आईची गौराई




गेले १ तास फेर धरलाय आम्ही आणि माझी आई …झिम्मा न मोडता एकसारखी गाणी सांगतेय . "कराड कोल्हापूरच्या गौरी " पासून ती सुरु करते

गौराई आलीया पावनी
तिच्या बापानं देखिली
वडील माझ्या बापा काय देशील लेयाला ?
जोडवी पडल्यात तबकात
घे ग चिलीम …. काढ ग कुलूप
जागा मामाच्या मंदिरी
आरसा ठेविला सामोरी
सोनियाचा करंड कुंकू लेतिया कपाळी
असमाने चढविल , वारा जरीची चोळी
सार लेण झाल खंर
दुधा तुपाच ताट म्होर
उद्या शंकर यील की
एका रातीची वस्ती करून म्होर घालून न्हील की
गौराई आलीया पावनी .

माझ्या दीदीच हे आवडीच गाण .  

गौरीदिवाशी ती अगदी गौरीसारखी नटायची . ही गौराई नटायला जरा जास्तंच वेळ घ्यायची  पण आईन हे गाण सांगायला सुरु केल की सगळा शृंगार अर्ध्यावर टाकून झिम्मा धरायला आलीच धावत ……. नाकातील नथ हातात राहिली तरी चालेल पण या गाण्याला ती चुकवत न्हवती

तिला गौराई म्हणायचं कारण म्हणजे आमच्या शेजारच्या काकू . त्या म्हणतात "अंजू , तुझी थोरली गौरी आणि धाकटी गंगा आहे बघ " (गौरी बडबड करते , खेळते आणि गंगा शांत राहते …… म्हणजे गाणी सांगताना :) )

आईने हे गाण आज सांगायला सुरु केल्या बरोबर तिची आठवण झाली . लग्न होऊन सासरी गेली तशी आमच्या घरच्या गौरीच्या खेळाचा रंग उतरला . तिच्या इतक्या हौसेनी महिना महिना अगोदर पासून डाव नाही रंगत आता अंगणात . हो पण गणपतीच्या ५ दिवसात रंगतो आणि तो हि तिच्यामुळे .

तिच्या सासरच्या गौरीला नटवून थटवून , जेवायला घालून , भानुरा वाजवून तिला झोपवून गौरीच्या रात्री दीदी तिच्या सासूबाई बरोबर दरवर्षी येते . माहेरची गौरी जागवायला :) 

तिचं त्या दिवशीच माहेरी येण अगदी पाहण्यासारखं असत . मला तर हसायलाच येत बाई . आणि मी काही तिला चोरून वैगरे हसत नाही . फक्त काकीच्या पदराचा आडोसा घेते इतकंच :P  

मग ओठांची कमान एका बाजूने दाबून वाकवत , कपाळाला आठ्या पाडत,  मान नको इतकी हलवून लगेच ती म्हणते कशी "लग्न होऊन सासरी जाशील तेव्हा कळेल मी का धावत येते उंबर्यापर्यंत :) " घोड्यावर स्वार होवून आल्यासारखी धावतच घरात प्रवेश करते . घरातल्या  गौरी-गणपतीला डोकं टेकून नमस्कार करते . तिच्या मते ' प्रत्येकाच्या घरची गौराई हा जगातील सगळ्यात  जागृत देवी . कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवत नाही . शेवटी माहेरवाशीण आहे ती . माहेरी भरभरून देवून जाते :) ' मग आज्जीला , बाबांना , आईला , काकीला नमस्कार करते . हो …… आमच्या घरची रीत आहे . वयाप्रमाणे नमस्कार करायचे :) . वाहिनीच्या आणि तिच्या काय खाणाखुणा चाललेल्या असतात ते फक्त त्याच दोघींना माहीत .  

गौरीच्या दिवशी ती सासरी जेवत नाही . सकाळपासून उपवास करून आमच्या घरी म्हणजे माहेरी आल्यावर गौरीला ठेवलेल्या नैवेद्याच्या ताटातलीच वडी, कढी,  भाजी भाकरी खाते . आणि हे करण्यापासून तिला कधीही कुणीही अडवलं नाही . आजीची शिकवण आहे ही . घरातली मुलं बाळ जेवली की देवाला नैवेद्य पोहचला अस समजायचं . देव देव्हाऱ्यात बसून राहत नाही . तुमच्या मुलांच्यात मनसोक्त खेळत असतो तो . रांगायला यायला लागल्या पासून मी ही देव्हाऱ्यातील साखरेची वाटी आज्जीची बाप्पाची आरती करून झाल्याझाल्या संपवायची :)

दीदीपेक्षा मी लहान असल्याचा एक तोटा म्हणजे गौरी घरी आणतेवेळी मला तिच्या बाजूला फक्त उभं राहावं लागायचं . माझ्या हातात कधीच नाही दिलं तिने . "मी लग्न होऊन गेल्यावर घेशिल की तूच गौराई घरात " असं म्हणायची . तो मुहूर्त आज आला :) 



हळदी कुंकवाची बोट लावलेली , पोवत घातलेल्या गौरीच्या डहाळ्याचा तो गार , ओला स्पर्श ज्यावेळी तुमच्या हाताला , कमरेला होतो त्या क्षणापासून तिच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम वाटायला लागत . या वर्षी पहिल्यांदा जाणवलं हे मला . दीदी नेहमीप्रमाणे आजही घरी धावत आली तर हसायला नाही येणार मला . ही गोष्ट फारच साहजिक आहे .      

पण आज अजून नाही आली . बराच उशीर झालाय तिला .  आईचं ही लक्ष खेळापेक्षा उंबऱ्याकडेच जास्त आहे .

" आईची गौराई आली  ……."

वरच्या मजल्यावरून चोरून चोरून गौरीचा खेळ पाहत बसलेला माझा भाऊ बोलला … (खेळ पाहतोय कसला ???? टिंगल टवाळ्या करत असेल  ……  
" तुझ्या काय अंगात येत काय ग गौरीचं खेळताना ? " या आमच्या बंधुराजांच्या  गोड (????) प्रश्नावर दीदीच नेहमीच उत्तर "होय , का ? येतोस लिंबू द्यायला . की अंगारा द्यायला बसतोय ? माझा असिस्टंट म्हणून :P " ) 

माझ्या भावाने अगदी हळू आवाजात बोललेलं "आईची गौराई "हे वाक्य बरोब्बर आईच्या कानात पडल्या पडल्या तिचा गाणी सांगायचा सूर बदलला . 

" गौराई आलीया पावनी "तिने अर्ध्यावरच सोडलं . झिम्म्याच्या टाळ्या आपोआप जोरात पडायला लागल्या . आमच सगळ अंगण एका क्षणात नव्याने जिवंत झाल्यासारख वाटायला लागलं . 

काकीने घागर आणून ठेवली . वाहिनीची खडे शोधायची अन जोडाव्या काढायची गडबड …… घागर वाजली पाहिजे ना :) आजीने घरातल्या गौरीच्या समोरचं नैवेद्याच्या ताटात अजून चार वड्या आणि अर्धी भाकरी आणून ठेवली .

एकदम उत्साह आल्यासारखं आईने नवीन गाण्याला सुरुवात केली . 

" उप्परमाळी सांडल्या तुरी 
वेचता वेचता दमल्या पोरी 
आज गौराई आली खरी " 

 आईची गौराई आली  ……. :) 


2 comments:

Thank you for your comment :)