एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा
पोरीच्या लांबसडक केसांची अंघोळ राहिलीये रीठ्याची
बघ …पुरण राहिलंय अजून , फक्त पूजाच केलीये पाट्याची
ह्यांच्या पिवळ्या सदऱ्याच परवा तुटलंय म्हणे बटन
शेजारच्या सखुला ही सांगितलय उद्या तिला देईन मटण
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा
धाकटा सकाळीच मागत होता खोबऱ्याची वडी
ताईने घेतलेल्या साडीची मोडलीही नाही मी अजून घडी
शाळेतून आल्यावर पोर हंबरडा फोडील रे
उद्या पासून आई नाही , कुशीत घेऊन एकदा समजाऊ दे
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा
तिकटीवरच्या आजीची वाटी राहिलीये द्यायची परत
गोठ्यातली गायसुद्धा नाही माझ्याशिवाय चरत
पोरीला फक्त लग्न करून सासरी पाठवते
शेवटचीच तिला एकदा मनासारखी नटवते
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा
दिराचे हात पिवळे करून अजून जाऊ पण नाही आणली घरी
मी गेल्यावर चूल सांभाळणारी सुगरण असलेली बरी
कामावरून परत आल्यावर आल्ल्याचा चहा लागतो रे ह्यांना
"सांभाळून रहा " म्हणून सांगून तरी येते त्यांना
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा
पिल्लू बघ रे कधीच … दुधासाठी रडतंय
प्रत्येकजण आज कसं त्याच्यावर इतक चिडतय
तुळशीतल्या दिव्याची वात ही संपत आलीये
पिळूच्या पिशवीची शोधाशोध सुरु झालीये
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा
पुन्हा येईन येईन परतून मी , काळजी नको करू
एकदा आत झोपवून येते तिला , उंबऱ्यात वाट बघत बसलय लेकरू
संसार एकट्यान ओढायची नवऱ्याला ताकद देऊन येते
अर्ध्यावरच सोडून आलीये …… थोड आवरून तरी घेते
एखाद्या तासासाठी सोड रे देवा
नाहीत भेटणार कुणी मला परत केव्हा
View Facebook Comments
Really nice poem
ReplyDeleteu r god gifted :)
Thank you Vinayak :)
Delete