Jan232014

पान अन पान


अंगणातल्या वृंदावनाजवळ आज बराच वेळ पावलं घुटमळत होती . मनच लागेना घरात . काय काय विचार चालू होते डोक्यात त्या तुळशीच्या रोपट्याकडे पाहून.…
अगदी दोनच वर्ष झाली असतील . फार हौसेने लावलं होत हे तुळशीच रोप घरी . खर म्हणजे मी फक्त लावलं , रोप आणि त्याची माती आणून देण्याच काम आमच्या घरी येणाऱ्या काकूंनी केलं होत . त्यामुळे तुळशीपुढे दिवा लावताना मी रोज म्हणायची "या तुळशीच पुण्य सगळ काकूंच्या पदरात जाऊ दे " :)

आज तिथे पावलं घुटमळायच कारण म्हणजे  इतकी मस्त बहरलेली माझी तुळस ……. पण त्याची एक छोटी फांदी मलूल झाली होती. का  कोणास ठाऊक पण राहून राहून वाटत होत बिचारी एकटीच कशी कोमेजली असेल ?

तुळशीपुढे दिवा लावताना तिला थोडस अंजारल - गोंजारलं . अगदी हलक्या हाताने . दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे उठून पहिल्या किरणासोबत तिला अर्घ्य दिल . दोन दिवसात मलूल झालेली फांदी पुन्हा नव्याने तरारून उभी राहीली . बंर वाटलं फार . समाधान वाटलं .

अख्ख वृंदावन फुलून निघाल होत माझ्या अंगणात. एखाद्या फांदीने तसाही काही फरक नसता पडला . पण तरीही ……. मला न्हवत गमवायचं तिला . शेवटी तिच्यावरही मी पहिल्या दिवसापासून प्रेम केल होत .

हे सगळ सहज बोलता बोलता माझ्या " श्री अहो" ना सांगितलं . नेहमीप्रमाणे एक छानस स्मितहास्य देत म्हणाले "तुझ आपलं काहीतरीच असत वेड्यासारख. सुकलेल्या फांदीसाठी इतकं हळवं कशाला होतेस ? "

मी एकच वाक्य बोलले "तुम्ही तरी वेगळ अस काय करता ? हे सगळ मी तुमच्याच कडून शिकलिये :)" फार समाधानाने तुळशीला नमस्कार केला त्यांनी आज ……. मलाही बर वाटलं :)

आणि खरंच सगळ ह्यांनीच शिकवलंय . एखाद्या दिवशी मी हि अशीच कोमेजले तर मला नाही का सांभाळून घेत ? शेवटी कसं आहे ना ……. रोपावर आपलं प्रेम आणि विश्वास असला कि प्रत्येक पान अन पान जपतो आपण …… परिस्थिती बदलली तरी नाती असतातच ना , विझू नये म्हणून ओंजळ धरायला :)