येस.... अगदी बरोबर. टेंशन ला बाय आणि पेंशन ला हाय करण्याचा अमृत मुहूर्त आमच्या घरी आज साजरा झाला
. १९८१ पासूनच्या जबाबदारीतून बाबा आज सेवानिवृत्त झाले.
अनिल गजानन जाधव , स्टेट बँक ऑफ इंडिया
शून्यातून इतकं सुंदर विश्व निर्माण करणाऱ्या या तपस्वी ला माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
खरं तर खूपच कमी वय असताना आलेली म्हणा किंवा स्वतःहून आनंदाने स्वीकारलेली म्हणा .. पण बाबांनी ही जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे निभावली . स्वतःच शिक्षण पूर्ण करत सुरवातीला बाबा टायपिंग चे वर्ग घ्यायचे. त्या ठिकाणी बाबाचं होतो म्हणून शक्य झालं त्यांना हे सगळं. मला खरचं नसतं जमलं.
मग मिळाला एक मोठ्ठा परिवार. स्टेट बँक ऑफ इंडिया. पहिले काही वर्ष श्रीरामपूर मग अब्दुल लाट, कोल्हापूर, मलकापूर .... आणि पुन्हा कोल्हापूर . बाबांचा हा सगळा प्रवास मी खूप जवळून पाहिला आहे. आपल्या पदाचा किंचितही गर्व न करता राहणी किती साधी असावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाबा.
बॅंकेतून कितीही कंटाळून घरी आले तरी मला बागेत घेऊन जाणारे बाबा ...
मार्केट यार्ड शाखेत असताना उत्तम टेबल टेनिस खेळणारे बाबा...
बँकेच्या वार्षिक स्नेहसंमेलन वेळी दणदणीत टाळ्या मिळवलेले एखादं फक्कड मराठी गाणे म्हणणारे बाबा ...
मित्रांमध्ये ever green personality म्हणून ओळख असणारे बाबा ...
केसांना मस्त वळण पाडून, लाटा लाटांची हेअर स्टाईल करणारे बाबा ...
आपलं काम सांभाळून नेहमी आईच्या सोबत राहणारे बाबा ..
बॅंकेतून सुट्टी घेऊन नातवंडा सोबत रमणारे बाबा ...
या आणि अशा बऱ्याच सुवर्ण आठवणी .
मी ऑफिस मध्ये जायला लागल्यापासून खूप वेळा वाटलं, सांगावं बाबांना ... "आता घ्या निवृत्ती. खूप केलं आम्हा सर्वांसाठी. " पण बाबांना थांबा म्हणाण्या इतकी मी कधी मोठी झालेच नाही कदाचित. ☺️ हा माझा अधिकार नाही आणि ही माझी योग्यता ही नाही ..
आम्हा मुलांच्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी , " मी आहे ना . नको काळजी करू " या बाबांच्या एका वाक्यावर आमचा वाकलेला पाठीचा कणा अजूनही ताठ होतो.
" ज्या संस्थेने आपल्याला इतकं मोठं केलं त्या संस्थेला सोडून जाताना वाईट वाटतं. " हे बाबांचं सेवा निवृत्तीचं वाक्य
मी समजू शकते या भावना पण तरीही ....
नो .... आता वाईट वगैरे वाटून घ्यायचं नाही . आता नुसतं एन्जॉय एन्जॉय
खूप केलंय हो ... अगदी अभ्यंकर ची चपला झिजेतोवर कष्ट केले .
आता तुम्ही बसायचं आणि आम्ही करायचं.
नवीन भाषा शिकण्याची तुमची हौस पूर्ण कुठे झालीय अजुन. खूप ठिकाणं फिरायची राहिली आहेत . तुमच्या आवडीची जुनी गाणी निवांत बसून ऐकून कित्ती दिवस झाले असतील. आई सोबत फिरायला कधी पासून जायचं ?
आता टेबल टेनिस ला तुमचा पार्टनर म्हणून जावई . लाटा लाटांची हेअर स्टाईल शिकायला नातू कधीचा उत्सुक आहे.
नातीला आजोबांसोबत सायकल ची फेरी करायची आहे.
आणि मला..... तुमच्या जवळ बसून भरपूर गप्पा मारायच्या आहेत.
जबाबदारी मुळे सुटून गेलेले सगळे आनंदी क्षण परत जगायचे ☺️
सेवानिवृत्ती म्हणजे कोरा कागद.... तुमच्या आवडीचे रंग भरण्याची मुभा .
सेवानिवृत्ती म्हणजे कोरा चेक..... कितीही मोठी रक्कम भरा .... तो नक्की वठणार☺️
आणि योगायोग म्हणजे निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी तुमचा वाढदिवस .... ६० वर्ष पूर्ण
गणपती बाप्पा तुम्हाला निरोगी आरोग्य , आनंदी आयुष्य, चैतन्य, समाधान , भरभराट देवो . हीच माझी बाप्पाला प्रार्थना 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏
ज्या दोघांनी मला इतकं सुंदर आयुष्य दिलं त्यांचं आयुष्य याहून अधिक सुंदर आणि चैतन्यदायी कर.