आलीस का गौराबाई, आले गं बाई

सखू आणि चिऊ …. दोघी मायलेकी . देवाने जणू त्यांना एकमेकीसाठीच बनवलं होत. आता चिऊच लग्न झालय पण म्हणून काय झाल ? सखू साठी ती अजूनही आंब्याच्या लोणच्यासाठी स्वयंपाक कट्ट्यावर चढणारी तिची नाजूक परीच आहे . :) मुलं मोठी होतात पण आई नाही होत कधी मोठी……. असो 

आज हे सगळ आठवायचं कारण म्हणजे गौराबाई … गणपती उत्सवातील हा तिसरा दिवस . गौरी आल्या न आज घरी . 

सखूची गौराई मात्र राहिली यावेळी लांब . काय करणार ? सप्तपदीवेळी वचन दिल्याप्रमाणे चिऊला जावच लागलं नवऱ्याबरोबर , तो नेईल तिकडे … अहो चिऊ गेली परदेशी तिच्या नवऱ्याबरोबर तिच्या पिल्लाला घेऊन . झाले आता त्याला ६ महिने पूर्ण होतील . 

तसं पाहिलं तर रोजच सखू कासावीस व्ह्यायची नातवाच्या आणि मुलीच्या आठवणीने पण आज तिला राहवतच न्हवत . घरची गौराई म्हटलं की सखुला तिची गौराई ….  चिऊच येते समोर . आणि का नाही येणार ? पोरगीला गौरीचा खेळ खेळायची हौस म्हणून चिऊला चालायला यायला लागल्यापासून सखूने तिच्या अंगणात डाव मांडला . पोर पण खेळायचीच हो अगदी अंगात भिनल्यासारखी. पन्नास एक गाणी तोंडपाठ असतील तिला . तिने झिम्मा धरला कि नाहीच तुटायचं तासतासभर . अशी  एकामागोमाग सांगायची गाणी ती . केवड्यातल्या नागासारखी तिची लांबसडक वेणी घागर घुमावाताना कुठल्या कुठे जायची तिलाही भान नसायचं. हौसेन नऊवारी नेसून खऱ्याखुऱ्या गौरीसारखी नटायची .  पाटील काका नेहमी म्हणायचे "सुनबाई …. पोरीला नजर लागेल हो कोणाचीतरी " पण आजी लावायची ना काजळाचा टिळा कानामागे    

लोकं म्हणतात हे गौरीचे खेळ वगैरे सगळे खेडवळ प्रकार . पण त्या लोकांच्या नाकावर टिच्चून चिऊ सगळ्या वाडीचा कौतुकाचा विषय होती . आई बाबांच्या मनासारखी पोरगी खूप शिकली . laptop च्या keyboard वर जितक्या लयीत तिची बोट चालायची त्यापेक्ष्या जास्त गौरीचा भानुरा वाजवताना हलायची  (भानुरा म्हणजे परात पालथी घालून रवीने वाजवत गौरीचे कान उघडायला ) जितक्या आवडीने जीन्स घालायची तितक्याच आवडीने नाकात नथ ही घालायची सणाला . गौरी घरात घेताना आईने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना तो नथेचा मोती नेहमीच टोचायचा तिला  

सखू  विचारायची "कशावरून आली ?"
चिऊच आपलं नेहमीच उत्तर " हत्तीवरून " लक्ष्मी येते ना हत्तीवरून म्हणून …… मनात म्हणायची माझ्या बाबांच्या घराचा उंबरा सोन्याचा होऊ दे :)

"कशाच्या पावलांनी आली ?"
…. हळदी कुंकवाच्या , सोन्यामोत्याच्या 

" काय ल्याली? "
…. पिवळ पितांबर 

  " काय खाल्ली ?"
…भाजी भाकरी 

मग सगळ्या घरभर फिरून सखुची गौराई , चिऊ विचारायची "इकडे काय ? इकडे काय ?" सखू पण सगळ सगळ फिरून दाखवायची "हा दिवाणखाना , ही  मोरी , हे देवघर , हे दुधदुभत " चिऊला लहानपणी प्रश्न पडायचा ही गौरी कोण ? माझ्या हातातल्या कालाशातले घडे , की हे डहाळे  की मी ?

मग सगळ घरदार फिरून झाल्यावर गौराबाई बाप्पाशेजारी विराजमान व्ह्यायच्या . शेपू भाजी आणि वडी भाकरीचा आनंद घ्यायला .  गौरीला आल्याआल्या भाजी भाकरी का द्यावी लागते ह्याच उत्तर चिऊला तिचं लग्न झाल्यावर अपोआप मिळाल . "चिऊ … फुगली ग तुझी भाकरी . घे ताट वाढून " अस जेव्हा सखू माहेरी राहायला आलेल्या चिऊला म्हणायची तेव्हा तिला पुरणपोळी ही नको वाटायची त्या बदल्यात. कुणीतरी म्हटलंच आहे "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते " 

हे सगळ असच्या अस्स घडतंय हा भास चिऊ ला आज सकाळपासूनच होत होता . कशातच लक्ष लागेना पोरीच . इतक्या लांब राहायला गेली होती मग तिथे कुठला आलाय गणपती आणि गौरी ? तिथे नुसते चर्च पण तरीही चिउने घराच्या गणपतीची छोटीशी आरास केली होती खीर मोदकाचा नैवेद्य देखील केला . गौरीचा नैवेद्य करायला शेपू सारखी कुठलीच भाजी नाही मिळत म्हणे तिकडे आणि भाकरी करायचा तर प्रश्नच नाही इलेक्ट्रिक शेगडी आहे आता तिच्या घरी :)  गौरीच्या खेळाची हौस पुरवायची म्हणून चिऊ गेले २ दिवस ठरवून रात्री उशिरा फोन करायची सखुला …. माहेरी कुणी डाव मांडला असेल तर आवाज तरी पडेल कानी झिम्म्याचा . पण यावेळी सखूच अंगणही तिच्यासारखाच शांत शांत होत . खेळाचा डाव मांडायला खेळणारी लाडकी लेक नाही म्हटल्यावर तीलातरी कुठला हुरूप येईल हो . गेल्या २० वर्षात तिचं अंगण आज पहिल्यांदा शांत होत . तिच्या माहेरवाशिणीची, चिऊची वाट बघत   

कसातरी करून स्वतःला आवरलं होत आज सखूने पण सकाळी गौरी घरात घ्यायची वेळ झाली आणि तिची घालमेल वाढली . पोरीचा चेहरा डोळ्यासमोरून हलेना . तशीच दिसत होती चिऊ तिला समोर "आई तुझी जोडवी दे ग हाताच्या बोटात घालायला …. अजून जास्त वाजेल घागर माझी  " म्हणणारी.…  दोन वर्षापूर्वी तर चिउने कहरच केला . नको नको म्हणताना ८ व्या महिन्याचं पोट घेऊन नाचवली घागर . बाकीच्यांना टेन्शन "पोटातला हिचा गणोबा काय करतोय काय माहीत :)"  

ह्या सगळ्या आठवणी मनात दाबून कंठाशी आलेला आवंढा गिळत सखु आज तिची गौराबाई घरात घेत होती . इतक्यात फोन वाजला . हातातलं सगळ जागीच टाकून सखु पाळली "माझ्या लेकीचाच असणार … जीव नसेल लागत सकाळपासून तिचा तिकडे " 

"आई …. गौरी घेतल्यास ग ? " 
चिऊच्या कापणारा आवाज त्यामागचा ओलावा सखुला जाणवला 
"पोरी … माझी गौराबाई रडत नाही येत घरात आईच्या. माहेरच्या भरभराटीसाठी हसत आत ये  "
आणि चिऊ ओक्साबोक्शी रडायला लागली फोनवरच . 

ती फोनवर बोलते आहे तोवर तिच्या पिल्लाचा एक पराक्रम चालू होता …. आता फार उद्योगी झालाय न हा कृष्ण तिचा . आता आईची अंगाई  नको असते त्याला . Justin Bieber च " baby baby " म्हणायला लावतो आई बाबांना . 

चिउने आरास केलेल्या गणपतीसामोरच कुंकू घेऊन साहेब सगळ्या कपाळाला फासत होते . चिऊ ओरडली "पिल्ला थांब … देवबाप्पाच आहे ते "
तिची हाक कानापर्यंत जाईतोवर तो कुंकवाची एक चिमट जमिनीवर सांडून त्यातून दुडूदुडू पळत सगळ्या घरभर नाचला . आणि त्याची इवली इवली कुंकवाने भरलेली पावलं घरभर उमटली
  
सखुने एक क्षण थांबून विचारलं "काय झाल ग चिऊ …. का उगाच ओरडते आहेस त्याला ? बोल का फोन केलास आत्ता ?"
"काही नाही ग आई …… गौराबाई तू घरात घेतलीस आणि हळदी कुंकवाची पावलं माझ्या घरी उमटली :) "

आमची चिऊ म्हणजे हा असाच प्रकार आहे … तिला जे हव असत ते समोरच्या प्रत्येक गोष्टीत शोधायचा प्रयत्न करते आणि सापडलं कि आनंद गगनात मावत नाही 

आईचा फोन ठेवल्यापासून स्वारी खुशीत आहे एकदम :) 

मानल तर सगळ आहे इथे आणि नाही मानल तर काहीच नाही सापडत 

गणेशोत्सवात ती येउन गेल्यावर प्रश्न पडतो - कोण आलं होत ? खडयाची, मुखवट्याची , एरंडाची , मातीची गौराई की लग्न होऊन सासरी गेलेली आपली लेक ? 

View Facebook Comments


11 comments:

  1. Awesome ..... Khup khup khup khup chhan lihili ahes he sagal

    Agadi manapasun ani manatal sagal

    Khar sang.... Hi CHIU mhanaje tuch na ?

    Kasala pani kadhate dolyat ... Ani na kunkawachya pawalanchi gaurai tuzya Germany madhe hi ...

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much

      Ho ali na...itakya lamb rahunahi Mazi Gaurai ali mazya ghari

      :)

      Delete
  2. पुरुषाचा मन माझं .....तुझ्या जीवाची होणारी तळमळ नाही समजु शकणार इतकी पण का कुणास ठाऊक,
    गौराबाई तूझ्या आईने घरात घेतली आणि हळदी कुंकवाची पावलं तुझ्या घरी उमटली
    तुमच्या दोघींची माय-लेकींच्या प्रेमाची फुगडी माझ्या डोळ्यासमोर फेर धरु लागली.

    तुझी आई तर नक्की म्हणत असेल,

    "सण गवराईचा आला, तरी माझी गवराबाई येईना,
    तिच्या वाचुन गाभारा, पुरा वाटे सुना सुना."

    ReplyDelete
  3. Replies
    1. :) Thank you

      Thank you so much for celebrating Ganesh Festival here too :)
      I was feeling like I was in India

      Delete
  4. "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते "
    this is really nice and true.. :)

    ReplyDelete

Thank you for your comment :)