फोटो सौजन्य : गुगल
कधीही न पाहिलेल्या सासू - सासऱ्या बद्दल तिला वाटणाऱ्या आपुलकीची आणि एकटेपणाची कुणीतरी चेष्टा करेल किंवा तिच्या त्या भावनेबद्दल शंका व्यक्त करेल या भीतीनेच ….तिने हि तगमग कोणाजवळ ही बोलून दाखवली नाही
तसं पहायला गेलं तर एकदा …. हो फक्त एकदाच…तिच्या आईजवळ बोलली होती ती हे सगळ
"इतरांना सासू सासरे असतात म्हणून अडचण आणि मला नाहीत म्हणून "
यानंतर तिच्या आईने तिला जे काही समजावलं . त्यानंतर हा विषय तिने कधीही कोणाजवळ ही काढला नाही . आभाळभर रिकामेपणा साचलेल्या लेकीच्या छपराला तिने कोणत्या शब्दात आसरा दिला हे फक्त त्या माउलीलाच ठाऊक . याच शब्दांच्या शक्तीवर आणि आधारावर सासू सासऱ्याविनाच सासर तिच्या लेकीने आजवर पेललंय .
खर पहायला गेल तर कधीही कोणाही जवळ तक्रार करू नये इतका गुणी नवरा साथीला होते तिच्या . पण म्हणतात ना 'ज्याची त्याची दुखणी ज्याची त्यालाच माहित असतात . आणि ती एकट्यानेच सहन करायची असतात…करावी लागतात '
कुणाच्या घरी कधी हळदी कुंकवासाठी ती गेली की कोपऱ्यात नटून बसलेल्या त्या घराच्या सासूबाईकडे बघून तिला अगदी हेवा वाटायचा . हळद कुंकू कुठल्या बोटाने लावावं ? नारळ ओटीत घालताना कसा घालावा ? विड्याच्या पानच टोक कोणत्या बाजूस अन देठ कोणत्या बाजूस असावं ? अशा बारीकसारीक गोष्टी हक्काने सांगायला तिच्याही घरी कोणीतरी जेष्ठ व्यक्ती असायला हवी होती अस सारखं वाटायचं . अंगणात एकट्याच खेळणाऱ्या तिच्या बाळकृष्णाला गोष्टी सांगायला , गालावरून हात फिरवत कडकड बोटे मोडायला त्याच्या वाट्याला आजी आजोबा असायला हवे होते हे जाणवायचं
पण हे वाटण , जाणवण सगळ मनातल्या मनात . ओठांच्या पाकळ्या उघडून आजपर्यंत एकही शब्द बाहेर पडला नाही . तिचा हा संवाद एकटीचाच असायचा . स्वतःपुरता मर्यादित . "ओरडणाऱ्या का असेनात पण मला सासूबाई हव्या होत्या , ज्यांच्या नजरेला चुकून जरी नजर मिळाली तरी भीती वाटावी इतके कडक का असेनात पण मला सासरे हवे होते "
कधीतरी तिच्या माहेरवाशिणी मैत्रिणी एकत्र जमायच्या . त्यांच्या रंगलेल्या गप्पा ' सासू ' या विषयावर येउन नेहमी थांबायच्या . मग त्या एकमेकीना सांगत राहायच्या घराच्या ' त्या ' दोन व्यक्तींमुळे होणारी अडचण , त्रास , अवघडलेपणा …… आणि बरच काही . हिच्याकडे पाहून कुणीतरी अगदी सहज बोलून जायचं "बरंय बाई तुझ. हे असले प्रकार तुझ्याकडे नाहीत " या वाक्यावर तिच्याकडे खोट्या हसण्याव्यतिरिक्त काहीही उत्तर नसायचं . ज्या भावनांचा कल्लोळ तिच्या मनात उठायचं ते वादळ तिच्या मैत्रिणींना समजणार न्हवत .
मी ही सहजच केला होता आज तिला फोन . तिच्या पहिल्याच वाक्यात आवाज खोल गेल्याचा जाणवला . गळ्यात दाटलेल्या हुंदक्यामुळे तिला धड बोलताही येईना . "काय झालंय ग ???" न राहवून शेवटी विचारलंच मी . "आज सर्वपित्री " इतकच बोलली ती यावर .
तिला काहीही न समजावता मी फोन बंद केला . बाप्पाजवळ हात जोडून उभी राहीले आणि एकचं मागण मागितलं
"हवं तर सगळ वैभव लुटून ने पण कोणाची जिवाभावाची माणसं नको नेत जाऊ अशी ज्यांची जागा उभ्या आयुष्यात दुसर कुणीही नाही घेऊन शकत . "
मुर्तीतला देव मुका का असतो ?? हे आज कळल मला :)
Speechless . . . The people who have in laws , do not value them .
ReplyDelete:) Its human tendency.
DeleteSometimes you will never know the true value of a moment until it becomes a memory. Same for person too :)
What thoughts...!!!
ReplyDeleteThank you
Delete