May212014

तराजू मे तोलने का गजब उससे हो गया …….


कमरेची कळ आतापर्यंत खांद्याला पोहोचली होती . बस …… एकदा आईचा हात फिरवा पाठीवरून असं  राहून राहून वाटत होत. डोळे झोपेने किलकिले झालेच होते पण मिटायला तयार न्हवते . रात्रीचे ११ वाजले आणि या डोळ्यांचा असहकार …….


एक थेंब तिच्या गालावरून ओघळत शेजारी कुशीत निवांत झोपलेल्या तिच्या बालकृष्णाच्या गालावर पडला . आईच्या डोळ्यात दाटलेला पूर पाहून तो अजूनच बिलगून झोपला तिला . काय कळल त्या चिमुरड्याला कोण जाणे ? पण ती मात्र रात्रभर जागी ……. खिडकीच्या फटीतून आत येणाऱ्या रस्त्यावरच्या डांबाच्या प्रकाशझोताकडे पाहत


रात्रभर तिला तिचा बाबा आठवत होता . हो ……… ती तिच्या बाबाला ' ए बाबा ' अशीच हाक मारायची . शेजारची काकू नेहमी म्हणायची "बापाला एकेरी नावाने हाक मारायचे हे कसले संस्कार आहेत ??????" त्यावर तिचा बाबा छाती फुगवून सांगायचा "माझ्या मुलीचा मी पहिला मित्र . ती मला अहो बाबा म्हणून का बोलावेल ? माझी मैत्रीण आहे ती :)" आणि खरच त्याने ते नात आयुष्यभर जपलं 


तिच्या डोळ्यासमोरून बाबाची छबी काही केल्या हलेना . सगळे जुने दिवस झर झर डोळ्यासमोरून सरकत निघाले होते 


- रात्री ८ वाजता दमून घरी आला तरी तिला बागेत घेऊन जाणारा तिचा एव्हर ग्रीन बाबा 


- आईला सोबत म्हणून तिची कादंबरी वाचून होइतोवर रात्री उशिरापर्यंत काम करत बसणारा बाबा. का तर आईला कादंबरी वाचायला आवडते पण दिवसभर वेळ मिळत नाही . आणि एकांत आवडतो तिला यावेळी …… पण एकाकीपणा नाही :) म्हणून ही सोबत    


- मुलीच्या फीसाठी पैसे साठवताना नवीन बुटाची टाळाटाळ करणारा बाबा . आणि कारण काय तर नवीन बूट घातले की टाच  दुखते माझी . मी अभ्यंकर घालतो तेच ठीक आहे ( बरेच दिवस टिकत न ते )  


- बायकोचा मणका दुखतो पण तिचा दिवस दारात रांगोळी काढल्याशिवाय नाहीच सुरु होत , म्हणून ती उठायच्या आधी भल्या पाहते अंगण धुवून ठेवणारा बाबा .  


म्हणतात ना  ' घर दोघंचं असत , दोघांनी सावरायचं . एकाने विसकटल की दुसर्याने आवरायचं . ' पण तिच्या बाबाला हे ही माहित होत की घर नेहमी एकानेच आवरायचं असा नसतं :)


अशा कित्तीकती आठवणी आणि कित्तीतरी कारण बाबाची आठवण यायला .


त्या बाबाची लाडकी लेक तीच पाहिलं प्रेम आणि दुसर प्रेम तोलू पाहत होती . हो …… आयुष्यात ती ज्याचा पहिल्यांदा प्रेमात पडली असा पहिला वहिला पुरुष म्हणजे बाबा आणि दुसरा तिचा नवरा . दोघांना तिने तराजूच्या दोन बाजूना बसवलं होत . तोलू पाहत होती तिच्यासाठीच दोघांच प्रेम 


आणि तिचा हा वेडेपणा तिला झोपू देत न्हवता . बाबाचं पारड जड होत होतं नेहमी . तेच खाली जात होतं . डोळ्यातले विचार पाचोळ्यासारखे उडायला सुरु झाले होते. " माझा नवरा माझ्या बाबापेक्षा कमी प्रेम करतो का माझ्यावर ? तो त्याच्यासारखा का नाही ? " हे आणि असे अनेक …… 


पण तिला कोण समजावणार ……. 


बाप बाप असतो. मुलीच्या सुखासाठी तो तिच्या जन्मापासून झुकतच आलेला असतो .  तिच्या बालपणासाठी तो लहान होतो . तिच्या तारुण्यात तो तिचा मित्र होतो आणि लग्नानंतर तिच्या एका छबीसाठी आसुसलेला जीव . बापाचं पारडच काय ……. मुलीसाठी बाप नेहमीच झुकलेला असतो 


आणि नवरा …… बायकोच्या सुखासाठी ताठ कण्याने उभा राहतो तिच्या मागे . तिच्या सोबतीसाठी :)


म्हणून तिच्या तराजूत बापाचं पारड खाली आणि नवऱ्याच पारड वर जातं . 


आणि मी म्हणते ……. कोण सांगितलंय  तराजू हातात धरायला ? दोन्ही बाजूनी प्रेमाची उधळण तिच्यावरच होतेय ना ???? :) 


नांदा सौख्य भरे …… 


View Facebook Comments

May152014

वाटत … सगळ मागे टाकून


वेळच न्हवता जात आज दुपारी म्हणून सहजंच उघडला कप्पा
ते assignment papers , काळवंडलेला  खोडरबर , टोक तुटलेली पेन्सिल
गुण्या ……. एक टोक मोडलेला , तुटलेलं टोपण , शाईने भरलेलं कापड
ग्रंथालयाच पुस्तक , आयकार्डची लेस , बसची जुनी तिकीट
चुरगळून गेलेलं वेळापत्रक ,  कँटिनच बिल , पट्टी … अंक पुसट झालेली
झेरोक्सवाल्याचे द्यायचे राहून गेलेले २ रुपये  
हे आणि अस बररच काही …………
आणि या गर्दीतून बाहेर डोकावणारी  एक पक्की गाठ
तू बांधलेल्या फ्रेन्डशिप बॅंड ची ……….

बाहेर काढायचा माझा तो प्रयत्न , बऱ्याचश्या गोष्टीत अडकला होता तो धागा
पण का कोणास ठाऊक ……  मनगटावर येण्यासाठी शोधत होता जागा
कप्प्याच्या टोकाशी ठेवलेल्या कुंकवात बुडून एक टोक झाल होत लालबुंद
आपल्या दोघींच्या त्या गजऱ्याचा अजूनही येत होता त्याला गंध
पिनेच टोकही त्यातच अडकलं होत  आणि तू दिलेली अंगठी सुद्धा
ही  गाठ सुटणार नाही …… असाच म्हणायचा ना ग तुझा दादा ?

तुझ्या अक्षरात लिहिलेली आपली नावं , अजूनही तितकीच ठसठशीत
अन तुझ्या कपाळावरची चंद्रकोर , अजूनही त्यामागे तशीच
टिकली हरवली तर ही लावत जा म्हणत चिकटवली होतीस त्या मागे
मी आजही जुळवायला धडपडतेय , तुझे माझे हरवलेले धागे
खूप आठवण आली तुझी हे सगळ पाहून
बऱ्याचश्या गोष्टी आपल्या करायच्या गेलेत राहून

डोक्यावर चार तांदूळ टाकायलाही न्हवतीस तू हजर
तुझ्या पुढच्या वळणावरच आहे बघ माझ नवीन घर
बाळकृष्ण तरी माझा कुठे पाहीला आहेस तू अजून
मावशी …… म्हणायला शिकलाय तो आता गालातल्या गालात लाजून
तू दिलेली कुड्यांची जुडी लग्नाच्या पुजेदिवाशी होती घातली
सासूबाई म्हणाल्या …… बघा माझी गौराई कशी नटली  

वाटत …………
सगळ मागे टाकून एक दिवस तुझ्या घरी याव
पुन्हा एकदा मला तू तसंच मिठीत घ्यावं
गच्चीत तुझ्या पुन्हा एकदा कॉफी प्यायला बसू
येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर काहीतरी बोलून हसू
जमेल का ग आता आपल्याला 'ते' गाण म्हणायला  सुरात ?
इतक्या दिवसांनी दार ठोठवल्यावर घेशील ना मला पुन्हा घरात ?
:)