झेब्रा क्रॉसिंग

          "रस्ता ओलांडताना डावीकडे पहा नंतर उजवीकडे . कोणतीही वाहन नाही याची खात्री करूनच रस्ता ओलांडा." अगदी शाळेत असल्यापासून शिकत आलोय हे सगळ आपण . आणि त्या सूचनांच्या यादीमध्ये एक ठळक सूचना "रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा "
आठवतंय ???
आता तुम्ही म्हणाल …. रस्ता कसा ओलांडायचा हे सांगायला ही पोस्ट लिहिली आहेस का ग ?

नाही …… 
" कसा ओलांडायचा " हे सांगण्यासाठी नाही तर " कसा ओलांडला " हे सांगायची फार उत्सुकता लागली आहे 


खूप जुना परिपाठ आहे. कडेवर पिल्लाला सांभाळत ,खांद्यावरच्या ओझ्याला कोपराने आधार देत , एका हाताने पदर सावरत रस्ता ओलांडणारी आई आपण बऱ्याच वेळा पहिली आहे . तसे क्रॉस करण्यासाठी झेब्रे फार कमी आहेत आणि जे आहेत हे बिनकामाचे म्हणत ती जागा मिळेल तिथून वाट शोधत असते 

आता रस्ता क्रोस कधी करायचा ? कधीही . 
तुम्ही खुशाल झेब्रा क्रॉसिंग ठेवाल हो . लाल , हिरवे, पिवळे दिवे जिथे थांबवत नाहीत आम्हाला तिथे हे काळे पांढरे पट्टे काय कामाचे ? आपला सिग्नल हिरवा झाला कि नाही या पेक्षा शेजाऱ्याचा पिवळा झाला का यावर लक्ष ठेवणारे महाभाग जास्त . हे काळे पांढरे पट्टे म्हणजे टेम्पररी पार्किंग झालय लोकांसाठी . पादचाऱ्याना फरक पडत नाही आणि गाडीवाले फरक पाडून घेत नाहीत . इतक्या वर्षांचा चुकवाचुकवीचा अनुभव आणि धावण्याच स्किल कमी पडून एखादा अपघात झालाच तर तुम्ही पायी चालताय की गाडीतूनच डोकावताय यावर चूक कोणाची  हे ठरत . आता पायी चालत असाल तर म्हणाल  "कुणाची तार आलीये लेका ??? हे गाडीवाले माजलेत " आणि गाडीत असाल तर म्हणाल "आडवी यायला माझीच गाडी मिळाली तुला ?"     

या एवढ्या सगळ्यांना सहन करत क्रॉस करण्यापेक्षा जागा मिळेल तिथून घुसणारी ती साडी सावरणारी आई काय चुकीची ?
बर … हे सगळ राहू द्या …. सांगायचं हे न्हवतच मला . कोणाबद्दलही तक्रार नाही करायची आहे . एक आगळा वेगळा अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे . 

तसे बरेच दिवस झाले आता इथे राहायला येउन . जर्मनी आता चांगलाच पचनी पडलय.  जागा बदलली की हवेचा वाहायचा वेगही बदलतो त्यात या नियमांचं काय ? इथे आलेल्या पहिल्या दिवशीचा हा किस्सा :)  झेब्रा क्रॉसिंग . आल्या आल्या अहोनी बजावलं "सौ . रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंग असेल तरच ओलांडा." माझ्या डोक्यात अजूनही तेच झेब्रे होते ना जिथून ओलांडयाच म्हटलं तरी आजू बाजूचे वेड्यात काढतील . 

पिल्लाला थोडी थंडी अनुभवावी म्हणून घुमी घुमी करायला बाहेर पडले(घुमी घुमी म्हणजे पिल्लाच्या मैत्रिणीच्या भाषेत फिरायला जाण :) बालभाषा …दुसर काय.  तसं पाहण्यासारखं बरंच होत रस्त्यात आणि पिल्लाचेही स्टंट सुरु होते जोडीला . हो…. स्टंटमँन आहे तो . ' तारे जमीन पर ' पहिल्यापासून तो ही बाबागाडीच्या पुढच्या बाजूवर स्वतःला झोकून देऊन titanic पोज मध्ये उभा असते . मुव्ही मधला ' इशान दादा '  असाच करतो ना बसमधून बाहेर येउन. बाबागाडी याला बसायला आणली आहे की उभी राहायला याचा कधीतरी आम्हालाच विसर पडतो :)

आपण कुठे होतो बर ? घुमी घुमी …
रोड क्रोस करायचा होता … सगळ्या BMW आणि Mercedes झुप झुप करत वेगाने धावत होत्या . झेब्रा क्रोसिंग तस अजूनही ८ - १० पावलांवर होत . तिथे जाऊन पोहोचते न पोहोचते तोवर   दोन्ही बाजूच्या गाड्या नेट कनेक्शन ऑफ होऊन youtube विडीओ थांबवा तश्या एका क्षणात थांबल्या . मी ही थोडी दचकलेच . म्हटलं काय झाल काय नक्की ? 

सगळे थांबले म्हणून मी ही आपली पावलं आहे तिथेच रोवली. कुठून काही वेगळ घडतंय का याची वाट पाहत . फार …. उशिरा लक्षात आल . हे सगळे माझ्यासाठी थांबलेत :) नियम मोडण्यासाठी नाही तर पाळण्यासाठी बनवले आहेत इथे :) पायी चालणाऱ्याला आदर देण्याची एक पद्धत . वेळ आणि गती समोरच्या जिवंत माणसापेक्षा जास्त महत्वाची नाही हे सांगणार इथल झेब्रा क्रोसिंग 

फार वेगळ वाटल हे पाहिल्यावर . १०० पेक्षा जास्त वेग असणारी गाडी चालणाऱ्यासाठी येउन थांबते आणि त्याचा आदरही वाटला . 
  
पण एक सांगू ? अगदी प्रामाणिक…. रोड क्रोस करण्याची मज्जा यात नाही हो . ती प्रत्येक गाडीला चुकवत  पाळण्यातच आहे :) 

पैठणी


लाल काठ तिच्या
हिरव्याकंच पैठणीला
अन् पदरावर मोर भरलेला.
गालावारती खळी अन्
गळ्यातला साज खुललेला.
पायात नाजूक जोडव
हातात भरदार बाजूबंद,
नाकात मोत्याची नथ
अन् पैजणांचा नादच वेगळा.
हातातल कंकंण तीच माहेरच अंगण
निखळ हास्य तिच्या चेहर्‍यावरी.
अन् मनी मात्र भरलेल्या
आनंदाच्या सरी.......

~ Unknown

कायमचाच तुझा



सरणावरच्या मरणावर 
किती ग विश्वास तुझा 
अजून स्पंदतोय काळजात तुझ्या 
शेवटचा श्वास माझा 

प्राण गेलेल्या देहास 
किती अजून बिलगशील ?
आठवतंय …. " नाही " म्हणाली होतीस विचारल्यावर 
"तुझ्यातला मी परत देशील ?"

कशाला हा आक्रोश 
अश्रूंचा विनाकारण 
तू जिवंत असेतोवर 
जर नसेलच मला मरण

मंगळसुत्रातल्या वाट्यांशी 
उगाच केवढा हा लडीवाळा
माझीच गाणी गुणगुणतोय
बघ अजून तुझा हा गोड गळा 

अग …. विनाकारण रडतेस उगाच 
म्हणे मी तुला सोडून गेलोय 
तुझ्या बंद मुठीतील ऊब बनून 
आता तर कायमचाच तुझा झालोय :)