प्रेम - पैशाने विकत न घेता येणार


मधुरा …… या कथेची केंद्रबिंदू . पुढची सगळी गोष्ट हिच्या भोवती फिरत राहते . तिचं आयुष्यही असंच तिच्याभोवती गोल गोल फिरतंय . अगदी वर्तुळाकार . म्हणजे कुठेही मनाला बोचेल असा ९० अंशांचा कोन नाही की पोटात खड्डा पडावा असा अर्ध वर्तुळाकार लुप्त झालेला चंद्र नाही . सारं काही अगदी कोरल्यासारख . हो ……. पण हे वर्तुळाकार चित्र नियतीने कोरलंय . केंद्रस्थानी मधुरा असली तरी मार्ग ठरवणारी लेखणी तिच्या हाती नाही .

मधुरा हे तिच्या आईचं अगदी आवडीच नाव . आई म्हणायची मधुरा नावाच्या मुली फार गोड असतात . देवाच्या कमंडलूतून आई बाबाच्या ओंजळीत पडलेल्या अमृतासारख्या. त्यामुळे मधुरा आईच्या पोटात असतानाच तिचं हे नाव घरच्यांनी ठरवून ठेवलं होत . आणि तिच्या नावाप्रमाणे ती खरंच नावारूपाला आली .

शाळेत प्रथम क्रमांक कधीही सोडला नाही तिने . वक्तृत्व स्पर्धा तर तिच्या डाव्या हाताचा मळ असावा इतक्या सहजपणे जिंकायची . त्यामुळे शिक्षकांची चांगलीच लाडकी होती . शाळेतून बाहेर पडले की बरेचसे तारे निरभ्र आकाशात हरवून जावेत तसे लुप्त होऊन जातात . त्याचं पुढे काय झाल हे कोणालाच माहीत नसत .

पण मधुराच तसं नाही . शाळेबाहेरही तिने आपल तेज टिकवून ठेवल. बोलण्यात तोच बाणेदारपणा , स्पष्टपणा , आपल्या अभ्यासाशी प्रामाणिकपणा यामुळे बऱ्याचश्या प्रेझेन्टेशन्स बरोबर कॅम्पस इंटरव्हीयु मधेही तिने बाजी मारली . नाही नाही म्हणत एका महिन्यात ३ किल्ले सर केले . आणि सगळ्या मोठ्या पगाराच्या .

 आई हीच तिची सगळ्यात जवळची मैत्रीण  

जॉब निमित्ताने बेंगलोरमध्ये राहायला लागली . मनाची घालमेल बाजूला ठेवून लेकीच्या करियरसाठी आईने होकार दिला . "कोणी असेल तर सांगा ह ……. माधुरासाठी बघतोय आता " हे सांगायची वेळच नाही आली तिच्या बाबांवर . गुरुजींच्या भाकिताप्रमाणे " पदरात घातलेला पहिलाच नारळ लग्नाची ओटी समजायची " . आणि अगदी झालही तसंच .

तिला हवा तसा , तिला अनुरूप , तिच्याही २ पावले वरचढ नवरा आमच्या मधुराला मिळाला . सासर बेंगलोर नसल तरी नशिबाने तो बेंगलोरमध्ये स्थायिक असल्याने तिला नोकरी सुरु ठेवता आली . अगदी करियरच्या मागे लागणाऱ्यातील जरी ती नसली तरी आयुष्यभर अभ्यासू असणारी इतक्या लवकर नोकरी सोडायला तयार होणारी न्हवती . त्यामुळे बेंगलोरचा मुलगा म्हटल्यावर तिनेही लगेच होकार कळवला  


झालं …… डोक्यावर अक्षता पडल्या एकदाच्या पोरीच्या म्हणत तिचे घराचे सुस्कारा टाकतात तोच तिच्याकडून गोड बातमी समजली . :) सासूबाई म्हटल्या " पहिल्या अंगाऱ्याचा गुण आहे बंर हा ……. " लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच तिचं पिल्लू आल होत :) अगदी सगळंच कसं जुळून आल्यासारखं  झाल . पण या एका वर्षभरात बरंच काही घडून गेल राणी सरकारांच्या आयुष्यात

राजा राणी दोघेच राहायचे बेंगलोरमध्ये .  या ही अवस्थेमध्ये बराच शारीरिक त्रास सहन करत तिने आपला जॉब सुरु ठेवला होता पण ७ व्या नंतर डॉक्टरनी ताकीद दिली आणि मग नाईलाजाने तिला राजा मजूर करून घ्यावी लागली ( त्यातही बरीचं  दिव्य झालीत . आयत्या वेळी कोण नको का हिची जागा घ्यायला ऑफिस मध्ये ? ) . त्या दिवशी ऑफिसमधून पाय बाहेर टाकताना तिच्या मनाला हा विचार स्पर्शूनही गेला नसेल की हा माझ्या इथला शेवटचा दिवस असेल . परत हे सगळ मला कधी अनुभवता येईल ?  

देवदयेने गोंडस कन्यारत्न जन्माला आलं . ३ महिने आनंदात गेले . पण आता रजा संपत आली होती . काहीतरी कारणाने तिने ती वाढवून घेतली अजून ६ महिने . झाल त्या दिवसापासून तिच्या डोक्यात चक्र सुरु झाल . आजचं मरण उद्यावर ढकललय . पण उद्याचा सूर्य उगवायचा थोडीच राहणार आहे ? काहीतरी एक ठाम निर्णय घेण तिला भाग होत .

तिच्या नवरदेवानीही  तो निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली होती तिला . आता तिला जास्तंच जड जात होत . कारण तिला नेमक काय हवाय हेच ठरवता येत न्हवत . नाही …… तसं पाहील तर काही अपरिहार्य कारणांमुळे सासूबाई आणि आई दोघीनाही तिच्या घरी येउन राहण जमणार न्हवत . पण तिच्यावर घराच्या कुणीही नोकरीचा दबाव आणला नाही .

आता जॉब सुरु ठेवायचा म्हटलं तर तिच्यासमोर एकाच पर्याय शिल्लक होता . पाळणाघर ……. ज्याला आताच्या आयांनी एक सुधारित नाव दिलय Day  Care Center ……. सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत सुरु असत म्हणे तिच्या घराशेजारच पाळणाघर . बाकी मुलांना जेवण बनवून द्यायचीही तसदी नाही . सगळंच पाहतात ते लोकं ( ते काय पाहात असतील याची तुम्हा आम्हा सर्वाना कल्पना आहेच की हो )  मुलांना खेळवंतात , झोपवतात , जेवू घालतात , अभ्यास सगळ एकाच ठिकाणी ……. म्हणजे एका दगडात सगळे पक्षी मारल्याचा घरच्यांना आनंद :-|

पण ह्या पर्यायावर मधुराने साफ नकार दर्शवत एक मोठी फुली मारून टाकली . तिच्या मुलीला तिला त्या Day  Care Center मध्ये ठेवायची अजिबात तयारी म्हणती . मग त्यासाठी तिला काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल . तिच्या मते , लहान मुलाला पाळणाघरी ठेवण म्हणजे  आपल्या आई बाबांना वृद्धाश्रमात ठेवण्यासारखाच आहे . म्हणजे असं …… की दोघेही अशा वयात असतात की त्यांना आपली गरज असते …… आपली म्हणजे आपल्या असण्याची , सहवासाची , सोबतीची . आणि नेमके त्याच वेळी आपण पैसा किंवा करियरच्या मागे धावत या गोष्टी जमेतच धरत नाही .  

पण सगळ्या गोष्टींचा सारासार विचार झाल्यावर मधुराचा निर्णय पक्का झाला . तिने जॉब सोडून दिला . तिच्या या यातना तिच्या तिलाच माहीत . काय कमी दुखः झाल असेल काय त्या पोरीला . इतक्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडायची म्हणजे एक पाय कोणीतरी कापून अपंग झाल्याची  भावना . वर तिचा निर्णय म्हटल्यावर धड उघड उघडपणे मनाची सलं सांगताही येईना कोणाला . म्हणजे सल ही फक्त आर्थिकच होती असं नाही पण स्व-अस्तित्व नावाचा प्रकार फार महत्वाचा आणि तो टांगणीला लावायचा म्हणजे महादिव्य .

 बाकी मार्केटमध्ये परत प्रवेश करायचा म्हटलं तर resume वर किती मोठा gap दिसतोय कोणास ठाऊक हि भीती वेगळीच . नॉलेज जुनपुरण होणार नाही याचीही काळजी तिलाच घ्यावी लागणार होती . ज्या मुलीने आयुष्यभर पहिला नंबर नाही सोडला तिच्यासाठी हा प्रकार म्हणजे फुलपाखराचे पंख गळून पडल्याचा प्रकार होता . त्त्यातही भर म्हणजे आपला समाज …… "तुझी बायको फार दिवस नोकरी करेल असं वाटल न्हवतच ." किंवा मग " काय करणार …… सगळे कष्ट वय गेल न ग तुझे . वाटल होत पुन्हा जॉईन होशील पण नाही जमल तुला " असे शालुतून जोडे होतेच तयार .

खरच रिझाइन केल तेव्हा तब्बल १ आठवडा रडून काढला पोरीने …… आणि तो ही एकटीने. अवघड जागेच दुखण . सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था . तिच्या नवऱ्यालाही समजेना हिला कसं आणि काय समजवावं .  

बरोबरीला तिचा मैत्रीण परिवार होताच …… ज्या सगळ्या या सगळ्यातून "तो " सोयीस्कर पर्याय निवडून स्वतःला तारुन नेल्या . मग तिला अजूनच भांभावाल्यासारख व्हायचं . "मी करतेय ते चूक की बरोबर " असं कितीतरी वेळा तिने स्वतःलाच विचारलं असेल . तिची घालमेल तिची तिला जाणवत होती पण बाळाच्या हक्काली आई तिला तिच्या करियरवर बळी चढवायची न्हवती . आणि हे तीच स्वतःपुरत मत होत . बाकी सगळ्या मैत्रिणी आयाच असल्या तरी प्रत्येकीने वेगळ्या परिस्थितीतून वाटचाल केली असणार हे नक्की . तिच्या पायवाटेवर तिला तिचा हा निर्णय योग्य वाटला

आपल्या करियरचा आलेख इतक्या वेगाने वर चढत असताना ते सगळ कुणासाठीतरी सोडावं लागण फार महाभयंकर . पण जे कोणी तिला खरंच ओळखत होते , ती काय करू शकते याची कल्पना असणाऱ्या सर्वांनी तिच्या या निर्णयाच मनापासून कौतुक केल .

पुढे काय करू काय नको या विचारात असतानाच तिच्या नवऱ्याला एक छानशी संधी चालून आली . आता मधुरा सध्या कुटुंबासोबत US  मध्ये असते . तिच्या पिल्लासोबत मजा करतेय . पिल्लाला त्याची हक्काची आई मिळाली आणि मधुराला तिचं हक्काचं आईपण . आता तिच्या Salary अकाउंटमध्ये स्वतःचे काहीही जमा होत नसले तरी रोज एक गोड गोड पापाने सुरु होणारी सकाळ , भरपूर प्रेम , आनंदाचा एखादा डोळ्यातला थेंब आणि खूप सार समाधान न चुकता जमा होतंय तिच्या मनात

खुश आहे आता ती . पण याचा अर्थ तिने सगळच सोडलाय असा होत नाही . दिवसातून जेमतेम १ ते १ १/२ तास रिकामा मिळत असेल तिला . पण त्यातही तिने स्वतःचा गायनाचा छंद जोपासलाय . ज्या platform वर ती काम करायची ( अहो ती ही software  engg  आहे ) ते सगळ updated  राहावं म्हणून घरूनच छोटे मोठे प्रोजेक्ट करत राहते .  


भारताबाहेर , घरापासून दूर राहून बरच काही शिकायला, पाहायला मिळतंय तिला . नवीन प्रकारची माणस , त्यांचे स्वभाव , वागण्याची पद्धत नी बरच काही . नाती जपण्याची कला , नाती तयार करणारी गालावरची एखादी खळी , एखादा प्रेमाचा स्पर्श , भले मग समोरच्या व्यक्तीची भाषा न समजणारी का असेना , हे आणि असं बरंच काही ……

म्हणूनच सुरवातीला म्हटलं न …… तिचं आयुष्य वर्तुळाकार आहे पण मार्ग आखायची लेखणी तिच्या हाती नाही :)

रिकामा वेळ मिळाला विचार करायला की भावनांचे कल्लोळ अजूनही उठता मनात तिच्या. वर झेप घेणारा एक आलेख मागे सोडून आलेय खरी पण त्या बदल्यात बरेचशे आजूबाजूचे आलेख वर चढत आहेत तिचे . जे तिच्या कधी लक्षातच न्हवत आल आजवर . ओंजळ रिकामी करायचं धाडस असावं लागत …… खरच नवीन फुल आपोआप फुलून येतात रिकाम्या ओंजळीत . हे धाडस तिने केल .

अजूनही बरेचजण उलट सुलट प्रश्न विचारात राहतात तिच्या या निर्णय बद्दल . तिने आता उत्तर देण सोडून दिलय. स्पष्टीकरण मागणारे फुंकर घालायला कमी आणि खपली काढायलाच जास्त उतावळे असतात हे समजून चुकलय आता तिला

पण मागे सोडलेल्या " त्या " गोष्टीबद्दल तिला अजूनही खात्री आहे . अजुनही तिला वाटत की एखादी संधी पुन्हा उभी  राहील हात पसरून पुढे . ज्या दिवशी तिची , तिच्या पिल्लाच्या आयुष्यातली गरज कमी होईल तेव्हा पुन्हा एकदा नव्याने झेप घ्यायचं ठरवलंय तिने . बघू ……. कस कस जमतंय

पण मागे सोडलेल्या " त्या " गोष्टीबद्दल तिला अजूनही खात्री आहे . अजुनहि तिला वाटत की एखादी संधी पुन्हा उभी  राहील हात पसरून पुढे . ज्या दिवशी तिची , तिच्या पिल्लाच्या आयुष्यातली गरज कमी होईल तेव्हा पुन्हा एकदा नव्याने झेप घ्यायचं ठरवलंय तिने . बघू ……. कस कस जमतंय

कुणी विचारलं तर ती आता इतकंच सांगते …. माझ्या नियतीत उत्तम करियरपेक्षा उत्तम नवरा आणि पैशाने विकत न घेता येणाऱ्या प्रेमाला झुकत माप होत . अजून उभं आयुष्य पडलंय हरवलेलं पुन्हा शोधायला . पण माझा बाळकृष्ण रांगताना, बोबडे बोल बोलताना , पहिलं पाऊल टाकताना , पहिल्या दिवशीच्या शाळेतून पळत येत घट्ट मिठी मारताना मला परत कधीच पाहायला मिळाला नसता . आयुष्याची सगळी कमाई बाप्पाच्या पायावर ओतली तरी दिवस उलटे फिरून जाऊ शकत नाहीत . त्यापेक्षा थोडावेळ विश्रांती घेतली तर काय चुकल ?



   

अनामिक वाचक

                                                    Deva-kṣa.png


" मी क्ष ,

अमृता , फार उत्तम लिहितेस ग तू . वेड  लागेल कुणालाही वाचून . सरस्वती नाचते का तुझ्या वाणीत आणि लेखणीत ? कसं सुचत ग तुला ?  एखाद पुस्तक का नाही ग publish करत तू ? अग खर सांगू का ……. बऱ्याच वेळा वाचताना वाटत राहत , हे माझ्याही बाबतीत झालाय …. हिला इतक कस अचूक लिहायला जमत ? पाठ चेपनाऱ्याला आपली दुखरी नस सापडावी अगदी तसंच काहीसं लिहितेस बघ …… कुणाच्या मनात काय बोचतंय हे अजून जाणतेस :) अशीच लिहित राहा ……… "

अहो ……… इतकी प्रेमळ comment नसली जरी आली आजवर माझ्या ब्लॉगवर येतात थोड्याफार प्रतिक्रिया ……. आणि हो आवडतात वाचायला मला त्या . मी कितपत कुणाच्या मनात उतरू शकले याच गणित मांडता येत ना मला . नाहीतर मग " शून्य प्रतिक्रिया " म्हटलं कि गोळाबेरीज चुकते सगळी …… 

बर , आता तुम्ही म्हणाल "हिला post  जास्त महत्वाची की त्यावरच्या इतरांच्या प्रतिक्रिया ?" तर याच अगदी प्रामाणिक उत्तर तयार आहे माझ्याजवळ . हा ...........आता ज्यांना आधीपासूनच भरभरून प्रतिक्रिया येतात ते करू शकतात माज.  " मला कुणाच्या प्रतिक्रियेशी जास्त लळा  नाही . मी माझ्यासाठी लिहितो . कुणा दुसर्या साठी नाही . वगैरे वगैरे " 
 पण मी मात्र लिहिते ……. स्वतःला सुचत म्हणून कागदावर उतरवते आणि तुम्हा सर्वांना  वाचायला आवडत म्हणून इथे publish करते . आणि हो त्या क्षणापासून वाट पाहत राहते , प्रतिक्रियांची …… काय आहे , गणित मांडायचं असत न आपल्याला .....मनाच्या उंचीच आणि खोलीच :)

आणि ज्या सगळ्या प्रतिक्रिया आजवर मिळाल्या त्यात एक वाचक आहे ……… त्या वाचकासाठी ही माझी post " अनामिक वाचक " क्ष . 
हो क्ष ……. आता ज्याच नाव नाही माहित त्याला काय नावं ही ठेवता येत नाहीत आणि धड नावजताही येत नाही :)  

या क्ष बद्दल थोडस …… 
अस मी काहीही म्हणणार नाही . अहो मलाच काही माहित नाही तर थोड थोडक तरी काय म्हणून ओळख करून देणार ? ओळख इतकीच की आजवरच्या माझ्या बऱ्याचश्या  post वर " Anonymous " अशी प्रतिक्रिया देणारी एक व्यक्ती . 

त्रास होतो हो फार . एखाद्या माणसाला आपली ओळख लपवाविशी का वाटत असेल ? काय कारण असेल या मागे ? नाही …… तस पाहील तर प्रतिक्रियाही छान लिहिलेल्या असतात आणि मनापासूनच्या असतात . मग हा नावाचा लपंडाव कशासाठी ? मला कळल तरी हवं ना इतक्या आवडीने कोण वाचताय माझं लिखाण   

तसही या अनामिकपणाचा मला राग येतो .शाळेत असल्यापासून सहन करतेय हो मी . गणितामध्ये कोणत्याही आकड्याला " क्ष " मानताना मी चिडायची . 
म्हणजे कस …… "या जागेचे क्षेत्रफळ क्ष मानू " किंवा मग "तिसऱ्या खांबाची उंची क्ष मानली तर दुसऱ्या खांबाची ३. ५ क्ष असेल " असंच काहीस . 
YUKK...... म्हणजे हे कस झालाय माहितीये का ? तुम्ही चिंचेच्या बुटुकाच वजनही "क्ष"च मानणार अन त्या तांदूळ भरलेल्या पोत्याचाही . कसं  शक्य आहे राव ????? म्हणून मला हा " क्ष " प्रकार नाही आवडत . 

" माणसाने कसं काचेसारख पारदर्शी आणि आरशासारख स्वच्छ असावं . " इतक्या सभ्य शब्दात मी माझी नाराजी व्यक्त करायला मी काही संत बिंत नाही . कोल्हापुरी खेळते माझ्या जिभेवर म्हणून जरा स्पष्टच बोलते " ताकाला जावून भांड लपवू नये माणसाने " 

बाकी ……… तुमची इच्छा 

नावासहित ओळख करून दिलीत तर आभार . नसेल द्यायची तर माझी काही ……… हरकत नाही . आजही तितक्याच आवडीने वाचेन तुमचे प्रतिक्रियेचे शब्द . चूक भू माफी असावी . 

वाट पाहतेय ……. प्रतिक्रियेची

क्ष ही चालेल बंर मला . माझ्या ओळखीतल नवीन नाव समजेन मी :)  

काय करणार ……. गणित मांडायचं तटलय हो :)  

जित्याची खोड मेल्याशिवाय थोडीच जाणार आहे :)

आपल्या प्रतिक्रियांबद्दल मी आपली आभारी आहे 
     

Golden boy

गोड या शब्दाचा गोडसरपणा मला याआधी कदाचीत कधी कळलाच नसावा .कुणी इतकं गोड कसं  असू शकत ?   माझीच  नजर तर नसेल ना लागत कधी ? पापणी लववावीशीच नाही वाटत . एकटक नुसत पाहत राहावं त्याच्याकडे . 

किती आणि कुठून सुचतात तुला इतके सगळे प्रश्न ? कुठल्या मातीचा बनवलाय तुझा मेंदू देव बाप्पाने ? डॉक्टर काकांनी डिलिव्हरी रूममध्ये तुझं  ठेवलेलं नावाचं योग्य आहे अगदी  " Golden boy …….  दसऱ्या दिवशी देवबाप्पाच्या घरून चालत आलेलं सोन आहे हे :) " हो …… अगदी असंच म्हणाले होते .  

तुझ्या  सोनेरी पावलांनी आजीच घर भरून टाकलस तू . अन बाबा तर काय ……. स्वर्ग सुख अनुभवत असतात तुझ्यासोबत . 




सांगू का बाबांना …. तुमच्या लाडक्या लेकाने रडून गोंधळ घातला म्हणून . बंर …… कारण काय असावं तर तुझ्या आणि बाबांच्या लग्नात मला का नाही नेलं  बरोबर :) :) कसले भारी प्रश्न पडतात रे तुला …… आता काय उत्तर देऊ ??????

हो ……. आणि तुझ्या Cockroach fly ची गम्मतही सांगितली बर मी सगळ्यांना . Butterfly … fly करत म्हणून त्याला Butterfly म्हणतात तर Cockroach ला Cockroach fly का नाही म्हणत ? आई शप्पथ सांगते …. २५ वर्षांच्या या आयुष्यात मला हा प्रश्न कधीही पडला नाही . खरंच …… म्हणूनच त्या दिवसापासून तुझ्या आई बाबांसाठी Cockroach fly हेच बरोबर 

आता त्या दिवशीचच घ्या ना . 10 Little Fireman म्हणत बसला होता एकटा एकटाच . मध्येच काय झालं धावत आला स्वयंपाक खोलीत "आई, Fireman काय करतात ग ? " त्याला समजेत अशा शब्दात मी त्याच्या प्रश्नच समाधानकारक उत्तर दिलं . (माझ्या बाबांनी मला १० वेळा सांगितलंय . त्याच्या प्रत्येक प्रश्नच समाधानकारक उत्तर तुला देता आलं पाहिजे. ते जर नाही जमलं  तर तुझी सगळी प्रशस्तिपत्र वाया … हो अगदी UT सुद्धा  :) ) माझं  वाक्य पूर्ण होण्याआधी त्याचा पुढचा प्रश्न " Postman आपली letter post करतो ना . मग म्हणून तो postman . मग fireman चूक आहे ……. त्याला waterman म्हटलं पाहिजे . तो fire विझवतो . लावत नाही काही . त्या book  वाल्या काकांना काही ……. कळत नाही . " आता झाली न रावं पंचाईत . २ मिनिटासाठी वाटलं  जर आता नाही उत्तर सुचल तर गेली ……. माझी सगळी बुद्धी वाया गेली आज  :)  

आई चिडली तर तिला कसं शांत करायचं याचही टेकनिक आहे त्याच्याकडे . इतक्या वेळा समजावूनही एके दिवशी तो आईच्या औषधाच्या स्ट्रीपकडे पाळला  . मी सूर चढवला "पिल्ला …कित्तीवेळा सांगितलंय ???? दुसऱ्यांच्या औषधाला हात लावायचा नाही " माझ्या डोळ्यांपेक्षा मोठे डोळे करत जवळ आला आणि म्हणाला "दुसऱ्याची मम्मा आहेस तू ? मम्मा माझी … मग ते औषधही माझंच झाल ना . " एकदम impressive उत्तर दिलं पठ्ठ्याने :)




झालय काय माहिती आहे का … जर्मनीमध्ये आला तेव्हा खूपच लहान होता ना हा बाळकृष्ण . पण आता लागलाय Chaou , Tschüss करायला . इंडिया ट्रीप ही कारणा कारणानेच होते म्हणा ना . म्हणजे इथे आल्यापासून २ वेळाच . पहिली मामाच्या लग्नासाठी आणि दुसरी काकाच्या लग्नासाठी . त्यामुळे त्याला वाटत आजीकडे जायचं ते फक्त लग्नासाठीच . कुणीही विचारा "आता कधी येशील परत ?" पटकन उत्तर देतो "आता लग्नाला " :) 

मामाचं लग्न झाल्यावर मामी घरी आली. काकाने काकी आणली . मला म्हणतो कसा "का ग ……. मामी , काकी आता तिच्या आईकडे नाही राहणार ? त्या दोघांना आवडल्या त्या म्हणून घेऊन आलो आपण त्यांना आपल्या घरी ?" मी ही तितकंच सहज उत्तर दिलं "हो ……… आवडल्या म्हणून आणल्या . " झालं …. दिवसभर डोक्यात हेच चक्र सुरु होत दिवसभर साहेबांच्या . निरभ्र आकाश पाहत संध्याकाळी मी गच्चीत उभी असताना मला त्याचा आवाज आला . म्हणजे तो बोलत होता कोणाशीतरी . " आता तुझ आणि माझ लग्न झालंय . तू मला आवडतेस . मी घरी घेऊन जाणार तुला . आजपासून तू माझ्या बरोबर रहायचास . आई राहते न बाबाच्या घरी … तशीच " मला रहावेना . मी पटकन डोकावून पाहील तर हा त्याच्या आवडीच्या गाडीशी बोलत होता :) बाबांनी वाढदिवसाला गिफ्ट दिलेली कार एकदम प्रिय बंर आम्हाला :) तांदळाचे चार दाणे घेऊन तिच्यावर उधळत होता . 

आकाशाची निरभ्रता फिकी वाटावी इतकी स्वच्छ असतात ही चिमुरडी मनं . कुणीतरी आवडलं की घरी आणायचं असेल तर लग्न करायचं इतकच माहीत त्याला :) . मग मी ही सामील झाले  त्याच्या या खेळत . टाकले मी ही चार दाणे अक्षता म्हणून . कित्ती आनंद झाला म्हणून सांगू त्याला . पळत येउन इतका छान बिलगला मला . म्हणतात ना … जगातील सगळी सुखं एकीकडे आणि आई होण्याच सुख एकीकडे . त्याची तुलना कशाशीही नाही . :) 

View Facebook Comments



दिस शेवटचा


वाहून गेले सारे , घट्ट रोवलेली माती 
थांबवावे कुणी कुणाला असा एकही बांध राहीला नाही 

कोसळून भिजवायचा चिंब , आता मुसमुसतो त्या ढगात  
लपवावा ओलावा गालाचा इतका पाऊसही शांत राहीला नाही 

तुझ्या अंगणाशी झुकली रातराणी पण गंध राहीला नाही 
अन ती हुंगण्याचा मलाही आता छंद राहीला नाही 

सुटली आता गाठ , पुन्हा जुळणे नाही 
ऱ्हदयाला पडावा पीळ असा बंध राहीला नाही 

गेल्या विरून साऱ्या काळजातल्या जखमा 
आठवणीची उठावी कळ, असा वारा मंद राहीला नाही  

सरती मागे पाऊले , पुन्हा त्याचं भीतीने वेदनेच्या  
बेधुंद घ्यावा श्वास , इतका विश्वास नितांत राहीला नाही  

शब्दांच्या खेळात कधीचेच झाले बंद तुझे येणे 
कुठल्याच भावनेशी का तुझा संबंध राहीला नाही ?

गेली का सांग राहुनी , सरती भेट ही ती शेवटची 
बरंय …… दिस शेवटीचा म्हणून कुणी निंद्य राहीला नाही 

लाख झाल्या चुका , लाख गुन्हे केले 
पण …… 
सगळ्या पोटात घालण्याइतका मोठा एकदंत राहीला नाही 

सुखी तुझ्या घरी तू , मी आनंद माझ्या घरचा 
वळाव्या वाटा मागे , असा स्पंद राहीला नाही   

गोकुळ नांदते घरी बाळकृष्णाच्या पायी 
देवकी यशोदेचा कुठेही आता नंद राहीला नाही