ती सध्या काय करते ?
बराच गाजलेला मराठी चित्रपट मी गेल्या काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच पाहत होते . सोफ्यावर आमचे चिरंजीव बाबाला रेलून ... खूप मन लावून सगळे डायलॉग्ज ऐकणं सुरु होतं आणि मी आपली भारतीय बैठक मांडून , कन्यारत्नाला मांडीवर घेऊन
तुम्ही म्हणाल ... हे काय ? आमचाही पाहून झालाय ' ती सध्या काय करते ? '
हो .... कल्पना आहे मला . तुमचा नक्कीच एकपेक्षा जास्त वेळा पाहून झाला असेल आणि आता तुमच्यासाठी तो जुनाही झाला .
काय करणार :( मी थोडी (नाही बऱ्याचं ) उशिरा पाहते हल्ली मराठी कार्यक्रम ..... म्हणजे कसं माहितीये . लोकांनी चावून चावून चोथा करून झाल्यावर मग मी जाते पाहायला नेमकं ती सध्या काय करतेय ते :D
असो .... तर सांगायचं मुद्दा हा .... कि आमचे चिरंजीव फार मन लावून ऐकत होते सगळं
मध्यंतर नंतर बोस्टन वरून परत आलेली ' ती ' आणि तिचे बाबा यांच्यात एक संवाद दाखवलाय . तिच्या बाबाना ती पेल्यात बाटली रिकामी करून देते (आता कसली बाटली ??? हा प्रश्न कृपा करून नका विचारू) बाटली रिकामी झालेली असतानाही तिचे बाबा ती पुन्हा उलटी ठेवतात ... का ?
ती ही असाच विचारते "अहो बाबा संपलीये ती "
आठवतंय ?? बाबा काय उत्तर देतो ??
" हे जे शेवटचे उरलेले थेम्ब असतात ना त्यांना लव्ह ड्रॉप्स म्हणतात ..... जो हे पितो तो आयुष्यभर रोमँटीक राहतो म्हणे "
स्क्रिनवरच हे वाक्य संपते न संपते तोवर इतका वेळ समाधी लावल्यासारखा बाबाना रेलून बसला होता तो आमचा चिरंजीव ताडकन उठून उभा राहिला .
एकदा आईकडे आणि एकदा बाबांकडे फक्त डोळ्यांनीच बघून झालंही त्याच ..... मानेची अजिबात हालचाल न करता
मला वाटलं नेहमी स्क्रिनवर असाल काही पाहील कि जे विचारतो त्याप्रमाणे परत याला काहीतरी शंका आली असणार . त्यामुळे त्याचा प्रश्न तोंडून बाहेर पडण्याआधीच मी सांगून मोकळी झाले "अरे पिल्ला , ज्युस असतो तो ."
माझं वाक्य त्याने मधेच थांबवल . बाबांकडे डोळे मोठे करून , भुवया उंचावून स्वारी एकदम आनंदात येऊन म्हणाली
"बाबा , आपणपण आता रोमँटीक होणार .. "
आणि त्यानंतर घरी १ मिनिट स्मशान शांतात
हे म्हणजे कसा झालं माहितीये का , असले झरे आमच्या घराकडे वळू नये म्हणून भक्कम बांध घालून ठेवलेत तरीही एका क्षणात आलेली शंका ... आमच्या अंगणात ओलं आली कुठून ?
पण हा काहीतरी वेगळंच म्हणतोय हे त्याच्या आनंदी चेहऱ्याकडे बघून जाणवत होतं .
डोळ्याला आठ्या पडून मी ही विचारलं "रोमँटीक ???? आपण ???? म्हणजे????"
एकतर हा काय म्हणतोय याच गूढ आणि दुसरं म्हणजे रोमँटीक या शब्दाचा अर्थ याला कळतो ??? याचा धक्का
सगळं एकदम पचवणं जरा अवघडच झालं होत मला .
सोफ्यावरून दाणकन उडी मारून हा स्वयंपाक घरात गेला आणि काहीतरी हातातुन घेऊन आला . मांडी घालून माझ्या समोर बसत त्याने चक्क प्रात्यक्षिक सुरु केलं
"मम्मा , ही टोमॅटो सॉसची बाटली . तू अशीच ठेवतेस की नाही नेहमी .. उलटी . आणि विचारल्यावर हेच सांगतेस वाया जायला नको म्हणून .
मग ..... ते सिनेमामध्ये काका म्हटले तसं तूच घेतेस हा सॉस अगदी शेवटच्या थेंबापर्यंत . म्हणून ....... आपणसुद्धा असंच आयुष्यभर रोमँटीक राहणार . "
आई ग ....... हसावं की रडावं हे मला अन अहो दोघांनाही समजेना
त्याच्या सॉस ने माझा सास चा ठोकाच चुकवला
बाबा डोक्याला हात लावून जोर जोरात हसत होता आणि हा पठ्ठ्या उलट्या सॉसच्या बाटलीतून कसे थेम्ब खाली पडतात ते नजर बारीक करून न्याहाळत होता :)
भारी वाटलं ..... खरंच ... आपल्यासारख्या न बाटलेल्या माणसांच्या घरी सॉसचे थेम्बच लव्ह ड्रॉप्स असतात हा एक नवीन शोध लागला आज .
पण या सगळ्यावरून एक गोष्ट नक्की कळली मला ..... " ती सध्या काय करते " हे नाही पाहिलंत तरी चालेलं पण मंडळी .....
तुमचा ६ वर्षांचा चिमुरडा .. तो सध्या काय करतो .. या कडे मात्र नक्कीच तुमचं लक्ष असं गरजेचं आहे .
आपल्या बारीक सारीक हालचालींवर ही या महाभागांचं फार लक्ष असतं बरं का !
:)
तर .... कसा वाटला माझा
"तो सध्या काय करतो ?" ?
आवडला ना ??