आलास बाबा एकदाचा वसंता ……
गळून गेलेल्या पानाबरोबर
तुझे शब्द पण विरले की काय भिती लागून राहिली होती
पण दिल्या वाचनाला जागल्यासारखा अगदी वेळेवर हजर झालास
जाताना म्हटला होतास
"येईन रे मी वेळेत , काळजी कशाला उगाच ?"
उघड्या बोडक्या झाडांना कोवळी पालवी दिसली आज
म्हटलं ……. आपला वसंता तो हाच
सूर्यबाबापण पाठोपाठ तुझ्या ढगाआड गेला रे
अन तुझी ती आई … जमीन …… बसली होती बर्फाची रजई लपेटून कुडकुडत
धुक्यात हरवलेल्या पाऊल वाटेसारख सगळ अंधुक झाल होत बघ ….
एवढ्या मोठ्या वाड्याच्या रिकाम्या अंगणात स्नोमँन ते काय फक्त तग धरून उभे होते
चिल्ली पिल्ली गारठून बसायची त्या चुलीच्या उबेला
दुपारी ४ वाजताच पडायचा रे अंधार , कित्ती कंटाळवाण वाटायचं
तू येताना बोचाक्यातून मोठे मोठे दिवस घेऊन आलास ते एक बर केलास
बसू आता गप्पा मारत निवांत ……
रात्रीचे ९ वाजले तरी सूर्य काही बुडणार नाही
आणि पहाटे कोंबडा नाही आरवला म्हणून त्याचं काहीच अडणार नाही
तू आलास ……. घर कसं भरल्यासारख वाटतंय
बागेच्या कोपऱ्यावरही कालपासुन पोरांचे आवाज ऐकू येऊ लागलेत
अंगावर थोडी किरणं पडल्यावर ती झाडंपण उठली आहेत शहारून
कोवळी लुसलुशीत पालवी , अंगावर काटे उभारल्यासारखी उगवून आलीये
आजोबा न रे तुझा …… मी पण थकलो आता
पण म्हटलं …… सोडावं हे गळ्याभोवतीच लपेटलेल मफ़्लर
स्वेटर आणि कानटोपी ही हिने कालच ठेवून दिली माळ्यावर
आता आलाच आहेस …… तर आल्यासारखा चांगला दिवाळी पर्यंत राहा
ब्रेड बटर खा …… फुललेल्या बागा ही घे पाहून एकदा सवडीने
बघ आता माझं आभाळ कसं फुलांनी गजबजेल
लग्नानंतर पहिल्यांदा नटलेल्या पोरीसारख गालातल्या गालात लाजेल
आता जाऊ बघ भटकायला हवे तितका वेळ
खरंच सांगतो तुझ्याशिवाय रमलाच नाही रे थंडीचा हा खेळ