्स ग्रुप ची प्रत्येक मुलगी ही आपली जबाबदारी आहे - हे कदाचित तिने स्वतःसाठी घालून घेतलेला नियमच जणू. 

३ दिवस मी माझ्या १२ जणींच्या डान्स ग्रुप सोबत Munich la राहिले. यातल्या प्रत्येकीने मला खूप सांभाळून घेतल. या सहवासात तिच्या स्वभावाच्या बऱ्याचश्या छटा जवळून पाहायला, अनुभवायला मिळाल्या

- सगळ्यांची जातीने काळजी घेणारी, विचारपूस करणारी रश्मी 🤗

- डान्स ची प्रत्येक स्टेप परफेक्ट व्हावी म्हणून धडपडणारी जिद्दी रश्मी 💯 

- डान्स practice हून परत आल्यावर सर्वांचा क्षीण घालवायला दिलखुलास गप्पा मारणारी अल्लड अवखळ लाटे सारखी रश्मी 

- स्वतःचा पायाला दुखापत असतानाही होणारी वेदना कोणालाही न सांगणारी सहनशील रश्मी 

- जे पोटात तेच ओठात असणारी पारदर्शी रश्मी 

+ ५०००-६००० प्रेक्षकांनी आमच्या डान्स ला दिलेला प्रतिसाद बघून भरून पावलेली भावुक रश्मी

हे आणि असे बरेच पैलू जवळून पाहिले 

तिची माणसांना जोडायची कला मला कमालीची भावून गेली.  Munich मध्ये practice साठी गेलो असताना तिच्या ओळखीचे बरेच लोकं तिला तिथे भेटले. पण प्रत्येकाला ती तितक्याच प्रेमाने आणि उत्साहाने भेटायची. स्वतः इतकी छान नृत्यांगना असल्याचा ना कुठे गर्व , ना त्याचा अहंकार .  || विद्या विनयेन शोभते || हे अगदी तिच्याच साठी तयार केलेलं वाक्य असावं असं वाटतं. ☺️

फक्त आणि फक्त तिच्याच मुळे मला इतक्या मोठ्या रंगमंचावर कला सादर करण्याची आणि माझ्या आवडत्या नेत्याला इतक्या जवळून पाहण्याची संधी मिळाली.  काही गोष्टींची कधी कधी आपण स्वप्न ही नसतात पाहिलेली पण घडून जातात. त्यातील एक म्हणजे मोदी यांची भेट 

त्याचा ही एक किस्सा आहे आम्हा दोघींचा. Munich welcomes Modi च्या आयोजकांनी अचानक सांगितलं की जे लोक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत त्यांना माननीय पंतप्रधान मोदी यांना पाहता येईल याची आम्ही काही ठाम शाश्वती देणार नाही. 

झालं .... माझा तर मुडच गेला .  काहीही करून मला मोदींना जवळून पहायचं होत. तशी मी हट्टी नाही पण मोदी यांचं live भाषण माझ्यासाठी once in a lifetime experience असणार होता जो मला कोणत्याची परिस्थितीमध्ये सोडायचा न्हावता. 

Practice च्या दिवशी मी कमीत कमी १० वेळा हेच वाक्य बोलले असेन * काहीही झालं तरी मला मोदींना पहायचं आहे " आणि हे रश्मी ने ही ऐकलं होत.  आजवर मला माहीत असणाऱ्या पैकी बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट हे तीनच हट्ट लोक पुरवतात. 

पण रश्मी हे एक अस दिलखुलास व्यक्तिमत्व जिने मैत्रहट्ट ही पूर्ण केला. फक्त आणि फक्त मला मोदींना पाहता यावं, माझा हट्ट पूर्ण व्हावा म्हणून ... इतकी थकलेली असतानाही स्वतःची झोप बाजूला सारून , अगदी स्वतःच्या नावाप्रमाणे रश्मी - सूर्याचे पहिले किरण ...पहाटे ४ ल उठून मला घेऊन गेली. तिला शक्य ते सर्व प्रयत्न करून तिने माझा हट्ट पूर्ण केला . माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्या इतकी ती ही खुश होती 🤗☺️ आयुष्यात अशीही एक मैत्रीण असावी , जी तुमचे हट्ट आनंदाने पूर्ण करेल. मला माझी मैत्रीण सापडली ☺️😊 माझ्यासोबत ती माझ्या दोन्ही मुलांची आता आवडीची मावशी ही झाली 🥰

दुसऱ्याच्या आनंदासाठी धडपड करणारी , दुसऱ्याच्या इच्छा पूर्ण करणारी आपले आई बाबा आणि नवरोबा सोडून किती लोकं प्रयत्न करतात ? खूप दुर्मिळ ...  याच दुर्मिळ लोकांच्या यादीतील हे नाव...  

रश्मी गावंडे.

सांस्कृतिक कार्यक्रम तर उत्तम होणार होताच . रश्मी आणि पूर्वा यांच्या कष्टाचं फळ खूप गोड असणार याची पहिल्या दिवस पासूनच सर्वांना कल्पना होती. 

तुम्हाला पहायचं आहे का आमचा dance performance ? खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आवडला तर कळायला विसरू नका 

We performed at a renowned stage to welcome our beloved Prime Minister Shri Narendra Modi Ji

 Watch our video

👇👇

https://youtu.be/HcniTnqI-SM

रश्मी नावाच्या माझ्या या मैत्रिणीसाठी पोत भरून टाळ्या, ट्रक भरून प्रेम , हांडे भरून कौतुक आणि मनापासून आभार. 

अशीच उंच भरारी घेत रहा.... तुझ आकाश तुला खुणावत आहे ☺️☺️👏👏👏👏👏👏👏

~ अमृता पेडणेकर 







आई , व्हॉट्सॲप आणि मधुरा

कसलं भारी वाटतंय आज 😊
विचारा का ? विचारा ना .......
जाऊ दे ... मीच सांगते . मला आज इतकं छान वाटण्याचं कारण आई , व्हॉट्सॲप आणि आमचं लाडकं कन्यारत्न मधुरा. 

कुठेतरी यापूर्वी वाचलं होतं .. घरी ३ भाकरी शिल्लक असतील आणि जेवणारी तोंड ४ असतील तर " आज मला भूकच नाहीये " असं म्हणणारी पहिली व्यक्ती आई असते . आता जस जशी टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली तशी त्यासोबत आईची ही निरपेक्ष भावना आणि त्याग वृत्ती हीच ही एक नवीन व्हर्जन आलाच की हो ... पण किती लोकांना ह्याची जाणीव आहे आज ? 

भाकरी साठी भूक नाही म्हणणारी आई आता सहसा सापडत नसली तरी आज ची आई " मोबाईल हवा आहे का नवीन तुला ?" असं विचारल्यावर " मला नको .... " अशीच सुरुवात करते. 
 " मला काय करायचा आहे तो महागडा मोबाईल ? त्यात मी काही वापरणार ही नाही . धूळ खात पडेल तो बिचारा . माझ्या जुन्या मोबाईल च अजून बरंच आयुष्य शिल्लक आहे . तुमच्या सारखं मी काही ते WhatsApp  वापरायची नाही. "
प्रत्येक आई हेच म्हणते ..... माझी तरी असच म्हटली होती 😄


तरी तिच्या मनाविरुद्ध माझ्या भावाने ही मोबाईल खरेदी केली. आईच्या स्पेशल डे च गिफ्ट म्हणुन. तशी मनाविरुद्ध आणलेली गोष्ट ती कधीही वापरत नाही बरं का .... पण लेकाने हौसेने आणला म्हणून का असेना पण नव्या मोबाईल वर तिने धूळ साचू दिली नाही .😊
तिला जुनी गाणी आवडतात.... त्या निमित्ताने आम्ही यु ट्यूब install    केल.
लांब राहणाऱ्या नातावांशी बोलता येईल तुला video chat ने. या सबबीवर व्हॉट्सॲप ही आल एके दिवशी.

आणि इथून सुरू झाली " कसलं भारी वाटतंय आज " ची गोष्ट

टेक्नॉलॉजी नवी , त्यात तिला टच स्क्रीन ची सवय नाही. त्यामुळे व्हॉटसअप मेसेज लिहायला अजून शिकली न्हवती ती .

पण आज अगदी अनपेक्षित पणे तिचा रिप्लाय .... आणि तो ही शुद्ध मराठीमध्ये 😲
आज्जी चा मेसेज बघून तिचा ७ वर्षाचा नातू आनंदाने हरकून टूम  😄

हे सगळं तुमच्याही घरी घडून गेलं असेल कधीतरी ..... पण मला व्यक्त व्हावस वाटलं म्हणून लिहितेय हे सगळं

जितका आनंद नातवाला तितकाच आज्जीला
आणि याच अजून एक कारण म्हणजे अस्खलित जर्मन बोलणारा माझा नातू , मराठी ही तितक्याच स्पष्टपणे वाचू शकतो याचा 😊

मला तर बोलायला ही शब्द सुचेना ... हे माझे म्हणजे असाचं होता...... भावना व्यक्त करायच्या म्हटलं की शद्ब पाचोळ्या सारखे सैरावैरा धावत सुटतात.



आई ला इतकंच म्हटलं

मला खरोखर मस्त वाटले , आता तू WhatsApp msgs करू शकतेस 😊👏👏👏👏👍

जेव्हा मी पाटीवर पहिल्यांदा लिहायला शिकले तेव्हा तुला काय मस्त वाटलं असेल .... हे आज कळलं 😊🙏
एकदम भारी  👏👏👏👏

मला आठवतंय ना अजून ... आई , तिच्या मांडीवर मी आणि माझ्या मांडीवर कोरी पाटी . एक एक अक्षर  हात धरून गिरवून घेतल माझ्या कडून तिने.  म्हणून आज इतकं छान लिखाण जमतं. देवी सरस्वती यापेक्षा वेगळी ती काय असेल .... माझी सरस्वती तिचं.... मला मांडीवर बसवून अक्षर लिहायला शिकवणारी 🙏😊

 मी पाहिलं अक्षर लिहायला शिकले तेव्हा कित्ती आनंद झाला होता तिला ..... अगदी तसंच छान वाटलं मला आईचा मेसेज वाचून ...

कोण म्हणतं दिवस परत फिरून येत नाहीत .... आले ना परत तेच दिवस .... हा ... त्याची दिशा या वेळी उलटी आहे ... पण आनंद तोच ... भावना अगदी सेम टू सेम

आई ..... खूप छान .... अशीच नवीन नवीन शिकत रहा ... मनाने चिरतरुण रहा . आजी म्हणून हाक मारणारी नातवंड जरी आली असली तरी, तुझा हात धरून टच स्क्रिन शिकवू आम्ही तुला .... टेन्शन नॉट 😄

आणि या भारी , मस्त , खूप छान वाटण्यात आणखी एक योगायोग म्हणजे आमचं कन्यारत्न , मधुरा .... हिने आज तिच्या हातानी तिचं स्वतःच नाव कोणालाही स्पेलिंग न विचारता लिहिलं 😎😊


अहो हसता काय .... आई आहे मी तिची .. त्यामुळे तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचाही कौतुक आहे मला ... उद्या लग्न करून सासरी निघून गेल्यावर मा ही असच व्हॉटसअप सारखं बोलावं लगेच तिच्याशी

आई चा मेसेज आणि मधुरा ने लिहिलेलं नाव बघून वाटलं ..... आज एक वर्तुळ पूर्ण झालं 😊👍 

आज्जी सरस्वती ची लेखणी नात- सरस्वती कडे पोहोचण्याच काम मी अगदी अचूक पार पाडलं 🙏


~ आईची अमु आणि मधुरची आई 🥰

 

गोंधळ.....मातृदिनाचा

मातृदिन आलो की हो या रविवारी ...

ओह ... सॉरी बरं  का ... मातृदिन म्हणजे Mother 's Day  हो ....
मातृदिन वगैरे असा अवघड भाषेत बोललं की १० पैकी ८ जणांच्या भुवयांच्या कमानी उंचावतात आणि त्या कमानीखालच्या डोळयांची होते एक प्रश्नार्थक हालचाल .

विषय पटकन लक्षात यावा म्हणून आपलं सगळ्यांना कळेल अशा आपल्या बोलीभाषेतच (आपली मातृभाषा कुठली याबद्दल अजून गोंधळात आहे बरं का मी ) सुरुवात केलेली बरी .

आता या रविवारी बघा कस्सलं प्रेम उफाळून येईल सगळ्यांचं आईवरचं . फेसबुक काय , व्हाट्सअप काय ... सगळीकडे अचानक एक दिवसांसाठी आईचे फोटो दिसायला लागतात .  माझं आईवरच हे प्रेम चुकून जरा २ दिवस आधी उफाळून आलं . त्याबद्दल ही कैफियत

दोनशे -  तीनशे मातृदिनाच्या लेखांच्या ढिगात माझा अजून एक .... बाकी नवल काहीच नाही .


तर सांगायचं मुद्दा असा ...

सुरुवातीलाच प्रामाणिकपणे मान्य करते की मातृदिन आहे याची मला पुसटशीही कल्पना न्हवती.  ७ तारखेच्या संध्याकाळी हे मला कळलं याला कारण म्हणजे लेकाच्या शाळेतून  आलेलं आमंत्रण . हो ..... भलंमोठं पत्र छापून आलं होत ना माझ्या नावे :) . "१3 तारखेला शाळेत मातृदिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत हजर रहावे.  "

हे वाचून लेकाने विचारलंच (शंका न विचारानं राशीन बसत नाही आमच्या ) ...  " Mother 's Day जसा असतो तसा आज्जी डे करूया का आपण ? "
हा नातू आजीप्रेमी असल्याचा अजून एक पुरावा ... घ्या
त्याची idea ऐकून भारी वाटलं . त्याचा आणि लाडक्या आज्जीचा एक जुना  फोटो मी माझ्या व्हाट्सअप अकाउंटच्या  स्टेटसला सेट केला.  (व्हाट्सअप अकाउंटच्या  स्टेटसला मराठीत काय म्हणतात ते काही मला माहित नाही त्यामळे चुकभुक माफी असावी )
गडी एकदम खुश . आजीच्या मांडीवर बसलेला फोटो बघून .

दुसऱ्या दिवशी  म्हणजे ८ तारखेला सकाळी सकाळीच मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला . "अगं बया , Mother 's  Day  आज नाहीये . तो १० तारखेला आहे . आज का लावलाय काकूंचा फोटो ?"

मी एकदम चूप ..... काही बोलायलाच सुचेना की हो . आता आईच्या प्रेमाला  मला या मुहूर्तासाठी २ दिवस थांबावं लागणार ? आणि खरंच मला आजचं सांगायचं असेल तिला "आई , तू कसली भारी आहेस ." तर मग ?  सगळे असाच समजतील का की हिच्या कॅलेंडरच्या तारखा विसकटल्या ?

तिचा हा फोन संपल्या संपल्या मी सगळ्यांचे स्टेटस धडाधडा वाचून काढले ... सगळीकडे आईच. मग लक्षात आलं , असा फोन करण्यामागे तिची काहीच चूक न्हवती . माझ्यासारखं अजून बऱ्याच लोकांचं आईप्रेम २ दिवस आधी उफाळून आलं . माझं कारण जरा वेगळं होत ही गोष्ट वेगळी , आमचं आज्जी प्रेम होत ओ ते...... आता अजून काय सांगणार .. जाऊ दे ...

मग काय .... Google आपला हक्काचा गुरु . त्याने सांगितलेलं ज्ञान . मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सर्वांनी आपल्या आईवर जीवापाड प्रेम करायचं . हा...... खरी गोम इथे आहे तर . २ वर्षांपूर्वी मी महिन्याचा दुसरा रविवार ८ तारखेला आला असणार ना . मग तीच तारीख नोंदवून घेतली मेंदूने आपल्या आणि म्हणून झालेला हा संगळ्यांचा मातृदिनाचा गोंधळ  :)

असो ... इतरांना काय वाटत यापेक्षा मला काय वाटतं हे ऐकून घ्या की एकदा ... आई म्हणजे तो काय सण आहे काय ज्या त्या तारखेला साजरा करायला ?

आई म्हणजे अख्ख आनंदपर्व आहे की आपल्या आयुष्यच . सगळं आनंद तिच्या आजूबाजूला घुटमळत असतो आपला . जरा २ मिनिट आई शेजारच्या काकूंकडे जाऊदे , का बरं लगेच शोधायला उठता तिला ? तुम्हाला खर तर काहीचं नको असतं त्यावेळी आईकडून . पण ती १ मिनिट डोळ्यासमोरून हलून चालत नाही . घर कसं खायला उठतं लगेच . एकटे वाटायला लागतो आपण .

म्हणूनच तर आनंदपर्व म्हटलं तिला . आपल्याला कित्ती भारी वाटतंय हे सुद्धा सांगायला आईच लागले  आणि तुम्हाला भारी वाटतंय हे बघून तिला त्याहून छान वाटतं . सगळ्या घरादारात मिसळूनहीगेली इतके वर्ष  स्वतःच वेगळं अस्तित्व टिकवून ठेवणारी आजवर पाहिलेली ही एकमेव व्यक्ती ...  आई.. मग ती माझी असो वा तुमची ...

सगळ्यांचीच आई कस्तुरीमृग असते .. ती जिकडे जिकडे जाते तिकडे तिकडे सुगंध दरवळत असतो . पण हा सुगंध कुठून आलाय हे कुणाच्या लक्षातही येत नाही . आणि आईला तर हे माहीतही नसत की अख्ख घर आपल्यामुळे दरवळतय. ती आपली अंगणातल्या जाईला , मोगऱ्याला , निशिगंधाला आणि रातराणीचा न चुकता पाणी घालते .

मी आपलं नेहमीप्रमाणे आजही आईला फोन केला . भरपूर वेळ आजही बोलले पण Happy Mother 's Day वगैरे असलं काही म्हटलं नाही बाबा . कसंय  ती मला माझ्या जन्माच्या आधीपासून ओळखते . कपाळावर पालथा हात लावून ताप चढलाय का मला हे बघायलाही कमी करायची नाही . वर  आणि माझंच हस व्हायचं .
   
अहो अहो ..... थांबा .... विषयांतर करतेय ... क्षमस्व ....

हे सगळं वाचून तुम्हाला नक्की वाटलं असणार मी असल्या Day च्या विरोधात आहे . तुम्ही काही प्रतिक्रिया देण्या अशीच माझी बाजू मांडते .... तसं अजिबात नाहीये .
३६५ दिवसांपैकी १ दिवस आईच्या नावे केला म्हणून काय झालं .... आई नाही का ९ महिने आपल्या नावे करत ? आणि त्यानंतरचही सगळं तिचं आपल्यासाठीच सुरु असत की .

Day मी ही करतेच की साजरे . आणि तुम्हाला काय वाटलं ? इतकं सगळं लिहिल्यावर मी काय लेकाच्या शाळेत Mother 's  Day ला जाणार नाही ? जाणार की हो .... अगदी हौसेनी . माझी ममा (आई म्हणायला शिकलाच नाही हो हा शेवटी ... अव्यक्त दुःख )  किती ग्रेट आहे हे कसल्या शब्दात सांगतोय हे मलाही ऐकायचं आहेच की .

माझा मुद्दा इतकाच ... तुमच्या माहितीपैकी कुणाचं आईप्रेम लवकर व्यक्त झालं असेल तर कृपा करून त्यांना तारखेची आठवण करून देऊ नका . तारखेने सण साजरे करणाऱ्यांपेक्षा आवडीने सोहळे मांडणारी माणसं खरचं भारी असतात आणि दुर्मिळही .

बाकी तुमच्यातल्या सगळ्यांना १3 तारखेच्या मातृदिनाच्या शुभेच्छा !

शुभेच्छेसोबत तारीखही टाकलीये .... अंगात कमी कळा नाहीत .... असच म्हटला ना मला :P


तूच माझा valentine





नमस्कार !!!

कदाचित तुम्ही मला ओळखत असाल . पण तरीही मी माझी ओळख करून देतोच … कसं आहे, ओळख असलेली बरी . कधीतरी अचानक तुमची अन माझी भेट झाली तर " तू कुणाचा रे ? " असं नको ना विचारायला कुणी

मी ( यांना नाव सांगू कि नको माझं) ……… जाऊ दे नाव कशाला हवंय तुम्हाला ???  मी माझ्या आईचं लाडकं पिल्लू आणि बाबांचा ठोंब्या . इतकीच ओळख माझी :) पुरेशी आहे ना ??  
वयानी थोडा लहानच आहे मी . तीन-साडेतीनच वर्षांचा आहे पण मला बडबड करायला आवडते .आईच तोंड दुखायला लागलय माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन म्हणून म्हटलं आज जरा तुमच्याशी बोलावं  .

मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे …… हो पण कंटाळणार नसाल तरंच बंर का . सांगू ??? 

आज मी एकदम खुश आहे …. म्हणजे किती माहित आहे का ? एवढा (…. ) या बॉल एवढा , नाही अजून जास्त त्या ……. ढगाएवढा… खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त  …… आभाळाएवढा . 

आता विचारा " का खुश आहेस ? " विचारा ना ……राहू  दे मीचं सांगतो तुम्हाला

गेल्या काही दिवसांपासून मला स्वतःलाच थोड मोठ झाल्यासारख वाटतंय . हो थोडंच बंर . जास्त मोठा झालोय असं सांगितलं तर लगेच एखादी गोष्ट सांग पाहू आम्हाला किंवा कविता म्हणून दाखव , तुझं नाव लिहून दाखवं अशी प्रात्यक्षिक करून घ्याल माझ्याकडून . म्हणून थोडं ..च मोठ झाल्यासारखं वाटतंय असं सांगतोय 

आता यालाही एक गोड गोड कारण आहे . दादा म्हणणारी बहीण आलीये ना आता मला . .
अहह… अहो नाही नाही माझ्या घरी नाही काही , माझ्या मावशीच्या घरी . कित्ती छोटी आहे माहिती आहे का ती ? तिला अजून दातच आले नाहीत . शू शू पण पँट मधेच करते ती .बोलताही नाही येत तिला . पण मी फोनवरून हाक मारली की काहीतरी बोलायचा प्रयत्न करते . मावशी म्हणते ती "दादा …. " म्हणते . असेल बुवा , फक्त मावशीलाच कळते तिची अ , उ ,आ ,ए  ची भाषा . हो पण ही डॉक्टर काकांकडून ही बहीण आणून बरेचं दिवस झाले आता . मी खुश असायचं कारण वेगळंच आहे हो …

आता मी दादा झालो म्हटल्यावर थोडं शहाण्यासारखं , मोठ्या सारखं वागलं पाहिजेच ना . तर आता मी मोठा झालोय . त्यामुळे मोठ्या दादासारखं वागायला पाहतोय . स्वतःच्या हाताने पोळी भाजी खातो . चमच्याने भात खातो ( अहो हाताने खाल्लं की माझ्या टीचर स्पूनने खायला शिकवतात ना म्हणून ) . काल आईला सांगितलं संत्र्याचा ज्यूस नको करत जाऊ आता . मी सोलून खाईन आपल्या हाताने . :) 

शाळेतही  माझ्या माझ्या सायकल वरून जातो . ती सायकल हो …… त्यावर उभं राहून एका पायाने चालवायची असते ती . माझ्या शाळेत सगळे फ्रेंड्स अशीच सायकल घेऊन येतात . पाठीला दप्तर लावून बर्फातून वाट काढत काढत सकाळी सकाळी शाळेत जायला मज्जा येते . आई माझ्या कडेकडेने रस्ताभर पळत असते तेव्हा खूप गोड दिसते . 

मी आणि माझा बाबा तसे आम्ही रोजच एकत्र बाहेर पडतो जायला पण बाबा  ऑफिस ला जातो आणि मी शाळेत . दोघेही सायकलवरूनच . बाबाची सायकल मोठी आहे . बाबाएवढीच. कधी कधी मलाही फेरी मिळते या सायकलची पण फक्त सुट्टी दिवशीच . 

पण आज काय झाल माहित आहे ??????  माझा बाबा त्याची सकाळची ऑफिसची मिटींग रद्द करून माझ्यासोबत शाळेपर्यंत आला . म्हटला "चल , आज रेस लावू दोघे . कोण पहिला येईल तो मोठा . " 

कित्ती बरं वाटलं मला . खूप खूप वेगात चालवली आज सायकल मी . बाबाला हरवायचं होत ना . इतका मोठा आहे माझ्यापेक्षा पण माझ्या इतकी वेगात नाही चालावता येत त्याला त्याची सायकल . फार मागे पडला होता माझ्या . आणि मी पहिला पोहोचल्यावर मागे उभा राहून जोर जोराने टाळ्या ही वाजवत होता :)

बाबापेक्षा पुढे गेल्यावर मला खूप मस्त वाटल , कळल जिंकल्यावर कित्ती छान वाटत ते . …… मावशीने बाळ आणल्यावर वाटलं होत त्यापेक्षाही जास्त …

तेवढ्यात  मला काहीतरी आठवलं …… रात्री आई बाबा valentines day की काय असं काहीतरी बोलत बसले होते . मला काही फारसं कळल नाही त्यातलं पण मी आईला विचारलं " valentines day म्हणजे काय ग आई ?  काय करायचं असत ? " मग तिने मला हेच सांगितलं की जर आपल्याला कुणी खूप खूप आवडत असेल म्हणजे कित्ती माहिती आहे का ?? त्या …. ढगाएवढ तर मग आपण त्याला सांगायचं की तू मला खूप आवडतोस आणि जर वाटलंच तर छान छान फुलं द्यायची ….   बस एवढंच  

माझ्या आई बाबांचा असा एक फोटो आहे माझ्या घरी … पाहिलाय एकदा मी . बाबा फार आनंदात दिसत होता त्या फोटो मध्ये . पण आज त्यापेक्षाही जास्त आनंदात दिसत होता आज . माझ्याबरोबरची रेस हरून सुद्धा . मला जरा गंमतच वाटली .

बाबा टाळ्या वाजवत होता तेव्हा मी धावत त्याच्याकडे गेलो . त्याच्या शर्ट ला धरून त्याला खाली ओढलं . आणि हळूच कानात सांगितलं  " बाबा …… तू मला खूप आवडतोस . तूच  माझा valentine. आज आपल्या दोघांचा फोटो काढू . " आणि एक गोड गोड पाप दिला .

कित्ती आनंद झाला म्हणून सांगू  बाबाला……. त्याने मला वर उचललं आणि आभाळभर गोल गोल गोल गोल फिरवल . कित्ती छान वाटलं . जणू काही मला आज उडताच येत होत त्या पक्षासारख . आभाळाला हात पोहोचतात का हे बघत होतो मी .

आणि गम्मत म्हणजे खरंच आज हात आभाळाला पोहोचला …… बाबाने वर उडवलं तेव्हा :)

माझा बाबा मला त्या आभाळाएवढा आवडतो……

या ३ वर्षात त्याने मला ३००० वेळा तरी सांगितलं असेलच कि मी त्याला कित्ती आवडतो ते …… पण आज मी पहिल्यांदा सांगितलं त्याला आणि आभाळातला पाउस त्याच्या डोळ्यात उतरताना पहिला . आणि आईच्या डोळ्यातून तो कोसळताना    :)

शाळेतून घरी आलो तर माझ्या खेळण्यांची टोपली गुलाबाच्या फुलांनी भरली होती . आणि बाबा ऑफिसला दांडी मारून घरी माझी वाट पाहत होता .  

View Facebook Comments




प्रेम - पैशाने विकत न घेता येणार


मधुरा …… या कथेची केंद्रबिंदू . पुढची सगळी गोष्ट हिच्या भोवती फिरत राहते . तिचं आयुष्यही असंच तिच्याभोवती गोल गोल फिरतंय . अगदी वर्तुळाकार . म्हणजे कुठेही मनाला बोचेल असा ९० अंशांचा कोन नाही की पोटात खड्डा पडावा असा अर्ध वर्तुळाकार लुप्त झालेला चंद्र नाही . सारं काही अगदी कोरल्यासारख . हो ……. पण हे वर्तुळाकार चित्र नियतीने कोरलंय . केंद्रस्थानी मधुरा असली तरी मार्ग ठरवणारी लेखणी तिच्या हाती नाही .

मधुरा हे तिच्या आईचं अगदी आवडीच नाव . आई म्हणायची मधुरा नावाच्या मुली फार गोड असतात . देवाच्या कमंडलूतून आई बाबाच्या ओंजळीत पडलेल्या अमृतासारख्या. त्यामुळे मधुरा आईच्या पोटात असतानाच तिचं हे नाव घरच्यांनी ठरवून ठेवलं होत . आणि तिच्या नावाप्रमाणे ती खरंच नावारूपाला आली .

शाळेत प्रथम क्रमांक कधीही सोडला नाही तिने . वक्तृत्व स्पर्धा तर तिच्या डाव्या हाताचा मळ असावा इतक्या सहजपणे जिंकायची . त्यामुळे शिक्षकांची चांगलीच लाडकी होती . शाळेतून बाहेर पडले की बरेचसे तारे निरभ्र आकाशात हरवून जावेत तसे लुप्त होऊन जातात . त्याचं पुढे काय झाल हे कोणालाच माहीत नसत .

पण मधुराच तसं नाही . शाळेबाहेरही तिने आपल तेज टिकवून ठेवल. बोलण्यात तोच बाणेदारपणा , स्पष्टपणा , आपल्या अभ्यासाशी प्रामाणिकपणा यामुळे बऱ्याचश्या प्रेझेन्टेशन्स बरोबर कॅम्पस इंटरव्हीयु मधेही तिने बाजी मारली . नाही नाही म्हणत एका महिन्यात ३ किल्ले सर केले . आणि सगळ्या मोठ्या पगाराच्या .

 आई हीच तिची सगळ्यात जवळची मैत्रीण  

जॉब निमित्ताने बेंगलोरमध्ये राहायला लागली . मनाची घालमेल बाजूला ठेवून लेकीच्या करियरसाठी आईने होकार दिला . "कोणी असेल तर सांगा ह ……. माधुरासाठी बघतोय आता " हे सांगायची वेळच नाही आली तिच्या बाबांवर . गुरुजींच्या भाकिताप्रमाणे " पदरात घातलेला पहिलाच नारळ लग्नाची ओटी समजायची " . आणि अगदी झालही तसंच .

तिला हवा तसा , तिला अनुरूप , तिच्याही २ पावले वरचढ नवरा आमच्या मधुराला मिळाला . सासर बेंगलोर नसल तरी नशिबाने तो बेंगलोरमध्ये स्थायिक असल्याने तिला नोकरी सुरु ठेवता आली . अगदी करियरच्या मागे लागणाऱ्यातील जरी ती नसली तरी आयुष्यभर अभ्यासू असणारी इतक्या लवकर नोकरी सोडायला तयार होणारी न्हवती . त्यामुळे बेंगलोरचा मुलगा म्हटल्यावर तिनेही लगेच होकार कळवला  


झालं …… डोक्यावर अक्षता पडल्या एकदाच्या पोरीच्या म्हणत तिचे घराचे सुस्कारा टाकतात तोच तिच्याकडून गोड बातमी समजली . :) सासूबाई म्हटल्या " पहिल्या अंगाऱ्याचा गुण आहे बंर हा ……. " लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच तिचं पिल्लू आल होत :) अगदी सगळंच कसं जुळून आल्यासारखं  झाल . पण या एका वर्षभरात बरंच काही घडून गेल राणी सरकारांच्या आयुष्यात

राजा राणी दोघेच राहायचे बेंगलोरमध्ये .  या ही अवस्थेमध्ये बराच शारीरिक त्रास सहन करत तिने आपला जॉब सुरु ठेवला होता पण ७ व्या नंतर डॉक्टरनी ताकीद दिली आणि मग नाईलाजाने तिला राजा मजूर करून घ्यावी लागली ( त्यातही बरीचं  दिव्य झालीत . आयत्या वेळी कोण नको का हिची जागा घ्यायला ऑफिस मध्ये ? ) . त्या दिवशी ऑफिसमधून पाय बाहेर टाकताना तिच्या मनाला हा विचार स्पर्शूनही गेला नसेल की हा माझ्या इथला शेवटचा दिवस असेल . परत हे सगळ मला कधी अनुभवता येईल ?  

देवदयेने गोंडस कन्यारत्न जन्माला आलं . ३ महिने आनंदात गेले . पण आता रजा संपत आली होती . काहीतरी कारणाने तिने ती वाढवून घेतली अजून ६ महिने . झाल त्या दिवसापासून तिच्या डोक्यात चक्र सुरु झाल . आजचं मरण उद्यावर ढकललय . पण उद्याचा सूर्य उगवायचा थोडीच राहणार आहे ? काहीतरी एक ठाम निर्णय घेण तिला भाग होत .

तिच्या नवरदेवानीही  तो निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली होती तिला . आता तिला जास्तंच जड जात होत . कारण तिला नेमक काय हवाय हेच ठरवता येत न्हवत . नाही …… तसं पाहील तर काही अपरिहार्य कारणांमुळे सासूबाई आणि आई दोघीनाही तिच्या घरी येउन राहण जमणार न्हवत . पण तिच्यावर घराच्या कुणीही नोकरीचा दबाव आणला नाही .

आता जॉब सुरु ठेवायचा म्हटलं तर तिच्यासमोर एकाच पर्याय शिल्लक होता . पाळणाघर ……. ज्याला आताच्या आयांनी एक सुधारित नाव दिलय Day  Care Center ……. सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत सुरु असत म्हणे तिच्या घराशेजारच पाळणाघर . बाकी मुलांना जेवण बनवून द्यायचीही तसदी नाही . सगळंच पाहतात ते लोकं ( ते काय पाहात असतील याची तुम्हा आम्हा सर्वाना कल्पना आहेच की हो )  मुलांना खेळवंतात , झोपवतात , जेवू घालतात , अभ्यास सगळ एकाच ठिकाणी ……. म्हणजे एका दगडात सगळे पक्षी मारल्याचा घरच्यांना आनंद :-|

पण ह्या पर्यायावर मधुराने साफ नकार दर्शवत एक मोठी फुली मारून टाकली . तिच्या मुलीला तिला त्या Day  Care Center मध्ये ठेवायची अजिबात तयारी म्हणती . मग त्यासाठी तिला काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल . तिच्या मते , लहान मुलाला पाळणाघरी ठेवण म्हणजे  आपल्या आई बाबांना वृद्धाश्रमात ठेवण्यासारखाच आहे . म्हणजे असं …… की दोघेही अशा वयात असतात की त्यांना आपली गरज असते …… आपली म्हणजे आपल्या असण्याची , सहवासाची , सोबतीची . आणि नेमके त्याच वेळी आपण पैसा किंवा करियरच्या मागे धावत या गोष्टी जमेतच धरत नाही .  

पण सगळ्या गोष्टींचा सारासार विचार झाल्यावर मधुराचा निर्णय पक्का झाला . तिने जॉब सोडून दिला . तिच्या या यातना तिच्या तिलाच माहीत . काय कमी दुखः झाल असेल काय त्या पोरीला . इतक्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडायची म्हणजे एक पाय कोणीतरी कापून अपंग झाल्याची  भावना . वर तिचा निर्णय म्हटल्यावर धड उघड उघडपणे मनाची सलं सांगताही येईना कोणाला . म्हणजे सल ही फक्त आर्थिकच होती असं नाही पण स्व-अस्तित्व नावाचा प्रकार फार महत्वाचा आणि तो टांगणीला लावायचा म्हणजे महादिव्य .

 बाकी मार्केटमध्ये परत प्रवेश करायचा म्हटलं तर resume वर किती मोठा gap दिसतोय कोणास ठाऊक हि भीती वेगळीच . नॉलेज जुनपुरण होणार नाही याचीही काळजी तिलाच घ्यावी लागणार होती . ज्या मुलीने आयुष्यभर पहिला नंबर नाही सोडला तिच्यासाठी हा प्रकार म्हणजे फुलपाखराचे पंख गळून पडल्याचा प्रकार होता . त्त्यातही भर म्हणजे आपला समाज …… "तुझी बायको फार दिवस नोकरी करेल असं वाटल न्हवतच ." किंवा मग " काय करणार …… सगळे कष्ट वय गेल न ग तुझे . वाटल होत पुन्हा जॉईन होशील पण नाही जमल तुला " असे शालुतून जोडे होतेच तयार .

खरच रिझाइन केल तेव्हा तब्बल १ आठवडा रडून काढला पोरीने …… आणि तो ही एकटीने. अवघड जागेच दुखण . सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था . तिच्या नवऱ्यालाही समजेना हिला कसं आणि काय समजवावं .  

बरोबरीला तिचा मैत्रीण परिवार होताच …… ज्या सगळ्या या सगळ्यातून "तो " सोयीस्कर पर्याय निवडून स्वतःला तारुन नेल्या . मग तिला अजूनच भांभावाल्यासारख व्हायचं . "मी करतेय ते चूक की बरोबर " असं कितीतरी वेळा तिने स्वतःलाच विचारलं असेल . तिची घालमेल तिची तिला जाणवत होती पण बाळाच्या हक्काली आई तिला तिच्या करियरवर बळी चढवायची न्हवती . आणि हे तीच स्वतःपुरत मत होत . बाकी सगळ्या मैत्रिणी आयाच असल्या तरी प्रत्येकीने वेगळ्या परिस्थितीतून वाटचाल केली असणार हे नक्की . तिच्या पायवाटेवर तिला तिचा हा निर्णय योग्य वाटला

आपल्या करियरचा आलेख इतक्या वेगाने वर चढत असताना ते सगळ कुणासाठीतरी सोडावं लागण फार महाभयंकर . पण जे कोणी तिला खरंच ओळखत होते , ती काय करू शकते याची कल्पना असणाऱ्या सर्वांनी तिच्या या निर्णयाच मनापासून कौतुक केल .

पुढे काय करू काय नको या विचारात असतानाच तिच्या नवऱ्याला एक छानशी संधी चालून आली . आता मधुरा सध्या कुटुंबासोबत US  मध्ये असते . तिच्या पिल्लासोबत मजा करतेय . पिल्लाला त्याची हक्काची आई मिळाली आणि मधुराला तिचं हक्काचं आईपण . आता तिच्या Salary अकाउंटमध्ये स्वतःचे काहीही जमा होत नसले तरी रोज एक गोड गोड पापाने सुरु होणारी सकाळ , भरपूर प्रेम , आनंदाचा एखादा डोळ्यातला थेंब आणि खूप सार समाधान न चुकता जमा होतंय तिच्या मनात

खुश आहे आता ती . पण याचा अर्थ तिने सगळच सोडलाय असा होत नाही . दिवसातून जेमतेम १ ते १ १/२ तास रिकामा मिळत असेल तिला . पण त्यातही तिने स्वतःचा गायनाचा छंद जोपासलाय . ज्या platform वर ती काम करायची ( अहो ती ही software  engg  आहे ) ते सगळ updated  राहावं म्हणून घरूनच छोटे मोठे प्रोजेक्ट करत राहते .  


भारताबाहेर , घरापासून दूर राहून बरच काही शिकायला, पाहायला मिळतंय तिला . नवीन प्रकारची माणस , त्यांचे स्वभाव , वागण्याची पद्धत नी बरच काही . नाती जपण्याची कला , नाती तयार करणारी गालावरची एखादी खळी , एखादा प्रेमाचा स्पर्श , भले मग समोरच्या व्यक्तीची भाषा न समजणारी का असेना , हे आणि असं बरंच काही ……

म्हणूनच सुरवातीला म्हटलं न …… तिचं आयुष्य वर्तुळाकार आहे पण मार्ग आखायची लेखणी तिच्या हाती नाही :)

रिकामा वेळ मिळाला विचार करायला की भावनांचे कल्लोळ अजूनही उठता मनात तिच्या. वर झेप घेणारा एक आलेख मागे सोडून आलेय खरी पण त्या बदल्यात बरेचशे आजूबाजूचे आलेख वर चढत आहेत तिचे . जे तिच्या कधी लक्षातच न्हवत आल आजवर . ओंजळ रिकामी करायचं धाडस असावं लागत …… खरच नवीन फुल आपोआप फुलून येतात रिकाम्या ओंजळीत . हे धाडस तिने केल .

अजूनही बरेचजण उलट सुलट प्रश्न विचारात राहतात तिच्या या निर्णय बद्दल . तिने आता उत्तर देण सोडून दिलय. स्पष्टीकरण मागणारे फुंकर घालायला कमी आणि खपली काढायलाच जास्त उतावळे असतात हे समजून चुकलय आता तिला

पण मागे सोडलेल्या " त्या " गोष्टीबद्दल तिला अजूनही खात्री आहे . अजुनही तिला वाटत की एखादी संधी पुन्हा उभी  राहील हात पसरून पुढे . ज्या दिवशी तिची , तिच्या पिल्लाच्या आयुष्यातली गरज कमी होईल तेव्हा पुन्हा एकदा नव्याने झेप घ्यायचं ठरवलंय तिने . बघू ……. कस कस जमतंय

पण मागे सोडलेल्या " त्या " गोष्टीबद्दल तिला अजूनही खात्री आहे . अजुनहि तिला वाटत की एखादी संधी पुन्हा उभी  राहील हात पसरून पुढे . ज्या दिवशी तिची , तिच्या पिल्लाच्या आयुष्यातली गरज कमी होईल तेव्हा पुन्हा एकदा नव्याने झेप घ्यायचं ठरवलंय तिने . बघू ……. कस कस जमतंय

कुणी विचारलं तर ती आता इतकंच सांगते …. माझ्या नियतीत उत्तम करियरपेक्षा उत्तम नवरा आणि पैशाने विकत न घेता येणाऱ्या प्रेमाला झुकत माप होत . अजून उभं आयुष्य पडलंय हरवलेलं पुन्हा शोधायला . पण माझा बाळकृष्ण रांगताना, बोबडे बोल बोलताना , पहिलं पाऊल टाकताना , पहिल्या दिवशीच्या शाळेतून पळत येत घट्ट मिठी मारताना मला परत कधीच पाहायला मिळाला नसता . आयुष्याची सगळी कमाई बाप्पाच्या पायावर ओतली तरी दिवस उलटे फिरून जाऊ शकत नाहीत . त्यापेक्षा थोडावेळ विश्रांती घेतली तर काय चुकल ?



   

Happy Birthday Mumma........



He bent down......

Got on one knee.....

Kissed my hand 
and said 

" Happy Birthday Mumma ..."

And I was like Ohh My God  :O
Its a best birthday wish ever for me 

Thank you so much my little master. 
Love you a lot 

:-*




Sometimes smallest thing take up the most room in your heart.

Birthdays come and go , gifts are opened and thrown , candle blows , many hands come together to wish you.

   Those balloons, cream of you cake, so many gift wraps , parties  ......... that special day spent with all special ones for you .

Those phone calls at late night, specially your number is getting busy to everyone at 12 O' Clock .

Surprise from your mom, dad, friends  and a lovely husband.

                    Someone is waiting for you with bunch of roses in his hand. A tight hug , no words to say thank you , eye language saying "Just be with me as always !"

Everything is sweet. But yesterday's wish was so special for me .

My 2 years child was wishing me in that stylish way .The biggest surprise for me was knowing that my prince is growing so fast :)  


I will promise you my little heart ...... I will keep growing younger and younger as years passes by just for you .... To enjoy your childhood  with you :)






कळसातील पाणी

लग्न म्हणजे हजार प्रथा … विधी . त्यातील एक म्हणजे कळस … तसं पाहायला गेल तर बोहल्यावर चढणाऱ्या मुलीच्या अंगावर २ वेळा हे कळसातील पाणी पडत . एक म्हणजे लग्नाच्या आधी एक दिवस … हळदीच्या वेळी आणि दुसर म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी …. सासरी 

लहानपणी पडणाऱ्या बालीश प्रश्नांपैकी हा एक प्रश्न … का घालत असतील नवरी मुलीला कळसात पाणी ? आणि ते ही  २ वेळा ??  
पण म्हणतात ना …… अशा गोष्टींचा अर्थ लागायला कळसातील पाणी पडाव लागत डोक्यावर 

खरच या सगळ्या प्रथा नुसत्या प्रथा नाहीत तर त्या मागे फार मोठा अर्थ असतो . बस , तो अर्थ कुरवाळून समजावून सांगणारी एक आई नशिबाला असावी लागते . जी मला लाभली . 

इतके वर्ष न राहवून ' तो ' बालीश प्रश्न शेवटी मी तिला विचारला … माझं लग्न ४ दिवसांवर असताना . टपोऱ्या डोळ्यात पाणी आणून पदराची सावली देत जवळ घेऊन तिने जे मला सांगितल ते आयुष्यभर असं च्या असं मनात साठून राहील माझ्या :)

डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत आई बोलत होती 

देव जेव्हा प्रत्येकाच्या नशिबात प्रेम वाटत असतो तेव्हा ज्याच्या झोळीत तो मुठभर प्रेम जास्त घालतो त्याला मुलीचा जन्म मिळतो . मुलीला जन्मजातच सगळ्या गोष्टी २ - २ मिळालेल्या असतात . २ घर , सासू म्हणजे आई आणि सासरा म्हणजे बाबा , म्हणून २ आई बाबा , लाडक्या दिरासारखा अजून एक मित्र , नणंदे सारखी मैत्रीण  . मग इतक्या सगळ्या गोष्टी २ असताना कळसातील पाणी एकच कस असेल ??

पहिला कळस माहेरचा. आईच बोट धरून चालशील … शेवटच …. उद्यापासून नवऱ्याच बोट धरून चालायचं  , पाहिलं पाणी आईच्या अंगावरून ओघळून मुलीच्या अंगावर पडत . 

ते पाणी तिला सगळ्या जुन्या गोष्टी पदरात बांधून घ्यायला सांगत आणि उरल्या सुरल्या कळसात सोडून जायला सांगत .

  

- आईची माया पदराच्या टोकाला बांधून ने …. सासरच्या उंबऱ्यावर ही गाठ सोडून मग आत प्रवेश कर , अंगणापासून तुझ्या प्रेमाची लयलूट होऊ दे 

- ज्यांच्या बोटाला धरून पाहिलं पाऊल टाकलस त्या बाबांचे लाड मुठीत गच्च मिटून सांभाळून ने .  सासरी कधी एकटी पडलीस तर ही मुठ तुला कधीही एकट सोडून जाणार नाही . डोळ्यातलं पाणी पुसायला बाबाचा हात पुढे येईल 

-  बहिणीची माया कमरेला गुंडाळून ठेव . मणका दुखेतोवर काम करताना तिच्या गोंडस आठवणी भार हलका करायला कामी येतील 

-  बंधुराज तुझ्यापेक्षा धाकटा असला तरी तुझ्यापेक्षा मोठा होवून आजवर तुझी सावली सुद्धा सांभाळली . त्याचा मोठेपणा मुंडावळ्या सोबत कपाळाभोवती गाठवून घे . घराच्या ४ भिंती एकत्र ठेवायला तुलाही कधीतरी मोठ व्हावं लागेल . मोठेपणाने बरच काही पोटात घ्यावं लागेल , बरच काही विसरावं लागेल . तेव्हा होईलच की  आठवण भावाची …. तुझा शब्द कधीही नाही मोडला त्याने 

- बाकी राहिलं ते चिंचेच्या झाडाखालच बालपण, कैरीच्या फोडेसाठीची भांडण , सायकल शिकताना मैत्रिणीने आधारासाठी दिलेला हात, आजी सोडून गेली तेव्हा मन मोकळ करायला दिलेला तिचा खांदा , तुझ्यासाठी जागवलेल्या रात्री आणि बरच काही ……. जे सगळ आज या कळसातल्या पाण्याबरोबर वाहून जाईल . इथेच सोडून जाव लागेल तुला हे सगळ

दुसरा कळस सासरचा , लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पाणी नवऱ्याच्या अंगावरून ओघळून तुला भिजवेल 


   
ते पाणी तुला सगळ सगळ नव्याने करायची शक्ती देईल . नव घर उभ करायची ताकद देईल 

- नवऱ्याच्या प्रेमाने चिंब भिजशील तरच सगळ पेलता येईल .  

- दिराच्या सुखासाठी बाप्पाकडे रोज मस्तक टेकव.  हिरव्या चुड्याच्या किणकिण आवाजासाहित तो तुझे मोकळे दिवस परत आणून देईल  

- नणंदेच्या गप्पांसाठी तुझी दुपार राखून ठेव . बघ …. सगळा क्षीण निघून जाईल 

- सगळ्याच सासवा खाष्ट नसतात ग . . . कळसातल्या पाण्याने जड झालेली साडी तुला हेच सांगेल . आता कामाचं वजन वाढलाय वहिनीसाहेब …. नीरी सांभाळून पाऊल टाका . वाट दाखवायला ही माउली कधीही तयार असेल 

- आणि सासरा म्हणजे तुझ हक्काच लाडाच अकाउंट. मुलगी म्हणून घरात घेतील आणि प्रत्येक वेळी बापाच्या मायेने पाठीशी घालतील   

:)

दोन्ही कळसात चिंब भिजलीस तरच संसारात चांगली मुरवतीची होशील :) आणि हो … कळस उचलताना तुझ्या अंगाला त्याचा स्पर्श नाही होऊ द्यायचा 
आपल कोंदण आपण जपायचं … आपल्या माणसासाठी :) 

View Facebook Comments


पोस्टशंभरी


ही पोस्ट वाचण्याआधी एक विनंती … या पोस्टमधील " निळ्या रंगातील शब्द " reference link म्हणून वापरले आहेत. हे शब्द म्हणजे या ब्लॉगवरची एक कविता …. जवळपास सगळ्या कवितांची शीर्षके माळून ही पोस्ट लिहिली आहे .  एक छानशी गोष्ट . संबंधित कविता वाचण्यासाठी कृपया reference link ( blue letters ) वर click करा .       



आजची ही पोस्ट म्हणजे मी मजल दरमजल करत गाठलेला पहिला टप्पा …. या ब्लॉग वरची माझी शंभरावी पोस्ट . तुमच्या या अखंड प्रेमाबद्दल धन्यवाद :)

तश्या माझ्या कवितांनी हा आकडा कधीच पार केलाय म्हणा माझ्या डायरीमध्ये. तरीही … तुमची दाद मिळालेली ही शंभरावी.  
पण ही शंभरी नाकी नऊ आणणार अस वाटतंय कदाचित . म्हटलं १०० वी पोस्ट म्हटल्यावर काहीतरी खास लिहावं .काहीतरी सुरेख…कविता जमली पाहिजे …. माझ्या ब्लॉगच सेलिब्रेशन मी नाही करणार तर कोण ? पण म्हणतात ना …. काहीतरी ठरवून लिहायला बसल की शब्द रानातल्या पाचोळ्यासारखे सैरभैर उडून जातात . कुठेच काही गुंफता नाही येत. 

सरस्वतीसमोर मांडी घालून, लेखणी घेऊन बसताना जर तुम्ही वहीच्या पानाच्या डोक्यावर विषय कोरून बसलात तर कितीही वेळ तिची आराधना करा …. पान कोर ते कोरंच राहील :) . त्याऐवजी रिकाम्या मनाने बसून लेखणीतून उमटेल ते लिहित जावं …. अप्रतिम निर्मिती झाल्यावाचून राहणार नाही. आणि हे माझ शंभराव पान … पहा , अजूनही कोर :)

शंभरी म्हटली की ब्लॉग ची काय आणि माणसाची काय …… सगळ गणित एकचं . आकडे १ पासूनच  सुरु होत १०० पर्यंत पोहोचणार . म्हणजे असं ….   

आई चिमुकल्या पावलांची वाट पहात असते.  " फक्त एकदा येऊन जा " म्हणत बाळाच्या बोबड्या बोलांसाठी आतुर झालेली असते . आणि ती प्रतिक्षा संपते तब्बल ९ महिन्यांनी . जखमा कशा सुगंधी झाल्यात म्हणत आई सगळ्या वेदना अगदी धैर्याने सहन करते . पोटातला जीव " माझाच कुणीतरी " असतो ना तिच्यासाठी . :) . 

आई म्हणून घडताना …. " काय काय होत हे तेव्हाच जाणवत . हातात येत ते कन्यारत्न . बघता बघता " एक वर्ष झालं " तिला . " बाबा आज राहू दे office " म्हणणारे निरागस भाव चिमुकल्या डोळ्यात दाटलेले . आजी आजोबा खेळायला नाहीत म्हटल्यावर बाप्पाच्या पायरीवर रांगत जाऊन " आजी आजोबाना माझ्या तू लग्गेच घरी पाठवून दे " ही विनवणी करायची … " तिला इतकंच कळत " :)
  
या आणि अशा बर्याच तिच्या त्या बालिश आठवणी 

मुलगी नाशिबवानाच्या घरी जन्माला येते म्हणतात .मुलगी म्हणजे … विश्वनिर्मात्याला पहाटेच्या साखरझोपेत एक सुंदर स्वप्न पडाव … अशी निर्मिती … पण तरीही " मुलगा असते तर … " अस वाटतच हो कधीतरी कारण मुलगी म्हणजे " निखारा "  आणि हे कधी कळत ?? जेव्हा ती एकाच वेळी दोन जिवलग मित्रांना आवडते  " अशीच एक भावना , जिला शब्दच फुटत नाही " आणि समोर उभा राहतो तो Propose Day 

हे झाल पहिल्या कन्यारात्नाबद्दल.  

आता बायको आई झाली म्हणून  पन्नाशी  थोडीच गाठली  लगेच ? " तो आणि त्याची सौ … " दोघांचेही सोनेरी दिवस आत्ता कुठे सुरु झालेत ." सगळ किती सहज पेललस " म्हणत तो ही तिची दाद देतो .  एक दिवस जरी त्याच्याशिवाय काढायचा म्हटला कि लग्गेच " तुझ्याशिवाय …. " !!!! अस वाटत न अजून तिला. आणि एखाद गुलाबाचं फूल " बघ माझी आठवण येते का " हे सांगायला
जाता जाता तीच हे वाक्य " मुडकर न देखना " आणि मग रात्रभर दोघांचीही " आज झोपच आली नाही " अशी अवस्था ठरलेली . आता तुम्हीच सांगा " काय राव … हे काय बर आहे ". 

" तसं पाहिलं तर " अहो " I miss my college days "म्हणतच दोघांच्या संसाराची सुरवात झाली. दोघे एकाच कॉलेजचे म्हटल्यावर या लवस्टोरी मध्ये " तू मात्र अशीच " ही तक्रार करत एखादी " बालमैत्रीण " तिला सोडून गेली तर त्यात नवल ते काय ? अहो ते दिवसच मंतरलेले " पाहिलं प्रेम कस विसरायचं ? ". साठवलेल्या ओल्या चिंब भेटी " आठवतंय तुला ? "  म्हणत म्हणत 
  
आनंदाने भरलेल्या अंगणात " ओठावरच हसर गाण … देठासहित खुडून दिलस म्हणावं असा एक सखा ज्याचे आयुष्यभर धन्यवाद मानले तरी थोडेच . त्या सख्याच्या प्रेमात ती … प्रेम म्हटलं कि चंद्र आलाच पाहिजे की हो सोबतीला " चंद्राबरोबर तू ही हवा होतास " अस कितीतरी वेळा वाटत . आणि आजूबाजूचा प्रत्येकजण मग विचारत राहतो " प्रेमात कुणी पडलंय का ? ". मग " भावनांचा गुंता " अगदी अपेक्षितच. नको वाटते ही माणसांची गर्दी… " सगळ्यांपासून दूर ", " चंद्रालाही दूर लोटत " " सुटत चाललेली वीण " ओवायला पहिली की एकाकी रात्री " चांदण मुक्याने बरसत " आणि नेमक त्याच वेळी " कुणीतरी पाहत " :)

बर …. हे झाले जुने दिवस जुन्या आठवणी 
आणि आत्ता … कन्यारत्नाला एक वर्ष झाल रे झाल की त्याच onsite आ …… वासून उभ राहत त्यांच्या समोर … तो जातो …ही  इथेच …… :(  " Being a mother " चा रोल पुरेपूर निभावत  

" त्याच्या श्वासातला एक अखंड श्वास बनून " इतके दिवस त्याचा  " पारिजात " " स्पर्श " अनुभवल्यावर तिला त्याची रोजच " आठवण होते ". अराशासामोरच तिचं ते " एकाकी देखणेपण " आणि डोळ्यात धारा पण " वाहायचं थांबेल … तर पाणी ते कुठल ? "

छोट छोट पिल्लू आईला सांगत " Distance does't matter " मम्मा :) .आपण " एरोप्लेन " नवीन आणू .  बाबा रे " या आईला खरच नाही कळत काही " बघ एकदा कसे " साचलेत डोळ्यात तिच्या कोपर्यावाराचे ढग  
हि आणि अशी बरीच समजावयाची चिमुकली वाक्य . मग आईने कौतुकाने जवळ ओढल कि म्हणायचं " अग बाई … तुझाच आहे मी , कशाला उगाच भितेस ? "

" डोळ्यातले थेंब " बघून " ब्लॉग रायटिंग " वाली मैत्रीण विचारते " कशी आहेस ग ? " . यावर तीच ओलं चिंब उत्तर : संध्याकाळी शुभंकरोती " म्हणायला बसल तरी तिला " हल्ली तो मला देवळात दिसतच नाही ". काय करू ? " हल्ली हे असच होत हो "

सगळ अंगण आनंदाने भरल तरीही प्रत्येकाकडे " माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा " असतोच नेहमी आणि वाईफची " हाउसवाईफ " होता होता " सुटून गेलेले क्षण " परत आले तरी  " आता काय कामाचे ? "  

ही गोष्ट अशीच चालू राहील …. पुन्हा कधीतरी बोलू 
फार लिहावस वाटतंय … " तरीही आज ठरवलंय " बस … इथेच " The End च पोस्टर " लावायचं आणि ही नऊ महिन्यांपासून सुरु झालेली ही पोस्ट " सराणावरच्या मरणा " पर्यंत येउन शंभरी पूर्ण करायची :)

धन्यवाद !

आईची पन्नाशी

Specially for my Aai on her 50th birthday :)

बाबा अजून मोगऱ्याचा गजरा तिच्या वेणीत माळतात 
केसांच्या कुरळ्या बटा आजही तिच्या गालांवर खेळतात 
बांगड्यांची किणकिण … गणपती स्तोत्रापेक्षा पवित्र वाटते 
अंगणातली जाई आजही तिच्या अंगाईने पाकळ्या मिटते
उंबरातरी कुठे जागा होतो तिच्या हळदी कुंकवाच्या बोटांशिवाय
वृन्दावनातल्या तुळशीलाही तिच्याच ओंजळीच अर्घ्य हवय    
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?  
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही 

हौसेखातर सुनेच्या, गौरीचा खेळ आजी अजून अंगणात मांडते 
आईच्या हाकेने बहिणाबाई आमची अजून दुधाचा पेला सांडते :P 
कपाळावरच कुंकू ती अजूनही तितक्याच कोरून लावते
नातवालाही अंघोळ घालताना ती पूर्वीसारखाच पदर खोवते
बायको , सून , वाहिनी , आई वरून आता ती आजी झाली 
तरीही तिच्या चेहऱ्यावर एक सुरकुती नाही आली   
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?  
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही 

काजळ कोरते डोळ्यात … वाटत आजही ढग दाटून येतील 
तिची माती सुगंधायला पुन्हा सरी भेटून जातील  
ओठावरच्या तिळाने तिची रोजचं द्रुष्ट निघते 
आरसा कशाला लागतो तिला …. सगळ्यांच्या डोळ्यात ती दिसते 
मंगळसुत्राच्या वाट्यांची आजही करते पूजा 
तसूभरही प्रेम तिचं अजून नाही झालं वजा 
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?  
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही 

कोल्हापुरी साजावर आजही मनापासून भाळते 
रम्मीचा डावही अजून त्या एका पेप्सीसाठीच खेळते :)
दंडातल्या बाजुबंदासाठी चाललाय गेली २५ वर्षे हट्ट 
म्हणते " वाढवून घ्या हो तोळ्याभराने, झालाय आता घट्ट "  
लग्नातला परकाळा ही जपलाय लॉकरच्या कप्प्यात खाली 
म्हणे …. सासरी जाताना माहेरपण जपतील यातच माझ्या मुली
(खरंच …. माझ्या लग्नात मी आईचा २५ वर्षापूर्वीचा शालू आणि परकाळा घेतला होता )   
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?  
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही 

View Facebook Comments