कळसातील पाणी

लग्न म्हणजे हजार प्रथा … विधी . त्यातील एक म्हणजे कळस … तसं पाहायला गेल तर बोहल्यावर चढणाऱ्या मुलीच्या अंगावर २ वेळा हे कळसातील पाणी पडत . एक म्हणजे लग्नाच्या आधी एक दिवस … हळदीच्या वेळी आणि दुसर म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी …. सासरी 

लहानपणी पडणाऱ्या बालीश प्रश्नांपैकी हा एक प्रश्न … का घालत असतील नवरी मुलीला कळसात पाणी ? आणि ते ही  २ वेळा ??  
पण म्हणतात ना …… अशा गोष्टींचा अर्थ लागायला कळसातील पाणी पडाव लागत डोक्यावर 

खरच या सगळ्या प्रथा नुसत्या प्रथा नाहीत तर त्या मागे फार मोठा अर्थ असतो . बस , तो अर्थ कुरवाळून समजावून सांगणारी एक आई नशिबाला असावी लागते . जी मला लाभली . 

इतके वर्ष न राहवून ' तो ' बालीश प्रश्न शेवटी मी तिला विचारला … माझं लग्न ४ दिवसांवर असताना . टपोऱ्या डोळ्यात पाणी आणून पदराची सावली देत जवळ घेऊन तिने जे मला सांगितल ते आयुष्यभर असं च्या असं मनात साठून राहील माझ्या :)

डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत आई बोलत होती 

देव जेव्हा प्रत्येकाच्या नशिबात प्रेम वाटत असतो तेव्हा ज्याच्या झोळीत तो मुठभर प्रेम जास्त घालतो त्याला मुलीचा जन्म मिळतो . मुलीला जन्मजातच सगळ्या गोष्टी २ - २ मिळालेल्या असतात . २ घर , सासू म्हणजे आई आणि सासरा म्हणजे बाबा , म्हणून २ आई बाबा , लाडक्या दिरासारखा अजून एक मित्र , नणंदे सारखी मैत्रीण  . मग इतक्या सगळ्या गोष्टी २ असताना कळसातील पाणी एकच कस असेल ??

पहिला कळस माहेरचा. आईच बोट धरून चालशील … शेवटच …. उद्यापासून नवऱ्याच बोट धरून चालायचं  , पाहिलं पाणी आईच्या अंगावरून ओघळून मुलीच्या अंगावर पडत . 

ते पाणी तिला सगळ्या जुन्या गोष्टी पदरात बांधून घ्यायला सांगत आणि उरल्या सुरल्या कळसात सोडून जायला सांगत .

  

- आईची माया पदराच्या टोकाला बांधून ने …. सासरच्या उंबऱ्यावर ही गाठ सोडून मग आत प्रवेश कर , अंगणापासून तुझ्या प्रेमाची लयलूट होऊ दे 

- ज्यांच्या बोटाला धरून पाहिलं पाऊल टाकलस त्या बाबांचे लाड मुठीत गच्च मिटून सांभाळून ने .  सासरी कधी एकटी पडलीस तर ही मुठ तुला कधीही एकट सोडून जाणार नाही . डोळ्यातलं पाणी पुसायला बाबाचा हात पुढे येईल 

-  बहिणीची माया कमरेला गुंडाळून ठेव . मणका दुखेतोवर काम करताना तिच्या गोंडस आठवणी भार हलका करायला कामी येतील 

-  बंधुराज तुझ्यापेक्षा धाकटा असला तरी तुझ्यापेक्षा मोठा होवून आजवर तुझी सावली सुद्धा सांभाळली . त्याचा मोठेपणा मुंडावळ्या सोबत कपाळाभोवती गाठवून घे . घराच्या ४ भिंती एकत्र ठेवायला तुलाही कधीतरी मोठ व्हावं लागेल . मोठेपणाने बरच काही पोटात घ्यावं लागेल , बरच काही विसरावं लागेल . तेव्हा होईलच की  आठवण भावाची …. तुझा शब्द कधीही नाही मोडला त्याने 

- बाकी राहिलं ते चिंचेच्या झाडाखालच बालपण, कैरीच्या फोडेसाठीची भांडण , सायकल शिकताना मैत्रिणीने आधारासाठी दिलेला हात, आजी सोडून गेली तेव्हा मन मोकळ करायला दिलेला तिचा खांदा , तुझ्यासाठी जागवलेल्या रात्री आणि बरच काही ……. जे सगळ आज या कळसातल्या पाण्याबरोबर वाहून जाईल . इथेच सोडून जाव लागेल तुला हे सगळ

दुसरा कळस सासरचा , लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पाणी नवऱ्याच्या अंगावरून ओघळून तुला भिजवेल 


   
ते पाणी तुला सगळ सगळ नव्याने करायची शक्ती देईल . नव घर उभ करायची ताकद देईल 

- नवऱ्याच्या प्रेमाने चिंब भिजशील तरच सगळ पेलता येईल .  

- दिराच्या सुखासाठी बाप्पाकडे रोज मस्तक टेकव.  हिरव्या चुड्याच्या किणकिण आवाजासाहित तो तुझे मोकळे दिवस परत आणून देईल  

- नणंदेच्या गप्पांसाठी तुझी दुपार राखून ठेव . बघ …. सगळा क्षीण निघून जाईल 

- सगळ्याच सासवा खाष्ट नसतात ग . . . कळसातल्या पाण्याने जड झालेली साडी तुला हेच सांगेल . आता कामाचं वजन वाढलाय वहिनीसाहेब …. नीरी सांभाळून पाऊल टाका . वाट दाखवायला ही माउली कधीही तयार असेल 

- आणि सासरा म्हणजे तुझ हक्काच लाडाच अकाउंट. मुलगी म्हणून घरात घेतील आणि प्रत्येक वेळी बापाच्या मायेने पाठीशी घालतील   

:)

दोन्ही कळसात चिंब भिजलीस तरच संसारात चांगली मुरवतीची होशील :) आणि हो … कळस उचलताना तुझ्या अंगाला त्याचा स्पर्श नाही होऊ द्यायचा 
आपल कोंदण आपण जपायचं … आपल्या माणसासाठी :) 

View Facebook Comments


पोस्टशंभरी


ही पोस्ट वाचण्याआधी एक विनंती … या पोस्टमधील " निळ्या रंगातील शब्द " reference link म्हणून वापरले आहेत. हे शब्द म्हणजे या ब्लॉगवरची एक कविता …. जवळपास सगळ्या कवितांची शीर्षके माळून ही पोस्ट लिहिली आहे .  एक छानशी गोष्ट . संबंधित कविता वाचण्यासाठी कृपया reference link ( blue letters ) वर click करा .       



आजची ही पोस्ट म्हणजे मी मजल दरमजल करत गाठलेला पहिला टप्पा …. या ब्लॉग वरची माझी शंभरावी पोस्ट . तुमच्या या अखंड प्रेमाबद्दल धन्यवाद :)

तश्या माझ्या कवितांनी हा आकडा कधीच पार केलाय म्हणा माझ्या डायरीमध्ये. तरीही … तुमची दाद मिळालेली ही शंभरावी.  
पण ही शंभरी नाकी नऊ आणणार अस वाटतंय कदाचित . म्हटलं १०० वी पोस्ट म्हटल्यावर काहीतरी खास लिहावं .काहीतरी सुरेख…कविता जमली पाहिजे …. माझ्या ब्लॉगच सेलिब्रेशन मी नाही करणार तर कोण ? पण म्हणतात ना …. काहीतरी ठरवून लिहायला बसल की शब्द रानातल्या पाचोळ्यासारखे सैरभैर उडून जातात . कुठेच काही गुंफता नाही येत. 

सरस्वतीसमोर मांडी घालून, लेखणी घेऊन बसताना जर तुम्ही वहीच्या पानाच्या डोक्यावर विषय कोरून बसलात तर कितीही वेळ तिची आराधना करा …. पान कोर ते कोरंच राहील :) . त्याऐवजी रिकाम्या मनाने बसून लेखणीतून उमटेल ते लिहित जावं …. अप्रतिम निर्मिती झाल्यावाचून राहणार नाही. आणि हे माझ शंभराव पान … पहा , अजूनही कोर :)

शंभरी म्हटली की ब्लॉग ची काय आणि माणसाची काय …… सगळ गणित एकचं . आकडे १ पासूनच  सुरु होत १०० पर्यंत पोहोचणार . म्हणजे असं ….   

आई चिमुकल्या पावलांची वाट पहात असते.  " फक्त एकदा येऊन जा " म्हणत बाळाच्या बोबड्या बोलांसाठी आतुर झालेली असते . आणि ती प्रतिक्षा संपते तब्बल ९ महिन्यांनी . जखमा कशा सुगंधी झाल्यात म्हणत आई सगळ्या वेदना अगदी धैर्याने सहन करते . पोटातला जीव " माझाच कुणीतरी " असतो ना तिच्यासाठी . :) . 

आई म्हणून घडताना …. " काय काय होत हे तेव्हाच जाणवत . हातात येत ते कन्यारत्न . बघता बघता " एक वर्ष झालं " तिला . " बाबा आज राहू दे office " म्हणणारे निरागस भाव चिमुकल्या डोळ्यात दाटलेले . आजी आजोबा खेळायला नाहीत म्हटल्यावर बाप्पाच्या पायरीवर रांगत जाऊन " आजी आजोबाना माझ्या तू लग्गेच घरी पाठवून दे " ही विनवणी करायची … " तिला इतकंच कळत " :)
  
या आणि अशा बर्याच तिच्या त्या बालिश आठवणी 

मुलगी नाशिबवानाच्या घरी जन्माला येते म्हणतात .मुलगी म्हणजे … विश्वनिर्मात्याला पहाटेच्या साखरझोपेत एक सुंदर स्वप्न पडाव … अशी निर्मिती … पण तरीही " मुलगा असते तर … " अस वाटतच हो कधीतरी कारण मुलगी म्हणजे " निखारा "  आणि हे कधी कळत ?? जेव्हा ती एकाच वेळी दोन जिवलग मित्रांना आवडते  " अशीच एक भावना , जिला शब्दच फुटत नाही " आणि समोर उभा राहतो तो Propose Day 

हे झाल पहिल्या कन्यारात्नाबद्दल.  

आता बायको आई झाली म्हणून  पन्नाशी  थोडीच गाठली  लगेच ? " तो आणि त्याची सौ … " दोघांचेही सोनेरी दिवस आत्ता कुठे सुरु झालेत ." सगळ किती सहज पेललस " म्हणत तो ही तिची दाद देतो .  एक दिवस जरी त्याच्याशिवाय काढायचा म्हटला कि लग्गेच " तुझ्याशिवाय …. " !!!! अस वाटत न अजून तिला. आणि एखाद गुलाबाचं फूल " बघ माझी आठवण येते का " हे सांगायला
जाता जाता तीच हे वाक्य " मुडकर न देखना " आणि मग रात्रभर दोघांचीही " आज झोपच आली नाही " अशी अवस्था ठरलेली . आता तुम्हीच सांगा " काय राव … हे काय बर आहे ". 

" तसं पाहिलं तर " अहो " I miss my college days "म्हणतच दोघांच्या संसाराची सुरवात झाली. दोघे एकाच कॉलेजचे म्हटल्यावर या लवस्टोरी मध्ये " तू मात्र अशीच " ही तक्रार करत एखादी " बालमैत्रीण " तिला सोडून गेली तर त्यात नवल ते काय ? अहो ते दिवसच मंतरलेले " पाहिलं प्रेम कस विसरायचं ? ". साठवलेल्या ओल्या चिंब भेटी " आठवतंय तुला ? "  म्हणत म्हणत 
  
आनंदाने भरलेल्या अंगणात " ओठावरच हसर गाण … देठासहित खुडून दिलस म्हणावं असा एक सखा ज्याचे आयुष्यभर धन्यवाद मानले तरी थोडेच . त्या सख्याच्या प्रेमात ती … प्रेम म्हटलं कि चंद्र आलाच पाहिजे की हो सोबतीला " चंद्राबरोबर तू ही हवा होतास " अस कितीतरी वेळा वाटत . आणि आजूबाजूचा प्रत्येकजण मग विचारत राहतो " प्रेमात कुणी पडलंय का ? ". मग " भावनांचा गुंता " अगदी अपेक्षितच. नको वाटते ही माणसांची गर्दी… " सगळ्यांपासून दूर ", " चंद्रालाही दूर लोटत " " सुटत चाललेली वीण " ओवायला पहिली की एकाकी रात्री " चांदण मुक्याने बरसत " आणि नेमक त्याच वेळी " कुणीतरी पाहत " :)

बर …. हे झाले जुने दिवस जुन्या आठवणी 
आणि आत्ता … कन्यारत्नाला एक वर्ष झाल रे झाल की त्याच onsite आ …… वासून उभ राहत त्यांच्या समोर … तो जातो …ही  इथेच …… :(  " Being a mother " चा रोल पुरेपूर निभावत  

" त्याच्या श्वासातला एक अखंड श्वास बनून " इतके दिवस त्याचा  " पारिजात " " स्पर्श " अनुभवल्यावर तिला त्याची रोजच " आठवण होते ". अराशासामोरच तिचं ते " एकाकी देखणेपण " आणि डोळ्यात धारा पण " वाहायचं थांबेल … तर पाणी ते कुठल ? "

छोट छोट पिल्लू आईला सांगत " Distance does't matter " मम्मा :) .आपण " एरोप्लेन " नवीन आणू .  बाबा रे " या आईला खरच नाही कळत काही " बघ एकदा कसे " साचलेत डोळ्यात तिच्या कोपर्यावाराचे ढग  
हि आणि अशी बरीच समजावयाची चिमुकली वाक्य . मग आईने कौतुकाने जवळ ओढल कि म्हणायचं " अग बाई … तुझाच आहे मी , कशाला उगाच भितेस ? "

" डोळ्यातले थेंब " बघून " ब्लॉग रायटिंग " वाली मैत्रीण विचारते " कशी आहेस ग ? " . यावर तीच ओलं चिंब उत्तर : संध्याकाळी शुभंकरोती " म्हणायला बसल तरी तिला " हल्ली तो मला देवळात दिसतच नाही ". काय करू ? " हल्ली हे असच होत हो "

सगळ अंगण आनंदाने भरल तरीही प्रत्येकाकडे " माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा " असतोच नेहमी आणि वाईफची " हाउसवाईफ " होता होता " सुटून गेलेले क्षण " परत आले तरी  " आता काय कामाचे ? "  

ही गोष्ट अशीच चालू राहील …. पुन्हा कधीतरी बोलू 
फार लिहावस वाटतंय … " तरीही आज ठरवलंय " बस … इथेच " The End च पोस्टर " लावायचं आणि ही नऊ महिन्यांपासून सुरु झालेली ही पोस्ट " सराणावरच्या मरणा " पर्यंत येउन शंभरी पूर्ण करायची :)

धन्यवाद !

आईची पन्नाशी

Specially for my Aai on her 50th birthday :)

बाबा अजून मोगऱ्याचा गजरा तिच्या वेणीत माळतात 
केसांच्या कुरळ्या बटा आजही तिच्या गालांवर खेळतात 
बांगड्यांची किणकिण … गणपती स्तोत्रापेक्षा पवित्र वाटते 
अंगणातली जाई आजही तिच्या अंगाईने पाकळ्या मिटते
उंबरातरी कुठे जागा होतो तिच्या हळदी कुंकवाच्या बोटांशिवाय
वृन्दावनातल्या तुळशीलाही तिच्याच ओंजळीच अर्घ्य हवय    
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?  
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही 

हौसेखातर सुनेच्या, गौरीचा खेळ आजी अजून अंगणात मांडते 
आईच्या हाकेने बहिणाबाई आमची अजून दुधाचा पेला सांडते :P 
कपाळावरच कुंकू ती अजूनही तितक्याच कोरून लावते
नातवालाही अंघोळ घालताना ती पूर्वीसारखाच पदर खोवते
बायको , सून , वाहिनी , आई वरून आता ती आजी झाली 
तरीही तिच्या चेहऱ्यावर एक सुरकुती नाही आली   
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?  
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही 

काजळ कोरते डोळ्यात … वाटत आजही ढग दाटून येतील 
तिची माती सुगंधायला पुन्हा सरी भेटून जातील  
ओठावरच्या तिळाने तिची रोजचं द्रुष्ट निघते 
आरसा कशाला लागतो तिला …. सगळ्यांच्या डोळ्यात ती दिसते 
मंगळसुत्राच्या वाट्यांची आजही करते पूजा 
तसूभरही प्रेम तिचं अजून नाही झालं वजा 
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?  
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही 

कोल्हापुरी साजावर आजही मनापासून भाळते 
रम्मीचा डावही अजून त्या एका पेप्सीसाठीच खेळते :)
दंडातल्या बाजुबंदासाठी चाललाय गेली २५ वर्षे हट्ट 
म्हणते " वाढवून घ्या हो तोळ्याभराने, झालाय आता घट्ट "  
लग्नातला परकाळा ही जपलाय लॉकरच्या कप्प्यात खाली 
म्हणे …. सासरी जाताना माहेरपण जपतील यातच माझ्या मुली
(खरंच …. माझ्या लग्नात मी आईचा २५ वर्षापूर्वीचा शालू आणि परकाळा घेतला होता )   
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?  
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही 

View Facebook Comments