वटपौर्णिमा म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक भलंमोठं वडाच झाडं . आजूबाजूला लोम्बकळणाऱ्या पारंब्या , त्याचा तो डेरेदारपणा , कोसभर पसरलेली थंडगार सावली , जाडच्या जाड बुंधा आणि त्या भोवती मनोभावे सूत गुंडाळणाऱ्या सुवासिनी ... लहानपणी आईबरोबर पूजेसाठी वडाला जायचे तेव्हा खुप आवडायचं हे लांबून पहायला .
प्रत्येकीने गुंडाळलेले सूत तो वड सांभाळून ठेवायचा पुढे खुप दिवसांपर्यंत ... सूत रुतल्याचा कधी तक्रारीचा सूर नाही की झालेला गुंता सोडवण्याचा अट्टाहास नाही . जसं आहे तसं स्वीकारून त्याचा सांभाळ करणं कित्ती अवघड असतं हे स्वतःच कुटुंब सांभाळण्याची वेळ आली की मगचं लक्षात येत आपल्या .
हो .... वडाच झाड म्हणजे कुटुंबासारखाच नाही का ... घराला आधार देणारा , सगळं ओझं पेलून धरणारा त्याचा बुंधा म्हणजे कुटुंबातलं सगळ्यात मोठं , वयस्कर आणि जबाबदार व्यक्तिमत्व . सूत गुंडाळणाऱ्या त्या घराच्या सुना ... त्यांच्यावर प्रेम आणि आपुलकी बांधून ठेवण्याची जबाबदारी . लोम्बकळणाऱ्या पारंब्या म्हणजे त्या जेष्ठ व्यक्तीला भार सांभाळायला मदत करणारे आणखीन दोन चार हात .
खोलवर गेलेली मुळं हाच त्याचा जगण्याचा अनुभव जो त्याला उभं राहायला ताकद देतो आणि हेंदकाळणाऱ्या पारंब्या हे त्याच सगळ्यात मोठं समाधान ..... मदतीला , आधाराला कुणीतरी आपलं असल्याची जाणीव
पण या दर वर्षीच्या पूजेत मी असाही एक वड पाहिलाय ज्याला एकही पारंबी फुटली नाही इतक्या वर्षात . डेरेदार घेराचा भार त्याने आपल्या एका बुंध्यावर संभाळलाय गेली कित्येक वर्ष आणि आपल्या सावलीत अनेकांना आसराही दिलाय . खरं कौतुक मला याचंच वाटत . कुणाच्याही आधाराशिवाय कुठल्याही अपेक्षेशिवाय तो इतक्या भक्कमपणे , ताठ कण्याने उभारतो वर कुठली तक्रारही नाही .
" एक खांबी तंबू " म्हणजे काय हे यांच्याकडे पाहून कळत . सगळा भर एकावर . वादळ , पाऊस , ऊन सगळं एकट्याने सांभाळायचं . बरं .... आश्चर्य याचच वाटत , का बरं पारंब्या फुटल्या नसतील याला ? याच्या कुटुंबातलं कुणीच उभं राहू नये आधाराला ? कुणालाच भार हलका करावासा वाटू नये ? का असेल हे याच्या नशिबी ?
पण एक सांगू .... यालाही वटपौर्णिमेच्या गुंडाळलेली सुते आहेतच की . वाहिलेल्या दुर्वा आहेत , तांदूळ , फळाची ओटी आहे . कापसाचं नाजूक वस्त्र आहे .... सगळं सगळं आहे आज त्याला :)
हो ... पारंब्या नसल्या तरी कुणीतरी आहे जे त्याच्यासाठी प्रेम बांधून ठेवण्याची जबाबदारी दरवर्षी न चुकता उचलत .
एखाद्या शांत संध्याकाळी कधीतरी जाऊन बसा त्याच्या सावलीला ... मग सांगेन तो त्याची कहाणी तुम्हाला . अहो ..... सांगावी कशाला लागते ? ओळखणारा एका नजरेत ओळखेल असं त्याच जिणं .
त्या वडाच्या भोवती एक सायलीचा वेल वाढलाय . त्याच्या त्या डेरेदार बुंध्याला करकचून मिठी मारून वर वर चढत फांद्यांपर्यंत पोहोचलाय आणि आपली उंचीची सगळी स्वप्नं त्याच्या त्या कर्तृत्वावर ओवाळून टाकत त्याच्या आधारासाठी फांद्यांपासून खाली जमिनीकडे झेपावत पुन्हा मातीत येऊन रुजलाय ...... मातीत पाय घट्ट रोवून उभा ... वडाच्या सोबतीसाठी
पारंब्या न फुटल्याच दुःख कधीही जाणवलं नाही त्या वडाला या सायलीच्या वेलामुळे . अहो ... आता तुम्ही म्हणालं , इतकास वेल तो त्यात तो सायलीचा म्हटलं की त्याहून नाजूक ... तो कसला आधार देतोय या वटवृक्षाला ?
बरोबर .... अगदी बरोबर . नाहीच देऊ शकत आधार तो त्याला . इतकी त्याची ताकदही नाही आणि प्रयत्नही नाही . तो बिलंगलाय फक्त त्याच्या साथीसाठी .
माझ्यासोबत कुणीतरी आहे ही भावनांचं जगायला स्फूर्ती देऊन जाते .
परवा कुणीतरी एकाने म्हणे वडाच्या बुंध्यावर वार केला .रोज त्याच्याच सावलीला बसणाऱ्याने केलेला असा हा वार अगदीच वर्मी बसला त्याच्या .
उन्मळून पडायला तुटणं गरजेचं नसतंच .... एकटेपणाची भावनांचं उध्वस्त करायला पुरेशी असते ... मग तो वृक्ष असो वा माणूस
पण छे ..... वटवृक्ष आहे तो . उन्मळून पडणं त्याला शोभतही नाही आणि आवडतही नाही . जिथेजिथे घाव झालाय तिथेतिथे सायलीची वेल जाऊन बिलगली आणि सगळे घाव भरून काढले . पण त्याला ढासळू दिलं नाही .
घाव करणारा पुन्हा सावलीत बसण्याचं धाडसही नाही करणार परत . पारंब्या फुटल्या नसल्या म्हणून काय झालं ? वर चढणारी वेल त्याच्यासाठी खाली उतरली यातच समजायला हवी होती तिची ताकद :)
असो ... वार बऱ्यापैकी भरत आलेत आणि सायलीचं मूळ ही अजून घट्ट झालय. तंबू एकखांबी असेल तर पारंब्यांची ताकदही एका खोडात एकवटलेली असते . देणार कधी कुणासाठी कमी माप भरत नाही .
या वटपौर्णिमेदिवशी बांधलेल्या सूतांनी सायली आणि वडाच एकत्र राहणं कायमसाठी पक्क केलं . प्रेमाच्या माणसांनी येऊन स्वतःच्या आरतीच्या ताटातलं प्रेम आणि आपलेपणा त्याच्या मुळावर वाहीला आणि त्याला जगण्याची ताकद दिली.
त्या वडाच्या कर्तृत्वावर आणि पावित्र्यावर पावसाच्या थेंबाइतका स्वच्छ विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या सुवासिनींचे आणि त्यांच्या यजमानांचे ही सायलीची वेल आज हात जोडून मनापासून आभार मनात होती .
आजवर आधार देणार वटवृक्ष पहिला होता . प्रेमाच्या आधारावर आभाळाला पोहोचलेला पहिल्यांदाच पाहतेय ... खूप कौतुकाने . :)
आई जगदंबे ..... हाच वड पुढची सगळी जन्म पुजण्याचं भाग्य मला मिळू दे. :)
हि वेल माझ्या चांगल्याच परिचयाची आहे हो... देखनी तर आहेच पण गुणकारीहि खुपच . नशीब आहे वटवृक्षचं कि हि सायलीची वेल त्याला बिलगली 😇
ReplyDeleteThank you Swapnil Patil for this lovely comment.
You know me well :)
ReplyDeleteआत्ताच वड आणि सायलीची वेल वाचले कीती छान लिहीलय मनाला खोलवर लिचार करायला लावणारं
अगदी खरय पारंब्या नसल्या म्हणून काय झाल?
सायलीची वेल तीची प्रेमाची घट्ट मिठी तीची साथ हीच महत्वाची प्रेम कधीच कशातच तोलता येत नाही ना त्याची ताकद कीतीही संकट आली तरी एकमेकांची साथ न सोडणं हीच मैत्री हेच खर प्रेम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks Rani Di for this comment ....
खूप छान लिखाण आणि मांडणी....
ReplyDeleteThank you ☺️
Delete