जबरदस्तीचा राम राम


त्याचही तिच्यावर प्रेम आहे , तिला उगीचच वाटायचं
आवडतो त्याला गजरा म्हणून , दरवेळी त्याच्या मनासारखं नटायचं
बायको असूनही प्रीयसीसारखी, ठरलेल्या वेळेआधीच नेहमी पोहोचायची ती भेटायला
lucky girl असल्याचं, लागलं होत पुन्हा पुन्हा  वाटायला
सगळ कसं भोवती तिच्या फुलून आलं होत
पण कशावरून सोनंच असेल चकाकणार प्रत्येक नात ?

" तू चीडशील या भीतीनेच रोज येतो मी तुला वेळेत भेटायला "
मोरपीस फिरावं चेहऱ्यावरून , तो इतका अलगद बोलून गेला
पुढच्या क्षणी संपला ही हा विषय त्याच्यासाठी
पण तिच्या डोळ्यात ओल्याचिंब झाल्या, आजवरच्या सगळ्या भेटी
नको इतक्या भावनांचा कल्लोळ तिच्या डोळ्यासमोर दाटला
आज  हातात धरलेला तिचा हातही भीतीपोटीच असावा , असाही संशय वाटला

आवडतो म्हणून त्याने आणलेला , न्हालेल्या केसांवर तो माळलेला गजरा
पहिल्यांदा मिठीत आल्यावर , दोघांच्याही खाली झुकलेल्या नजरा
तिच्या हिरव्यागार चुड्याच्या किणकिणाटाने,  भरलेलं त्याचं देवघर
त्याचा तो थरथरणारा हात, पहिल्यांदा कुंकू कोरताना तिच्या कपाळावर
कायकाय म्हणून त्याने यातलं केल असेल घाबरून ?
त्याला पाठमोरा बघूनही , उगीचच आज काळीज येतंय भरून

ओझं व्ह्यायचं तिला म्हणून पोटातल्या बाळाला त्याने हाताने दिलेला आधार
झोपमोड नको तिची म्हणून , कितीतरी वेळा आवाज न करता लोटलेलं दार
साध्या सर्दी खोकाल्यासाठीही तिच्या , त्याने ऑफिसला मारलेली दांडी
अंगातल स्वेटर काढून द्यायचा तो … कारण काय तर तिला वाजतेय जास्त थंडी
कायकाय म्हणून त्याने यातलं केलं असेलं घाबरून ?
खांद्यावर ओझं जाणवतंय आज , उगीचच इतकं प्रेम घेतलं करून

 स्वतःची हार स्वतः जवळच मान्य करताना , तिच्या पापण्या झाल्यात जड
चौकटीचाच हललाय दगड , पुढे कसा पेलायचा हा अख्खा गड ?
कित्तीतरी प्रश्न , न संपणारा काळोख , दाटलाय तिच्या डोळ्यात
या सगळ्याच्या भीतीने , आलेला हुंदकाही  अडकलाय गळ्यात
कायकाय म्हणून त्याने आजपर्यंत केलं असेलं घाबरून ?
मी आपल उगाचच कवटाळत बसलेय ,
हा तर जबरदस्तीचा राम राम आहे ……. आणि तो ही दुरून :)

View Facebook Comments



शब्द...... आणि पंख गळलेली परी



सगळी कडूनच दाटून आलंय आज , पावसाची रिपरिप ही झालीये सुरु 
कळतच नाहीये ' तिच्या ' गोष्टीची सुरुवात कशापासून करू ?
असाच होतास न रे कोसळत पावसा , जेव्हा घरातून ती बाहेर पडली 
चिंब भिजवण्याआधी तिच्या हुंदक्यांची तू द्रुष्ट का नाही काढली ?
अश्रूत भिजलेला तो अस्पष्ट आवाज , तेव्हा शेवटचा होता रडत
तिलातरी कुठे होत माहीत ……. 
तुटेल ही वीणेची तार ……  जर अजून ताणली रागाने छेडत 

ती आणि तिचा तो ……… 

' ती ' म्हणजे गडगडणार आभाळ आणि ' तो ' मंदिरातला घंटानाद 
ती म्हणजे अखंड बडबड आणि तो म्हणजे पोवाड्यालाही स्मितहास्याची दाद
ती म्हणजे झरा खळखळणारा, तो तिला शांत करणारा डोह 
तरीही …तोच होता तिचं जग आणि ती म्हणजे त्याच्यासाठी कुणीही प्रेमात पडाव असा मोह

संभाषण दोघांचं नेहमी एकेरीच व्ह्यायचं, ती जागाच द्यायची नाही त्याला बोलायला 
त्यानेही नाही थांबवलं कधी तिला , नेहमी जवळ मात्र असायचा हातात हात घालून चालायला 
त्याची कधीच तक्रार न्हवती , त्याला ती मनापासून आवडायची
स्वतः बरोबर त्याच्याही आवडीची गाणी ती न कंटाळता त्याच्यासाठी गायची  

सकाळपासूनच त्या दिवशी ती जरा होती अस्वस्थ वाटत 
रात्र होई तोवर … पाझरणार पाणी गेलं डोळ्यात साठत 
कादंबरीतल्या कथेप्रमाणे …  त्याला नेमका आजच घरी यायला उशीर झाला
रडून लालबुंद झालेल्या तिच्या डोळ्यांनी नको इतका त्रागा केला 

एकदा जवळ ओढून त्याने , आजही केलंच होत तिला शांत 
पावसातच शमवायला बाहेर पडली ती, तिचा वेड्यासारखा चाललेला आकांत 
बस… रागाच्या भरात फक्त तिला , त्याला बोलायचं न्हवत काही
तिला एकटीला थोडा वेळ द्यावा म्हणून आज तो ही सोबतीला बाहेर पडला नाही 

कडेनेच चालत होती ती 

भरदाव वेगाने एक गाडी तिच्या पायाजवळ येउन थांबली 
कंठातून बाहेर पडणारी किंकाळी आज तिच्यासाठी कायमची लांबली 
जीवावरच आवाजावर निभावलं …… इतकचं काय ते सुख 
त्याला सोडून आज एकटी बाहेर पडली , हीच काय ती तिची चूक 

गोड आवाजाच्या शब्दांची माळ , ओठांची सांगत सोडून गेली 
अन त्याला आवडणारी तिची ती अखंड बडबड …… त्याच्यासाठी कायमची बंद झाली 
…………………. 



काही असेल बोलायचं , तर आता ती फक्त त्याच्याकडे पाहून हसते 
त्याला कधीही नको असणारी शांतता , त्या दोघांच्या मध्ये येउन बसते 
दिवसभर म्हणे आता …… ती एकटीच असते बसून 
चिमण्यांशीच काय ते तिचे मूक संवाद सुरु असतात , सार शांतपणे सोसून 

 रंगांच्या जोडीने भिंतीवरचा कोरा कागद , तिचं मन कसतरी करून रिझवतोय  
अन तिचा तो आवाज बस एकदा ऐकायला मिळावा म्हणून , ' तो ' सगळ्या देवळांच्या पायऱ्या झिजवतोय 

घड्याळाच्या टिकटिक शिवाय , काहीच नाही ऐकू येत म्हणे तिच्या घरी 
तिच्या बोलण्याच्या प्रेमात पडलेले सगळे म्हणतात ……. 
वार छातीत घेऊन फिरणारी , पंख गळलेली हीच खरी परी