Oct272023

बाबांचं गाण....अभूतपूर्व



आपल्या मुलांना व्यासपीठावर भाषण म्हणताना, गाण म्हणताना, बक्षीस घेताना बघण्याचा आनंदी योग सगळ्याच आई बाबांच्या आयुष्यात येतो...आम्हीही घेतला आहे हा आनंद , घेत आहोत

पण यापेक्षाही जास्त आनंद ... हृदय भरून का काय म्हणतात तो .. आभाळाएवढा ... त्या उंच पर्वताएवढा... कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालच तर ... ढीगभर , पोटभर... लई म्हणजे लैच भारी वाटतंय आज 😀😀

अहो का म्हणून काय विचारताय ? आमचे पिताश्री , evergreen बाबा,  त्यांनी आज एक फक्कड गाण म्हटलं ना राव आपल्या केशवराव भोसले नाट्यगृहात ... 

" आणि या पुढचं गाण सादर करत आहे , स्टेट बँकेचे हौशी कलाकार श्री. अनिल जाधव.." हे वाक्य ऐकल्यावर काय ऊर भरून येतो म्हणून सांगू ...

 मग त्याचं ते व्यासपीठावर ऐटीत चालतं येणं, माईक उजव्या हातात अगदी योग्य अंतरावर ... गाण्याचा आवाज हवा इतका खणखणीत येईल इतका, कडक इस्त्रीचे कपडे, उजवा पाय पुढे काढून बाकी बांधा थोडासा मागे झुकवून स्टाईल मध्ये उभा राहणं.. सगळंच कसं देखणं आणि प्रसन्न




गाण म्हणताना जितके ते तल्लीन होतात, त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांत बसलेले घरचे आम्ही . मग त्याचे किती नोट्स बरोबर आले आणि किती चुकेल याच गणित मांडायच नाहीच .... फक्त बाबा गाणं म्हणताना बघायला मिळणे हा माझ्यासाठी एक सोहळाच ... सर्वच अभूतपूर्व.

आमच्या घरी हा सोहळा आम्ही शाळेत असल्यापासून सुरू आहे ...  बाबा अजूनही स्टेट बँकेच्या वार्षिक कार्यक्रमात अगदी हौसेने गाण म्हणतात ..सेवानिवृत्ती नंतरही..

आता माझी मुले शाळेत आहेत या मुलांचे हे आजोबा ... एक चिरतरुण व्यक्तिमत्त्व.. आनंदी जीवनाचा रहस्य पुढच्या पिढीला नकळत भेट देत आहेत .

आजच्या त्यांच्या गाण्यावर खुश होवून खुद्द नातवाने विचारलं त्यांना .. आजोबा , तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे , काहीही मागा .. मी देतो 🥰🥰 
आणि त्यावर आजोबांचं उत्तर... माझं गिफ्ट दिलस तू मला 😊
नातवंडं आज खुश... आजोबांचं गाण ऐकून एकदम ढगात

एक आई म्हणून ही आणि एक मुलगी म्हणून ही ... या  दोघांचं बोलणं ऐकून मी धन्य झाले... स्वर्ग काय तो हा इथेच . और क्या चाहिए गालिब ? 

कोणता कोणता म्हणून तो सुवर्णकाळ आठवायचा ? गाण म्हणणारे बाबा , टेबल टेनिस ची मॅच जिंकणारे बाबा ,  रात्री रात्री खूप छान छान लिहीत बसणारी आई ... वा .. नुसत्या आठवणीच मला तृप्त करून जातात. 

आई आणि बाबा ... दोघे असेच आनंद घेत रहा

बाबा ... Keep singing , keep surprising others 😀 We love you both ❤️❤️

तुम्हाला बघायचा आहे का ? मी इथे व्हिडिओ शेअर केला आहे

आवडल्यास नक्की अभिप्राय नोंदवा 😊🙏🙏




Jan222023

Bareroot गुलाबाची लागवड आणि जोपासना

 



बेअर रूट लावण्यासाठी योग्य महिना म्हणजे February . 

 मी Aldi मधून दोन विकत घेतले. यातील एक झुडूप प्रकारात आहे आणि दुसरा वेली गुलाब आहे . दोन्हीही थंडीमध्ये जगणारे आहेत. 

 त्यांची लागवड करण्यापूर्वी ऐकत आणलेली मुळे 4-5 तास पाण्याच्या बादलीत ठेवा. त्यामुळे ती ओलसर होतील.

 जर तुम्ही बाल्कनीत लावणार असाल तर खूप मोठ्या आकाराची कुंडी निवडा कारण त्यांची मुळे वेगाने वाढतात. जमिनीत लागवड केल्यास, खोल खणणे.

 मातीचा पहिला थर, कंपोस्टचा दुसरा थर (इथे मी घोड्याचे शेणखत वापरले आहे), मातीचा तिसरा थर आणि मग त्यावर गुलाबाची मुळे ठेवा.

कंपोस्ट मुळांना स्पर्श होत नाही याची खात्री करा. अन्यथा मुळे जळून जातात. मातीचा तिसरा थर खूप महत्त्वाचा आहे.

2 सेमी बुंधा मातीच्या वर रिकामा सोडून मुळे आणि grafting चांगल्या दर्जाच्या मातीने झाकून टाका.

खरेदी केलेल्या बेअर रूट गुलाबांच्या लहान देठांवर नेहमी हिरवा रंग असतो. तो पेंट केलेला भाग कापून टाका.

लहान देठांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी, त्याच्या टोकावर थोडी शुद्ध हळद ​​पावडर लावा.

छान पाणी द्या. तुमच्या कुंडीला पाणी काढून टाकण्यासाठी छिद्रे असल्याची खात्री करा. छिद्र नसलेली कुंडी टाळा.

वरच्या थराची माती पूर्णपणे कोरडी झालेली दिसेल तेव्हाच आपल्या झाडांना पाणी द्या.

 माझ्या रोपांना वाढीची पहिली चिन्हे दिसण्यासाठी 3-4 आठवडे लागले. ( पहिला कोंब ४ आठवडे नंतर उगवला )या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो.

कीड व त्याचे प्रकार :

 1. पानांवर काळे डाग

 2. स्टेम आणि पानांवर पांढरी बुरशी

 3. मातीत बुरशी

 4. नव्याने जन्मलेल्या ब्रॅच/कळ्याला झाकणारे लहान हिरव्या रंगाचे कीटक

 उपचार:

 1. 2 चमचे नीम ऑइल 1 लिटर पाण्यात एकत्र कर. रोपावर फवारणी करावी. ते पाण्यात न घालता डायरेक्ट कधीही वापरू नका. ही मी स्वतः प्रयत्न केलेली आणि चाचणी केलेली पद्धत. परिपूर्ण कार्य करते. मी ते इतर झाडांसाठी देखील देखील वापरते.कोणतेही दुष्परिणाम नाहीत

 2. पाण्यात हळद पावडर टाका आणि फवारणी करा.

3. मातीच्या बुरशीसाठी, मातीचा वरचा थर पूर्णपणे कोरडा होऊ द्या. ते जास्त पाणी घातल्यामुळे होऊ शकते.

छाटणी:

 फुले उमलल्यानंतर (आणि झाडावर सुकल्यानंतर) ते स्टेम कापून टाका. जिथे ५ पाने एकत्र असतात तिथे फांदी कापून टाकायची. ३ पाने वाल्या फांदीला पुढे दुसरा फुटवा येत नाही / फुलं येत नाहीत.

रासायनिक खतांचा वापर टाळा.

कांद्याची साल पाण्यात २४ तास भिजवून त्याचे १ पेला + ३ पेले साधे पाणी . आठवड्यातून एकदा थोडे थोडे घालाने.

भरपूर फुले येण्यासाठी हे उत्तम खत आहे. मी सध्या हेच वापरते