आजी आजोबाना माझ्या तू लग्गेच घरी पाठवून दे

आबांच्या देवबाप्पा ... तुला रोज मोदक देतो 
फक्त सांग, तुझ्या घराचा रस्ता कुठून येतो ?
आई म्हणते उंच उंच ढगात तुझं घर
हातात माझ्या येऊ दे .. मला लवकर मोठ कर 

कित्ती वेळा रे सांगायचं तुला, मोठ्ठा मोठ्ठा पाऊस पाड
तुझ्या घराच दार दडलंय या काळ्या ढगाआड 
मोठी मोठी तलवार (वीज) येउ दे, चम चम करत 
म्हातारीच्या गडगडाटाला घाबरणार नाही मी परत   

म्हणे...तुला आवडणाऱ्या सगळ्यांना तू घेऊन जातोस 
खरं सांग , माझ्या आजी आजोबानाही तुझ्यातले एक एक मोदक देतोस ?
आवडत असतील तुला पण मग मी काय करू ?
कुणाच्या बोटाला धरून मी बागेमध्ये फिरू ?

तुझ्या देव्हार्यातली साखर ही, म्हणेन मी आज राहू दे 
आजी आजोबाना मात्र माझ्या तू लग्गेच घरी पाठवून दे 
वाट पाहत असतील ना ते, माझ्याशी खेळलाय ?
मलाही लागलाय रे आता माझ्या आजी च्या मनातल कळायला  

आजी माझी ओरडल्यावर , बाप्पा तू पण  रडतोस ?
सोन्डेसमोरची दुधाची वाटी रोज न पितास सोडतोस 
आजोबांच्या डोळ्यांना घाबरत जा कधीतरी 
जवळ घेतात आजोबा माझे , कित्ती असतील चिडले तरी 

वाट बघतोय मी, चान्दोमामाच्या उशीवर डोकं ठेवून 
लवकर लवकर स्वप्नात ये , त्या दोघांना घेऊन
बक्षीस म्हणून माझे डूल, तुझ्या मोठ्या मोठ्या कानाला
कसं सांगू आठवण येते 
कारण..
स्वप्नात रोज शिकवते ती मला "आजी आजोबा " म्हणायला 
 
 View facebook comments

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)