💕Goodbye Tension. Hello Pension 💕
जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव
जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव
अमृता पेडणेकर
जर्मनीतील लॉकडाऊन असं काहीसं नाव द्यावं वाटलं होतं या लेखासाठी. पण म्हटलं नको .... जर्मनी आणि लॉकडाऊन हे खरंतर विरूद्ध अर्थी शब्द वाटतात.
जर्मनी म्हटल्यावर स्वातंत्र्य, मोकळेपणा , निवांतपणा, निरभ्र आकाश , हिरवाई हेचं डोक्यात येत ना हो पहिले ... पण या जगात कुणालाही देशाला न सोडलेल कोरोनाचं वादळ इथेही येऊन थडकलच... त्यात आमचा जिल्हा Bavaria जास्त बधित ... त्यामुळे पाहिला मान आम्हाला . लॉकडाऊनच्या बातमीने साता समुद्रापार राहणाऱ्या माझ्या आईची काळजी मात्र वाढवली. सेवा निवृत्तीला पोहोचलेल्या बाबांच्या डोळ्यात नातवंडांचे चेहरे तरळू लागले. कशाला जाऊन राहता इतक्या लांब? हा डोळ्यातून न लपणारा प्रश्न जमेल तितका लपवू पाहत होते दोघेही.
असो ... पण खूप काही शिकवलं बरं या कोरोनाने . त्याची यादीच करायची ठरवली तर पहिला नंबर लागतो माझ्या कॅनव्हास पेंटिंगचा. आयुष्यात कधीही हातात रंग घेईन असं वाटलं न्हवत मला . चित्रकला हा माझा प्रांत नाही हे अगदी अगतिकपणे मान्यच केलं होत जणू मी. पण आज माझ्या घराच्या भिंती मी बनवलेल्या चित्रांनी सजल्या आहेत .... अनपेक्षित आनंद तो आणखी काय असावा ? कुठल्याही मॉल मधून खरेदी केलेल्या सजावटीला तुमच्या हौसेच मोल नाही. माझ्या चित्रकलेच्या सरांनी जर आज हे सगळं पाहिलं तर पहिला धपाटा घालतील पाठीत. " हे सगळं शाळेत काढायला काय झालं होतं तुला ?" असं म्हणत
जर्मनीने विद्यार्थ्यांना घरी राहण्याची मुभा दिल्यामुळे माझी दोन्ही शाळकरी मुले घरी ... याचीच तर वाट पाहत होते मी कित्ती दिवस . मराठी संस्कार करण्याची हीचं खरी वेळ . चालून आलेली संधी वाया घालवले ती आई कसली ? त्यांना सूर्य नमस्कार शिकवले , गणपती स्तोत्र पठण करून घेतलं .चित्रकलेचे धडे, गणिताचा सराव, वक्तृत्व कला , बुद्धिबळ कौशल्य आणि बरंच काही … अस्खलित जर्मन भाषेत बोलणारी मराठमोळी मुलं संस्कृत ही तितक्याच लीलया पेलताना पाहून हेवा वाटतो या पिढीचा. गगनाला भिडणार सुख म्हणजे ... मुलं मराठी लिहायला शिकली.
Bleiben zu Hause मुळे यजमान ही घरी . तुम्ही मला हल्ली वेळच नाही देत या समस्त बायको जातीवर या कोरोना ने काढलेला उपाय म्हणा हवं तर. मग रोज नवीन पदार्थ . माझ्या रेसिपी च्या YouTube channel साठी भरपूर रुचकर व्हिडिओ मिळाले. खादाडाच्या पंगतीतील आमचं कुटुंब अजुन धष्टपुष्ट होणार असं वाटतंय 😀 भाज्या आणि इतर सामानाच्या खरेदी साठीही बाहेर जाणं टाळत होतो आम्ही ... मग घराच्या गच्चीत उगवली कोवळी लुसलशीत कोथिंबीर आणि हिरवी गार मेथी... घरचा भाजीपाला ... आपलं काही तटत नाही ... अस्सल कोल्हापुरी बाणा 😎
शाळेत असताना गुरुजी शिकवायचे तेव्हा कधीही मन लावून प्राणायाम शिकले नाही. पण आता जीवाच्या भीतीने सकाळी न चुकता प्राणायाम करते. तुमच्या पासून काय लपवायचे. आज सगळच मान्य करायचं ठरवलं.
कित्तीतरी दिवसांची अपूर्ण इच्छा... महाभारत पाहणे... ती ही पुर्ण करून घेतली . आता जर्मनी मध्ये राहणाऱ्या माझ्या मुलांनाही भीष्म पितामह कोण ? कर्णानेही पांडव बंधुंशी का युद्ध केलं ? ह्या सर्वांची उत्तर माहीत आहेत. आपली नाळ आपल्या मातीशी जोडलेली असते आणि त्याचं प्रेम कधीही कमी होत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
"आपला भारत देश खरंच खूप छान आहे ग आई " हे वाक्य जेव्हा ८ वर्षाच्या मुलाच्या तोंडून ऐकलं तेव्हा वाटलं कोरोना अशा मागे पडलेल्या दिव्यांची आठवण करून देण्यासाठी तरी नसेल आला ? मोदी आजोबांचं भाषण न चुकता ऐकलं पिल्लानी. आपल्या मदत करणाऱ्या भारतीय योध्यांसाठी गच्चीत उभे राहून इथूनच टाळ्या वाजवल्या, दिवे लावले. याचा एक व्हिडिओ ही मी ट्विटर ला पोस्ट केला होता. कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या माझ्या वडिलांचा उर अभिमानाने भरून आला हे पाहताना.
मला सांगा ... सुख म्हणजे अजुन नक्की काय ? हेचं ... आजोबांना नातवाचा अभिमान वाटावा. हे वर्तुळ पुर्ण करण्यात मी यशस्वी झाले .आणि मला मदत केली या Corona लॉकडाऊनने. Corona च्या भीतीने किंवा काळजीपोटी म्हणा ... नातेवाईक, मित्र परिवार सर्वांना फोन करून झाले ... नात्यातील लांबत जाणार अंतर या लॉकडाऊन मुळे नक्कीच कमी झालं . आपण एकमेकांच्या अजुन जवळ आलो .
घरी बंदिस्त असण्याच्या काळात एक सुंदर विरंगुळा म्हणजे आमचे शेजारी . दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास न चुकता तो मुलगा रोज खूप छान बासरी वाजवायचा. आम्ही सगळे गच्चीत बसून मंत्रमुग्ध होऊन ऐकायचो. त्याची बासरी वाजवून झाली की सगळे आपापल्या घरातून टाळ्या वाजवत असू. आभार प्रदर्शनाचा हा एकच पर्याय समोर दिसत होता तेव्हा. जितका होता होईल तितका साकारार्थी राहण्याचा चाललेला एक निष्फळ प्रयत्न म्हणा हवं तर आपला. पण अशाच छोट्या छोट्या गोष्टी बळ देत राहिल्या.
लॉकडाऊन थोडं शिथिल झाल्यावर थोडे पाय मोकळे करावे म्हणून बाहेर पडलो आम्ही सगळे. इतके दिवस सगळे घरी बंधिस्त होते . नियम हे फक्त काटेकोर पाळण्यासाठीच असतात हे जर्मन लोकांकडून नक्की शिकावं असं. त्या दिवशी रस्त्यात एक ओळखीचे जर्मन कुटुंब भेटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता भारतीय पद्धतीने हात जोडून नमस्कार केला आम्हाला. दोघांत ठराविक अंतर पाळण्यासाठी , corona ला हरवण्यासाठी जे जग आत्ता शिकते आहे , ते आपण सर्वांना जन्मापासून देणगी म्हणून मिळालं आहे. जर्मनी मधे वास्तव्यास असताना भारतीय असल्याचा आज पुन्हा एकदा अभिमान वाटला.
बाहेरून फिरून आल्यावर माझी आजी पायावर पाणी घेतल्याशिवाय घरी घेत न्हवती आम्हाला. आज सगळं जग ओरडून सांगत आहे …बाबांनो, या सवयी लावून घ्या. पहा, खरंच प्रगत आहोत आपण.
Corona च वादळ काय आज ना उद्या जाणारच .... पण जाता जाता खूप गोष्टी शिकवत आहे. उन्हाळा सुरू झाला की सहली करणारे जर्मन रहिवासी घरी थांबले आहेत या वर्षी ... या वादळाने आपल्याला गरज आणि चैनी यातील रेषा ठळक करून दिली. कुटुंबासाठी दिलेला वेळ कितीतरी पटीने आनंद उत्पन्न करतो , हे आपण विसरलेले सत्य ओंजळीत परत आणून ठेवलं .
आता आपलं कर्तव्य हेचं ... या ओंजळी मधील आनंदाला पुन्हा सुटू न देणे. हा आनंद जमेल तितका ओंजळीत भरून घ्या. ठणका मारणारी जखम भरून आली की उठलेल्या व्रणचा अभिमान वाटतो कधी कधी. Corona ही अशीच जखम आहे . आपण यातून सही सलामत बाहेर पडलो .. कसे याचे किस्से पुढच्या पिढीला आपण अभिमानाने सांगू हे मात्र नक्की.
PASSING MARKS ... Only 35 out of 100
⛅⛅ SUNRISE ACRYLIC PAINTING ON CANVAS ⛅⛅
If you want to see a video , how I painted this canvas, click here. I shared it on YouTube.
My canvas is as colorful as the HOLI. Heaven...😍
All ups and downs experienced in life, I painted them today as it is here in mountains .
Climbs .. few were smaller and few were too high
Freely , happily .
My PASSING MARKS story finished here with freely flying birds.
Gave a birth to my a beautiful painting and a sweet story.
Hope you like both .... 🥰
So how many points are you giving me this time? 35,36 or 40 ?😅
~ Amruta
काठावर पास 😛
⛅⛅ SUNRISE ACRYLIC PAINTING ON CANVAS ⛅⛅
असं काहीसं भारी नाव द्यायचं मनात होत या पोस्ट ला . पण म्हटलं नाकापेक्षा मोती जड वाटतोय. आपल्या डोक्यात जे घोळतयं तेच खरं खुर..... काठावर पास 😛
या काठावर पास ची कहाणी माझ्या शालेय जीवनातील . ईयत्ता ५वी ते ९वी पर्यंत चे माझे चित्रकलेचे गुण ३६ 😝 ते की कोणाला कलेमध्ये नापास करू शकत न्हवते म्हणून . बाकी विषयात ढीगभर गुण गोळा करणारी मी चित्रकलेत काठावर पास ... नेहमीच.
बिचाऱ्या चित्रकलेच्या सरांनी हात टेकले माझ्या समोर 😄. आज वाटतंय ... हे "काठावर पास " माझ्या सरांनी वाचलं तर कमीत कमी ४० तरी मिळतील गुण 😝😄
Click below link to see it's detailed video.
https://youtu.be/bFQrhQORghI
मग मोर्चा वळवला तो रंगांच्या कपाटकडे. कधीही चित्रकला केली नसल्यामुळे कॅनव्हास ला कोणते रंग लागतात याबद्दल अज्ञान ...
त्यातल्या त्यात छोट्या आकाराचे , कमी रंगछटा असलेले उचलले. म्हणजे कसं, काहीच नाही जमलं तर फारसं वाया नको जायला 😄
८ रंगछटा असणारा अक्रेलिकचा छोटा पॅक घ्यायचं ठरवलं.
त्यापैकी खालील ५ रंग उपयोगी पडले .
अशा प्रकारच्या पेंटिंग साठी खूप साऱ्या प्रकारचे ब्रश वापरतात म्हणे .... म्हणे बरं का ..... माझ यातही अज्ञान ... 😛 म्हणून आपला एकचं ब्रश बरा आहे ...
या शुभ्र कॅनव्हास कडे पाहून मला माझी कोरी करकरीत उत्तरपत्रिका आठवायला लागली.
३६ गुणांची आठवण म्हणून पाहिलं रंग उचलला तो लाल. चित्रकलेच्या वाहितल्या लाल रेषा माझा आजचा पाहिला रंग.
उगवतीला गडद दिसावं इतकं लाल चुटुक करून टाकलं कॅनव्हास च्या पहिल्या पट्ट्याला
मग उमटवला माझा भगवा ... ज्याने मला मान उंच ठेवायला शिकवली. लाल पट्ट्यापेक्षा थोडा जास्त रुंद. त्याच्या भव्यतेबद्दल त्याला जास्त जागा दिली.
चित्रकलेचे सर पाहिला पिवळा वॉश द्यायला सांगायचे. तो विसरला च
की द्यायचा . चला, आत्ता देवून घेऊया.
रंगपंचमी मधे रंगलेल्या कपड्या सारखा रंगीबेरंगी दिसतोय माझा कॅनव्हास. कसला भारी 🥰
आता त्याला द्यायचा काळा टिळा. नजर नको लागायला कोणाची.
मग डोळ्यात काजळ पसरल्या सारखं त्याला मस्त पसरवलं. डोळ्यात साठलेला सगळा एकाकीपणा , भीती, तणाव ... सगळं सगळं बाहेर पडलं ह्या काळया रंगासोबत.
आयुष्यात आजपर्यंत चढून पार केलेले सगळे उंचवटे आहे असे रेखाटले. काही मोठे आणि काही छोटे.
जरा वाटतंय जमल्या सारखं. इतकाही वाईट नाही माझा रंगसंगतीचा अंदाज. जमतंय की रावं आपल्याला. 😎
मग मिटवावी का वरची लाल रेषेची आठवण? चित्रकलेच्या लाल शेऱ्या पेक्षा खऱ्या आयुष्यातील तणाव जास्त ठळक अणि खोल आहे .... म्हणून लाल रंगावर थोडी काळी छटा .... थोडीशीच.
बरं दिसतंय हे उगवतीच आभाळ ... कुणाला आवडो न आवडो ...मला आवडलं.
माझच मला आवडलं असं पहिलं चित्र 😄.... प्रामाणिकपणा नसात भिनालय ना ....काय करणार 😄
हे काळे डोंगर मला जास्तच खात आहेत . इतकाही वाईट नाही चाललं काही आपल्या जगात .
मग कशाला हा काळपट पणा ? तणावाला मुक्त करणारा एक रंग आहे की आपल्या कडे ..... शांततेच प्रतीक .... रंग पांढरा ....
पिवळ्या वॉश वर त्याचा एक थर चढवला. आता कसं शांत शांत वाटतंय .पहाटेला सगळे साखरझोपेत असताना सूर्यनारायण डोकावून पाहतो तेव्हा असतं तसं.
मुक्त झालेले मन पक्षांच्या थव्या सारखं भरारी घेत उंच उंच उडायला लागलं होत आज. अगदी स्वच्छंद.... आनंदी
आणि जन्म झाला एका छान चित्राचा आणि त्यासोबत एका गोड गोष्टीचा ♥️
तुम्हाला आवडेल ही अपेक्षा .... 🥰
मग किती गुण देताय या वेळी ?
~ अमृता
सगळं इथेच .... ते ही व्याजासहित
" सगळं काही इथेच फेडाव लागतं आणि ते ही व्याजासहित "
आज इतक्या वर्षांनी माझ्या आजीच तोंडून कधीतरी ऐकलेल हे वाक्य कानात घुमत होतं. सगळे हिशोब आपोआप जुळून आले की काय अशी भीती वाटून गेली.
या भीतीची सुरवात तिच्या फोन पासून झाली
सकाळी एका मैत्रिणीशी बोलणं झालं ... Coronavirus चा लॉक डाऊन असल्यामुळे फोनवरच गप्पा ... तिच्या आईबद्दल चौकशी केल्यावर , बोलता बोलता ती बोलून गेली
" ट्रेन चं तिकीट रद्द केलं बघ आताच . वर्षभर साठवून ठेवली होती रजा, आईकडे जाऊन राहता येईल सुट्टीला म्हणून .. आणि नेमका हा व्हायरस . आता कधी माहेरी जायला मिळतंय देव जाणे .
रात्री गादीला पाठ टेकली की डोळ्यातून पाणी वाहायला सुरू होतं आई बाबांच्या आठवणीने . जीव कासावीस झाल्यासारखं काहीतरी. नेमकं काय होतंय कळतंच नाही. पोटातल्या आतड्याला पीळ पडल्यासारखं अस्वस्थ मन ... कोणाला सांगता ही नाही येत.
सगळं इथेच फेडाव लागतं का ग खरंच ? कर्म वैगरे खरं असेल ? "
मला तिच्या या बोलण्याचा सुर आईच्या आठवणी पासून कर्म वगैरे पर्यंत का अणि कसा गेला ? हे काही कळेना ...
थोडासा उलघडा करून विचारलं तर सगळं सविस्तर .... मनाने मोकळी झाली .
८ वर्षापूर्वीची गोष्ट ... तीच पिल्लू जेमतेम ६ महिन्यांचं आणि नेमकी हिची टाळता न येण्यासारखी अडचण . त्यामुळे पिल्लाला आईकडे ठेवून तिने ऑफिस सुरू केलं . तशी दर आठवड्याला भेटायला जायची ती बाळाला पण ६ महिन्याच्या पोरासाठी ६ दिवस आईवाचुंन काढणे म्हणजे दिव्य. तिची सुध्दा घालमेलच की... बाळाच्या डोळ्यात पाणी बघून शेवटी कसेतरी ४ महिने काम करून तिने कायमच सोडून दिलं. बाळाच्या वाट पाहणाऱ्या नजरेला पुर्ण विराम .
आणि आज इतक्या वर्षांनी पुर्ण जगावर बेतलेल्या अनपेक्षित संकटामुळे माहेरी जाण्यासाठी बघावी लागणारी वाट, रात्रभर डोळ्यातून वाहणार पाणी, कुणालाही न सांगता येणार शल्य ... या सगळ्या मुळे तिला ८ वर्षांपूर्वीच सगळं डोळ्यासमोर उभ राहत होते.
" बाळाच्या डोळ्यातून वाहून गेलेल्या प्रत्येक थेंबाचा हिशेब तर नसेल मांडला गणपती बाप्पाने ?
६ महिन्यांच्या बाळाला आईपासून लांब रहावं लागलं काही दिवस .... त्याची ती वेदना आज माझ्यासमोर उकल न सापडलेली कोडी म्हणून उभी राहिली असतील का ?
आईची वाट पाहणाऱ्या त्याच्या नजरेचा सगळा हिशोब आज माझ्या नजरेला फेडावा लागतोय का ? आणि तो ही व्याजासहीत ?
आणि जे जर खरं असेल तर .....
गणपती बाप्पा समोर हात जोडून मदत मागण्याची तरी योग्यता असेल का माझी उरली ? "
सगळे प्रश्न एका दमात विचारून घेतले तिने . ज्यातील एकही प्रश्नाचं उत्तर आज माझ्याकडे नाही.
सगळं काही इथेच फेडाव लागतं आणि ते ही व्याजासहित.... आजीच हे एकच वाक्यं पुढच्या क्षणाला माझ्या डोक्यात चमकून गेलं .
तिला जे वाटतंय तसं कदाचित नसेलही काही ..
म्हणतात ना मन चींती ते वैरी न चिंती ... तसं उगाचच भीती वाटून गेली असेल तिला
कदाचित ..... असेलही
बाप्पाने लेकाच्या डोळ्यातला वाहून गेलेला पुर आज हिच्या डोळ्यातून वाहून रिकामा करायचं ठरवलंच असेल तर ?
कोण सांगावं?
या कोरोना मुळे पटावरचे सगळे फासे उलटे पडलेत. प्राणी संग्रहालय पाहायला जाणारी मंडळी, खिडकीच्या गजातून रस्त्यावर मुक्त विहार करणारे मोर केविलवाण्या नजरेने पाहत आहेत .
लंबोदरा ... तुझ्या उदरा इतका मोठेपणा दाखव आणि सगळ्या चुका पोटात घे .... 🙏
अखंड भारताने एकत्र येऊन ९ मिनिटांसाठी तुझ्यासमोर लावलेला दिवा ... खूप मनापासून प्रार्थना करत होता .
बळ दे . 🙏