आज मराठी भाषा दिवस !
त्यानिमित्ताने आठवणी ताज्या झाल्या . जणू काही कालच घडून गेल्यासारख्या . पण तरीही काही माझ्यापासून फार लांब गेल्यासारख्या
कानातून बाहेर येणाऱ्या गरम वाफा … स्वतःच्याच श्वासाचा ऐकू येणारा आवाज
छातीची धडधड शेजारी बसलेल्या मुलीलाही ऐकू यावी इतकी वाढलेली
घट्ट आवळलेली मुठ !!! चहुबाजूनी स्वतःचंच नाव पुकारल्याचा भास …….
नजर समोर उभ्या असलेल्या माईकवर खिळलेली……. यातून आपलाच नाव घेतलं जाणार असल्याची खात्री .
व्यासपीठावर कुठल्या बाजूच्या पायऱ्यानी चढायचं अगदी हे ही जवळ जवळ ठरलेलं !
पायाच्या बोटांची एक विशिष्ठ हालचाल ,
वर्गशिक्षकांनी वळून पाहिल्यावर खोट खोट हसू ……. जणू काही मी फार relax आहे
:)
हा अनुभव कित्तीतरी वेळा घेतलाय ……… अजूनही घ्यावा वाटतो … हेवा वाटावा असा …. माझी वक्तृत्व स्पर्धा मी फार miss करतेय आज
याची कित्ती बक्षिसं मिळवली याच खरच काही गणित नाही माझ्याकडे . शाळेतील,शाळांतर्गत , संस्थेची , बाहेरील बरीच .
मराठी वक्तृत्व , हिंदी वक्तृत्व , इंग्रजी वक्तृत्व , हिंदी कथाकथन … सगळीकडे दरवर्षी न चुकता प्रथम क्रमांकाची बक्षिसं माझ्याच नावे असायची :)
वार्षिक बक्षिसं वितरण समारंभावेळी मुख्याध्यापकही म्हणायचे "अग , दुसऱ्या कोणाला कधीतरी घेऊ देत जा :)"
हो …… आणि कारणही तसच असायचं . मला त्या दिवशी विद्यार्थिनींच्या रांगेत न बसवता कडेला उभी करायचे ……. शिक्षा दिल्यासारखे . का ? तर म्हणे , तुला सारख जावं लागत व्यासपीठावर . तू आपली बाहेरचं थांब . :)
आणि आमचे शिपाई मामा असायचेच माझ्या मदतीला . माझी बक्षिसं माझ्या त्या चिमुरड्या हातात मावायची नाहीत ना
मी इयत्ता पहिलीत असताना पहिल्यांदा भाषण केल . "माझा आवडता नेता , महात्मा गांधी " .माझ्या काकांनी लिहून दिल होत . वकील आहेत ते पण त्यांच्या कामातून वेळ काढून त्यांनी जर मला त्या दिवशी मदत नसती केली तर कदाचित आज मला हे काहीही मिळवता नसतं आल
त्या दिवसापासून माझी त्या व्यासपीठाशी , माईक शी मैत्रीच झाली . कधी दडपण नाहीच आल . उलट त्या सगळ्याची दिवसेंदिवस चटक लागल्यासारख झालं .
तो टाळ्यांचा कडकडाट मला हवाहवासा वाटायला लागला . समोर बसलेला प्रत्येकजण मला ऐकतोय याचा अभिमान वाटायचा . आई बाबांना वाटणार समाधान माझ्यासाठी लाखमोलाचं होत . ती कौतुकाची वाक्य , डोक्यावरून फिरवलेले हात , प्रेमाची नजर या सगळ्याच्या मी अक्षरशः प्रेमात पडले . हे सगळ मला पुन्हा पुन्हा हव असायचं . प्रत्येक वेळी तो क्षण जिंकल्याचा आनंद नव्याने अनुभवायचा असायचा .
यासाठी आईने काही कमी कष्ट घेतले असतील का …… रात्र रात्र जागायची माझ्या तयारीसाठी . शब्द फेकायची पद्धत , आवाज कुठे चढवायचा , कुठे उतरवायचा , भावनिक प्रसंगी तो थोडा कापलाही पाहिजे , हातांची हालचाल कशी असायला हवी , आपल्या प्रत्येक अवयवचा उपयोग कसा करायचा डोळे, ओठ , तळहात , भुवया कपाळाच्या आठ्या नकाच मुरडण या आणि अश्या बऱ्याच गोष्टी तिने मला शिकवल्या . आरशासमोर उभं राहून तयारी केली की आपल्या चुका आपल्याला दिसतात असं म्हणायची ती . अगदी बरोबर होत ते. मी ऑफिस प्रेझेन्टेशन वेळीही हे उपयोगात आणते . नशीब लागत अशी आई मिळायला . कुणीही घडीव दगड जन्माला घालत नाही . मातीच्या गोळ्याला घडवावं लागत आणि तिने ते अगदी कसोशीने केलं .
कित्ती सही होत ते सगळ ! स्पर्धेआधीची तयारी , उत्सुकता , चढाओढ, मुद्दे लिहिलेला कागद अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत हातासमोर असायचा , वेळेत सगळ संपवायची घाई , वेळेआधी दर १ मिनिटाला वाजणारी बेल , विसर पडवा म्हणून कुणीतरी मुद्दाम खाली सांडलेली कंपास पेटी, त्या नंतरची ती नजरेने सुरु झालेली भांडण
खोट कशाला बोलू ……… भाषण सुरु करण्याआधी सगळीकडे एकवार नजर फिरवायचे …. हे लोक मला टाळ्या वाजवणार याच समाधान . मग हातात हात धरून बेल वाजली कि बोलायला सुरवात . आवाज कापू द्यायचा नाही , हातांची थरथर कोणाला दिसता कामा नये म्हणून ते सगळे हातवारे ……. आणि मला सगळे चिडवायचे "किती भाकऱ्या थापाल्यास भाषण संपेतोवर :) " भीती अजिबात वाटत न्हवती असही नाही काही पण एक बालिश विश्वास ……. माझ्या मावशीने विणलेल स्वेटर मला फार लकी होत अस वाटायचं मला . अजूनही वाटत . कित्तीही कडक ऊन असलं तरीही स्पर्धेदिवाशी मी दिवसभर घालून फिरायचे ते . आणि खिशात आईचा फोटो . तिचा चेहरा आठवला की मला सगळ आपोआप आठवायला सुरु व्हायचं . घरचे सगळे म्हणतात ना मला अजून 'आई माझा गुरु … अमृता हो जा शुरू !!! ' :D
काय पण दिवस होते न ते . स्वतःच्याच प्रेमात पडायचे . आपल्याला शंभर लोकांसमोर न अडखळता बोलत येत हे माझी मला आवडणाऱ्या गोष्टींपैकी एक !
कशाला मोठे झालो ? उगाच लग्नाबिग्नाच्या भानगडीत पडले असं वाटत ना :) लहानपणच मस्त होत . अजून स्पर्धा जिंकाव्या वाटतात , अजून उभ राहावं वाटत त्या व्यासपीठावर . बक्षिसांच्या गठ्ठ्यात अजून बरीच भर करावीशी वाटतेय . आरशासमोर उभं राहून बोलावस वाटत . शेजारचे काहीही म्हणोत .
टाळ्यांचा कडकडाट पुन्हा एकदा ऐकायचा आहे .
आणि प्रथम क्रमांक ……. अमृता जाधव !!!! कान अतुरलेत हे वाक्य ऐकायला
View Facebook Comments
हल्लीची पिढी आपल्या पुढे एक पाऊल आहे असं म्हणतो सगळे आपण . पण माझ्या घरी दोन दिवसांपूर्वी जो अनुभव आला त्यानंतर अजूनही मी पावलच मोजत बसली आहे . किती पुढे गेलीत आमची पिल्ले याचा अंदाजही नाही लागत आहे .
तर झाल अस ………. माझी एक जिवाभावाची मैत्रीण . अश्विनी . आयुष्यात काही माणस कुठल्याही साबबीशिवाय मनात स्थान निर्माण करतत. अगदी मनापासून आवडतात . त्यांपैकी अश्विनी एक . तसं पाहायला गेल तर माझ्याआधी ह्यांची मैत्रीण आहे ती पण आता माझी जास्त जवळची :)
तिच्याही घरी आर्यच्या वयाची एक परीराणी आहे , फारतर ३ - ४ महिन्यांनी लहान असेल त्याच्यापेक्षा . फार गोंडस आहे तीच हे पिल्लू . युक्ता ( अश्विनी , तुझ्या परवानगीशिवाय माझ्या ब्लॉगमध्ये तुमचा उल्लेख केल्याबद्दल तुझी काहीही हरकत असेल तरी माझ्या परीबद्दल मी लिहिणार :) ) तर सांगण्याचा मुद्दा असा की तिने काही दिवसांपूर्वी परीचे ( मी परीच म्हणते तिला ) फोटो अपलोड केले होते फेसबुकला. फोटोमधून का होईना पण मी ही फार दिवसांनी पाहत होते तिला. तितक्यात माझं पिल्लू आल जवळ . आईचा laptop हे त्याच हक्काचं ठिकाण झालाय आता . काही विचारण्यापूर्वी सगळी सूत्र आपल्या हाती घेऊन रिकामा होतो .
तसा दिवसभर त्याच्या प्रश्नांचा भडीमार सुरूच असतो माझ्यावर . तेव्हाही परीचे फोटो पाहून त्याने विचारलं "कोण आहे ग ही ? कोणाचे फोटो पाहते आहेस ?" मी ही त्याला तितकच बालिश उत्तर दिलं "मैत्रीण आहे ती आर्यची. युक्ता !!!!! " बापरे ! त्याला इतका आनंद झाला. त्याच्या या नव्या मैत्रीबद्दल त्याचं पहिलं-वहील वाक्य "माझी मैत्रीण आहे ना . मग ping करू का मी तिला ? "
मी तर पहातच राहिले या हिरोकडे . काय सांगावं ? हो की नाही काहीच कळेना . आईच्या उत्सुकतेपोटी मी विचारलं " काय रे ping करणं म्हणजे काय ? तुला काय कळत ? " . तर अगदी जग जिंकल्याच्या अविर्भावात महाशय उत्तरले "ह्म्म्म …… कळत मला सगळ. तू नाही का तुझ्या मैत्रिणीशी ping करून बोलतेस :) तसच ग …… काय मम्मा तू पण !! " :O
हे घरी आल्या आल्या त्यांच्या कानावर घातला घडला प्रकार मी . ते ही निशब्द . मुलगा मोठा होतोय याची पहिली घंटा वाजली होती आमच्या घरी आज :)
आता या ping च काय घेऊन बसलात …… skype वरून आजीला call लावता येतो याला . फोनमध्ये याच्या पोएमंचा व्हिडीओ सापडेना तर बाबांना सांगत होता म्हणे " YouTube लावा YouTube " तिथेही शोधाशोधीची भानगड नको म्हणून त्याने अजून एक सोपा मार्ग शोधून काढलाय . Google's voice recognition software उघडून कवितेची पहिली ओळ गुणगुणली की लगेच सापडते आपली कविता हे माहीत झालंय आता त्याला . Laptop चे right click , double click हे अनु असे बरेच उद्योग त्याला कळतात याचा मलाही धक्काच बसला . हो ना धक्काच म्हणावं लागतंय आता .
कुणी म्हणेल का हो की हा मुलगा २ वर्षांचा आहे ? म्हणजे प्रामाणिकपणे मान्य करते मी की हे सगळे प्रकार मला दुसऱ्या वर्षी सोडाच पण दुसऱ्या इयत्तेत गेले तरी न्हवते येत . ह्याच्या वयाची इतरही मुलं अशीच आहेत का हो ? म्हणजे काळजीपोटी विचारते आहे हा ……
तसं पाहायला गेल तर हा काही laptopi किडा वैगरे नाही . अभ्यासही वयाच्या मानाने बराच येतो म्हणायला हरकत नाही . दिवसातून जेमतेम ५ मिनिट मिळत असेल त्याला . पण कौतुकाची गोष्ट ही की या मुलांची निरीक्षणशक्ती फार वाढलेली आहे . आई बाबा ही वस्तू हाताळताना काय काय आणि कुठली कुठली बटन दाबतात याची नुसती टूकुटूकू पाहणी चाललेली असते .
निष्कर्षाचा मुद्दा इतकाच ………. हल्लीची मुलं फक्त एक पाऊल पुढे नाहीत तर चांगलं मैलभर अंतर पार केलय यांनी . :) कौतुक वाटत आणि त्यापेक्षा जास्त काळजी :)
आई शप्पथ खर सांगतो रावं
या पोरी कस्सला खातात भाव
तिशी संपून डोक्यावर दिसू लागलीये पस्तीशी
वाटतंय आता थोड्या दिवसात लागेल ही बसवावी बत्तीशी
इतक्या वर्षात कुणाच्याच नजरेत नाही हो भरलो
कांदे पोह्याच्या कार्यक्रमात आम्ही साफ हरलो
गलेलठ्ठ पगाराची भुरळ आता नाही पडत
चारचाकी बघून म्हणतात "असेल अजून EMI फेडत "
आई शप्पथ खर सांगतो रावं
या पोरी कस्सला खातात भाव
onsite असलो तर दहा वेळा करतात visa check
कुणी सांगावं म्हणे हल्ली काय असू शकत fake
कसलं contract आहे आणि राहणार दिवस किती ?
बायकोला कधी घेऊन जाणार ? याचं पश्नांची सरबत्ती
सातासमुद्रापल्याडही सोडला नाही अजून मी शाकाहारी बाणा
अन या म्हणतात , कशाकशाने बाटला असेल रे देवा याचा दाणा
आई शप्पथ खर सांगतो रावं
या पोरी कस्सला खातात भाव
आई वडिलांबरोबर गावी राहिल्यावर ह्यांचा सूर वेगळाच
म्हणे , नवीन संसारात सासूचा कुणी सहन करावा जाच ?
कधीच यांना कळला नाही आभाळाएवढ प्रेम करणारा सासरा
मग कुठला उमजतोय हो , काळ्या मातीने दिलेला आसरा ?
शेतात या राबणार नाहीत अन गोठ्यातही नाही वाकणार
कचकड्याच्या बाहुल्या या , कसा माझा संसार हाकणार ?
आई शप्पथ खर सांगतो रावं
या पोरी कस्सला खातात भाव
शेवटी आज सांगून टाकलं मी कमरेत वाकलेल्या आईला
अजून खेटर झिजवावी लागणार, शोधत अंगणातल्या जाईला
सावळी कांती साधी माय समजावत म्हणाली मला
कुठल्या तुळशीला पाणी घालत बसलीये कोण जाणे ती बया ?
डोळ्यात कोरून काजळ , आईने ठेवली असेल ती चंद्रकोर झाकून
खणखणीत रुपया हवाय मग शोधायला नको का रे बाबा जरा वाकून ?
आई शप्पथ खर सांगतो रावं
माझ्यावरचं उलटला हा डाव :D
View Facebook Comments
सूर्योदय पाहायला मिळण्याइतकं सुख कशातच नाही . या आनंदाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही . फक्त यासाठी सगळी कामं गडबडीने आवरून बसते मी पहाटे पहाटे .
झाडांच्या दाटीवाटीत आपलं छोटस घर
या छानश्या कौलारू घराची टुमदार गच्ची
समोरच्या खिडकीत मिणमिणता दिवा
बसं जोडीला उगवता सूर्य असायला हवा
अंगाला लपेटलेली शाल , श्वासावाटे बाहेर येणारा धूर
कुठेतरी रंग बदलल्याचा भास होतोय क्षितिजावर दूर
सगळीकडे बर्फाची चादर , बाहेर तापमान उणे
अहो सुर्यनारायणाने आत्ताच शृंगार करायला घेतलाय म्हणे
हातात कॉफीचा मग , थंडीने कापणार अंग
या वरच्याची रंगरंगोटी पाहण्यातच डोळे झालेत दंग
क्षणापूर्वी कोपरा अन कोपरा काळोखाने होता भरला
उगवणाऱ्या पहिल्या किरणासमोर आज चंद्रही हरला
वाटत होत… कुठल्या ब्रशमधून असतील निघत हे रंग
इतक्या सुंदर आकाशाला कोण देत असेल अभ्यंग
किरणोत्सवासारखं महालक्ष्मीच्या सगळ उजळतय
ढगाआडून इतक्या पहाटे कोण दिवे पाजळतय
हिऱ्यासारखा चमकतोय बर्फही पायाखालचा
प्रत्येक ढग नवा भासतोय जणू न्हवेच हा कालचा
कितीकिती आणि काय म्हणून साठवून ठेवू या डोळ्यात
कुणी सुगंध भरला या उमलणाऱ्या कळ्यात
दिवसाची सुरुवात बस्स अशी व्ह्यायला हवी
पक्षांच्या किलबिलाटाबरोबर एखादी ओळ आपणही गुणगुणावी
उगवत्या किरणासारखा दिवस सुखाने भरून जावा
अन हा माझा निरोप त्या चित्रकाराला पोहोचायला हवा
View Facebook Comments
" NRI…… अनिवासी भारतीय " हा शिक्का एकदा का तुमच्या कपाळी पडला की लोकांच्या तुमच्याकडे बघण्याच्या नजरा बदलतात . त्याला कारण म्हणजे तुमच्यामध्ये झालेले बदल ,जे मायभूमीवर पाऊल टाकल्या टाकल्या सगळ्यांच्या नजरेत भरतात .
दिवस फार लवकर बदलतात . पूर्वी मैत्रिणीला सांगायला कौतुक वाटायचं " सुट्टीला मामाच्या, मावशीच्या, आत्याच्या घरी राहून आले " . आणि आता …. "सुट्टीला इंडियामध्ये जाऊन आलो " या वाक्यात कौतुकापेक्षा प्रदर्शनचं खचखचुन भरलंय हे लक्षात यायला वेळ लागत नाही . त्यातही भारताचा ' इंडिया ' असा उल्लेख करणं हा पहिला लक्षणीय बदल :)
असो … ज्या तळ्यातील पाणी आपण पितो त्यात जास्त दगडफेक करणं बर न्हवे . उठलेले तरंग आपल्यापर्यंतही येउन पोहोचतील याचं भान ठेवत अनिवासी भारतीय याबद्दलची चर्चा इथेच थांबवू . बाकी आपण सूज्ञ आहात . :)
आज हे सगळ सुचण्याच कारण म्हणजे आईच्या घरून परत येवून आठवडाच झाला ( आईच घर म्हणजे इंडियातून :P ) पण जेवणाची चव अजून नाही गेली जिभेवरची . तश्या आठवणी बऱ्याच आहेत सांगण्यासारख्या आणि सांभाळून ठेवण्यासारख्या पण मला पहिलं आठवेल ते भरलेलं वांग . विमानतळावरून घरी पोहोचायला रात्रीचे ३ वाजले मला त्या दिवशी . आणि इतक्या रात्रीही मी काकुच्या हातचं भरलेलं वांग , मसाले भात , पुरी वर ताव मारत होते . शेवटी जवळ जवळ एका वर्षांनी घराच्या जेवणाची डिश समोर आली होती माझ्या .
घरी आले खरी पण आमचे बाळराजे कुठे झोपायला तयार ? त्याच्या डोक्यात अजून जर्मनीच घड्याळ टिकटिकत होत ना … त्याबरोबर पहिल्या दिवशी सहन न होणारी उष्णता . AC मधून भट्टीत येउन पाडल्यासारखं झालं होत . पिल्ला तर कपडे काढून फरशीवर लोळायला सुरु झालाही . तोवर त्याच्या तळपायाला कुठूनतरी धुळीचा कण येउन चिकटला . "मम्मा शी ……. " साहेब सुरात ओरडले . त्या दिवसापासून पायात चढवलेले बूट त्याने अंघोळी व्यतिरिक्त कधीही काढले नाहीत :)
ह्याच्या रात्रीच्या पराक्रमांची यादी करते न करते तोच सकाळी सकाळी हा मला झाडू घेऊन धावत जाताना दिसला . बाहेर जाऊन पाहीलं तर सनई चौघडे वाले :) गेलेल्या दुसर्याच दिवशी भावाचं लग्न होत माझ्या . आणि माझ्या लेकराला इतक्या शांततेतून गेल्यावर तो गोंगाट सहन होईना . सनईवाल्याच्या मागे झाडूच घेऊन लागला पठ्ठ्या . आता त्याला ओरडावं म्हटलं त्यात त्याची काहीही चूक न्हवती . मलाही आवाजातला फरक लक्षणीय जाणवत होता . लग्नादिवाशी कार्यालयभर हा सगळे कपडे काढूनचं फिरत होता . आणि त्याच्यामागे मी नऊवारी नेसून…… त्याच धोतर हातात घेऊन मागे मागे धावत :)
हे सगळे झाले सुरुवातीचे किस्से पण नंतर एकदम मस्त रमला तो…… घरातल्या सगळ्या बाटल्या, रिकामे डब्बे गोळा करून हा " डब्बा डब्बा " म्हणत डब्बा एक्स्प्रेस खेळायला शिकला . शेजारच्या मुलांचा आवाज आला रे आला की लपंडावसाठी धावायचा. रात्री आजीच्या हाताचं चविष्ट जेवण झाल की हा झालाच सुरू " आजोबा …चला शेकोटी " आणि आजोबाना रोज शेकोटी करायला लावायचा . (जर्मनीत परत आल्यावरही त्याचा हा शेकोटी प्रकार सुरु आहेच . फक्त आग लावत नाही . बाबांचे खराब पेपर बॉल करून रचून ठेवतो :) आणि आई बाबानाही शेकायला बसवतो )
माझं माहेर म्हणजे एकत्र कुटुंब . मुलांना भरपूर मामा मिळाले की ती फार आगाऊ होतात याचा मला प्रत्यय आला . या मामा लोकांनी माझ्या लेकराला पार काहीच्या काही शिकवून सोडला . दुधाचा पेला घेऊन आई येताना दिसली की हा एकदम एका पायावर उडी घेत , टाळ्या वाजवत "कब्बडी कब्बडी " सुरु व्ह्यायचा . मग याला पकडून पकडून मला एक एक घोट पाजवावा लागायचा . आजोबांनी आणलेल्या सायकलची तर त्याने " धूम धूम " करत अगदीच वाईट अवस्था करून ठेवली होती . आता घरचे हौशी म्हटल्यावर रोज हरभऱ्यासाठी आणि वाटाण्यासाठी भाजीवाल्याकडे याच रतीभ सुरु झालं होत .
कौतुक करून घ्यायची एकही संधी सोडली नाही बहादराने. मामाचं लग्न , काकाचा साखरपुडा सगळीकडे याचेच फोटो जास्त .
इथे असताना Autumn त्याने मस्त एन्जोय केला होता . त्याचाच परिणाम की काय , समोरच्या आजीने साठवून ठेवलेला पाचोळा आणि राख याने एके दिवशी डोक्यावर उधळून घेतली . बम्बातील राख कलर समजून मिशा काढून आला . (समोरच्या आजीच या गुलामाने 'बोक्याची आजी ' असं नामकरणही केलं आहे )
खरेदीसाठी बाहेर पडायचं म्हटलं की नको वाटायचं याला . कारण काय तर बस शी असते , रिक्षामध्ये मान डुगडूगु हलते ( खड्ड्यांचा परिणाम हो )…. म्हणे " बाबा मला एरोप्लेन पाठवा " कशाला तर महाद्वाररोड वर जायला :) आता झाली न पंचाईत . ड्रेस खरेदीला गेले तर दुकानातून पळून आला . "मला नको द्रेस. आहेत भरपूर माझ्याकडे " म्हणत . घरी आल्यावर थोड लाडीगोडीने विचारलं तर म्हणतोय कसा "कसलं होत ते शॉप . खेळायला काहीच न्हवत मला . मग कपडे कसले असणार तिथे ?" (जर्मनीमध्ये असलेल्या children's play zone ची सवय झालीये त्याला )
असे बरेच किस्से माझ्या बालकृष्णाचे . जावयाच्या कौतुकाच्या आठवणी , कोल्हापुरी तांबडा पांढरा आणि बरचं काही
सगळंच छान छान आणि गोड वाटतंय पण टेन्शन एकाच गोष्टीचं आहे . परत भारतात आल्यावर या माझ्या पिल्लाला सेट व्ह्यायला किती दिवस जातात कोणास माहीत ????
View Facebook Comments